Ashok Saraf : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याशी अनेक

bobby : आर केच्या ‘बॉबी’ सिनेमाच्या पंजाबमधील डिस्ट्रीब्यूशनचा किस्सा!
Honesty is best policy असे इंग्रजीत म्हणतात. प्रामाणिकपणाचे फायदे नक्कीच असतात. कदाचित ते उशिरा मिळत असतील पण नक्की मिळतात. असाच काहीसा प्रकार पंजाबमधील एका डिस्ट्रीब्यूटरला राज कपूर (Raj Kapoor) यांच्याबाबत झाला होता. या डिस्ट्रीब्यूटरने अतिशय प्रामाणिकपणे राज कपूर यांच्यासमोर सत्य कथन केले आणि त्यातूनच त्यांना राज कपूरच्या ‘बॉबी‘ (bobby) या चित्रपटाचे डिस्ट्रीब्यूशन हक्क मिळाले. खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे.

त्याकाळी राज कपूरचे सहाय्यक असलेले राहुल रवैल यांनी त्यांच्या राज कपूरवरील पुस्तकात हा किस्सा लिहिला आहे. या प्रकरणातून राज कपूर यांच्या हिरे पारखण्याच्या जोहरी नजरेचा देखील प्रत्यय येतो. १९७० साली राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्या रनला हा सिनेमा सुपरफ्लॉप झाला. राज कपूर यांच्या म्हणण्यानुसार तब्बल ५५ लाख रुपयाचे नुकसान या सिनेमाने झाले होते.
राज कपूर संपला राज कपूर तबाह हो गया.. अशा वावड्या फिल्म इंडियामध्ये उठू लागल्या. पण राजकपूर हा खचून जाणाऱ्यातील नव्हता. त्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आणि ‘बॉबी’ (bobby) हा चित्रपट निर्माण करायला घेतला. परंतु ‘जोकर’ च्या अपयशानंतर बॉबी हा चित्रपट खरेदी करण्यासाठी आणि या चित्रपटाला फायनान्स देण्यासाठी डिस्ट्रीब्युटर्स पुढे यायला कचरत होते. ज्या फायनान्सर डिस्ट्रीब्यूटर्स यांनी राज कपूर यांच्या सिनेमावर करोडो रुपये कमवले होते तेच लोक आता राज कपूरला पैसे देण्यासाठी कचरत होते.

पण राज कपूर मात्र मोठ्या चिकाटीने आणि विश्वासाने बॉबी (bobby) या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये गुंतला होता. काही फसवे डिस्ट्रीब्युटर्स त्याच्याकडे येत होते. पण राजकपूरला असले लोक नको होते. याच काळातील ही घटना आहे. तेव्हा वकील सिंग नावाचा एक डिस्ट्रीब्यूटर राज कपूर यांना भेटण्यासाठी पंजाबहून आला होता त्याला ईस्ट पंजाबसाठी ‘बॉबी’ या चित्रपटाचे राइट्स हवे होते म्हणून तो मुंबईत आला होता. नाझ बिल्डिंग परिसरातील टीप टॉप हॉटेलमध्ये तो उतरला होता. राज कपूरला भेटण्यापूर्वी त्याची भेट मनोज कुमार यांच्याशी झाली. दोघांमध्ये बातचीत झाली.
तेव्हा मनोज कुमारला कळाले की तो राज कपूरच्या ‘बॉबी’ (bobby) चित्रपटाचे डिस्ट्रीब्यूशन राइट्स घेण्यासाठी आला आहे. तेव्हा त्याने याला त्याला एक सल्ला दिला, ”जर राज कपूरन विचारले तू मुंबईमध्ये कुठे उतरलास तर तू हॉटेल ओबेरॉयमध्ये उतरला असे उत्तर दे! हॉटेल ओबेरॉय म्हटल्यावर तुझा रौब वाढेल. राज कपूर कुणा लल्लू पंजूला भेटत नाहीत.” त्यावर वकील सिंग म्हणाला, ”पण मी तर नाझ बिल्डिंग जवळच्या टीप टॉप हॉटेलमध्ये उतरलो आहे.” त्यावर मनोज कुमार म्हणाला, ”टीप टॉप हॉटेलचे नाव ऐकल्यानंतर राज कपूरचा वॉचमन देखील तुला आज सोडणार नाही.” त्यावर सिंग म्हणाला, ”जर राज कपूर म्हणाले मी तुला ओबेरॉय हॉटेलमध्ये भेटायला येतो तर मी काय उत्तर देणार?” त्यावर मनोज कुमार म्हणाले, ”ओबेरॉय हॉटेल त्यांच्या ऑफिसपासून खूप लांब आहे आणि ते तुला तिथे भेटायला येणार नाहीत त्यामुळे तू ओबेरॉय हॉटेलमध्येच उतरला असे सांग म्हणजे तुझे काम नक्की होईल.”
===============
हे देखील वाचा : Gopaldas Neeraj : “या” निर्मात्याने गीतकाराला गिफ्ट केली स्वतःची कार !
===============
मनोज कुमारच्या सल्ल्यानुसार तो डिस्ट्रीब्यूटर वकील सिंग राज कपूर यांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेला तिथे गेल्यानंतर राज कपूरने पहिला प्रश्न त्यांना विचारला की, ”मुंबईमध्ये तुम्ही कुठे उतरला आहात?” सिंगला मनोज कुमारच्या उत्तराची आठवण झाली. तो म्हणाला, ”मी हॉटेल ओबेरॉयमध्ये उतरलो आहे.” ते ऐकल्यानंतर राजकपूर खुश झाले. ते म्हणाले, ”ठीक आहे. आज संध्याकाळी माझे तिकडे काम आहे. मी संध्याकाळी सात वाजता ओबेरॉय हॉटेलमध्ये तुम्हाला येऊन भेटतो !” आता मात्र वकील सिंगची पाचावर धारणा झाली. तो म्हणाला, ”कपूर साहब. मी अजून हॉटेलमध्ये चेक इन केलेले नाही. एअरपोर्टवरून डायरेक्ट मी तुम्हाला भेटायला आलो आहे.”
त्यावर राजकपूर म्हणाले, ”ठीक आहे. तू आता हॉटेलमध्ये जाऊन चेक इन कर. मी संध्याकाळी तुला भेटायला येतो !” आता मात्र वकील सिंग यांची पंचाइत झाली. तो आपल्या टीप टॉप हॉटेलवर गेला. तिथून चेकआउट केले आणि संध्याकाळी सहा वाजता त्याने हॉटेल ओबेरॉयमध्ये चेक इन केले. बरोबर संध्याकाळी सात वाजता तो राज कपूरची आवडती ब्लॅक लेबल व्हिस्की घेऊन त्यांची वाट पाहत बसला. सात वाजता राज कपूर आले रात्री दहापर्यंत त्यांच्या गप्पा झाल्या. उद्या दुपारी पुन्हा सिंगला त्यांनी आपल्या ऑफिसला बोलावले.
मात्र दुसऱ्या दिवशी राज कपूर यांना सिंग सोबतची मीटिंग रि-शेड्युल करायची होती म्हणून त्याने सकाळी हॉटेल ओबेरॉयला फोन केला तेव्हा हॉटेलकडून त्यांना असे कळाले की सिंग यांनी काल रात्री चेक आउट केले आहे. त्यांना काहीच प्रकार कळाला नाही. दुसऱ्या दिवशी सिंग राज कपूर यांना भेटायला गेल्यानंतर राज कपूर त्यांना म्हणाले, ”मी सकाळी हॉटेलला फोन केला होता पण तुम्ही काल रात्रीच चेक आउट केले. कसे काय?” आता मात्र वकील सिंग यांचा नाईलाज झाला.

त्यांनी सर्व ट्रू स्टोरी राज कपूर सांगितली आणि सांगितले की, ”खरंतर मी काल रात्री दहा वाजताच तुमच्यासोबत मीटिंग झाल्यानंतर हॉटेल चेक आउट केले. यामुळे मला हॉटेलचे फक्त 30 टक्केच बिल द्यावे लागले. कपूर साब मी गरीब माणूस आहे. मी नाझ बिल्डिंग जवळच्या टीप टॉप हॉटेलमध्ये उतरलो आहे. मला मनोज कुमार यांनी ओबेरॉयचे नाव सांगितले. त्यामुळे मी तिकडे खास तुमच्या सोबत मीटिंग करण्यासाठी गेलो होतो. पण आता तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो. पण मी नक्की सांगतो मी साध्या हॉटेलमधील उतरलो असतो; तरी माझे पंजाबमधील नेटवर्क चांगले आहे. ‘बॉबी’ हा चित्रपट मी अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे रिलीज करेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका.” राज कपूर यांना सिंग यांच्या प्रामाणिकपणाची खात्री पडली. त्यांनी वकील सिंगला मिठी मारली आणि म्हणाले, ”अरे पुत्तर तूने मेरा दिल जीत लिया रे…”
अशा पद्धतीने सिंग यांना ‘बॉबी’ (bobby) या चित्रपटाचे संपूर्ण पंजाबच्या डिस्ट्रीब्युशनचे हक्क मिळाले. तिथून पुढे आर केच्या प्रत्येक चित्रपटाचे डिस्ट्रीब्यूशन सिंग करत होते. राजकपूर पारखी नजरेचे होते. मनोज कुमार यांनी दिलेला सल्ला देखील योग्य होता. कारण त्यावेळी राजकपूर प्रत्येक पाऊल खूप काळजीने उचलत होते. आपला चित्रपट योग्य व्यक्तीच्या हातात जावा ही त्यांना काळजी होती. त्यामुळे मनोज कुमारने दिलेला सल्ला देखील उपयोगी पडला. दिग्दर्शक राहुल रवैल यांनी राज कपूरवर लिहिलेल्या पुस्तकांमध्ये हा किस्सा विस्ताराने लिहिला आहे.