Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Asha Bhosle : आपण स्वतःच लिहिलेल्या कॅब्रे सॉन्ग वर हे गीतकार का नाराज होते?
एक काळ असा होता जेव्हा सिनेमातील कॅब्रे सॉन्ग असतील किंवा बोल्ड गाणी असतील ती गाण्याची कम्प्लीट जबाबदारी आशा भोसले यांच्यावर असायची. विशेषतः सत्तरच्या दशकांमध्ये जेव्हा हिंदी सिनेमामध्ये क्लब डान्स सॉंग्स मोठ्या संख्येने येऊ लागले तेव्हा आशा भोसले यांच्या अशा प्रकारच्या गाण्यांची संख्या वाढू लागली. लता मंगेशकर यांच्याकडे मात्र कायम नैतिकदृष्ट्या चांगली असलेली गाणीच त्यांना गायला मिळायची. आशा भोसले यांनी एकदा पंचमकडे हि तक्रार देखील केली होती! अर्थात याला काही अपवाद देखील होते. पण आशा भोसले यांचा व्हर्सेटाईल व्हाईस असल्यामुळे त्या कुठल्याही प्रकारचं गाणं जाऊ शकायच्या.

रसिकांनी सुद्धा आशाच्या सर्व प्रकारच्या गाण्यांवर विलक्षण प्रेम केलं. त्यामुळे गाणं रोमँटिक असो, गझल असो, कव्वाली असो, मुजरा असो, लावणी असो,भाव गीत असो वा भक्ती गीत, सॅड सॉंग असो किंवा कॅब्रे सॉन्ग… आशा भोसले लिलया सर्व प्रकारची गाणी उत्तम रीतीने गात असायच्या. अलीकडेच त्यांनी एका वेब पोर्टल ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या एका गाजलेल्या गाण्याचा किस्सा शेअर केला होता. हे गाणं १९७१ साली आलेल्या नासिर हुसेन यांच्या ‘कांरवा’ या चित्रपटातील होते. या गाण्याचे गीतकार मजरूह सुलतानपूरी मात्र हे गाणं लिहिल्यानंतर प्रचंड नाराज झाले होते आणि ‘मी अतिशय घाणेरडे गाणं लिहिलं आहे’ अशा प्रकारचे ते पश्चाताप दग्ध झाले होते. तसं त्यांनी आशा भोसले यांच्याकडे बोलून देखील दाखवले होते. मजरूह सुलतानपुरी आपल्याच गाण्यावर का नाराज होते आणि कोणतं होतं ते गाणं? मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे.

निर्माता दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी जितेंद्र आणि आशा पारेख यांना घेऊन ‘कांरवा’ हा एक म्युझिकल हिट सिनेमा १९७१ साली प्रेक्षकांपुढे आणला होता. या सिनेमातील एकूण आठ गाणी होती आणि सर्व प्रचंड लोकप्रिय झाली होती. चित्रपटातील सर्व गाणी मजरूह सुलतानपूरी यांनी लिहिली होती तर संगीत आर डी बर्मन यांचे होते. या चित्रपटात आशा भोसले आणि आर डी यांच्या स्वरात ‘पिया तू आप तो आजा …’ हे गाणं होतं. चित्रपटातील हे कॅब्रे सॉंग होतं आणि हेलनवर हे चित्रित झाले होते.
================================
हे देखील वाचा : Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!
================================
कॅब्रे नंबर असल्यामुळे गाणं फडकतं व्हायलाच हवं होतं त्या पद्धतीने राहुल देव बर्मन यांनी जबरदस्त ट्यून तयार केली आणि त्यावर मजरूह सुलतानपूर यांनी गाणे लिहिले. गाणे लिहिताना ते थोडेसे नाराज झाले होते कारण यातील शब्द! आणि या शब्दांवर आशाचा मादक आवाज आणि त्यावरची हेलनची कामुक दिल खेचक अदा. अर्थात यामुळे गाणं नक्कीच लोकप्रिय होणार होतं पण मजरूह सुलतानपूरी यांना मात्र आपण खूप व्हल्गर , घाणेरडे शब्द यामध्ये वापरले आहेत असं वाटलं. ‘मैने बहुत गंदा गाना लिख दिया है…!” असं त्यांना वाटत होतं. इकडे आर डी आशा नासीर हुसैन गाण्याच्या शब्दावर खूष होते. गाण्याच्या रिहर्सल झाल्या. गाण्याच्या रेकॉर्डिंग दिवस ठरला.

सर्वजण रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जमा झाले. पुन्हा एकदा आशाच्या स्वरात फायनल रिहर्सल सुरु झाली. आता गाण्याचा फायनल टेक सुरू होण्याची वेळ झाली. रेकॉर्डिंग स्टुडीओत मजरूह अस्वस्थ होते. ते आशा भोसले यांच्याकडे गेले आणि त्यांच्याशी बोलू लागले. आशा ने विचारले,” काय झालं?” त्यावर ते म्हणााले, “आशाजी , मैने बहुत गंदा गाना लिख दिया है मेरी लडकिया जवान होने के बाद गाना सुनेगी तू मुझे कितना शर्मिंदा होना पडेगा! मुझसे बडी गलती हो गई!” त्यावर आशा भोसले म्हणाल्या,” दादा, जमाना बदल रहा है. हमे जमाने के साथ बदलना होगा. आपने कोई गंदा वंदा गाना नहीं लिखा है. आपने बहुत अच्छे तरीकेसे गाना लिखा है. ये गाना बडा खूबसूरत होगा और बरसो तक लोग इसे याद करेंगे” पण गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचं काही समाधान झाले नाही ते रेकॉर्डिंग स्टुडिओतून निघून गेले!
आशा आणि आरडी यांची चर्चा झाली, गाणं तर रेकॉर्ड करायचंच होतं. आशाने आपल्या फुल एनर्जीने हे गाणं गायलं. गाणं जबरदस्त झालं होतं, आर डी बर्मन प्रचंड खूष होते. गाण्यांमध्ये अनेक इन्स्ट्रुमेंटचा अतिशय सुंदर वापर केला होता. या गाण्यात आर डी बर्मन यांनी देखील ‘मोनिका ओ माय डार्लिंग….’ हा आवाज दिला होता. एकूणच हे एक फडकतं गाणं झालं होतं. चित्रपटात हे गाणं हेलन यांनी मोठ्या जोशात पडद्यावर सादर केलं.
================================
हे देखील वाचा : अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!
=================================
चित्रपटात इतर देखील गाणी जोरदार होती पण या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. आशा भोसले यांना या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. आशा भोसले यांनी त्या मुलाखतीत सांगितलं ,” नंतर काही सामाजिक संघटनांनी या गाण्याच्या विरुध्द अश्लील गाणे म्हणून कोर्टात अपील केलं होतं. काही काळ या गाण्यावर आकाशवाणीवर बंदी देखील आली होती. त्या काळात अशी मर्यादित काळाची बंदी माझ्या अनेक गाण्यांवर आली होती. ‘हरे रामा हरे कृष्णा’ या सिनेमा तील ‘दम मारो दम’ या गाण्यावर देखील काही जणांचा आक्षेप होता. खरंतर हे गाणं ड्रग्स आणि हिप्पी संस्कृतीच्या विरुद्ध होतं पण तरीही काही काळासाठी या गाण्याला आकाशवाणीने बॅन केले होते!” ‘पिया तू अब तो आजा’ या गाण्याची लोकप्रियता बघून कदाचित गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा विरोध मावळला असावा. ‘पिया तू अब तो आजा…’ हे गाणं आशा भोसले यांच्यासाठी सिग्नेचर सॉंग बनलं आणि त्यांच्या टॉप टेन गाण्यांमध्ये याचा समावेश झाला!