फिल्मी दुनियेची सुपरहिट ब्लॉकबस्टर दिवाळी
सिनेमाच्या जगात यश आणि फक्त यशच सबकुछ असते. आणि जेव्हा पिक्चर भारी हिट होते तो ‘शुक्रवार’ या फिल्मवाल्यांची दसरा दिवाळी! फार पूर्वी तर आजच्यासारखं शाहरूख खानचा सिनेमा दिवाळीत, सलमानचा ईदला आणि आमिरचा ख्रिसमसला असे ‘सणवार’ नसत. हे हीरो अधूनमधून आपल्या सणावरचा हक्क बाजूला ठेवतात. फार पूर्वीपासूनच फस्ट डे फर्स्ट शोच्या पब्लिकला पिक्चर आवडले रे आवडले की पक्का रिपोर्ट मिळे, पिक्चर हिट आहे हे वर्षानुवर्षे चालत आलेले मोठे सत्य आहे (तो एकूणच वेगळा विषय आहे).
दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊन सुपर हिट झालेले अशा ‘टॉप फाईव्ह’ हिंदी चित्रपटावर ‘फोकस’ करूया…
१) मुकद्दर का सिकंदर (२७ ऑक्टोबर १९७८) – साठीच्या आसपासच्या रसिकांच्या डोळ्यासमोर एव्हाना मरीन ड्राईव्हवर अमिताभ बच्चन सुसाट मोटारसायकलवर ‘वो मुकद्दर का सिकंदर जानेमन कलहाऐ गा’ नक्कीच आला असेल. ‘सलाम ए इश्क मेरी जान, प्यार जिंदगी है, दिल तो है दिल दिल का ऐतबार क्या चीज है’ अशी सगळीच गाणी एकदमच आठवली असतील. रेखा, राखी, विनोद खन्ना, अमजद खान, कादर खान, निरुपा रॉय असे सगळे डोळ्यासमोर आले असतीलच. दिग्दर्शक प्रकाश मेहरा आणि अमिताभ बच्चन या जोडीने कायमच मसालेदार व मनोरंजक चित्रपटाची चौकट सांभाळून विविधता दिली. त्यातील ‘जादुगर’ वगळता सगळे चित्रपट सुपर हिट! मुकद्दर का सिकंदरच्या काळात विभागवार चित्रपट प्रदर्शित होत. भारतातील एकूण अकरा वितरण क्षेत्रातील सुरुवातीला दोन तीन राज्यात, मग पुढील शुक्रवारी आणखीन दोन विभागात असा नवीन चित्रपटांच्या प्रदर्शनाचा प्रवास सुरु असे. मुकद्दर का सिकंदर काही शहरात दिवाळीपूर्वी तर काही शहरात दिवाळीत तर काही ठिकाणी दिवाळीनंतर असाही रिलीज झाला आणि पहिल्याच शोपासून सुपर हिट ठरला. ते जास्त महत्वाचे आहे. मुंबईत मेन थिएटर अलंकार येथे या चित्रपटाने तब्बल पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला. या दशकातील टॉप फाईव्ह चित्रपटातील हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. हिट गाण्यांमुळे रसिकांच्या किमान तीन पिढ्या ओलांडून आजही हा चित्रपट हिट आहे. सिनेमात गीत, संगीत व नृत्य दर्जेदार हवे हे आजच्या सिनेमावाल्याना कोणीतरी ओरडून सांगा हो.
हे वाचलंत का: सिनेमाचे जग आणि मिडिया यांच्या दिवाळीतील नातेसंबंधाची सुरुवात एक खूप मोठी परंपरा आहे…. याच परंपरेविषयी…
२) मर्द (८ नोव्हेंबर १९८५) – दिग्दर्शक मनमोहन देसाई आणि अमिताभ बच्चन हीदेखील भारी हिट जोडी. मनजींच्या चित्रपटातील अमिताभ हा अगदी पिटातल्या पब्लिकशी (पडद्याच्या अगदी जवळचा) पडद्यावरुन थेट संवाद साधणारा. अनेकदा सेटवरच अमिताभ मनजींकडे एकाद्या अतिरंजित दृश्य अथवा संवादाबाबत नाराजी व्यक्त करत असे, पण मनजी म्हणत, ‘ये मेरी फिल्म है….’ असे किस्से, कथा, दंतकथा प्रसिद्ध झाल्या. याही चित्रपटात अमिताभच्या आईच्या भूमिकेत निरुपा रॉयच, पण पिता मात्र ‘मर्द हीरो’ला साजेसा हवा. तसा एक जबरा कलाकार म्हणजे दारासिंग. एका दृश्यात दारासिंग चक्क धावपट्टीवरुन उड्डाणासाठी धावत असलेल्या विमानाच्या पंख्यात साखळदंड अडकवतो आणि ते थांबवतो (मनजींच्या चित्रपटात असे काहीही चाले). या चित्रपटातील अमिताभ व अमृता सिंग जोडीवर तेव्हा खूप विनोद झाले (आजच्या भाषेत मिम्स). मुंबईत मेन थिएटर रॉक्सीमध्ये चक्क खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. मनजींच्या मनोरंजनाचा हुकमी ऑडियन्स होता. तो कंटाळला तेव्हा अमिताभबरोबरचा त्यांचा ‘गंगा जमुना सरस्वती’ (१९८८) दाणकन आपटला.
३) तेजाब (११ नोव्हेंबर १९८८) – संकलक आणि दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्या या चित्रपटाच्या मुहूर्ताचे आमंत्रण आजही माझ्या कलेक्शनमधे आहे आणि मुहूर्त तर छोट्या छोट्या गोष्टींसह स्पष्ट आठवतोय (मुहूर्ताच्या आमंत्रणात नाना पाटेकरचेही नाव आहे, ती भूमिका नंतर सुरेश ओबेरॉयने केली, ती वेगळी स्टोरी आहे). अंधेरीच्या नटराज स्टुडिओत अमिताभ बच्चनच्या हस्ते ‘तेजाब’चा मुहूर्त होताना जितेंद्रने कॅमेरा कळ दाबली. तोपर्यंत माधुरीचे पिक्चर पडत होते. पण आपल्या मेहनतीत ती कुठेही कमी पडत नाही हे एन. चंद्रा यांच्या कृपेने मेहबूब स्टुडिओत ‘एक दो तीन चार’ गाण्याच्या शूटिंगच्या वेळी सेटवर रिपोर्टीगसाठी गेलो असताना अनुभवले. हे गाणे हमखास हिट होणार हे लक्षात येताच अनिल कपूरला आपल्यावरही असे गाणे हवे असे झाले. चंद्रा ह्यांनी पटकथेत तशी जागा काढली आणि आज जो शाहरूखचा मन्नत बंगला आहे तेथे शूटिंग केले (तेथे पूर्वी हमखास शूटिंग होई आणि तेव्हाच्या आम्हा सिनेपत्रकारांचे सेटवर जाणे होई). ‘तेजाब’चे मुंबईतील मेन थिएटर ड्रीमलॅन्डला पब्लिकने पिक्चरचे असे काही जोरदार स्वागत केले की माधुरी स्टार झाली. पण नेमकी तेव्हा ती अमेरिकेत बहिणीकडे होती, काही दिवसांनी मुंबईत आल्यावर विमानतळावरच टॅक्सीवाले तिला बघून ‘मोहिनी मोहिनी’ असे म्हणाले तेव्हा तिच्या लक्षात आलं की, ‘तेजाब’ हिट झालाय (टेलिकम्युनिकेशन क्रांती होण्यापूर्वीचा हा काळ होता हो!).
४) दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे (रिलीज २० ऑक्टोबर १९९५) – यशराज फिल्मचे हे पंचवीसावे वर्ष सुरु होते, आदित्य चोप्रा पित्याच्या अर्थात यशजींच्या पावलावर पाऊल टाकत दिग्दर्शनात उतरला. श्रवणीय गीत- संगीतासह खेळकर खोडकरपणे प्रेमकथा खुलवली. यशराज फिल्म बॅनरने या डीडीएलजेपासूनच भारतासह युरोप आणि अमेरिकेत आपली चित्रपट वितरण संस्था सुरु केली. देशात खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले होते. चित्रपट रसिकांची मानसिकता बदलली होती. दिवाळी म्हणजे रोषणाई, फराळ, खरेदी आणि शुभेच्छा यासह चकाचक चित्रपटाचे मनोरंजन असे नवीन समिकरण समाजात रुजत होते. शाहरूख खान या पिढीचा लाडका हीरो होता. आणि सिनेमाही म्युझिकल हिट ठरला. आज यशराज फिल्म बॅनरचे हे पन्नासावे वर्ष सुरु आहे आणि या चित्रपटाचे पंचवीसावे. लॉकडाऊननंतर जगभरातील अनेक देशांत मोठ्या प्रमाणावर डीडीएलजे रिलीज झाला आहे. यश, यश आणि फक्त यशच बरेच काही घडवते. हिंदी चित्रपटसृष्टी आणि समाज असा विचार करताना डीडीएलजेपूर्वी आणि नंतर असा फोकस टाकावा लागतो असा हा माईलस्टोन चित्रपट. मेन थिएटर न्यू एक्सलसियर दिवसा तीन खेळ याप्रमाणे पन्नास आठवड्यांचा मुक्काम केल्यावर मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला शिफ्ट केला आणि लॉकडाऊनचा काळ वगळता तो सुरुच आहे. विश्वविक्रमच हो म्हणायचा.
हे ही वाचा: जिंदगी ना मिलेगी दोबारा- एक ब्रेक तो बनता है
५) दिल तो पागल है (रिलीज ३१ ऑक्टोबर १९९७) – राज कपूर आणि यश चोप्रा हे अगदी अखेरपर्यंत आपल्या व्यक्तिमत्व आणि दिग्दर्शनातील तारुण्य टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले. यशजींनी या चित्रपटात गीत, संगीत व नृत्य यांच्या माध्यमातून प्रेमाचा त्रिकोण-चौकोन रंगवला. दिवाळी म्हणजे शाहरूखचा सिनेमा हवाच असे कितीही मार्केटिंग झाले तरी हा चित्रपट कोणत्याही शुक्रवारी रिलीज होत दिवाळी साजरी झाली असती. उर्मिला मातोंडकरला अन्य चित्रपटामुळे या चित्रपटासाठी होकार देता न आल्याने माधुरी आणि उर्मिला यांच्यातील अभिनय, नृत्य व सौंदर्य यांचा सामना टळला आणि करिष्माने बाजी मारली. मुंबईत मेन थिएटर लिबर्टीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. पण आजही चॅनल अथवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट तजेलदार अनुभव आणि आनंद देतोय (येथे दिग्दर्शक दिसतो).
दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊन सुपर हिट झालेले आणखीन अनेक चित्रपट आहेत तसेच दणकून फ्लॉप झालेलेही ‘सावरिया’ (२००७), ‘ठग्ज ऑफ हिन्दुस्तान’ (२०१८) वगैरे बरेच चित्रपट आहेत. दिवाळी म्हणजे सिनेमा हमखास हिट असे अजिबात नाही आणि नसतेच.
तुमचा चित्रपट कोणत्याही फिल्मी ज्योतिष्याला विचारुन कोणत्याही शुक्रवारी रिलीज करा हो, प्रेक्षकांना तो समजला तर आणि तरच आवडतो आणि एकदा का त्यांना सिनेमा आवडला की मग यशाचे फटाके, फराळ वगैरे बरेच काही आहेच.