Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Bharat Jadhav : मराठी मनोरंजनसृष्टीतला ‘श्रीमंत’ कलाकार!
“गोड गोजिरी लाज लाजरी, ताई तु होणार नवरी”… या ओळी ऐकल्या की आपसूकच भरत जाधव यांचं ’श्रीमंत दामोर पंत‘ हे नाटक डोळ्यांसमोर उभं राहतं. मराठी नाट्यसृष्टीत अभिनेते भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी मोलाचे योगदान दिलं आहे. एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारून नाट्यसृष्टीचा पाया अधिक भक्कम भरत जाधव यांनी केला. इतकंच नाही तर मराठी मनोरंजनसृष्टीतील ते पहिले मराठी अभिनेते आहेत ज्यांनी स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली. जाणून घेऊयात भरत जाधव यांच्या प्रवासाबद्दल….(Marathi film star)
भरत जाधव यांनी आत्तपर्यंत नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही मनोरंजनाच्या माध्यमात कामं केली आहेत. व्ही शांताराम यांच्या मालकिच्या मुंबईतल्या चाळीत १९७३ मध्ये भरत जाधव यांचा जन्म झाला. चाळीत लहानाचे मोठे झालेल्या भरत यांचे वडिल टॅक्सी ड्रायव्हर होते. घरची परिस्थिती तशी बेताचीच आणि त्यातही अभिनयाचं खुळ भरत जाधव यांना लागलं. त्यावेळी नाटकात काम करणं म्हणजे बेरोजगारच आहेस अशी एक समजूत होती. पण भरत यांनी एकांकिकेतून सुरु केलेला अभिनयाचा प्रवास आज सातासमुद्रापलिकडे नेऊन ठेवला आहे. भरत यांच्या कामाची सुरुवातच शाहिर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमातून झाली. आणि तिथेच भरत यांची गट्टी जमली केदार शिंदे, Ankush Chaudhari, संतोष पवार, अरुण कदम यांच्याशी. (Bharat Jadhav films)
===========================
हे देखील वाचा: Suraj Chavan : भरत जाधव आणि सूरज चव्हाण यांची ग्रेट भेट
===========================
नाटकात छोट्या-मोठ्या भूमिका करत असले तरी भरत यांना खरी ओळख ‘ऑल द बेस्ट’ (All The Best) या नाटकामुळे मिळाली आणि हे नाटक अजरामर झालं. ३००० पेक्षा अधिक प्रयोग या नाटकाने करत एक इतिहासच रचला. याशिवाय ‘सही रे सही’, ‘तू तू मी मी’, ‘अस्तित्व’, ‘आमच्यासारखे आम्हीच’ अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी कामं केली. तसेच, ‘पछाडलेला’, ‘जत्रा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘शासन’ अशा अनेक मराठी चित्रपटांतही त्यांची कामं उल्लेखनीय ठरली. (Marathi films industry)

एकीकडे उत्तमोत्तम कामं करत असताना दुसरीकडे भरत जाधव यांनी करिअरमध्ये आणखी एक उत्तुंग भरारी घेत स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन घेतली. भरत जाधव यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये त्यांनी आजवर ज्या-ज्या भूमिका केल्या त्यांचे फोटो त्यांनी लावले आहेत. आणि विशेष म्हणजे ते फोटो ज्या फोल्डिंग टेबलावर त्यांनी लावले आहेत याच्या मागे भरत यांनी वडिलांच्या टॅक्सीची प्रतिकृती तयार केली आहे. इतकंच नाही तर आजही मुंबईत असताना टॅक्सी चालकाशी ते आपुलकीने बोलून त्यांच्याशी गप्पा मारताना दिसतात. त्यामुळे आजही भूतकाळात आपण कोणत्या वातावरणात वाढलो आणि मोठे झालो आहोत याची जाणीव ठेवून भरत जाधव आपल्या मुळांशी घट्ट नाते ठेवून आहेत.(Bharat Jadhav)
‘सही रे सही’ या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते आणि विशेष म्हणजे या नाटकाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. इतकंच नव्हे तर, ‘सही रे सही’ या नाटकाचे गुजराती आणि हिंदी नाटकात देखील रूपांतर झाले असून या गुजराती नाटकात शर्मन जोशी तर हिंदीत जावेद जाफरीने भूमिका साकारली आहे.

लवकरच भरत जाधव अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अशोक सराफ आणि मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०२५ या वर्षात कुरळे ब्रदर्स भेटीला येणार अशी अपेक्षा केली जात आहे. (Entertainment masala)
-रसिका शिंदे-पॉल