तीन आंबट शौकीन म्हातार्यांची हिरवट धमाल : शौकीन
आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांना समोर ठेवून त्यांच्या जीवनाशी निगडित असे अनेक चित्रपट येऊन गेलेले आहेत. पण या वयातील त्यांच्या ह्युमरला फार कमी वेळेला पडद्यावर आणले गेले आहे. दिग्दर्शक बासू चटर्जी (Basu Chatterjee) यांनी १९८२ साली तीन वृद्ध कलाकारांना घेऊन एक धमाल कॉमेडी चित्रपट बनवला होता. या चित्रपटाचे नाव होते ‘शौकीन’.
बंगाली मधील साहित्य अकादमी विजेते लेखक समरेश बसु यांच्या कथानकावर हा चित्रपट आधारलेला होता .अशोक कुमार, उत्पल दत्त आणि ए के हंगल या तिघांना घेवून बासूदानी धमाल आणली होती. सिनेमाचा जॉनर वेगळा असल्यामुळे प्रेक्षकांनी देखील त्याला चांगली दाद दिली. आपल्याकडे असा प्रकार यापूर्वी कधी झाला असला तरी इतका लोकप्रिय झाला नव्हता. अशोक कुमार चाळीसच्या दशकापासून रुपेरी पडद्यावर विविध भूमिकातून प्रेक्षकांच्या पुढे आले होते. उत्पल दत्त बंगाली सिनेमा आणि रंगभूमीवरील बुजुर्ग अभिनेते. ए के हंगल यांची रुपेरी प्रतिमा मात्र या सिनेमातील व्यक्तिरेखेपासून टोटली वेगळी होती. पण त्यांनी देखील जबरदस्त कॉमिक सेन्स दाखवत या सिनेमात जबरदस्त कॉमेडी केली होती.(Basu Chatterjee)
चित्रपटातील कथानक तसे फारसे विशेष नव्हते. तीन विधुर म्हातारे आयुष्याच्या उत्तरार्धात काहीतरी चावट दंगा करावा म्हणून एका ट्रिपला जायचे ठरवतात! तिघेही पैशाने गर्भश्रीमंत असतात पण या वयातले एकटेपण आणि मनाचे हिरवेपण यामुळे हे धाडस करायला ते निघतात. त्यातून काय गमती जमती होतात हा त्या चित्रपटातला प्रवास होता.
ट्रीपला जाण्यासाठी ते एका ड्रायव्हरची निवड करतात. ती भूमिका मिथुन चक्रवर्तीने केली आहे. घरातून बाहेर पडतात पण कुठे जायचे आहे हे ठरलेलं नसते. त्यामुळे ड्रायव्हरच त्यांना त्याची प्रेयसी असलेल्या रति अग्निहोत्रीच्या गावी गोव्याला घेऊन जायचे ठरवतो. या तिघांना ती आपली प्रेयसी आहे हे तो सांगत नाही. हे तिघे म्हातारे गोव्याला जातात. तिथे त्यांना मादक सुंदर रति अग्निहोत्री भेटते तिला पाहून तिघेही प्रचंड खुश होतात आणि तिला पटवण्यासाठी नाना युक्त्या प्रयुक्त्या करत बसतात.आपण अजूनही तरुण आहोत या अट्टाहासाने तशी वेशभूषा करतात. एकमेकांना थापा मारत बनवत राहतात. त्यातून त्यांची बऱ्याचदा फजिती होते. हा सर्व मोठा धमाल प्रवास बासू चटर्जी(Basu Chatterjee) यांनी चित्रपटात दाखवला आहे.
शेवटी तिघांनाही कळते की आपण ज्या तरुणीला पटवण्याचा प्रयत्न करतो आहोत ती आपल्या ड्रायव्हरची प्रेयसी आहे. वास्तवाची त्यांना जाणीव होते. मोकळ्या मनाने ते त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात! एक साधी ,सोपी, स्वच्छ, निरोगी , आणि प्रसन्न कॉमेडी या चित्रपटातून पाहायला मिळाली. या चित्रपटांमध्ये एक गाणं होतं जे अशोक कुमारवर चित्रित केलं होतं ‘जब भी कोई कंगना बोले पायल खनक जाये….’ हे गाणं त्या काळात खूप लोकप्रिय झाला होतं. मुळात हे गाणं सचिन देव बर्मन यांनी बंगालीमध्ये गायलं होतं त्या गाण्याचे बोल होते ‘नितोल पाये रीनिक झिनिक’. हे गाणे पंचम तथा आर डी बर्मन यांना खूप आवडत असे. या गाण्याच्या ट्यून वरूनच त्यांनी योगेशकडून गाणे लिहून घेतलं आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांनी ते संगीत बध्द केले. (Basu Chatterjee)
=======
हे देखील वाचा : ‘या’ कारणामुळे काजोलने नाकारला चक्क मणीरत्नमचा चित्रपट!
=======
या चित्रपटात अशोक कुमार यांनी बऱ्याच वर्षानंतर एक गाणे गायले होते. अशोक कुमार आणि रती अग्निहोत्रीवर चित्रित झालं होतं. ‘चलो हसीन गीत एक बनाये….’ हे गाणे अशोककुमार यांनी स्वत: गायले होते. याच चित्रपटाचा रिमेक २०१४ मध्ये आला होता; शौकीन या नावानेच. या चित्रपटात पियुष मिश्रा, अनुपम खेर आणि अन्नू कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. परंतु या सिनेमाला ती मजा आली नाही जी १९८२ सालच्या ‘शौकीन’ या चित्रपटात आली होती. बासू चटर्जी(Basu Chatterjee) यांचा हा शेवटचा कमर्शियल हिट झालेला सिनेमा असं या चित्रपटाचे वर्णन करावं लागेल यानंतर त्यांनी बरेच चित्रपट काढले पण कुठल्या चित्रपटाला फारसे यश मिळालं नाही.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी