मराठीच्या पडद्यावर हिंदी अभिनेत्री..
सुषमा शिरोमणी अभिनित आणि निर्मित “फटाकडी” (१९७८) या मसालेदार मनोरंजक चित्रपटात रेखाने साकारलेले ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ या आयटम सॉंगने सगळीकडे धूम मचवली असल्याचे रेखाच्या कानावर गेले (आपल्या यशाच्या गोष्टी सेलिब्रेटिजना हव्याहव्याश्या वाटतच असतात) आणि आपलेच गाणे आपण ‘पडदाभर’ पहावे असे रेखाला वाटले, तिने तशी इच्छाही व्यक्त केली. तिने व्यक्त केलेली ही इच्छा सुषमाने एका मिनी थिएटरमध्ये, या सुपर हिट गाण्याचा शो आयोजित करुन पूर्णही केली.
खुद्द सुषमा शिरोमणीने एकदा गप्पांच्या ओघात हा खास किस्सा सांगितला.
आजच ही गोष्ट का आठवली माहित्येय? दिग्दर्शक गजेन्द्र अहिरेच्या मराठी चित्रपटात जया बच्चनची भूमिका आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही.
पण मराठी चित्रपटाच्या पडद्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीचा प्रवास अशा पध्दतीने यशस्वीपणे पुढे सुरु आहे आणि तेच कौतुकाचे आहे. जया बच्चननी यापूर्वी अमिताभ बच्चनचे (Amitabh Bachchan) (मेकअपमन दीपक सावंत यांनी निर्मिलेल्या ‘अक्का’ (१९९४) या मराठी चित्रपटात अमिताभसोबत श्रीगणेश भक्तीचे ‘तू जगाचा अधिपती नमन तुला पहिले श्री गणपती’ हे गाणे साकारले आहे. तर सुषमा शिरोमणीने आपल्या प्रत्येक मसाला मिक्स मराठी चित्रपटात हिंदी अभिनेत्रीच्या नृत्याचा तडका रसिकांना आवडेल अशाच पध्दतीने साकारला आहे. सुषमाच्याच ‘गुलछडी’मध्ये रति अग्निहोत्रीचे ‘पब्लिकला मी दिले आमंत्रण’ हे फक्कडबाज लावणी नृत्य रंगले. सुषमाच्या चित्रपटात हिंदी कलाकार ही एक छान हुकमी ओळख निर्माण झाली आणि अरुणा इराणी (भिगंरी), मौशमी चटर्जी (मोसंबी नारंगी) अशी हिट लिस्ट वाढत राहिली.
माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) मराठी चित्रपटात कधी बरी भूमिका साकारणार हा एक दीर्घकालीन प्रश्न होता. एक दोनदा मी देखिल तिला मुलाखतीत विचारला (माधुरी दीक्षित हिंदी चित्रपटाच्या सेटवरही आम्हा सिनेपत्रकारांशी शुध्द मराठीतच बोलायची हेही आम्ही कौतुकाने लिहित असू), माधुरी मराठीत खूपच उशिरा आली. तरीही ती ‘ब्रेकिंग न्यूज’च! तेजस विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटात तिने भूमिका साकारली. त्यानिमीत्ताने ती अलिबाग तालुक्यातील चौल, रेवदंडा परिसरात शूटिंगसाठी गेली.
हे देखील वाचा: बॉलिवुडवर राज्य करणारी, देश विदेशातील प्रेक्षकांना आपल्या सौंदर्याने, नृत्याने आणि अभिनयाने भुरळ पडणारी अशी ही मनमोहिनी माधुरी.
तर तिने स्वप्निल जयकर दिग्दर्शित ‘१५ ऑगस्ट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आणि तो तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने रिलीज केला. उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) ह्रदयनाथ, आजोबा अशा मराठी चित्रपटात भूमिका साकारली. सोनाली बेंद्रेने (Sonali Bendre) केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं बाई अरेच्च्या’ या मराठी चित्रपटात ‘छम छम करता यह नशीला बदन’ हे आयटम सॉन्ग साकारले. तर अमोल पालेकर दिग्दर्शित ‘अनाहत’ या चित्रपटात भूमिका साकारली. विशेष म्हणजे हा चित्रपट खरं तर हिंदीत निर्माण होणार होता. पण काही कारणाने तो मराठीत निर्माण करावा लागला, पण थीम आवडल्याने अगोदरच होकार दिला असल्याने सोनालीने या चित्रपटात भूमिका साकारायचे निश्चित ठेवले. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मराठी चित्रपटात भूमिका साकारताना असेही काही किस्से, गोष्टी घडतात.
कधी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मराठीत फक्त नृत्यापुरती तर कधी एकाद्या व्यक्तिरेखेत अशी ही छान दुहेरी वाटचाल सुरु आहे. याबाबत अनेक उदाहरणे सांगता येतील.
नूतनजी या चाळीसच्या दशकातील अभिनेत्री शोभना समर्थ यांची मोठी मुलगी तर तनुजा छोटी मुलगी. या दोघीनीही मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे. नूतनने किशोर मिस्कीन निर्मित आणि दिग्दर्शित ‘पारध’ या मराठी चित्रपटात हवेलीच्या मालकिणीची भूमिका साकारली. या चित्रपटात सचिन पिळगावकर आणि सारिका हे नायक नायिका होते. तनुजाने सुषमा शिरोमणी दिग्दर्शित ‘गुलछडी’, मीनल भाटिया दिग्दर्शित ‘उनाड मैना’, डाॅ. श्रीराम लागू दिग्दर्शित ‘झाकोळ’ तर कालांतराने नीतिश भारव्दाज दिग्दर्शित ‘पितृऋण’ या मराठी चित्रपटात भूमिका साकारली.
पितृऋण या चित्रपटासाठी तनुजाची निवड नेमकी कशी केली असे मी नीतिश भारव्दाजला विचारले असता तो म्हणाला, या व्यक्तिरेखेसाठी कोणाची निवड करायची या विचारात मी बरेच दिवस होतो. अशातच यश चोप्रा यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी यशराज फिल्म स्टुडिओत तनुजाना पाहिले आणि मला वाटले, या व्यक्तिरेखेसाठी तनुजाच योग्य आहे. नीतिश भारव्दाजने केलेली निवड अगदी योग्य होती हे चित्रपट पाहिल्यावर लक्षात आले (येथे दिग्दर्शक दिसतो असे कौतुकाने म्हणायला हवे). हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मराठीच्या पडद्यावर येण्याची अशीही काही कारणे आहेत. दीप्ती नवलने सूर्योदय आणि अनाहत या मराठी चित्रपटात भूमिका साकारली.
गगनबिहारी बोराटे दिग्दर्शित ‘सूर्योदय’मध्ये (१९८९) नाना पाटेकरसोबत तिने भूमिका साकारली. या चित्रपटाची भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागात निवड झाली होती. मराठी चित्रपटात भूमिका साकारल्याने हा एक विशेष योग येतो. पद्मिनी कोल्हापूरने महेश कोठारे दिग्दर्शित ‘चिमणी पाखरं’, डाॅ. मृणालिनी पाटील दिग्दर्शित ‘मंथन’, शरद बनसोडे दिग्दर्शित ‘मुंबई आमचीच’ या चित्रपटात भूमिका साकारली.
हेलनच्या नृत्य अदांबाबत वेगळे सांगायला नकोच. धाकटी बहिण, शांतता खून झाला आहे अशा मराठी चित्रपटात हेलनचे धमाकेदार नृत्य आहे. बिंदूनेही “माफीचा साक्षीदार” या चित्रपटात नृत्य साकारले आहे. तर पद्मा खन्ना ‘देवता’ या चित्रपटात खेळ कुणाला दैवाचा कळला या गाण्यात होती. अरुणा इराणी कधी फक्त नृत्यापुरती (आंधळा मारतो डोळा वगैरे) तर कधी नायिका (चंगू मंगू) साकारलीय.
हे नक्की वाचा: उर्मिला मातोंडकर आणि बरंच काही
नम्रता आणि शिल्पा या शिरोडकर भगिनींची आजी मीनाक्षीताई शिरोडकर या फार पूर्वी मराठी चित्रपटाच्या आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या गेल्या. या भगिनीनी हिंदी चित्रपटात कारकिर्द घडवली. तरी शिल्पाने “सौभाग्यावती सरपंच” या चित्रपटात तर नम्रताने ‘अस्तित्व’ या चित्रपटात भूमिका साकारली. ‘सौभाग्यवती सरपंच’चा मुहूर्त आजीवासन स्टुडिओत गाण्याच्या रेकाॅर्डिंगने झाल्याचे आठवतेय. शिल्पा आपल्या आईसोबत आली होती आणि आपण मराठी चित्रपटात भूमिका साकारत आहोत याचे तिला विशेष रोमांच वाटत होते. या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने आपण प्रथमच कोल्हापूरला जात आहोत असे शिल्पा म्हणाली होती. त्या काळात मराठी चित्रपट आणि कोल्हापूर हे अगदी घट्ट नाते होते. नंदिता दासनेही मराठी चित्रपटात भूमिका साकारलीय हे कदाचित माहित नसेल. चित्रा पालेकर दिग्दर्शित ‘माती माय’मध्ये भूमिका साकारलीय.
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या एकाच वेळेस हिंदी व मराठीत निर्माण झालेल्या चित्रपटात तब्बूने भूमिका साकारली. इशा कोप्पीकर हिंदीत ‘खल्लास गर्ल’ म्हणून फेमस झाली. तिनेही ‘मात’ या मराठी चित्रपटात भूमिका साकारली. अशी अनेक तरी उदाहरणे देता येतील. अगदी चेतन आनंद दिग्दर्शित ‘आखरी खत’ (१९६६) या चित्रपटात राजेश खन्नाची नायिका असलेल्या इंद्राणी मुखर्जीने राजदत्त दिग्दर्शित ‘अपराध’ (१९६९) या मराठी चित्रपटात रमेश देव आणि सीमा यांच्यासोबत प्रमुख भूमिका साकारली. तर प्रियांका चोप्राने राजेश म्हापुस्कर दिग्दर्शित ‘व्हेन्टीलेटर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करताना त्यात छोटीशी भूमिकाही साकारलीय. ती आपल्याच भूमिकेत म्हणजे प्रियांका चोप्राच होती.
अशी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मराठीच्या पडद्यावरची आणखीन अनेक उदाहरणे (‘आधार’ या चित्रपटात जयाप्रदा, मणी मंगळसूत्रमध्ये ह्रषिता भट्ट वगैरे वगैरे) सांगता येतील. अनेकदा तरी ती ब्रेकिंग न्यूजच ठरलीय. तरीही त्यासह काही प्रश्नांची कुजबुज झालीच (व्हायलाच हवी). कधी म्हटलं गेले, ही थीम मराठी अभिनेत्रीसाठी फिट्ट होती, तरी हिंदी तारका कशाला? मराठी अभिनेत्रीना ग्लॅमर नाही काय? कधी कुजबुज झाली की, मराठी चित्रपटात भूमिका साकारायला हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मानधन किती घेत असतील हो? त्यात पुन्हा त्यांचा ड्रायव्हर, मेकअपमन, हेअरड्रेसर, बाॅय यांचे भारी मानधनही द्यायला हवे. कधी या अमराठी अभिनेत्रींच्या डबिंगचाही खर्च असतोच.
काही हिंदी अभिनेत्रीनी मराठी चित्रपटासाठी नृत्य साकारताना हिंदी चित्रपटसृष्टीतील नृत्य दिग्दर्शिकाही आणली. (मराठीतही उत्तमोत्तम नृत्य दिग्दर्शक आहेत हो, त्यांच्यावर विश्वास वाढवा.) आऊटडोअर्स शूटिंगच्या वेळी हिंदी अभिनेत्रीची बडदास्त कशी महागडी असते? त्यांना विशेष काही खाणे असते काय? तिला मराठी बोलता येते काय? ती मराठी चित्रपट पाहते काय? (होय मी मराठी चित्रपट पाहते, त्याच्या कथा खूप इम्प्रेसिव्ह असतात असे हिंदीतील अनेक सेलिब्रेटिज टिपिकल उत्तर देतात) सर्वात महत्वाचे म्हणजे, हिंदीतील अभिनेत्री मराठीच्या पडद्यावर आल्याने शो हाऊसफुल्ल झाले का? तेच जास्त महत्वाचे असते. त्याचा कधी कधीच लाभ झाला असेल तर थीमची गरज असेल तर आणि तरच हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मराठीत येऊ देत.
दिग्दर्शक गजेन्द्र अहिरेने जया बच्चनबाबत तोच विचार केला असणार हे जसे विश्वासाचे आहे, तसेच जया बच्चनही उगाच कोणत्याही चित्रपटाला होकार देणार नाही हेही खरेच. येथे दिग्दर्शक दिसतो असे गजेन्द्र अहिरेबाबत नक्कीच म्हणता येईल. तो थीमनुसार कलाकार निवडण्यासाठी ओळखला जातो.
एक वेगळे उदाहरण देतो. दिग्दर्शक विजय कोंडके यांना ‘माहेरची साडी’ (१९९१) या चित्रपटासाठी भाग्यश्री पटवर्धन हीच ‘सोशिक नायिका ‘ म्हणून योग्य वाटत होती. त्या सुमारास तिची भूमिका असलेल्या सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘मैने प्यार किया’ सुपरडुपर हिट झाला असल्याने तर भाग्यश्रीची जबरदस्त क्रेझ होती. त्यामुळे विजय कोंडके यांची ही निवड योग्यच होती. पण बराच काळ जाऊनही भाग्यश्रीने होकार दिला नाही म्हणून अखेरीस आणखीन वेळ वाया न घालवता शूटिंग सुरु करुया असा व्यावसायिक विचार करुन अलका आठल्येची निवड केली आणि ‘माहेरची साडी’ असा काही खणखणीत यशस्वी ठरला की आज तीस वर्षांनंतरही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे हे विशेष उल्लेखनीय आहे.
म्हटलं ना, सिनेमाच्या जगात एकाच वेळेस बरेच काही घडत/बिघडत असते आणि त्यातूनच या माध्यम व व्यवसायाची झक्कास वाटचाल सुरु आहे.