दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
ब्लॉग: या कारणासाठी जुही चावलाने निर्मात्याला कोर्टात खेचले होते.…नव्वदच्या दशकाच्या मध्याची गोष्ट!
नव्वदच्या दशकातील एक गोड अभिनेत्री म्हणजे जुही चावला (Juhi Chawla). तिची प्रमुख भूमिका असलेली एक मालिका दूरदर्शनवर प्रक्षेपित होत असल्याचे वृत्त काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आणि त्यावरुन तिचाच गोंधळ उडाला. आपण अशा कोणत्याही स्वरुपाच्या मालिकेत भूमिका साकारलेली नाही, असा तिच्या सेक्रेटरीकडून लगोलग अगदी तत्परतेने खुलासा केला गेला.
खरंतर, जुही चावला (Juhi Chawla) तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘टाॅप फाईव्ह’ अभिनेत्रींपैकी एक होती आणि तिला अशा पध्दतीने छोट्या पडद्यावर येण्याची आवश्यकता नव्हती. याचीच ‘दुसरी बाजू’ म्हणजे त्या काळात ज्या स्टार्सना चित्रपटातून मागणी कमी कमी होते तेच छोट्या पडद्यावर येतात, असा एक समज होता. पण जुही चावला (Juhi Chawla) मात्र विचित्रच अनुभवातून जात होती. तिच्या बाबतीत आणखीन काही वेगळे घडले होते.
झालं असं, चित्रपट बराच काळ निर्मितीवस्थेत रखडला होता. या चित्रपटात जुही चावला (Juhi Chawla) प्रमुख भूमिकेत होती. चित्रपटाला वितरक लाभणे अवघड होते. म्हणून त्या चित्रपटाच्या निर्मात्याने अर्ध्या तासाचा एक भाग असे तेरा भाग केले (त्या काळात अनेक मालिका अशा तेरा भागाच्या असत आणि म्हणूनच जास्त प्रभावी ठरत).
निर्मात्याने एक प्रकारे व्यावहारिक विचार केला होता. पण आपण मालिकेसाठी नव्हे, तर आपल्या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी करार केला आहे, असा दावा जुही चावला (Juhi Chawla) हिने केला होता आणि त्यात तत्थही होते.
हे आताच का बरं सांगतोय? तर, आता परिस्थिती किती, केवढी आणि कशी बदलली आहे ते बघा. अजय देवगन ‘रुद्र’, माधुरी दीक्षित नेने ‘फेम गेम’ याप्रमाणे सैफ अली खान, बाॅबी देओल, राधिका आपटे असे अनेक बडे स्टार आज डिजिटल प्लॅटफॉर्मवर आले आहेत. तेदेखील कसलीही कटकट न करता अथवा अरे बापरे, आपण वेबसिरिजमध्ये काम करायचयं? असा कोणताही प्रश्न पडू न देता ते आले आहेत. असेच आणखीन काही बडे स्टार असेच वेबसिरिजमध्ये दिसले, तर त्यांनी बदलत्या काळाबरोबरच्या माध्यमासह आपल्यात बदल केला आहे असे अतिशय कौतुकाने म्हणता येईल.
फार पूर्वी असे होत नव्हते याला काही कारणे होती. दिलीपकुमार, देव आनंद आणि राज कपूर यांचे सोनेरी युग एकपडदा चित्रपटगृहे अर्थात सिंगल स्क्रीनचे होते. ते दिवसच वेगळे होते. त्यांना आणि त्या काळातील स्टार्सना चित्रपटगृहातील अंधारात पडद्यावर पाहताना स्वतःची दुःख/तणाव/विवंचना विसरुन जावे, अशी रसिकांची मानसिकता अथवा दृष्टिकोन होता.
त्या काळात शहरातील मोठ्या थिएटरमध्ये पस्तीस एमएमचा पडदा असे. छोट्या आणि ग्रामीण भागातील थिएटरमध्ये तर सोळा एमएमचा पडदा असे, मोनो साऊंड सिस्टीम असे. तरी रसिकांनी चित्रपटावर वर्षानुवर्षे बेहद्द प्रेम केले आणि तो रुजवला. त्यांना कधीच चित्रपट कसा पाहायचा, कोणता चित्रपट पाहायचा, हे सांगावे लागले नाही आणि त्यांनी ते ऐकलेही नसते. गुरुदत्त दिग्दर्शित ‘कागज के फूल’ (१९५९) हा आपल्याकडचा पहिला सिनेमास्कोप चित्रपट तर पांछी दिग्दर्शित ‘अराऊंड द वर्ल्ड’ (१९६७) हा आपल्याकडचा पहिला सत्तर एमएमचा पडदा असलेला चित्रपट होय.
त्यानंतर १९७२ साली मुंबईत दूरदर्शन (हळूहळू ते सगळीकडे गेले) आणि १९८२ साली देशात रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ आला तरी चित्रपटात भूमिका साकारणे हीच परिस्थिती होती. मालिकांच्या युगात मोठ्या पडद्यावरचे स्टार छोट्या पडद्यावर येऊ लागले तरी त्यांना खरी प्रतिष्ठा २००० साली अमिताभ बच्चनने कौन बनेगा करोडपतीचे सूत्रसंचालन स्वीकारले आणि अतिशय सूत्रबद्ध पध्दतीने यशस्वी केले तेव्हा मिळाली.
छोट्या पडद्यावरुन रसिकांना घरबसल्या दर्शन द्यायला काही हरकत नाही, त्यामुळे आपली चित्रपटातील लोकप्रियता ओसरत नाही, असा विश्वासच बीग बीने दिला आणि मग शाहरुख खान, माधुरी दीक्षित, गोविंदा, मनिषा कोईराला, अनुपम खेर, उर्मिला मातोंडकर, सोनाली बेंद्रे, करिष्मा कपूर, सलमान खान, आमिर खान, शिल्पा शेट्टी असे अनेक स्टार रिॲलिटी शो, गेम शो यातून आले.
आता त्यासाठी त्यांना चित्रपटाच्या स्वरुपात मानधन मिळाले की, छोट्या पडद्यासाठीची त्यांची प्राईज वेगळी होती अथवा असते हे पैसे देणारे आणि घेणारे यांनाच ठाऊक! (स्टार्सच्या मानधनाचे भले मोठे आकडे येतात. त्यात प्रसिद्धीचा भाग जरा जास्तच असतो. आपल्या कमाईचा खरा आकडा सांगणे या स्टार्सना अनेक कारणास्तव अडचणीचे असते. तो वेगळा विषय आहे.)
रेखा मात्र छोट्या पडद्यावर आली नाही. ती रिॲलिटी शोमध्ये येणार अशा अधूनमधून बातम्या येत असतात. गाॅसिप्स रंगत असते. पण तिने आपला अभिनय, फिटनेस, सौंदर्य आणि लोकप्रियता या गुणांवर आपले मोठ्या पडद्यावरचे आकर्षण कायम ठेवले आहे. टिच्चून टिकवले आहे. आपल्या कारकिर्दीच्या पन्नाशीनंतरही (तिचा पहिला चित्रपट ‘सावन भादो’ हा १९७० चा) ती चित्रपटातील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते, हे विशेष उल्लेखनीय आहे. आणि विशेष म्हणजे तिचे फॅन्स तिच्याशी कायमच जोडले गेले आहेत.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने चित्रपट प्रदर्शित होण्याच्या युगात अमिताभ बच्चनची भूमिका असलेला ‘गुलाबो सिताबो’ त्यावर आला. म्हणजेच बीग बीचे नवीन माध्यमात पाऊल पडले. तेच त्याचे पाऊल वेबसिरिजमध्येही पडले, तर आश्चर्य ते काय हो? जुने जाऊ द्या, आपण नव्याचा विचार आणि स्वीकार करु, त्यामुळे एकाच वेळेस मनोरंजन क्षेत्र, मिडिया आणि आजची डिजिटल रसिक पिढी अशा तिघांशीही आपण जोडलेले राहू असाच बीग बीचा सकारात्मक दृष्टिकोन दिसतो. रोल माॅडेल असावा तर बीग बीसारखा असेच मी म्हणेन.
चित्रपट, चॅनल, डिजिटल अशा तीनही माध्यमातून आपण कार्यरत राहिलो, तर कामात तोचतोचपणा येणार नाही असाही त्यामागे हेतू असेल, तर ते अगदी स्वाभाविक आहे अथवा योग्यच आहे. एखादा क्रिकेटपटू एकाच वेळेस कसोटी सामने, एकदिवसीय मर्यादीत षटकाचे सामने आणि ट्वेन्टी ट्वेन्टी अशा तीनही प्रकारांमध्ये कमालीच्या आत्मविश्वासाने खेळतो, प्रत्येकात काही वेगळे खेळायचे असते, प्रत्येकात डावपेच वेगळे असतात, प्रेशर्स वेगळे असते हे लक्षात ठेवतो आणि तीनही पध्दतीच्या सामन्यात यशस्वीही ठरतो. तसेच मनोरंजन क्षेत्रातील स्टार्सनाही एक प्रकारे खेळावे लागते. किंबहुना आता या मनोरंजन क्षेत्रात येत असलेल्यानी या विविधतेची जाणीव ठेवून पावले टाकली, तर त्यांना भरपूर संधी आहे. अगदी जाहिरातपटापासून इव्हेन्टसपर्यंत हा झक्कास एक्पोजर आहे.
====
हे देखील वाचा: जेव्हा दिलीप कुमार यांनी भर कोर्टात मधुबाला वरील जाहीर प्रेमाची कबुली दिली!
====
जाहिरातपटाचे काम एका दिवसाचे असले तरी ती सातत्याने त्या स्टारला रसिकांसमोर ठेवते. चित्रपटाचे काम लहान मोठ्या शेड्युलमधून अर्थात काही तुकड्या तुकड्याने होते. मालिकेसाठी जवळपास रोजच अडकून पडायला होते. रिॲलिटी शो, गेम शोमध्ये होम वर्क केल्याने काम सोपे होते.
वेबसिरिज कधी सहा भागांची, तर कधी त्यापेक्षा अधिक भागाची असते आणि त्याची निर्मिती प्रक्रिया चित्रपटासारखीच आहे. असे हे वेगवेगळे फंडे आजच्या ग्लोबल युगातील स्टार्सना वेगळे सांगण्याची अजिबात गरज नाही. ते अतिशय बुद्धिमान आणि प्रतिभावान आहेत. व्यावसायिक जगाचे त्यांना पूर्ण भान आहे.
फार पूर्वी, चित्रपट एके चित्रपट यावरच भिस्त ठेवावी लागे आणि काही स्टार पडद्यावरील आपल्या प्रतिमेच्या प्रेमात पडत. त्यांच्या फॅन्सनाही आपल्या आवडत्या स्टारने अजिबात चौकट मोडू नये, असेच वाटे. (राजकुमारने व्यक्तिरेखेबाहेर येऊन जोरदार डायलॉगबाजी करावी, देव आनंदने स्वतःच्या चालण्यावर, बोलण्यावर, दिसण्यावर प्रेम करावे असे त्यांच्या चाहत्यांना मनोमन वाटे आणि त्यांनाही अनेकदा पर्याय नसे.) आता डिजिटल युगात फॅन्स आणि फाॅलोअर्सही अधिकाधिक चौकस झाले आहेत. तेही चौकटीबाहेरचा विचार करतात.
बदल होतच असतो आणि तो व्हायला हवा असतोच. तोच बदल असा विविध स्तरांवर दिसतोय.