स्टुडिओ कॅमेराच्या आगेमागे…
अश्विनी भावे आर. के. फिल्मच्या रणधीर कपूर दिग्दर्शित ‘हीना ‘( १९९१) च्या चेंबूरच्या आर. के. स्टुडिओतील चित्रीकरणातील शूटिंगमध्ये सहभाग घेत होती तेव्हाची गोष्ट. तिच्या विशेष मुलाखतीसाठी मी या चित्रपटाच्या सेटवर गेलो होतो तेव्हाची आठवण. मनसोक्त, दिलखुलासपणे बोलता बोलता तिने एक छान अनुभव सांगितला. ती तेव्हा कुर्ला येथील शिवसृष्टीत राहायची आणि चेंबूर परिसरात आल्यावर अगदी लहानपणापासून सर्वसामान्य माणसाप्रमाणे आर. के. स्टुडिओ (R. K. Studio) बाहेरुन पाहत होती. अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरु केल्यावरही या स्टुडिओत शूटिंगसाठी येण्याचा हा पहिलाच योग होता. पहिल्या मजल्यावरील मेकअप रुममध्ये तयार होऊन सेटवर ती आली आणि एकदम अवाक झाली, थक्क झाली. लहानपणापासून आपण थिएटर अथवा दूरदर्शनवर राज कपूर दिग्दर्शित चित्रपटात जो उभ्या जीन्याचा भव्य दिव्य सेट पाहातोय तसाच सेट आता तिच्या समोर होता. अशाच सेटवर तिने पाऊल टाकले. चित्रपटातील देर ना हो जाए कही देर न हो जाए… या नृत्य गीताचे या सेटवर शूटिंग होते. ( सुरेश सावंत हे कला दिग्दर्शक होते.)….अश्विनी भावेसाठी हा अनुभव वेगळाच आणि सुखद होता.
अश्विनी भावेने “बाहेर ते आत” असा आर. के. स्टुडिओचा यशस्वी प्रवास केला, पण अगणित चित्रपट रसिकांनी असंख्य वेळा आर. के. स्टुडिओचे आवर्जून आणि आनंदाने बाहेरुन दर्शन घेतलयं हे मी अगदी सुरुवातीलाच का सांगतोय माहितीये? मुंबईत, राज्यात काही शहरात आणि देशातील जुन्या-नव्या, लहान-मोठ्या स्टुडिओत आर. के. स्टुडिओचा स्पाॅट खूपच महत्वाचा आणि सहज लक्षवेधक. (काही वर्षांपूर्वीच हा स्टुडिओ पाडल्याने इतिहासजमा झाला ती ‘आठवणीतील स्टोरी’ वेगळीच). कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, १९७२ साली मुंबई आणि नवी मुंबई, वाशी यांना जोडणारा ठाणे खाडी पूल बांधण्यात आला आणि कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ येथे जाणाऱ्या गाड्या चेंबूरवरुन या पूलावर ये जा करु लागल्या आणि आता आर. के. स्टुडिओ (R. K. Studio) दिसू लागला. मैत्री पार्क हा तेथील एस.टी. थांबा.
अनेकांची तरी आर. के. स्टुडिओच्या (R. K. Studio) बाह्यदर्शनाची हीच सेम टू सेम स्टोरी. मी गिरगावात लहानपणाचा मोठा होताना ‘मामाच्या गावाला’ अलिबागला जा-ये करताना चेंबूर परिसरात एस. टी. बस आली रे आली की, या स्टुडिओवर आठवणीने नजर टाकणारच. आणि मी अगदी खात्रीने सांगतो. अनेकांनी हीच सवय लावून घेतली असेल. क्षण छोटा वाटतो, पण आनंदाचा. ते अतिशय भव्य प्रवेशद्वार, बाजूला आर. के. फिल्मचा आकर्षक आणि देखणा असा भव्य व बोलका ट्रेडमार्क, बाहेरुन दिसणारा आतमधील मुख्य इमारतीचा वरचा भाग आणि हे सगळेच धावत्या एस.टी. तून दिसत असतानाच आर. के. फिल्मच्या आग, आवारा, बरसात, आह, श्री ४२०, जिस देस मे गंगा बहती है, संगम, मेरा नाम जोकर अशा माईलस्टोन चित्रपटांची आठवण आणि स्टुडिओत नेमके काय चालत असेल, शूटिंग कसे असेल अथवा असते, स्टार कसे वावरत असतील याबाबतचे विलक्षण कुतूहल हे सगळेच या काही क्षणात डोळ्यासमोर येत असे. फिल्म दीवाना असल्याचा हा जणु पुरावाच. स्टुडिओचे बाह्यांगच असे आणि इतके बोलके की, विशेष कौतुकाने असेच म्हणायला हवे, ‘येथे दिग्दर्शक दिसतो.’ (सर्वच स्टुडिओंबाबत असे म्हणता येणार नाही हे मिडियात आल्यावर अनुभवातून लक्षात येत गेले.)
बरीच वर्ष आर. के. स्टुडिओ(R. K. Studio) मी असाच बाहेरुन पाहत पाहत मोठा झालो. अधूनमधून मनात येई, आपली एस. टी. तेथून ये जा करीत असतानाच नेमकी राज कपूर अथवा रणधीर कपूरची गाडी बाहेर पडली तर बरं होईल. तेवढेच मित्रांमध्ये इम्प्रेशन मारायला बरे. शाळा काॅलेजच्या वयात प्रसार माध्यमातून ‘सिनेमाच्या जगातील ‘ जे काही वाचायला फोटोत पाहायला मिळत जाई, त्यात राजकमल कलामंदिर, मेहबूब, नटराज, फिल्मीस्थान, फिल्मालय, कमालीस्तान इत्याची इत्यादी स्टुडिओची नावे समजत..( ही माहिती म्हणजे, सिनेमाचे ज्ञान नव्हते… वा नसतेही.) त्या काळात पिक्चर पाहताना श्रेयनामावलीत पडद्यावर ही स्टुडिओची नावे वाचत असतानाच ती पुढे जात. मराठी चित्रपटाच्या पडद्यावर शांतकिरण, जयप्रभा स्टुडिओ ही नावे वाचायला मिळे ते कोल्हापूरचे मानाचे स्टुडिओ हे लक्षात येताच आदर वाढला.
अशातच १९७३ सालापासून वडाळ्यातील नातेवाईकांकडे जाता येताना ७२ अथवा ७३ नंबरची बेस्ट बस पकडल्यावर दादर पूर्वच्या दादासाहेब फाळके मार्गावरुन जाता येताना रणजित स्टुडिओ व रुपतारा स्टुडिओ दिसत आणि आणखी काही स्टुडिओ दिसू लागले याचा आनंद होऊ लागला. ते वयच तसे होते..आयुष्यातील अनेक गोष्टींचे आनंद हे असे लहान लहान गोष्टीत असतात. वयानुसार त्याची लांबी,रुंदी, खोली, व्याप्ती असते. एकदा रणजित स्टुडिओवरुन जाताना तेथे बाहेरच ‘चालू मेरा नाम ‘ या चित्रपटाच्या मुहूर्ताची फुलाची सजावट पाहून आनंदलो. अर्थात या चित्रपटात कोण कोण आहेत याबाबतचे वाढलेले कुतूहल जागे करण्याचा एक मार्ग म्हणजे, साप्ताहिक रसरंग. त्यात वाचले विनोद मेहरा व विद्या सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि आता रणजित, रुपतारा स्टुडिओ परिसरात बस आल्यावर एकाद्या स्टारची गाडी येता जाताना दिसली तर बरे होईल असे वाटू लागले. भाबडी आशा हो, तेव्हाच्या वयानुसार, दुसरं काय?
=======
हे देखील वाचा : थिएटर्सचे भन्नाट कल्चर…
=======
अशातच काॅलेजमधील माझा मित्र राजेन्द्र खांडेकरसोबत १९८० साली एकदा चक्क परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत जाण्याचा योग आला. त्या काळात मी वृत्तपत्र व मासिकांत वाचकांच्या पत्राच्या सदरात लिहीत होतो. आणि राजू त्या काळातील आघाडीचे पत्रकार अशोक शेवडे यांचा मेव्हणा. साप्ताहिक चित्रानंदमध्ये ते चित्रपट नाटक कलाकारांच्या पानभर मुलाखती घेत. त्यांनी दत्ता भट यांची मुलाखत घेतली होती आणि आता त्यांच्याकडून त्यांचा फोटो आणायचा होता. ते राजकमलमध्ये निर्माता व दिग्दर्शक व्ही. रवींद्र यांच्या ‘सौभाग्यदान’च्या शूटिंगमध्ये भाग घेत होते. गिरगावातून ६१ नंबरची बेस्ट बस पकडून राजकमलला पोहचेपर्यंत ‘आयुष्यात आपण प्रथमच स्टुडिओत जातोय आणि तेही चित्रपती व्ही. शांताराम यांच्या स्टुडिओत’ याबाबत मनात अनेक प्रकारच्या भावना येत होत्या. तोपर्यंत मी चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित दो आंखे बारह हाथ, झनक झनक पायल बाजे, पिंजरा, नवरंग हे चित्रपट पाहिले असल्याने त्यांच्याबद्दल मनात आदर निर्माण झाला होता. स्टुडिओ जस जसा जवळ येत गेला माझे कुतूहल अधिकाधिक वाढत गेले. गेटवर बरीच विचारणा झाल्यावर उजव्या बाजूस गार्डन आणि डाव्या बाजूस कॅन्टीन दिसले आणि समोर भव्य दिमाखदार इमारत दिसली ( त्यात व्ही. शांताराम यांचे कार्यालय, प्रिव्ह्यू थिएटर असल्याचे समजले), आजूबाजूलाच शूटिंगचे भव्य फ्लोअर दिसले. नक्की कुठे पाहू, काय पाहू असे मला वाटत असतानाच आम्ही मेकअप रुममध्ये पोहचलो आणि दत्ता भट यांच्याकडून त्यांचे फोटो घेतलेही. ( कालांतराने राजकमल कलामंदिर स्टुडिओची मोठ्याच प्रमाणात ओळख होत गेली.)
चित्रपट माध्यम व व्यवसायात ‘शूटिंगचा स्टुडिओ ‘ हा तर गाभा. त्याभोवती आणि त्यासह हे जग आहे. चित्रपट इतिहासातील सर्वात महत्वाचा घटक आणि त्याच्या जडणघडणीचा,काळानुसार बदलायचा प्रवासही अनेक वळणावळणांचा, खूपच मोठा. कधी काहीसा गुंतागुंतीचा. चित्रपटाचे जग बाहेरुन दिसतं तसे असणे शक्य आणि आवश्यकही नाही. पडद्यावर जो पिक्चर दिसतो त्यापेक्षा त्याचे पडद्यामागचे जग खूपच मोठे आहे आणि त्याचा एक मार्ग स्टुडिओतून जातो. आणि माझी सिनेपत्रकारतेची एकूणच सगळी वाटचाल दीर्घकाळ फिल्डवर्कवर घडल्याने अनेक लहान मोठ्या स्टुडिओतील अगदी कॅन्टीनपर्यंत पोहचलो आणि अनेक प्रकारच्या चवीचे पदार्थ आणि तशाच अनेक प्रकारच्या आठवणी, किस्से, कथा आहेत.
क्रमश:
दिलीप ठाकूर