
‘बावर्ची’ आणि Lagaan मधील गाण्यांचं इंटरेस्टिंग कनेक्शन!
ऋषिकेश मुखर्जी यांचा 1972 साली ‘बावर्ची’ नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटाचा नायक राजेश खन्ना असला तरी रूढ अर्थाने तो नायक नव्हता कारण यात त्याने अतिशय नॉन ग्लॅमरस असा रोल केला होता. खरंतर तो राजेश खन्नाचा सुपरस्टार पदाचा पीक पिरेड होता पण असे असतानाही त्याने एक हटके भूमिका या चित्रपटात केले होते. या ‘बावर्ची’ चित्रपटातला संगीत मदन मोहन यांचे होते तर गाणी कैफी आजमी यांनी लिहिली होती. यात एकूण सात गाणी होती. लताचे नितांत सुंदर पण फारसे न गाजलेले ‘मोरे नैना बहाये नीर..’ हे पिलू रागावर आधारीत गाणे यात होते. या गाण्यात सतार ,सारंगी, बासरी , तबला या वाद्यांचा फार सुंदर वापर केला होता. जय भादुरी नृत्यांसाठी कधीच आठवली जात नाही पण या गीतात तिने सुरेख नृत्य साकारले आहे.

या चित्रपटात ‘भोर आई गया अंधियारा‘ हे एक मॅरेथॉन गाणे होते. तब्बल 12 मिनिटाचे हे गाणे अतिशय सुरेल सूरात (राग अल्हया बिलावल) मदन मोहन यांनी रचले होते. हे गाणे मन्नाडे, किशोर कुमार, हऱ्रेन्द्रनाथ चट्टोपाध्याय,लक्ष्मी शंकर, निर्मलादेवी यांनी गायले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणातील या गाण्यात चित्रपटातील सर्व कलावंतांनी अतिशय सुंदर अभिनय केला होता. ए के हंगल, दुर्गा खोटे, उषा किरण, असरानी, राजेश खन्ना, जया भादुरी.. या सर्वांनी एक उत्तम फॅमिली सॉंग म्हणता येईल असं हे गाणं चित्रपटात साकारलं होतं या गाण्यात एक अंतरा इंग्रजीमध्ये होता जो किशोर कुमार यांनी गायला होता आणि चित्रपटात असरानी यांच्यावर चित्रित झाला होता. या अंतऱ्याचे बोल होते ‘गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओ पापा’.. हे गाणे जरी कैफी आजमी यानी लिहिलं असलं तरी हा अंतरा त्यांनी लिहिला नव्हता. तर तो लिहिला होता गुलजार यांनी. या गाण्याचे एक मस्त कनेक्शन आशुतोष गोवारीकर यांच्या 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘लगान ‘ सिनेमातील एका गाण्याशी होते.

कैफी आजमी यांची मुलगी शबाना आजमी. तिचे पती जावेद अख्तर यांनी 2001 साल च्या ‘लगान’ या चित्रपटाची गाणी लिहिली होती. चित्रपटात हे गाणं आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांच्या वर चित्रित झालं होतं. या गाण्यात देखील एक इंग्लिश अंतरा होता. तो अभिनेत्री Rachell Shelly हिच्यावर चित्रित झाला होता. गाण्यातील हा इंग्रजी अंतरा जावेद अख्तर यांनी लिहिला नव्हता तर तो लिहिला होता फरहान अख्तर यांनी! ‘बावर्ची’ या चित्रपटाचे कनेक्शन अशा पद्धतीने लगान या सिनेमा सोबत आहे. ते इथेच थांबत नाही. तर या दोन्ही सिनेमाच्या सुरुवातीचे निवेदन अमिताभ बच्चन यांनी केले होते. लगान सिनेमाची नायिका ग्रेसी सिंग हिने गुलजार यांच्या ‘हुतुतू ‘ या सिनेमात छोटी भूमिका केली होती.

खरंतर ‘बावर्ची’ या चित्रपटात हरींद्रनाथ चटटोपाध्याय होते ते स्वतः उत्तम कवी गीतकार होते. त्यांनी ‘ज्यूली’(1975) चित्रपटातील ‘माय हार्ट इज बीटिंग’ हे संपूर्ण इंग्रजी भाषेतील गाणे लिहिले होते जे प्रीती सागर यांनी गायले होते. ‘बावर्ची’ या चित्रपटात हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या वर देखील हे गाणे चित्रीत झालेला आहे पण यातील इंग्रजी पोर्शन हा त्यांनी न लिहिता गुलजार यांनी लिहिला होता! ‘बावर्ची’ हा चित्रपट Galpo Holeo Satti (1966) या बंगाली सिनेमाचा रीमेक होता. हा बंगाली सिनेमा तपन सिन्हा यांनी दिग्दर्शित केला होता. ‘बावर्ची’ या सिनेमाची कथा तपन सिन्हा यांचीच होती.
================================
हे देखील वाचा :Sholay चित्रपटावेळी जया बच्चन यांनी बिग बींना दिली होती ‘ही’ गुड न्यूज!
================================
याचा स्क्रीन प्ले ऋषिकेश मुखर्जी यांनी लिहिला होता तर संवाद गुलजार यांचे होते. या सिनेमातील राजेश खन्ना त्याच्या तत्कालीन इमेज च्या एकदम उलट होता. एका मुलाखतीत राजेश ने सांगितले होते,” ‘बावर्ची’मध्ये, मी ‘आनंद’ (१९७१) मध्ये हृषिकेशदांनी माझ्याकडून जे करून घेतले होते, त्याच्या अगदी उलट केले. त्यांनी मला भूमिका माझ्या पद्धतीने साकारण्याची आणि अभिनय करण्याची परवानगी दिली. मी पुरेशा गंभीर भूमिका केल्या होत्या, आणि ‘बावर्ची’ने मला हवी त्या पद्धतीने भूमिका साकारण्याची आणि अभिनय करण्याची संधी दिली. त्यामुळे मी स्वत:ला पूर्णपणे मोकळे सोडले.”