घरी रहा…छंद जोपासा
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधून आपल्या सर्वांना खळवळून हसवणारे अभिनेते भाऊ कदम सध्या लॉक झालेत. हो….कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनमुळे भाऊंनाही घरी रहायला मिळालं…तेही तब्बल सात वर्षानंतर…या सुट्टीचा भाऊंना आणि त्यांच्या कुटुंबियांना फायदा झालाय. एवढा वेळ घरी बसायची सवय नसलेले भाऊ थोडे कंटाळलेतही. पण ही सुट्टी सरकारने आपल्या आरोग्यासाठी दिली आहे. तेव्हा सरकारी नियमांचे पालन करा, घरी बसा. लवकरच सर्व पूर्ववत होईल असा संदेश ते आपल्या चाहत्यांना देत आहेत.
कलाकृती मि़डीयाबरोबर भाऊंनी संवाद साधला. एवढ्या मोठ्या सुट्टीत ते काय करतात हे विचारल्यावर भाऊ म्हणाले, मला पहिल्यांदा माझी बायको किती कष्ट घेते याची कल्पना आली. मुलांना सांभाळणे ही मोठी कला आहे. त्यांचा अभ्यास, शाळा, जेवण, त्यांनी केलेला पसारा आवरणे हे मोठे काम असते. मी नेहमी बाहेर असतो. मला अनेकजण सांगायचे, तुमच्या बायकोचे खूप कौतुक आहे. ती मुलांना खूप चांगल्या पद्धतीने साभाळते. पण मला हे कधी समजले नाही. पण या लॉकडाऊनच्या काळात याचा अंदाज मला आला. आता मुलांची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांच्याकडून अभ्यास करुन घेणे ते त्यांनी केलेला पसारा आवरणे…हे सर्व मी करतो. त्यामुळे हा मोठा टास्क मला वाटतो.
भाऊ सध्या मुलांबरोबर आपला वेळ घालवत आहेत. फक्त काही जरुरीचे सामान आणण्यासाठी ते घराबाहेर पडतात. सरकारने घातलेल्या नियमांचे पूर्ण पालन करत आहेत. त्यातून लवकर परिस्थिती सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सध्या भाऊ मुलांसोबत कॅरम, लुडो, हौजी सारखे गेम खेळतात. मुलांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत, ही बातमी त्यांनी मुलांना सांगितली नाही. त्यामुळे रोज सायंकाळी त्यांच्याकडून ते अभ्यास करुन घेतात. शिवाय नेहमीच्या व्यस्त वेळापत्रकात अनेक गोष्टी करायच्या राहील्या होत्या. त्या आता ते करत आहेत. जुने-नवे चित्रपट बघतात, नाटकं बघतात, शिवाय काही पुस्तकंही वाचायला घेतली आहेत. चहा हवा येऊ द्या ची सर्व टीम आता घरी आराम करीत आहे. या सर्वांची अनोखी मैत्री आहे. या सर्वांशी भाऊ फोन करुन गप्पा मारतात. याशिवाय खूप उशीरा पर्यंत झोपण्याचा आनंदही भाऊ घेत आहेत.
आपल्या सर्वांच्या सहकार्यांतून या कोरोना व्हायरसपासून सूटका होईल अशी खात्री भाऊ यांनी व्यक्त केली आहे. वास्तविक या उन्हाळ्याच्या सुट्टीत,परीक्षासंपल्यावर ते मुलांना कोकण फिरवणार होते. पण यावर्षी हा बेत त्यांनी रद्द केला आहे. पण त्यामुळे ते नाराज नाहीत. कुटुंबाला वेळ देणे गरजेचे असते, ते या लॉकडाऊनमध्ये शक्य झाल्याचे ते सांगतात.
ज्यांना या घरी बसण्याचा कंटाळा आला आहे, त्यांनाही भाऊंनी जरा धीर धरा असा सल्ला दिला आहे. भाऊ सांगतात, आता पूर्वीसारखे नाही, आता सगळी मनोरंजनाची माध्यमं घरात उपलब्ध आहेत. अनेकांचे काही छंद मागे राहीले असतील. ते त्यांनी पूर्ण करावे. गाणं, वाद्य यांची साधना करावी. पूस्तकं वाचावी. नाटकं बघावीत. फक्त माझ्याच नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यात एवढा मोठा गॅप मिळाला आहे. पण हा सार्वजनिक जीवनातला दुरावा तुमच्या आमच्या फायद्यासाठीच आहे. त्यामुळे घरी रहा आणि सरकारला मदत करा असे आवाहन भाऊ कदम यांनी केले आहे.
सई बने