अशी ही बनवाबनवी ३६ पूर्ण !
अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्या अंधेरी (पश्चिम)तील घरी जाण्याचा योग आल्यावर दरवाजा उघडला गेल्यावर उजव्याच बाजूला “धनंजय माने येथेच राहतात” वाचताना पटकन माझ्या डोळ्यासमोर “अशी ही बनवाबनवीचा” (Ashi Hi Banwa Banwi) आजही सुरु असलेला प्रवास येतोच…
आज या कायमच तारुण्यात राहिलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनास चक्क छत्तीस वर्ष पूर्ण झाली देखिल…. २३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झालेल्या धमाल मनोरंजक चित्रपटाचा मुद्रित माध्यमे ते डिजिटल आणि सिंगल स्क्रीन थिएटर्स ते मोबाईल स्क्रीन असा झक्कास प्रवास सुरु आहे…
मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील माझ्या मनसोक्त, मनमुराद भटकंतीमधील काही आठवणी या इतक्या ताज्या रसरशीत आणि जणू काल परवा घडलेल्या गोष्टीसारख्या आहेत ना की त्या आठवल्या तरी मी त्या जुन्या आठवणीत रमतो. अशीच भारी आठवण व्ही. शांताराम प्राॅडक्सन्स (युवा विभाग) निर्मिती संस्थेचा किरण शांताराम निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित “अशी ही बनवाबनवी” (Ashi Hi Banwa Banwi). पटकथा व संवाद लेखन वसंत सबनीस यांचे. या चित्रपटाच्या मनोरंजनात त्यांचा महत्वाचा वाटा. मार्मिक मिस्कील खुमासदार संवाद ही या चित्रपटाची खास बात. सर्वच कलाकारांनी उत्तम टायमिंग साधून रंग भरला.
पहिल्याच दिवशीचा प्लाझा चित्रपटगृहातील “बनवाबनवीच्या” प्रीमियरमध्ये मी आजही वावरतोय असेच मला वाटतंय. असा तो लाईव्ह होता.
मुंबईतील आम्ही चित्रपट समीक्षकांनी बाल्कनीत सर्व कलाकार आणि पाहुण्यांसोबत हा चित्रपट एन्जॉय केला, सिनेपत्रकार म्हणून माझ्या चौफेर प्रगती पुस्तकातील ही उल्लेखनीय नोंद. त्या काळात मराठी चित्रपटाचे प्रीमियर हे प्रामुख्याने आमच्या गिरगावातील सेंट्रल, लालबागचे भारतमाता आणि दादरचं प्लाझा अथवा कोहिनूर या चित्रपटगृहामध्ये व्हायचे. वृत्तपत्राच्या जाहिरातीत म्हटले जाई, आज सायंकाळी प्लाझा चित्रपटगृहात कलाकार व पाहुण्यांसोबत या चित्रपटाचा भव्य प्रीमियर.
…..पिक्चर हाऊसफुल्ल असे आणि मराठी कलाकार पहायला थिएटरबाहेर ही गर्दी. प्रीमियरचा मूड मस्त राही.
बनवाबनवीच्या सेन्सॉर प्रमाणपत्रला पब्लिकने दिलेली दादच सांगत होती, पिक्चर पब्लिकपर्यंत पोहचलाय. (या प्रीमियरचा स्टाॅल आणि अप्पर स्टाॅलच्या पब्लिकने तिकीट काढून गर्दी केलेली) आणि पिक्चर जस जसा पुढे सरकला रंगत वाढत वाढत गेली.
फर्स्ट डे फर्स्ट शोचा पब्लिक रिपोर्ट भारी म्हणजेच पिक्चर सुपर हिट हे त्या काळातील जणू बॅरोमीटर. खरं तर त्या काळात आम्हा चित्रपट समीक्षकांची परीक्षणे प्रसिद्ध झाल्यावर सोमवारपासून मराठी चित्रपटाची गर्दी वाढे आणि पहिल्या तीन दिवसाच्या रसिक प्रेक्षकांच्या माऊथ पब्लिसिटीची त्यात भर पडे. (Ashi Hi Banwa Banwi)
बनवाबनवी तोपर्यंत एक क्रेझ बनला आणि आता प्लाझासह सगळीकडे पिक्चर हाऊसफुल्ल. मनसोक्त मनमुराद हसण्यासाठी रसिक पुन्हा पुन्हा येत (असा रिपीट ऑडियन्स चित्रपटाला कायमच पूरक ठरे). चित्रपटाचा रंगभूषाकार मोहन पाठारे याचा खास उल्लेख हवाच. त्याने “चेहरे” छान रंगवले तर छायाचित्रणकार राम अल्लम यांनी कॅमेऱ्यातून करामत केली. विशेष गोष्ट प्लाझा चित्रपटगृहातील या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे उत्पन्न आसाम आणि बंगालच्या पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले. (चित्रपटाच्या जाहिरातीत तसे म्हटले होते.)
त्या काळात चित्रपट समीक्षेखाली आम्ही समीक्षक स्टार देत नसे. लक्षवेधक शीर्षकच भारी ठरे. ते चित्रपटाच्या जाहिरातीत वापरले जाई. कालांतराने इंग्रजी वृत्तपत्रातील स्टार देण्याची पध्दत मराठीत आली. वृत्तपत्राचा शुक्रवारचा अंक म्हणजे, मनोरंजनाच्या दोन अडिच पाने जाहिराती. नाटक, चित्रपट, वाद्यवृंद या प्रत्येकाला रसिकांसमोर राहायचंय आणि त्यात सतत नवीन भर पडतेय.
अशा वेळी आपली कलाकृती प्रेक्षकांसमोर ठेवायची तर? पहिल्या शुक्रवारपासून पन्नासाव्या आठवड्यापर्यंत बनवाबनवी (Ashi Hi Banwa Banwi)ची प्रत्येक शुक्रवारी दोन काॅलम जाहिरात. हा फंडा बाॅम्बे पब्लिसिटी सर्विसचा. आणि वार शुक्रवार असो वा रविवार. अगदी मधला का असेना त्या काळातील मराठी चित्रपटाच्या जाहिरातीत मस्त कॅचलाईन असे..त्या आवर्जून वाचल्या जात आणि त्यामुळेही चित्रपट रसिकांसमोर राह्यचा. त्यात सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्राचे प्रतिबिंबही पडे. ते दिवसच वेगळे होते. (अनेक चांगल्या गोष्टी हद्दपार झाल्यात, त्यात हीदेखील)
प्लाझा आणि पुण्यासह अन्य शहरात पंचवीस आठवडे झाले आणि परेलच्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत एका सायंकाळी रौप्य महोत्सवी सोहळा. चित्रपती व्ही.शांताराम यांची विशेष उपस्थिती. त्यांनी बनवाबनवी (Ashi Hi Banwa Banwi)च्या संपूर्ण युनिटचे मनापासून कौतुक केले. चित्रपटातील सगळे कलाकार, तंत्रज्ञ, काही चित्रपटगृहांचे प्रदर्शक आणि आम्ही सिनेपत्रकार अशा सगळ्यांचा जणू हा आनंद मेळा. त्या काळात चित्रपट सुपरहिट म्हणजे असे सेलिब्रेशन आलेच. एकमेकांना भेटण्याची मस्त संधी.
….. सव्वीसावा आठवडा
…… सत्ताविसावा आठवडा
…… अठ्ठावीसावा आठवडा
……. एकोणतीसावा आठवडा
असे करत करत पन्नासावा सुवर्ण महोत्सवी आठवडा सुरु.
तोपर्यंत अनेक फिल्म दीवान्यांनी किमान चार पाच वेळा तरी बनवाबनवीसाठी प्लाझात पाऊल टाकले आणि प्रत्येक वेळेस फ्रेश होऊन बाहेर पडले. आपल्या देशात चित्रपट व क्रिकेट एक प्रकारच्या टाॅनिकचे काम करतात. सुवर्ण महोत्सवी यशाचा सोहळा जणू कालच झाला असा मला आठवतोय…
किरण शांताराम यांनी या सेलिब्रेशनसाठी जुहूतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याचे आयोजन केले आणि त्याच्यासाठी विशेष उपस्थिती चित्रपती व्ही.शांताराम आणि दिलीप कुमार. भारतीय चित्रपट सृष्टीच्या वाटचालीतील दोन मोठे तपस्वी. आदर्श व्यक्तिमत्व. आधारस्तंभ. भारतीय चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत त्यांचा बहुमूल्य वाटा. तसेच सहभाग.
एकाच सोहळ्यात ते देखील मराठी चित्रपटाच्या सोहळ्यात आपल्याला ते ऐकायला मिळणार, पाहायला मिळणार हे माझ्यासाठी तरी विलक्षण थ्रिल होतं. कधी एकदा ती संध्याकाळी येते आणि जुहूच्या त्या पंचतारांकित हॉटेलमधील स्विमिंग पूलाच्या बाजूला मी पोहोचतोय असं मला झालं होतं. संध्याकाळ झाली आम्ही सिनेपत्रकार वेळेपूर्वीच पोहचलो. मला आजही आठवते माझ्यासोबत त्यावेळेला लोकसत्ताचे शरद गुर्जर होते. त्या काळात सचिन पिळगावकर अतिशय आवर्जून शरद गुर्जर यांना विलक्षण आदराने भेटे. त्यांचे परीक्षण वाचल्याचे आवर्जून सांगे हे मी अनुभवलय.
….या सोहळ्यात सगळे कलाकार हजर होतेच. सगळ्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद. अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, निवेदिता, प्रिया बेर्डे, सुशांत रे… एकाच सोहळ्यात इतक्या जणांच्या भेटीगाठी. एकदम झक्कास अनुभव.
….चित्रपती व्ही.शांताराम आणि दिलीप कुमार ह्या दोघांची भाषण प्रभावी झाली हे पुन्हा वेगळे सांगायला हवे काय? या चित्रपटाच्या यशाचा तो एक मानाचा तुरा. हा सोहळा आणि त्यातील भेटीगाठी याला भरपूर कव्हरेज मिळालेच. सिनेमा तरुण होता आणि यशही खणखणीत, त्यामुळेच तर किती लिहू नि किती नको असे झाले (त्या काळातील कलाकार आपल्या चित्रपटाची परीक्षणे नि आपल्याबद्दल काय प्रसिद्ध झालेय हे वाचत. त्यामुळे लिहिण्यात जबाबदारी वाढे.)
ते मुद्रित माध्यमाचे दिवस. ते आजही कायम आहेत. नव्वदच्या दशकात उपग्रह वाहिनी आल्या. आता डिजिटल मीडिया. या संपूर्ण वाटचालीमध्ये काही गोष्टी कायम राहिल्या. “अशी ही बनवाबनवी” (Ashi Hi Banwa Banwi) उपग्रह वाहिनीवर वारंवार पाहिला जाऊन सुद्धा त्याच्याविषयीचे आकर्षण कायम. पिंक साडी आणि धनंजय माने इथेच राहतात का आणि इतर काही दृश्यांवर कधी मुलाखतीत प्रश्न, कधी रिल्स, तर कधी मिम्सही. या सगळ्यातून बनवाबनवी लॅण्डलाईन फोनच्या काळातून स्मार्ट फोनच्या काळात पोहचला देखिल. त्यात भर लोकप्रिय गीत संगीत व नृत्याची.
अनेक चित्रपटांचे अस्तित्व व आपलेपण याच गाण्यांनी कायम ठेवलयं. सुधीर मोघे आणि शांताराम नांदगावकर यांच्या गीतांना अरुण पौडवाल यांचे संगीत आणि गाणी आपल्या ओठांवर आहेतच, बनवाबनवी अशी ही बनवाबनवी, ह्रदयी वसंत फुलताना, चांदण्यात न्याग हिला, ही दुनिया मायाजाल… माझ्या कलेक्शनमध्ये या चित्रपटाचे बुकलेट आणि बरीच छायाचित्रे आहेत. सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्त्री वेश आणि अशोक सराफ अश्विनी भावे यांचे काही गमतीदार प्रसंग कायमच सुपर हिट. आजही या चित्रपटातील कलाकारांच्या मुलाखतीमध्ये आवर्जून या चित्रपटाची आठवण विचारली जाते ( मुलाखतकर्त्यांपेक्षा या चित्रपटाचे वय जास्त आहे हेही विशेषच.) अर्थात अथवा या चित्रपटाबद्दल काही प्रश्न केला जातो. एकदा सुपरहिट ठरलेला चित्रपट कायमच सुपरहिटच असतो.
============
हे देखील वाचा : एक दिवसाचे नाटक आहे का हो?
============
आज एकदम अचानक काही वर्षांपूर्वीचे हिंदी चित्रपट पुन्हा पुन्हा प्रदर्शित होत आहेत (साठ व सत्तरच्या दशकात रिपीट रन व मॅटीनी शोचे कल्चर मस्त स्थिरावले होते.) मला वाटतं (नि तुम्हालाही वाटत असेलच) अशी ही बनवाबनवीला छत्तीस वर्ष पूर्ण होत असतानाच त्याच पद्धतीने हा चित्रपट पुन्हा थाटामध्ये प्रदर्शित झाला तर नक्कीच त्याला हाउसफुल गर्दी होईल. आतापर्यंत अनेकदा पाहूनही हा चित्रपट एन्जॉय केला जाईल.
हा छत्तीस वर्षाचा मोठा कालखंड कधी सरला हे मात्र समजले नाही हे या चित्रपटाचं मोठं यश म्हणता येईल. काही चित्रपट थिएटरमधून गेले तरी “मनाच्या पडद्यावर” कायम असतात. “अशी ही बनवाबनवी” (Ashi Hi Banwa Banwi) तसाच. आठवला तरी चेहर्यावर हसू उमटते. आजच्या गतिमान, भाववाढ, गर्दी आणि स्पर्धेच्या युगात ते आवश्यक आहेच.