हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे नष्ट करून टाकल्या होत्या!
जगभरात चित्रपटांची निर्मिती होत असते. भारत यात सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा देश समजला जातो. भारतात सिनेमा येऊन देखील आता १०० वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. जगभर विविध चित्रपट महोत्सव होत असतात. यातून सांस्कृतिक आदान प्रदान होत असते पण यातूनच कधीकधी चौर्य कर्म, कॉपी असले प्रकार होत असतात. अलीकडे या सर्व प्रकाराला एक ऑफिशियल लेबल मिळालेले आहे. एखाद्या निर्मात्याला जर परदेशातील किंवा देशातील इतर भाषिक चित्रपटावरून चित्रपट बनवायचा असेल तर त्याचे विधिवत हक्क विकत घ्यावे लागतात आणि त्यानुसार मग त्याचा ऑफिशियल रिमेक बनवला जातो.

बऱ्याचदा बेमालूमपणे सिनेमाच्या कथानकाची आयडीया कॉपी केली जाते, गाण्याच्या चाली उचलल्या जातात, ॲक्शन सिक्वेन्स, टेकिंग यांची फ्रेम टू फ्रेम कॉपी केली जाते. आणि फक्त इन्स्पिरेशन आहे असं सांगितलं जातं. इन्स्पिरेशन आणि कॉपी यातील सीमारेषा अतिशय धूसर असल्यामुळे थेट कॉपी ॲक्ट चा गुन्हा दाखल करता येत नाही. पण अशा प्रकारचे अनेक प्रकरणे न्यायालयीन प्रविष्ट असतात. आज मी तुम्हाला अशा एका भारतीय चित्रपटाच्या बाबत घडलेल्या प्रकारची गोष्ट सांगणार आहे. पन्नास च्या दशकात हा भारतीय हिंदी चित्रपट तयार झाला. पिक्चर हॉलमध्ये रिलीज देखील झाला.
या सिनेमाने चांगली गर्दी देखील जमवली. पण दहाव्या दिवशी या चित्रपटाच्या निर्मात्याच्या विरुद्ध कोर्टाची ऑर्डर आली आणि या चित्रपटाला चित्रपट गृहातून उतरवून टाकण्यात आलं. इतक्यातच हे प्रकरण थांबलं नाही तर कोर्टाने आदेश दिला की या चित्रपटाच्या सर्व प्रिंट्स तुम्ही आमच्या समक्ष डिस्ट्रॉय करून टाका. नष्ट करून टाका. संपवून टाका. निर्मात्याने कोर्टाचे म्हणणे ऐकले आणि हा चित्रपट संपूर्णपणे डिस्ट्रॉय करण्यात आला. याच्या एकूण एक प्रिंट नष्ट केल्या गेल्या. काय कारण होतं? कोर्टाने असे आदेश का दिले होते ? आणि कोणत्या चित्रपटाच्या निर्मात्याला न विचारून त्याची कॉपी या निर्मात्याने केली होती.
=================================
हे देखील वाचा : Shahu Modak : या खिश्चन कलावंताने २९ वेळा श्रीकृष्णाची भूमिका साकारली!
=================================
६ मार्च १९५७ या दिवशी नरेंद्र सुरी दिग्दर्शित ‘बेगुनाह’ हा चित्रपट भारतात सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात किशोर कुमार आणि शकीला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची गाणी शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांनी लिहिली होती तर संगीत शंकर जयकिशन यांचे होते. रूप कमाल चित्र निर्मिती या संस्थेमार्फत शहा ब्रदर्स यांनी केली होती. चित्रपट पूर्ण झाला. थिएटरमध्ये रिलीज झाला. पण हा चित्रपट १९५४ सालच्या हॉलीवुडच्या मेल्विन फ्रॅंक यांनी दिग्दर्शित केलेल्या knock on wood या चित्रपटाची अक्षरशः कॉपी होता. अगदी फ्रेम टू फ्रेम. फक्त बेगुनाह सिनेमातील इथलं वातावरण भारतीय होतं. हॉलिवूडच्या चित्रपटाचा प्रमुख नायक होता डॅनी के. हि एक कॉमेडी मुव्ही होती आणि तिकडे सुपर हिट ठरली होती.

जेव्हा तिकडे अमेरिकेत निर्मात्याला कळाले की आपल्या एका चित्रपटाची कॉपी भारतात केली आहे आणि आपल्याला न विचारता केली आहे तेव्हा त्यांनी सरळ बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली आणि कॉपीराईट चा प्रश्न निर्माण केला. हा चित्रपट तात्काळ थिएटर मधून उतरवावा अशी मागणी त्यांनी केली. त्या पद्धतीने या चित्रपटाचे प्रदर्शन संपूर्ण थांबवण्यात आले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. त्याना कोर्टाने एवढंच सांगितलं गेलं नाही तर या चित्रपटाच्या देशभरात वितरित झालेल्या सर्व प्रिंट्स कोर्टात जमा करून कोर्टाच्या समक्ष त्या नष्ट कराव्यात असे आदेश कोर्टाने द्यावेत. अशी विनंती हॉलीवूड च्या चित्र संस्थेकडून करण्यात आली. असे जर उचलाउचली चे प्रकार सुरू राहिले तर या व्यवसायाला काही अर्थ राहणार नाही असे त्या चित्र संस्थेचे म्हणणे होते.

कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि पॅरामाउंट पिक्चर्स च्या मागणीला मान्यता दिली. ‘बेगुनाह’ सिनेमाच्या देशभरातील सर्व प्रिंट्स एकत्र करून कोर्टाच्या समक्ष त्या डिस्ट्रॉय करण्यात आल्या. चित्रपटाच्या निर्मात्यांनी गुन्हा दाखल केला असल्यामुळे त्यांना काहीच बोलता आले नाही. त्यांनी चुपचाप कोर्टाच्या आदेशाचे पालन केले. मोबदला किंवा दंड मागितला नाही. पण या सगळ्या प्रकारानंतर भारतीय चित्रपट रसिकांना एक चांगला सिनेमा पाहता आला नाही. या चित्रपटाच्या सर्व प्रिंटस जरी नष्ट झाल्या असल्या तरी या सिनेमाच्या रेकॉर्ड्स मात्र मार्केटमध्ये उपलब्ध होत्या. आहेत. आज देखील तुम्ही गुगल वर एवढी सर्व गाणी फक्त ऐकू शकता. यातील मुकेश यांनी गायलेले ‘ऐ प्यासे दिल बेजुबान’ हे गाणं त्या काळात प्रचंड गाजले होते. आणि जेव्हा सिनेमा नष्ट झाला असं कळायला नंतर या गाण्याची लोकप्रियता आणखी वाढत गेली.
================================
हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
=================================
हा किस्सा इथेच थांबत नाही. २०१७ साली पुण्याच्या नॅशनल फिल्म आर्काइव्ह ला या सिनेमाच्या ६० मिनिटाच्या दोन रील्स मिळाल्या. तत्कालीन एन एफ ए आय चे संचालक प्रकाश मगदूम यांनी असे सांगितले की कदाचित सर्व प्रिंट्स डीस्ट्रॉय करताना कुठेतरी या प्रिंट राहून गेल्या असतील आणि त्या प्रिंट्स आता त्यांच्या ताब्यात आल्यात. या प्रिंट्स खूप खराब झालेल्या आहेत. पण त्यातील एका प्रिंटमध्ये ‘ ऐ प्यासे दिल बेजुबान ..’ हे गाणे पडद्यावर चक्क पियानोवर बसून संगीतकार जयकिशन गातो असे दाखवले आहे. चित्रपट रसिकांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण संगीतकार जयकिशन याच्यावर चित्रित झालेलं हे संपूर्ण गाणे आहे. ‘बेगुनाह’ या शब्दाचा अर्थ खरं तर निष्पाप … पण याच नावाच्या चित्रपटाला नष्ट व्हावे लागले. हॉलीवूड च्या सिनेमाचे चौर्य कर्म आणि कॉपी ॲक्ट यामुळे संपूर्णपणे डिस्ट्रॉय झालेला हा भारतातील एकमेव चित्रपट असावा!