Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Asha Bhosle : तरुण आहे रात्र अजूनी…
दोनच वर्षांपूर्वीची गोष्ट. वांद्र्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आशा भोसले यांचा आम्हा सिनेपत्रकारांशी संवाद. निमित्त आशा भोसले यांच्या दुबईतील कार्यक्रमाची माहिती देणे. आशाजींसोबत सुदेश भोसले वगैरेही हजर. आशाजींचा उत्साह तरुणांना लाजवणारा. आपण कोणती गाणी गाणार आहोत याबाबत त्या अतिशय मनमोकळेपणाने सांगताहेत. अशातच पूनम धिल्लॉन आपल्या मुलीसोबत येते आणि आशाजी ‘यह वादा रहा’ या चित्रपटातील ‘यह वादा रहा’ हे गाणे गुणगुणतात. एक लक्षात रहावा असाच हा लाईव्ह अनुभव. याच वेळेस भेटलेले सुदेश भोसले सांगत होते, आपण अनेक वर्ष गातोय तर आपल्याला रिहर्सलची गरज नाही असे अजिबात न करता आशाजी आजही पूर्ण रिहर्सल करुनच गायनाच्या कार्यक्रमास सज्ज होतात. त्यांचा उत्साह अतिशय दांडगा असतो, त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे…. तर वर्षभरापूर्वीच विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातील आशा भोसले यांचे दिलखुलास भाषण असाच एक सुखद अनुभव. आशाजींची प्रचंड उर्जा व सकारात्मक दृष्टिकोन कौतुक करावा तेवढा थोडाच.

अशीच एक साधारण चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबईतील एका ट्रॅव्हल कंपनीने आपल्या व्यवसाय वृध्दीचा भाग म्हणून ‘कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आशा भोसले यांचे संध्याकाळपासून रात्रीपर्यंत गायन ‘ अशा भव्य दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करताच काही दिवसांतच सगळी तिकीटे हाऊसफुल्ल झालीदेखिल यात आश्चर्य वाचण्याजोगे काही नव्हतेच . आता कदाचित तुम्हाला वाटेल, इतक्या वर्षांनंतर आशा भोसले यांना अनेक गाणी तोंडपाठ असतील आणि शोच्या वेळी त्या सहज गातील. त्यांनी तसे केले असते तर त्यात काहीच आश्चर्य नव्हतेच. पण आशा भोसले काही वेगळ्याच. त्यांनी सर्वप्रथम कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कोणती मराठी व हिंदी गाणी योग्य ठरतील त्याची तयारी केली. मग वादक आणि अन्य गायकांसोबत रिहर्सल सुरु केली. आणि मुंबईजवळच पनवेल येथे असलेल्या या शोच्या स्पाॅटची माहिती मिळवली. काही कारणास्तव ती जागा निश्चित करता आली नाही. म्हणून कर्जत येथील विस्तीर्ण अशा एन. डी. स्टुडिओच्या भव्य प्रांगणात, अतिशय मोकळ्या आणि हवेशीर वातावरणात हा शो करायचे ठरले. देश विदेशातील कधी बंदिस्त तर कुठे ओपन थिएटरमध्ये आशाजींनी गायनाचे अनेक कार्यक्रम रंगवलेले आणि रसिकांना विलक्षण तृप्त केलेले. आणि त्यात स्वतःदेखील गायनाचा मनापासून आनंद घेतलेला.

मला आठवतंय, आम्ही काही पत्रकार मित्रांनी एका गाडीतून वेळेपूर्वीच जाणे पसंत केले. अहो, आशाताई भोसले यांना तीन साडेतीन तास प्रत्यक्षात गाताना ऐकायचे होते ना? बरं त्या ‘एक गाणे झाले की दुसरं असे यांत्रिकपणे गात नाहीत ‘ याची कल्पना होती. ते त्या गाण्याचे व्यक्तिमत्व आपल्या शैलीत साकारतात आणि आपण ज्या नायिकेसाठी पार्श्वगायन केले ती डोळ्यासमोर उभे करणार ही त्यांची खासियत. आशाजींच्या अगदी साडीच्या निवडीपासून त्यांचा टच लक्षात येतो. गाता गाता सहज संवाद साधणे, एकादे मार्मिक मिस्कील वाक्य बोलणं, छान बोलणं हसणं, अर्थपूर्ण पाहणे, सूचक नजर टाकणे असं करत करत कार्यक्रम लाईव्ह ठेवतात तर लवकर जाऊन तशी सगळाच स्टेज दिसेल अशी जागा पटकावणे आवश्यक होतेच. हा कधीच न संपणारा अनुभव घ्यायचा होता. पत्रकारीतेने मला असे बरेच चांगले अनुभव दिले. ते तुम्हा रसिकांना सांगण्यात एक आनंद असतो.
====================================
हे देखील वाचा : Famous Studio आता पडद्याआड चालला!
====================================
एन. डी. स्टुडिओचा छान परिसर, मोकळे आकाश, आणि आशा भोसले एकेका गाण्यासह जुन्या आठवणीत नेताहेत असा झक्कास अनुभव. आशा भोसले यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा देताना आजही आपण त्याच कार्यक्रमात आहोत आणि आशा भोसले दिलखुलास गाताहेत, त्या गात असतानाच त्यांनी पार्श्वगायन केलेल्या अनेक नायिका, सहनायिका, खलनायिका डोळ्यासमोर येत आहेत. एकाच लेखात मावणारा हा विषय नाही. आशाजींनी मराठीसह चौदा भाषांत गायन केले आहे. गाण्यांची संख्या बारा हजारपेक्षा जास्त . आणि त्या प्रत्येक भाषेचा अर्थ त्यांनी आपल्या गाण्यात परफेक्ट पकडलाय. गाण्याचा आत्मा, भावार्थ त्यांनी कायमच महत्वाचा मानला. गाण्याचे व्यक्तिमत्व आपल्या गाण्यात उतरवले. पार्श्वगायन कसे असते, असावे, कसे शिकावे, कसे आत्मसात करावे हे आशाजींकडून आवर्जून शिकण्यासारखे.
आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात “माझा बाळ” या चित्रपटातील ‘चला चला नव बाळा ‘ या गाण्यापासून केली. संगीत दत्ता डावजेकर यांचे आहे. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर सुरय्या, नूरजहा, लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यांना उत्तम मागणी. लता मंगेशकर तर भगिनी.

आशाताईंना संधी मिळणे अवघड होते. या गायिकांच्या चलतीच्या काळात अथवा वातावरणात राहून, गाऊन, आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे, स्वतःला सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशाताईंपुढे होते. ते त्यांनी आपली प्रतिभा, मेहनत, कसब, कौशल्य यांच्या गुणांवर साध्य केले. हिंदीतील त्यांनी गायलेल्या गाण्यांचे मुखडे त्यांच्या अष्टपैलुत्वाची ओळख करुन देतात. आईये मेहरबान (हावडा ब्रिज), मेरा कुछ सामान (इजाजत), दम मारो दम (हरे राम हरे कृष्ण), चुरा लिया है तुमने जो दिल को (यादों की बारात), इन ऑखों की मस्ती ने (उमराव जान), उडे जब जब जुल्फे तेरी (नया दौर), छोड दो ऑंचल जमाना क्या कहेगा (पेईंग गेस्ट), अच्छा जी मै हारी (काला पानी), हाल कैसा है जनाब का (चलती का नाम गाडी), आधा है चंद्रमा रात आधी (नवरंग), देखने मे भोला है (बम्बई का बाबू), भंवरा बडा नादान है (साहिब बीवी और गुलाम), नदी नाले ना जायो श्याम (मुझे जीने दो), इशारो इशारो मे (कश्मीर की कली), चैन से हमको कभी (प्राण जाऐ पर वचन न जाऐ), तनहा तनहा यहां पे जीना (रंगीला)…. आशा भोसले यांची हिंदी चित्रपटातील गाण्याची रेंज यातून ‘ऐकायला’ मिळतेय. प्रत्येक गाणे वेगळे. विविध मूडची. पाश्वगायिका एक. अष्टपैलूत्वाबद्दल ख्याती असणाऱ्या.
आशा यांनी मराठीत गायलेल्या गाण्यात संगीतकार सुधीर फडके यांच्याकडे गायलेली गाणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. किती नको असं होऊन जाते, सांग तू माझा होशील का?( लाखाची गोष्ट), नाच नाचुनी अती मी दमले, तुला पाहते रे तुला पाहते (जगाच्या पाठीवर), काल मी रघुनंदन पाहिले (सुवासिनी), ही रात चांदण्याची (गरीबाघरची लेक), जो जो गाई कर अंगाई (हा माझा मार्ग एकला), लिंब लोण उतरु कशी (एकटी). आशा भोसले यांनी एका सुधीर फडके यांच्याबद्दल मुलाखतीत म्हटलयं, फडकेसाहेबांनी एकदा मला सुनावलं, की सूर सुटला तरी चालेल पण शब्द चुकता कामा नये. आता दु:ख हा शब्द बघा. गाताना ‘दु’वर जोर देऊनच शब्द बाहेर आला पाहिजे. गाताना चित्र म्हटलं तर काय होतं? पण नाही तो अगदी जोर लावूनच ‘चित्र’ असा आलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह. पण यामुळे आशा भोसले यांना मराठी गाण्यात सूर सापडला असे म्हटले जाते. चित्रपट संगीत संस्कृतीचा इतिहास असा खोलवर व अनेक लहान लहान गोष्टींसह आहे.
================================
हे देखील वाचा : Bollywood Gossips : घटस्फोट हाच मार्ग? वेगळेही राहता येते….
=================================
आशा भोसले यांच्या क्षमतेबद्दल ‘खरोखरच शब्द अपुरे पडतात’. कोरोनाच्या काळात त्या लोणावळ्याला होत्या. पण आराम करताहेत, छान हवेत रमल्यात, जुन्या आठवणीत रमल्यात असे मुळीच नव्हतेच. ‘वय हा त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त एक आकडा आहे’. तेव्हाच त्यांनी स्वतः यू ट्यूब चॅनल सुरू केले, त्यात काही जुन्या आठवणी व्यक्त केले, पण नवीन आवाजाला त्यांनी आवाहन केले आणि जगभरातून त्यांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालादेखिल. नवीन आवाज त्यांनी ऐकला हा त्यांच्यातील खूप वेगळा गुण आहे. विशेष म्हणजे आजही त्यांना कामाचा कंटाळा नाही. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कट्ट्यावर त्या आल्या तेव्हा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना दोन तास वाट पहावी लागली, पण त्या अजिबात कंटाळल्या नाहीत. अगदी दिवसभर थांबायची आपली तयारी होती, आपल्याला काम करायचेच आहे तर थांबायला काय हरकत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आशा भोसले यांच्यावर ‘एक लेख लिहिणे म्हणजे फक्त वाळूचा कण आहे. खूपच मोठी यशस्वी मेहनती वाटचाल आणि त्यातील विविधता. मराठी आणि हिंदी चित्रपट गीते झालीच, अन्य भाषेतील चित्रपटांसाठी पाश्वगायन एकीकडे तर दुसरीकडे भावगीते आणि अनेक प्रकारची गैरफिल्मी गाणी. पण त्यानी मोजून मापून काम केले आहे अथवा नवीन विक्रम प्रस्थापित करण्यासाठी त्या गायल्या/ गातात असे अजिबात नाही. ती त्यांची वृत्ती नाही. आपल्या कामाचा भरभरून आनंद घेत इतरांनाही तो द्यावा अशा मोकळ्या ढाकळ्या स्वभावाच्या त्या आहेत. अतिशय गप्पिष्ट असा त्यांचा स्वभाव आहे. एकदा त्यांचा दौरा सुरु होण्यापूर्वी पेडर रोडवरील प्रभू कुंज या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीचा योग आला असता. त्यानी सांगितलेल्या गोष्टींतील काही आवर्जून सांगतो,
फार पूर्वी एकेका चित्रपटाचे एकेका गाण्याचे रेकॉर्डिंग म्हणजे खूप मोठा आणि प्रत्येक वेळी वेगळा अनुभव असे. एकेका गाण्यासाठी सिटींग होत, गाण्याची चित्रपटातील जागा, त्या गाण्याचे स्वरुप, कोणावर ते चित्रीत होणार आहे अशा अनेक लहान मोठ्या तपशीलाचा विचार केला जाई, अनेक तास सिटींग चाले, त्यातच अनेक चाली सुचत, विविध कारणास्तव त्या नाकारल्या जात आणि मग एक निश्चित केली जाई. प्रत्यक्ष रेकाॅर्डिंगच्या वेळी त्या चित्रपटातील कलाकार आवर्जून हजर रहात. आम्हा गायकानाही आपले गाणे पडद्यावर साकारणारी अभिनेत्री प्रत्यक्षात कशी बोलते याचा आलेला प्रत्यय आम्हा गायकाना गाण्यात वापरता येई आणि आम्ही नेमके कसे गायलोय, कुठे चढ उतार घेतले हे त्या अभिनेत्रींनी प्रत्यक्षात अनुभवल्याने त्याचा उपयोग त्या आपल्या अभिनयात करीत. त्यामुळे पूर्वीची अनेक गाणी आम्ही गात नसून ती व्यक्तिरेखा आणि ती अभिनेत्री गातेय असेच वाटते. यामागे अशी अनेक छोटी मोठी कारणे आहेत. तसेच त्यावेळी सगळा वाद्यवृंद्य एकसाथ वादन करे आणि आम्ही गायक त्यासह गात असू. रिहसर्लचा त्यासाठी फायदा होत असला तरी अनेक रिटेक होत. सगळ्याना परफेक्शनचा ध्यास असे. सर्व पातळीवर मेहनत घेतल्याने तेव्हाची गाणी आजही लोकप्रिय आहेत.
आशा भोसले यांच्या बोलण्यात अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. आशा भोसले यांनी चित्रपट गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या बदललेल्या पध्दतीचाही कालांतराने अनुभव घेतला. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘रंगीला ‘ (१९९५) निर्मितीवस्थेत असतानाची गोष्ट. आशा भोसले या चित्रपटातील एका गाण्याच्या रेकाॅर्डिंगसाठी चेन्नई ( तेव्हाचे मद्रास) येथे गेल्या. रेकॉर्डिंग स्टुडिओत पोहचल्यावर त्यांच्या लक्षात आले की, एकही वादक हजर नाही. असे कसे झाले? गाण्याचे रेकॉर्डिंग म्हणजे अनेक प्रकारच्या वादनासह वादकांचा प्रचंड ताफा हवा. त्यांना इतकीच सूचना मिळाली की “हे गाणे अशा अशा पध्दती”ने (मूडने/शैलीने) गायचे आहे. ‘एक नवीन अनुभव ‘ असे मानतच त्या गायल्या आणि मुंबईत येऊन आपल्या कामात व्यग्र झाल्या. काही दिवसांनी ‘रंगीला ‘ची गाण्याची ध्वनिफीत प्रकाशित झाली आणि आशाजीनी गायलेले तेच गाणे त्यांनी ऐकले आणि त्या अवाक् झाल्या. त्या गाण्यावरचा संगीत साझ आणि त्याची उच्च तांत्रिक मूल्ये ‘ऐकून ‘ त्या गुणगूणू लागल्या.

‘तनहा तनहा यहां पे जीना यह कोई बात है….’, त्या काळात आशाजी आपल्या ‘लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आणि मुलाखतीत हा अनुभव अतिशय रंगवून खुलवून सांगत आणि संगीतकार ए. आर. रेहमानला दाद देते. गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या या पध्दतीशी ए. आर. रेहमानने आपल्या प्रतिभेने जुळवून घेतल्याचे त्याना विलक्षण कुतूहल आणि कौतुक असे. योगायोगाने ‘रंगिला’ ( रिलीज ८ सप्टेंबर १९९५) तीस वर्षे पूर्ण झाली आहेत, पण या गाण्यातील आशाजींच्या आवाजाची जादू पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. आशा भोसले यांनी महेश कोडियाल दिग्दर्शित ‘माई’ (२०१३) या चित्रपटात शीर्षक भूमिका साकारलीय. या चित्रपटात राम कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली तेव्हा त्यांचे प्रत्यक्षातील वय ७९ इतके होते तर ही भूमिका अल्मायझर झालेल्या ६४ वर्षांच्या स्रीची होती. गायन असो वा अभिनय यात सोपे असे काहीच नाही असे त्यानी यावेळी मत व्यक्त केले होते. तर आजच्या चित्रपट गीतामधून एक्सप्रेशन मेलडी ( गाण्याचा भावार्थ) पूर्णपणे हरवला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक गाण्याला आपलं एक व्यक्तीमत्व असते आणि तेच आज नेमके हरवले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आशा भोसले यांच्या करियरचा वेध घ्यायचा तर एक महामालिका तयार करावी लागेल, तरीही त्यात काही कमतरता राहिल. इतके आणि असे अफाट कर्तृत्व आणि प्रतिभा असलेले हे कायमच मनाने तारुण्यात असलेले व्यक्तिमत्व आहे. ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’ ( तिसरी मंझिल), ‘दिल चीज क्या है मेरी’ (उमराव जान), ‘मेरा कुछ सामान’ (इजाजत) ही तीनही गाणी एकाच गायिकेची आहेत यावर पटकन विश्वास बसू नये, पण ती आशा भोसले यांनीच गायलीत ही वस्तुस्थिती आहे, यातच त्यांच्या गायिकीची रेंज, त्यावरचे प्रभूत्व लक्षात येते. आणि आपल्या जगभरातील अनेक देशांत स्टेज शोजमध्येही त्या संपूर्ण स्टेजवर आपल्या व्यक्तिमत्व आणि उत्फूर्त गायनाचा प्रभाव दाखवतात, अशी त्यांची वैशिष्ट्ये वाढत वाढत जाताहेत….
आशा भोसले यांची मराठीतील वाटचालीबद्दल बरेच सांगता येईल. संगीतकार वसंत पवार यांच्या ‘बाळा जो जो रे ‘ या चित्रपटातील आठपैकी सहा गाणी, तर ‘तू सुखी रहा’ या चित्रपटातील सहाही गाणी आशा भोसले यांची आहेत. शिवलीला (सहा गाणी), चिमणी पाखरं (चार), स्री जन्मा तुझी कहाणी (सात), पुनवेची रात (आठ), सांगत्ये ऐका (सहा), साता जन्माचे सोबती (पाच). संगीतकार वसंत पवार आणि आशा भोसले यांनी लक्षवेधक धडाका लावला. राम कदम यांच्या संगीतात नाचू किती लाजू किती (सुगंधी कट्टा), घुंगरु आज कशी रुसली (सुगंधी कट्टा), मीच गेले जवळ त्याच्या (वऱ्हाडी आणि वाजंत्री), सांगू कसं मी तुला (पतिव्रता), आले अमृत घट घेऊन मी (राजमान्य राजश्री) इत्यादी गाणी त्यांनी गायली आणि अतिशय प्रतिष्ठित अशा राज्य चित्रपट महोत्सवात त्यांनी एकूण अठरा वेळा पुरस्कार पटकावले हे आवर्जून सांगायला हवे.

१९६२ साली महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार महोत्सवाला सुरुवात झाली आणि पहिल्याच वर्षी ‘मानिनी ‘ या चित्रपटासाठी आशा भोसले यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार आशा भोसले यांना प्राप्त झाला. त्यानंतर ‘रंगल्या रात्री अशा’ (१९६३), संथ वाहते कृष्णामाई (१९६७), आम्ही जातो आमच्या गावा (१९६८), अपराध (१९६९), धाकटी बहिण (१९७०), घरकुल (१९७१), सुगंधी कट्टा (१९७४), हा खेळ सावल्यांचा (१९७६), बाळा गाऊ कशी अंगाई (१९७७), महानंदा (१९८४), पुढचं पाऊल (१९८६), बंदीवान मी या संसारी (१९८८), कळत नकळत (१९८९), चौकट राजा (१९९१), एक होता विदूषक (१९९२), रंगल्या रात्री अशा (१९९५), राजू (२०००).
तर, ‘जगाच्या पाठीवर’ मधली त्यांची गाणी हा तर अनमोल ठेवाच आहे. दुसरीकडे ह्रदयनाथ मंगेशकर यांच्याकडचा त्यांचा क्लास काही वेगळाच. ‘सखी गं’, ‘दिन कैसे रजनी’, ‘मी मज हरपून’ (शेवटच्या ताना निव्वळ भान हरपून टाकणाऱ्या), ‘जिवलगा राहिले दूर’, ‘तरूण आहे रात्र’ मधला ‘गाऽऽऽऽर वाऽऽरा’ वरची हरकत एकदमच भारी..आपले वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची आशाबाईंनी गायलेली नाट्यगीतं हाही एक मोलाचा ऐवज आहे. ‘युवती मना’, ‘कठीण कठीण कठीण किती’, ‘मधुमिलनात या’ अशा या नाट्यगीतातल्या दाणेदार ताना आणि हरकती अचंबित करणाऱ्या…..गाण्याखेरीज आशाबाईंचा छंद म्हणजे पाककला. त्या एक अप्रतिम कुक आहेत हे सर्वांना माहीत आहेच. आपल्या मुलाखतीतून त्यांनी ते सांगितलयं. याच छंदाचे त्यांचा धाकटा मुलगा नंदू (आनंद भोसले) याने यशस्वी व्यवसायात रूपांतर केले. ‘आशाज’ नावाची रेस्टॉरंट्सची साखळीच दुबई, कुवेत अशा काही देशांत आहे. तिथल्या शेफ्सना आशाबाईंनी स्वतः ट्रेनिंग दिले आहे. आज आशाबाई दुबईला आपलं दुसरं घरच मानतात ते यामुळेच. हे प्रगती पुस्तक एवढ्यावरच थांबत नाही. त्या ‘नाच रे मोरा’ गात असताना जी पिढी बालवयात होती, तीदेखील आता म्हातारी झाली. पण आशाबाईंना वार्धक्य अजून शिवलेले नाही. म्हटलं ना, आशाजींबाबत सांगावे तेवढे थोडेच म्हणून.
आशा भोसले यांनी गायलेल्या विविध मूडची गाणी अनेक अभिनेत्रींनी पडद्यावर साकारलीत. त्यातील जयश्री गडकर यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेली आशा भोसले यांची काही गाणी सांगायची तर, सुख आले माझ्या दारी, थंड थंड अशी हवा (आलिया भोगासी), बुगडी माझी सांडली ग (सांगत्ये ऐका), बहुरुनी ये अणु अणु (अवघाची संसार), वनवास हा सुखाचा, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं दोर (मानिनी), गेला हटकून बाई भरल्या बाजारात (रंगपंचमी), आभाळ फाटलेले टाका कुठे मी भरु (वैजयंता), आज गूंज सांगते तुला (बाप माझा ब्रह्मचारी), सासरच्या घरी आले माहेरा माहेरा (वैशाख वणवा), प्रिज तुज काय दिसे स्वप्नात (जिव्हाळा), चढाओढीने चढवित होते (लाखात अशी देखणी)….
ग. दि. माडगुळकर, मधुसूदन कालेलकर, जगदीश खेबूडकर, योगेश, कवि संजीव, गंगाधर महाम्बरे, डॉ वसंत अवसारे, बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोघे यांच्या चित्रपट गीते कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजुनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती – अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’.ही लावणी, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली उत्कट हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ची छान गोडी, सगळेच भन्नाट आणि पुन्हा पुन्हा ऐकावे तर तीच गोडी आणि ओढ. पुन्हा पुन्हा ऐकावयास हवेच अशीच आपण रसिक श्रोत्यांची भावना.

नाच रे मोरा, आईए मेहेरबाँ, दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत), जिवलगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांज ये गोकुळी, जानम समझा करो, मागे उभा मंगेश… ही ‘रेंज’च अफाट आहे, हा आवाकाच अविश्वसनीय आहे. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीते, प्रेमगीत, विरहगीते, भक्तीगीत, नाट्यगीते, गझली, लावण्या, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई तेवढ्याच ताकदीने गायल्या आहे. गाण्याला व्यक्तिमत्व दिलयं. एवढे यश, मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या उत्कट, संवेदनशील कलाकार. जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी (सहगायक, संगीतकार, गीतकार, सहवादक, स्टुडिओतील कर्मचारी… इत्यादी) या गोष्टी न विसरणाऱ्या, किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणाऱ्या आशाताई ह्या एक ‘संवेदनशील माणूस’ आहेत.
================================
हे देखील वाचा : Ramesh Sippy यांचे ‘न आलेले चित्रपट’ ही मोठेच
=================================
आशा भोसले यांच्याबद्दल सांगावे तेवढे थोडेच. गदिमा-यशवंत देवांचं ‘उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी’, ‘सिंहासन’मधलं सुरेश भटांचं ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’, बहिणाबाईंचं ‘अरे खोप्यामंधी खोपा सुगडिणीचा चांगला’, खेबुडकरांचं ‘सतीचं वाण’ मधलं किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला’, ‘फटाकडी’तलं शांताराम नांदगांवकरांचं ‘लोणावळा, खंडाळा , कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा नि काश्मीरला, कुठं कुठं जायाचं हनीमूनला’, पडद्यावर रेखाने विलक्षण ठसकेबाजपणे साकारलेय, हेमंतकुमार यांच्यासोबतचं सुधीर मोघेंचं ‘हा खेळ सावल्यांचा’मधलं ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, पी. सावळाराम यांचं ‘भालू’मधलं ‘गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन’, सुधीर फडकेंसोबत गायलेलं खेबुडकरांचं ‘पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला’, भटांचं ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’, शांता शेळके यांनी रचलेलं ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’, भा. रा. तांबेंचं वसंत प्रभूंच्या संगीतातील बाबुजींसोबतचे ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’,…..आशा भोसले यांच्या मराठी गाण्यांची कायमच आपल्याशी साथसोबत.
जेव्हा ‘नाच रे मोरा ‘ हे गाणं आपण ऐकतो तेव्हा बालपणीच्या किती तरी आठवणींचे मोर आपल्या सभोवती नाचल्याशिवाय राहात नाहीत. ही भावना सुखावून टाकते. प्रेमसुलभ भावना व्यक्त करायच्या असतील तर ‘मलमली तारुण्य माझे’ हे गाणं अगदी जवळचं वाटतं. प्रत्येक तरुण पिढीची हीच भावना आहे. आशाताईंच्या आवाजातला तब्बल सात दशकांहून अधिक काळ आशाताईंच्या स्वरांनी रसिकांच्या काळजात कायमचे स्थान मिळवलं आहे. वडील पंडित दीनानाथ मंगेशकरांकडूनच गाण्याचं बाळकडू घेतलेल्या आशाताईंनी आपल्या स्वतंत्र गायनशैलीने स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं. त्यांना जितकं गाणं आवडतं तितकंच क्रिकेटही. आणि क्रिकेटपटूंच्या भेटीगाठी घेणेही आवडते. त्यांना मंत्रोच्चार ऐकायला आवडतात. त्यात त्यांना विलक्षण मानसिक शांती मिळते. अनेकदा तरी त्यांनी अनेक विशेष कार्यक्रमात विशिष्ट रंगाची, काठाची पैठणी नेसण्यात विशेष आनंद घेतलाय. त्यांच्या या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वामुळेच त्या लोकप्रिय ठरल्या. पुण्यातील तुळशीबाग आणि जुन्या नाशिकांत तांब्याची जुनी भांडी खरेदी करण्याची त्यांची अनेक वर्षांची हौस कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. मुंबईत (पूर्वी पेडर रोड आणि आता वरळीत) असताना अनेकदा तरी माहिमच्या मच्छी मार्केटमध्ये त्या आपण सेलिब्रिटीज आहोत हे पूर्णपणे विसरुन मासे खरेदी करतात. अशा सार्वजनिक जीवनातून त्यांना एक प्रकारची उर्जाच मिळते आणि त्याला सपोर्ट सिस्टीम त्यांच्या प्रवासाच्या आवडीची. असे त्यांचे लहान मोठे गुण सांगावेत तेवढे थोडेच.
================================
हे देखील वाचा : Ramesh Sippy यांचे ‘न आलेले चित्रपट’ ही मोठेच
=================================
विशेष उल्लेखनीय गोष्ट, एकाच गायिकेच्या गळ्यात स्वरांचे नानाविध अलंकार असणं हे दुर्मीळच. आशाताईंच्या गाण्यात कुठेही जनरेशन गॅप जाणवत नाही. त्यांनी कायमच स्वतःला कालसुसंगत अर्थात आजच्या पिढीतील ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या सतत नवीन पिढीशी जोडल्या गेल्या आणि त्या प्रत्येक नवीन पिढीलाही त्या आपल्याश्या/ आपल्यातील वाटतात. ग्रामोफोन रेकॉर्डपासून गाणी ऐकण्याच्या आणि मग पाहण्याच्या अनेक पध्दती आल्या त्यात लता मंगेशकर व आशा भोसले ही नावे कायम. ध्वनिमुद्रिका, ध्वनीफित, दूरचित्रवाणी, चित्रफित ( व्हिडिओ कॅसेट), व्हिडिओ अल्बम, उपग्रह वाहिनी, मोबाईल रिंगटोन व काॅलरट्यून, कॅम्युटर, लॅपटॉप, यू ट्यूब, ओटीटी असा त्यांचा बदलत्या माध्यमातून यशस्वी व चौफेर उल्लेखनीय असा प्रवास आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त आशा भोसले यांना ब्याण्णव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. भारतीय चित्रपट संगीत, भावगीते, सुगम संगीत यात आशा भोसले यांच्या गायनाचा बराच मोठा वाटा आहे. त्यांच्याबद्दल सांगावे तेवढे थोडेच ही त्यांची सर्वात मोठी मिळकत. पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!