महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
दिवाळीतील बीग फाईट : मोहब्बते विरुद्ध मिशन कश्मीर
दुनिया मे कितनी है नफरते… फिर भी दिलों मे है चाहते… मर भी जाए प्यार वाले… मिट भी जाए प्यार वाले… जिंदा रहेगी यह मोहब्बते….
आदित्य चोप्रा दिग्दर्शित यशराज फिल्म निर्मित “मोहब्बते” (mohabbatein) मधील या डायलॉगवर थिएटरमधून प्रचंड टाळ्या आणि शिट्ट्या.
वक्त, जिहाद और मौत… किसीका इंतजार नहीं करता
विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित “मिशन कश्मीर” या चित्रपटातील या डायलॉगवर थिएटरमधून प्रचंड टाळ्या व शिट्या
हे दोन्ही एकाच शुक्रवारी सुरु झाले… २६ ऑक्टोबर २०००. म्हणजेच या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनास चोवीस वर्ष पूर्ण झाली देखिल…. मला आठवतय दिवाळीचे दिवस होते. दिवाळीच्या मुहूर्तावर भले मोठे बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होण्याचा ट्रेण्ड रुजत होता. “यंदाच्या दिवाळीत कोणते मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत” याकडे पावसाळ्यापासूनच लक्ष.
शाहरुख खान व दिवाळीत त्याचा चित्रपट हे नाते घट्ट झाले होते. त्यामुळेच “मोहब्बते” (mohabbatein) २००० च्या दिवाळीत येणार हे स्पष्ट होतेच. त्याच्या स्पर्धेत “मिशन कश्मीर”. दोन्ही चित्रपट भिन्न स्वरुपातील. भिन्न व्यक्तिमत्वाचे. पहिल्यात प्रेमाचे लोणचे, मुरंबा, ड्रायफ्रूटस, ज्यूस, श्रीखंड असे सगळेच. दुसर्यात खचाखच ॲक्शन, आधुनिक शस्त्रास्त्र, दहशतवादी, रक्तपात, हिंसाचार वगैरे. मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना एक दिवस आधीच गोरेगावातील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील मिनी थिएटरमध्ये “मिशन कश्मीर” दाखवला. कश्मीर दहशतवादाविरुध्दचा कडवा संघर्ष पाहिला. तर “मोहब्बते” ची आम्हा चित्रपट समीक्षकांना लिबर्टी चित्रपटगृहाची फर्स्ट डे फर्स्ट शोची बाल्कनीची तिकीटे दिली होती. एव्हाना चकाचक मनोरंजन स्थिरावत होते.
यशराज फिल्मच्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित “दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे” (१९९५ ची दिवाळी) पासून नवश्रीमंत व उच्चभ्रू वर्गातील चित्रपट रसिकांना आपलेसे वाटतील अशा चकाचक मनोरंजक चित्रपटाचा ट्रेण्ड सुरु झाला. शाहरुख खान या “क्लास”चा (कार्पोरेट पिढीचा) हीरो म्हणून ओळखला जाऊ लागला. यश चोप्रा दिग्दर्शित “दिल तो पागल है” (१९९७ ची दिवाळी), करण जोहर दिग्दर्शित “कुछ कुछ होता है” (१९९८ ची दिवाळी) असे करत करत “मोहब्बते” (mohabbatein) आला ( त्यानंतरही शाहरुख व दिवाळी हे समीकरण हिट्टच राहिले. त्याची न्यूज स्टोरी होवू लागली.
“डीडीएलजे” च्या घवघवीत यशानंतर (तसा तो आजही मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला २९ व्या वर्षांत सुरुच आहे) आदित्य चोप्राचा चित्रपट कोणता याची उत्सुकता होतीच. त्यानंतर पाच वर्षांनी तो “मोहब्बते” घेऊन आला. दोन चित्रपटांच्या दरम्यान इतके अंतर हे त्याला साध्य झाले ( खरं तर “मोहब्बते”च तो अगोदर बनवणार होता. दिग्दर्शन पदार्पणातच ही गोष्ट नको असा यशजींनीच सल्ला दिल्याने त्याने अगोदर डीडीएलजे बनवला)
“मोहब्बते” (mohabbatein) सर्वात जास्त महत्वाचे, अमिताभ बच्चनने साकारलेली मुख्याध्यापक नारायण शंकर ही व्यक्तिरेखा. अमिताभचा जोरदार कमबॅकच. अमिताभसारख्या अष्टपैलू गुणवत्ता, कमालीचा आत्मविश्वास आणि फोकस्ड व्यावसायिक रणनीती असलेल्या कलाकाराने मृत्यूदाता, कोहराम, लाल बादशाह, सूर्यवंशम असे चित्रपट का स्वीकारावेत या प्रश्नाचे उत्तर मिळण्यापूर्वीच हे चित्रपट थिएटरमधून गेले देखिल. चित्रपटसृष्टीत यश हेच चलनी नाणे असल्यानेच या फ्लाॅपने अमिताभचे स्थान डळमळीत झाले.
आपला रस्ता आपणच शोधायचा असतो या अलिखित नियमानुसार अमिताभने जुहूच्या आपल्या प्रतिक्षा बंगल्यापासून जवळच असलेल्या यश चोप्रा यांच्या बंगल्यावर जात, त्यांची भेट घेत काम मागितले आणि त्यातून त्याला मोहब्बते मिळाला. हा किस्सा सर्वश्रुतच. दरम्यान जून २००० पासून सुरु झालेला “कौन बनेगा करोडपती” चा रंगतदार खेळ स्वरुप बदलत बदलत आणि अधेमधे काही काळ थांबत थांबत आजही छान सुरु आहे. सध्या मनोरंजन वाहिनीवर आवर्जून पाहण्यासारखे हेच.
“मोहब्बते”(mohabbatein) च्या खणखणीत यशाने अमिताभ पुन्हा जबरदस्त फाॅर्मात आला. फाॅर्म टेम्पररी असतो, गुणवत्ता कायम असते याचे हे सर्वोत्तम उदाहरण. या चित्रपटातील त्याच्या पत्नीच्या भूमिकेसाठी श्रीदेवी व माधुरीने (हिने एव्हाना लग्न करुन अमेरिका गाठली होती) नकार दिला म्हणून ही भूमिकाच काढून टाकली. अमिताभला मोकळीकही मिळाली. शाहरुख सुरुवातीस या चित्रपटासाठी नाहीच म्हणत होता. अमिताभसोबत संधी म्हणून हो म्हणाला. त्याची प्रेयसी म्हणून काजोलने लग्नामुळे तर रानी मुखर्जीने अन्य चित्रपटात बिझी असल्यानेच नाही म्हटले. ऐश्वर्याला संधी मिळाली. आनंद बक्षी यांच्या गीतांना जतिन ललितचे संगीत. गाणी आजही लोकप्रिय. तब्बल तीन तास छत्तीस मिनिटांचा चित्रपट असूनही त्यात गुरुकुल संस्कृती, तीन प्रेमकथा, जोरदार संवाद यामुळे चित्रपट सुपरहिट.
“मिशन कश्मीर“ची जातकुळीच वेगळी. मारधाड, पाठलाग, गोळीबारी चित्रपट आवडणार्यांसाठी हा चित्रपट पर्वणीच. दहशतवादाचा खातमा हे मध्यवर्ती कथासूत्र. मुंबईत मेन थिएटर मेट्रोत रसिकांकडून जोरदार स्वागत झाले. विनोद प्रधान यांच्या छायाचित्रणाचे विशेष कौतुक हवेच. संजय दत्त, हृतिक रोशन, प्रीति झिंटा, सोनाली कुलकर्णी, जॅकी श्राॅफ, पुरु राजकुमार इत्यादींच्या प्रमुख भूमिका. समीर व राहत इंदोरी यांच्या गीतांना शंकर एहसान लाॅय यांचे संगीत. ब्रुम्ब्रो गाणे आजही लोकप्रिय. चित्रपटाचे संकलन राजकुमार हिरानीचे.
===============
हे देखील वाचा : “वो मै नहीं” पन्नास वर्ष झाली तरी…
===============
दिवाळीत मोठे चित्रपट प्रदर्शित या ट्रेण्डमधील २००० सालची दिवाळी यशाचे जोरदार फटाके फोडणारी. चित्रपटसृष्टीला यशाचे भक्कम टाॅनिक हवे असते आणि एकदा का गल्ला पेटीवर चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत चालू लागला की चित्रपटावरची टीका टिप्पणी बाजूला सरते. मोहब्बते (mohabbatein)मध्ये विस्कळीतपणा जाणवतो नि मिशन कश्मीर मूळ दहशतवादी समस्या बाजूला ठेवून नुसताच गोळीबार करतो या गोष्टी दुय्यम ठरत जातात…
मोहब्बत भी जिंदगी की तरह होती है… हर मोड आसान नहीं होता…हर मोड पर खुशी नहीं होती… पर जब हम जिंदगी का साथ नहीं छोडते… फिर मोहब्बत का साथ क्यू छोडे? मोहब्बते (mohabbatein) पाहताना अशा प्रेमाच्या डायलॉगाची भरपूर रेलचेल तर मिशन कश्मीर पाहताना ढिश्यूम ढिश्यूम भरपूर.
महत्वाचे आहे ते, फिल्मवाल्यांना ही दिवाळी फळली. तशी ती प्रत्येक शुक्रवारी देखिल यशाने फळू देत…