‘या’ एका घटनेनं अशोक मामांना वक्तशीर बनवलं…
अशोक सराफ यांची पंच्याहत्तरी बघता बघता आली. बघता बघता अशासााठी की तीन वर्षापूर्वी त्यांनी ‘व्हॅक्युम क्लिनर’सारखं नाटक करायला घेतलं. निर्मिती सावंत आणि अशोक सराफ (Ashok Saraf) हे दोन तगडे कलाकार या नाटकात होते. त्यावेळी आपला ७२ वा वाढदिवस त्यांनी रंगमंचावरच सादर केला होता. म्हणजे सत्तरी उलटून गेल्यावरही अशोक सराफ अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके मामा रंगदेवतेचीच पूजा करत होते. लोकांचं रंजन करत होते.
त्यावेळी विचार येऊन गेला होता की, अजून तीन वर्षांनी मामा ७५ वर्षांचे होतील. त्यावेळी हे नाटक सुरू असेल का? मामा नाटक करत असतील का? त्याचवेळी मन म्हणालं होतं की, मामा आहेत म्हणजे नाटक तर असणारच! त्यावेळी त्यांची पंच्याहत्तरी जोरदार साजरी व्हावी.
आता बघता बघता तीन वर्ष उलटून गेली. त्या तीन वर्षापैकी दोन कोरोनानेच खाल्ली आणि पुन्हा एकदा सगळं आलबेल होत असताना व्हॅक्युम क्लिनरद्वारे मामा पुन्हा मंचावर उभे राहिले. आता मामांबद्दल लिहायचं म्हणजे नक्की काय लिहायचं, हा प्रश्न होताच.
खरंतर ‘कलाकृती’ मीडियाच्या संपादक मंडळाने दहा दिवस आधीच मला लेखाची कल्पना दिली होती. किंबहुना मीही आवर्जून लेख लिहावा या हेतून तत्काळ होकार दिला. पण गेल्या आठेक दिवसांपासून मामांबद्दल काय लिहावं, हे नेमकं उमगेना. उमगेना अशासाठी की किती आणि काय काय लिहावं.. त्यांचा प्रवास.. त्यांचं शिक्षण.. त्यांनी केलेले सिनेमे.. त्यांनी केलेली नाटकं.. त्या नाटकांमधले अनुभव.. हे सगळं सगळं याआधी आलेलं आहे. अनेक माध्यमं त्यांची ती वाटचाल पुन्हा अधोरेखित करतीलच. मग आपण असं काय वेगळं लिहायचं? या प्रश्नाची गाठ काही मनातून सुटेना.
मग वाटलं ‘फर्स्ट हॅंड एक्सपिरिअन्स’ लिहू. या हिमालयाएवढ्या माणसाला आपण कोण एका लेखात बसवणार? या हिमालयाचा आपल्याला जो परिचय आहे तोच वाटू सगळ्यांना. म्हणून मग लेख लिहायला घेतला.
खरंतर मामांची आणि माझी पहिली भेट होती तेव्हा मी महाराष्ट्र टाईम्समध्ये काम करत होतो. त्यावेळी त्यांचं ‘सारखं छातीत दुखतंय’ हे नाटक चालू होतं. मामांना प्रयोगाच्या आधी भेटायचं ठरलं होतं. ही भेट ठरली होती शिवाजी मंदिरला. मामांना भेटल्यावर नक्की काय बोलायचं ते मनाशी ठरवलं होतं. त्याआधी मामांच्या एका अनुभवाची खुणगाठ मी मनाशी बांधली होती. तो अनुभव असा –
तो काळ अशोक सराफ यांच्या उमेदीचा काळ होता. मामा एकीकडे नोकरी करत होते आणि त्यावेळी नाटकात कामही करत होते. मामांना मिळालेलं नाटक श्रीराम लागूंचं होतं. लागूंच्या नाटकात अशोक सराफ काम करणार होते. तालीम ठरली. लागू वेळेचे फार पक्के. एकदम शिस्तबद्ध. ठरल्याप्रमाणे नाटकाचं वाचन सुरुवातीच्या काळात होत असे. त्यानंतर ‘स्टॅडिंग प्रॅक्टिस’ व्हायची. आताही अशाच प्रकारे नाटक बसवलं जातं.
वाचनाची तालीम चालू करायची असतानाच एक दिवस मामा वाचनाला उशीरा गेले. लागू तर वेळेत आले होतेच. मामा आले तेव्हा एव्हाना वाचन चालू झालं होतं. आपल्याला उशीर झालाय, हे मामांना कळलं होतंच. त्यामुळे आधीच मनातून ते काहीसे घाबरले होते. मामा जसे त्या हॉलमध्ये गेले त्यावेळी डॉ. लागूंनी एकच थंड कटाक्ष अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्याकडे टाकला आणि त्या पूर्ण शांततेत ते मामांना म्हणाले, “अशोक तूसुद्धा?”
बस्स! मामा वरमले. त्यानंतर त्यांनी निर्णय मनाशी पक्का केला की, यापुढे आपण वेळ चुकवायची नाही. आपणच आपल्याला दिलेलं वचन त्यांनी त्यानंतर कायम पाळलं आहे. अगदी आजही!
मामांना शिवाजी मंदिरला भेटायला जाण्यापूर्वी हा एक किस्सा मला पुरेसा होता. साहजिकच, जी व्यक्ती वेळ पाळते तिने दिलेल्या वेळत आपण जाणं हे ओघानं आलं. मी शिवाजी मंदिरला गेल्यावर नाटकाची लगबग चालू होती. स्टेजवर सेट लावण्याचं काम चालू होतं. मामा रंगभूषा करत होते. माझी त्यांची ओळख असायचं काहीच कारण नव्हतं. मी महाराष्ट्र टाईम्सचा असलो तरी एक सामान्य -तरुण पत्रकार होतो.
मामांना भेटलो. मामांनी आरशात बघत.. मेकअप करतच जुजबी बोलणं केलं आणि म्हणाले, “हे होऊ दे मग बोलू. काय बोलायचं आहे?” मी म्हटलं, “तुमच्याशी बोलायचं आहे.” तर म्हणाले, “थांब दहा मिनिटं.”
खरंतर मामांचं ते बोलणं मला फार कोरडं वाटलं. अगदी गरजेपुरतं. त्यात अनादर नक्कीच नव्हता. पण फार औपचारिकता होती. तर दहा मिनिटं थांबल्यावर मामा बोलायला आले. मी त्यांना प्रश्न विचारत होतो. मामा फारच मोजक्या शब्दात उत्तरं देत होते. अगदीच जुजबी बोलत होते.
शेवटी मीच न राहावून विचारलं, “मामा तुम्ही नाराज आहात काय मटावर? काही राग वगैरे आहे का?” तर म्हणाले नाही. मग मी म्हणालो, “मग बोला ना थोडं विस्ताराने.” यावर ते म्हणाले, “मग तू प्रश्न विचार ना.. तू जसा प्रश्न विचारशील तशी मी उत्तरं देईन.” त्यानंतर आमचा संवाद खुलला. कारण प्रश्नागणिक मामा खुलले, बोलले. (Ashok Saraf)
मुलाखत झाली आणि पुन्हा काहीतरी राहून गेल्यासारखं वाटलं. त्यानंतर मामांच्या अनेक मुलाखती घेण्याचा योग आला. मामांनी आयुष्यात पहिल्यांदा जे फेसबुक लाईव्ह केलं ते माझ्यासोबत. मामांनी पॉडकास्टवर पहिल्यांदा मुलाखत दिली ती मीच घेतलेली. प्रत्येकवेळी मी मामांना भेटत गेलो आणि मामांचं आणि माझं नातं घट्ट होत गेलं. गंमत अशी की, असं त्यांना भेटलेल्या प्रत्येक पत्रकाराला वाटतं. त्याच्यासोबत प्रश्नोत्तरं झाल्यानंतर प्रत्येकवेळी आपलं काहीतरी राहून गेल्याची भावना मनात येते माझ्या. कारण, त्यांनी आधीच सांगितलेलं होतं, जसे तुझे प्रश्न तशी माझी उत्तरं. आता जवळपास पन्नास वर्षं मनोरंजनसृष्टीचा सम्राट असलेल्या या व्यक्तीला मी त्या अर्ध्या-पाऊण तासात.. किंवा पुढच्या दोनेक तासात काय विचारणार आणि किती विचारणार? मी जे जे प्रश्न विचारतो त्यावर मामा आपल्या परीने मोकळी उत्तर देत होतेच.
मामा असे आहेत.. तुम्ही कितीती ओंजळ भरभरून त्यांच्याकडून घेतलंत तरी आपली ओंजळ थिटी असल्याची भावना प्रत्येकवेळी येते.
नाटकावर प्रेम करणारे.. लेखकाचा सन्मान करणारे.. काळानुरुप स्वत:ला अपडेट करणारे.. नव्या नव्या माणसांशी जुळवून घेणारे.. असे आहेत मामा. आणि सगळ्यात म्हत्वाचं म्हणजे, इतक्या वर्षांच्या प्रवासाकडे फार ‘थर्डली’ बघण्याचं बळ त्यांच्याकडे आहे. फार कशाला? मामांवर टीव्हीवर बऱ्याचदा कार्यक्रम झालेले आहेत. त्यांचे सत्कार होतात..’चला हवा येऊ द्या’ सारख्या कार्यक्रमात ते आल्यावर स्कीट केलं जातं.. त्यांच्या चित्रपटावर चर्चा होते.. त्यावेळी मामांकडे मी जेव्हा जेव्हा पाहातो तेव्हा हा सम्राट आपण करुन गेलेल्या कामांकडे अत्यंत तटस्थपणे पाहताना दिसतो. आपण ती कलाकृती केल्याचं समाधान तर त्यांच्या चेहऱ्यावर असतं, पण त्याला ते चिकटून बसत नाहीत. आपण यापूर्वी आपल्या कलेत कसे षटकार ठोकले होते.. असं सांगत ते मैफली गाजवत नाहीत.
=========
हे देखील वाचा – रणदीप हुडा: ट्रोलर्सच्या कमेंट्सना माध्यमांचीच फूस
=========
चित्रपटांच्या पार्ट्या असोत किवा म्युझिक लॉंचचे इव्हेंट, कधी थांबायचं हे मामांना कळतं. म्हणून मामा कोणत्याही गॉसिपमध्ये अडकलेले कुणी पाहिले नाहीत. आणि म्हणूनच अशोक सराफ (Ashok Saraf) कधीच खोटं बोलत नाहीत. त्यांना वाटतं ते ते बोलतात, सांगतात. फार कशाला, अशोक सराफ आणि रंजना यांची जोडी १९८० च्या दशकात भलतीच जमली होती. दोघांनी अनेक सिनेमे केले. यापुढे हे दोघे लग्नही करणार होतेच. पण दुर्दैवाने रंजना यांचा अपघात झाला आणि सगळ्याच गोष्टी फिरल्या. पण असं असलं तरी एबीपीच्या कट्ट्यावर जेव्हा त्यांना त्यांच्या आवडत्या नायिकेबद्दल विचारलं होतं तेव्हा त्यांनी नाव घेतलं होतं ते ‘रंजना’ यांचं.
इतकं थेट.. साधं.. सरळ जगता यायला हवं माणसाला. एका अनुभवाने शहाणा होणारा, एकदा निर्णय घेतला की, आयुष्यभर तो निर्णय पाळणारा, आपण केलेल्या चित्रकृतींबद्दल आदर बाळगणारा, पण त्यात कधीच न अडकणारा असे आहेत अशोक सराफ. मामा! सगळ्यात असून कशात नसणारे अशोक सराफ! (Ashok Saraf)
वाढदिवसाच्या शुभेच्छा!