‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई!
काही गाणीच अशी असतात की काळ कितीही पुढे गेला तरी त्या गाण्यांची जादू जरा देखील कमी होत नाही. तुम्हाला ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ हा चित्रपट आठवतो? या चित्रपटाचं नाव काढलं की पहिल्यांदा आपल्या ओठांवर या चित्रपटातील अंगाई येते. “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही?’
‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटाच्या वेळची गोष्ट आहे.
चित्रपटाचे सर्व शूटिंग झाले होते. फक्त एका गाण्याचे शूटिंग बाकी होते आणि ते गीत अभिनेत्री आशा काळे -नाईक यांच्यावर चित्रित होणार होते. पण त्यावेळी आशा काळे यांची तब्बेत बरी नव्हती. रुग्णालयातून त्या घरी येऊन नुकत्याच घरी आल्या होत्या. पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की नाटकात आणि चित्रपटात सध्या काम करू नका.
एकाच गाण्याचे शूटिंग राहिले आहे, ते आपण करूया का, असे दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांनी विचारले . पण आशा काळे यांच्या आईने नकार दिला. तोरणे साहेब म्हणाले की सर्व चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. फेमस स्टुडिओत सेट उभारला आहे आणि तो सेट आता काढावा लागणार आहे. त्यामुळे तिथे त्या गाण्याचे शूटिंग होणे आवश्यक आहे. आशा काळे यांनी होकार दिला.
हे वाचलेत का ? रात्रीस खेळ चाले…
ती अंगाई होती,”निंबोणीच्या झाडामागे” आणि त्यात अर्थातच एक बाळ त्यांच्यासमवेत असणार होते. लहान मुल ते, साहजिकच मध्येच ते केस ओढणार, गळ्यातील साखळीशी खेळणार हे स्वाभाविक होते . अखेर त्या अंगाईचे चित्रण झाले. गीतकार मधुसूदन कालेलकर यांना आशा काळे म्हणाल्या,” या चित्रपटात ‘धुंदीत गाऊ’ हे प्रेमगीत आहे आणि त्यासाठी तुम्ही चक्क काश्मीरला जाऊन चित्रण केलंत आणि मला मात्र या स्टुडिओत हे गीत दिलंत.”
त्यावर कालेलकर म्हणाले, “आशा, हे गीत म्हणजे अंगाई आहे आणि ही अजरामर होणार आणि या गीतामुळे तू कायम लक्षात राहशील.”
कालेलकरांचे हे शब्द खरे ठरले. आजही जेव्हा एखाद्या समारंभाला त्या जातात, तेव्हा या गाण्याबद्दल त्यांना प्रतिक्रिया मिळते. एकदा त्या एका लग्नाला गेल्या होत्या. एका बाईंच्या कडेवर एक मूल होतं आणि ते सारखे आशा काळे यांच्याकडे पाहत होते.
आशाताईंना त्या मुलाच्या आईने सांगितले की अहो आशाताई, तुम्हाला आमचं बाळ ओळखतं कारण रोज रात्री आम्ही ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ मधील तुमचे गीत आम्ही आमच्या बाळाला मोबाईलवर दाखवतो. ” ही प्रतिक्रिया ऐकल्यावर आशाताई यांना खूप भरून आलं. मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेली सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ही अंगाई अजरामर झाली. या अंगाईला संगीतकार ‘एन. दत्ता’ यांनी संगीत दिले आहे.