भाग बिनी भाग: अपुऱ्या संवादाविना गडबडलेले कथानक
‘लग्न केलं म्हणजे आयुष्य थांबतं. मग व्यक्तीला त्याची/तिची स्वप्न पूर्ण करता येत नाहीत, त्यांना प्रत्येक पावलात अडथळे येतात, जबाबदार्यांच्या ओझ्याखाली ते दबून जातात. त्यामुळे लग्न न केलेलं उत्तम.’ मधल्या काळातील वेबसिरीज, युट्यूब व्हिडियोज पाहीले की त्यांच्या कथेमध्ये हा मुद्दा सामाईकपणे आढळतो. अर्थात लग्न, नातेसंबंध, प्रेम याबद्दल प्रत्येकाची मते ही वेगवेगळी असू शकतात आणि मागच्या पिढीने ज्या पद्धतीने आपल्या आयुष्याच चित्र रंगवलं, त्याचं रंगामध्ये नव्या पिढीनेही चित्र रंगवलं पाहिजे ही अपेक्षा करणं खरतर चुकीचं ठरेल.
प्रत्येक पिढीगणिक आपल्या आयुष्यातील प्रेम आणि लग्न या टप्प्याबद्दल चर्चा होणे, त्यावर वेगवेगळी मते असणे हे सहाजिकच आहे किंबहुना असायलाच हवं. पण एखादा मतप्रवाह पूर्णपणे चुकीचाच आहे, याबद्दल आपलं मत बनविताना त्याला साजेसी कारणमिमांसा असणंसुद्धा तितकच महत्त्वाच असतं. ‘भाग बिनी भाग’ पाहताना नेमका हाच मुद्दा न राहवून सतावत राहतो.
एमबीए करून उत्तम पगाराची नोकरी मिळवलेली, वयाची अठ्ठावीस वर्षे पूर्ण केलेल्या एकुलत्या एक मुलीच्या आयुष्यातील पुढचा टप्पा म्हणजे लग्न, ही बिनीच्या मध्यमवर्गीय आईवडिलांची इच्छा असते. बरं, लग्नही ठरत ते तिच्या प्रियकरासोबत. तीन वर्षाच्या त्यांच्या नात्यानंतर अरुणलासुद्धा या टप्प्यावर लग्नाचा विचार सतावत असतो आणि त्या उत्साहात तो बिनीला लग्नासाठी मागणी घालतो. पण बिनीच्या मनामध्ये मात्र वेगळेच विचार थैमान घालत असतात.
हे देखील वाचा: जोधा अकबर- भव्यदिव्य प्रेमकथा साकारताना..
लहानपणापासून शेखर सुमनचे कार्यक्रम पाहून मोठ्या झालेल्या बिनीला विनोदवीर व्हायचं असतं आणि या टप्प्यावर लग्न करायचं म्हणजे संसार, मुलं याच गर्दीमध्ये अडकून जाऊ याची भीती तिला सतावते. याचं विचारांच्या वादळामध्ये ऐन रोका होत असताना ती कार्यक्रमामधून पळून जाते आणि थेट विनोद सादर करायला मंचावर उभी राहते.
सिरीजच्या कथानकामध्ये नाविन्य म्हणायचं तर काहीच नाही. त्यात सिरीजच सादरीकरणसुद्धा अगदीच सुमार आहे. वयाच्या एका टप्प्यावर आपल्या सुरु असलेल्या आयुष्यातून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा बिनीला व्हावी यात काहीच हरकत नाही. तिने आईवडील, प्रियकर, मित्र यांच्यासोबत भांडून त्या मार्गावर चालू लागणं हेही प्रेक्षक म्हणून आपल्याला पटत. पण बिनीच्या प्रवासातील मुख्य टोचणारी गोष्ट म्हणजे ती म्हणते तितक्या कळकळीने तिच्यासमोरील अडचणी पडद्यावर उभ्या राहत नाहीत. अगदी सिरीजच्या सुरवातीला बिनीला विनोदवीर बनायचं असतं हे अधोरेखित होतं. पण त्यासाठी ती फारसे काहीही प्रयत्न करताना दिसत नाही.
ना ती तिच्या समकालीन विनोदवीरांचे कार्यक्रम पाहून त्यांच्याकडून काही शिकायचा प्रयत्न करते ना आपले लिखण सुधारण्यासाठी धडपड करते. किमान एखादं पुस्तक वाचण्याची गरजही बिनीला असू नये, याचही आश्चर्य वाटू लागतं. सिरीजच्या एका टप्प्यावर अरुण बिनीला म्हणतो, ‘तुला विनोदवीर बनायचं होतं हे तू मला कधी सांगितलच नाहीस, तू फक्त निघून गेलीस.’ प्रेक्षक म्हणून आपल्यालाही तेच जाणवतं. कदाचित बिनीने पळून जाण्याआधी या तिघांशी बसून शांतपणे संवाद साधला असता, तर पुढे सहा भागांमध्ये रंगलेला कंटाळवाणा ड्रामा टाळून महिला विनोदवीर म्हणून तिचा प्रवास पाहता आला असता.
हे वाचलंत का: अनिल कपूर – बॉलिवूडचा एकदम “झक्कास” अभिनेता!
सिरीजच्या कथानकावर ‘मार्व्हलस मिसेस मेजल’ या अॅमेझॉन प्राईमवरील गाजलेल्या सिरीजचा प्रभाव जाणवतो. पन्नाशीच्या दशकातील चूल आणि मुल यात गुंतलेल्या मिरियमचा विनोदवीर बनण्यापर्यंतचा प्रवास या सिरीजमध्ये पहायला मिळतो. पण मिरियमच्या पुढे असलेले प्रश्न, स्त्री म्हणून तिच्या स्वप्नांना असलेली बंधने आणि त्यातून तिने पुकारलेल बंड हे पडद्यावर उत्तमरीत्या उभं राहत. इथे मात्र बिनीचा संघर्षचं दिसत नाही.
या सिरीजसाठी कलाकार मंडळींची फौज उभी केली आहे. स्वरा भास्करच्या खांद्यावर सिरीजची धुरा दिली असली तरी, तिच्यापेक्षा गिरीश कुलकर्णी, मोना आंबेगावकर, वरून ठाकूर, डॉली सिंग यांचा पडद्यावरील वावर अधिक सुखावतो. थोडक्यात, एखाद्या विषयावर दोन पिढ्या किंवा समकालीन माणसांमध्येसुध्दा मतभेद असणं सहाजिक असतं पण समोरच्या व्यक्तीसोबत नीट संवाद साधला तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सहज मिळतात, ही बाब या सिरीजमुळे जाणवत राहते.