
इच्छाधारी Nagin पन्नास वर्षांची झाली!
नागिन के ‘इंतकाम का ज्वाला कोई ताबीज शांत नहीं कर सकती’, हा शाप एका इच्छाधारी नागिणीचा. ती होती राजकुमार कोहली निर्मित आणि दिग्दर्शित ‘नागिन’ (मुंबईत प्रदर्शित २३ जानेवारी १९७६. मेन थिएटर नॉव्हेल्टी) या चित्रपटातील. चक्क पन्नास वर्षे झाली देखिल या दंतकथेला! आपल्या चित्रपटात कृष्ण धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट चित्रपटाच्या काळापासून रुपेरी पडद्यावर नाग नागिणीच्या गोष्टी येत आहेत आणि गंमत म्हणजे त्यातील अनेक चित्रपट आणि त्यातील गीत संगीत नृत्याची बहारदार फोडणी रसिकांना आवडली. (Nagin Movie)
नागकथा हा यशाचा एक हुकमी फॉर्म्यिला. चित्रपटापासून मालिकेत आणि मग वेबसिरीजमध्ये नाग नागिणीच्या गोष्टी सतत येत राहिल्या. काही चित्रपट पूर्णपणे नागकथावाले तर काही चित्रपटात एखाद्या दृश्यात नाग. इतकेच नव्हे तर, अनेक कलाकार अधूनमधून खोट्या अथवा नकली नागासोबत आपण कसे काम केले यांच्या गोष्टी आपल्या फिल्मी मुलाखतीतून रंगवून खूलवून सांगतात. खुद्द असली असो वा नकली साप, त्याच्याकडून अभिनय करुन घेणे सोपे नसते. (अभिनय करून घेणं असे म्हणायचे की काम करुन घेतले असं म्हणायचं?)

कदाचित तुम्हाला माहिती नसेल, ऐंशी आणि नव्वदच्या दशकात एक असाच सापवाला मुंबईतील चित्रपट चित्रीकरण स्टुडिओत अधूनमधून भेटायचा. एकदा तो मला म्हणाला, पौराणिक चित्रपट असो, मारधाडवाला चित्रपट असो अथवा फॅण्टसी असो, एखाद्या दिवशी दिग्दर्शकाला नाग नागिणीच्या जोडीची अथवा एकाची आवश्यकता असतेच. ती गरज मी पूर्ण करतों. आपल्या टोपलीत दात काढलेले साप असतात. त्यांना चांगली मागणी असते. त्याचं बोलणं ऐकून चित्रपटाच्या भल्या मोठ्या जगात कधी कोणतं नाणं का नि किती चालेल हे सांगता येणार नाही यावर कायमचा विश्वास बसला.
‘नागिन’ अथवा ‘नगिना’ नावाचा अथवा त्यांच्या जवळ जात असलेल्या नावाने अनेक चित्रपट आले. ‘नागपूजा’, ‘नागपंचमी’, ‘नाचे नागिन गली गली’, ‘शेषनाग’, ‘दूध का कर्ज’ वगैरे वगैरे. त्यातील १९७६ चा ‘नागिन’ त्या काळाशी सुसंगत. एक म्हणजे, मल्टी स्टार कास्ट, त्यामुळे पोस्टरभर अनेक चेहरे, दुसरं म्हणजे हीदेखील सूडकथाच. चुन चुन के बदला घेणारी. यात आणखी एक गोष्ट, रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१५ ऑगस्ट १९७५)ची अक्राळविक्राळ क्रेझ असताना त्या वादळात ‘नागिन’ टिकून नि टिच्चून उभा राहिला. मुंबईसह देशातील अनेक लहान मोठ्या शहरात रौप्य महोत्सवी यश संपादले. अशा भाबड्या गोष्टीतही रंजकता असते. ते पटकथा लेखक आणि दिग्दर्शकाचे कसब आहे. (Sholay Movie)

याची गोष्ट समिक्षकांना भाकडकथा वाटली. पण पिक्चर फार फार चालले हे महत्त्वाचे. काही मित्र एका जंगलात सहलीला गेले असता शिकार करण्याच्या अति उत्साहात एका नागाला गोळ्या घातलात. त्याच्या त्याच मृत्यूचा बदला त्या नागाची प्रेयसी इच्छाधारी नागिण घेते. या सहा सात मित्रांना इच्छाधारी नागिण एकेक करत करत मारते यावर एका तात्कालिक चित्रपट समीक्षकाने म्हटले, त्या त्या नायकाच्या योग्यतेनुसार त्यांचा मारण्याचा क्रम ठरवला आहे. ही कॉमेंट्स छान होती.
इच्छाधारी नागिणच्या भूमिकेसाठी सर्वप्रथम सायरा बानूला विचारले असता तिने अशी खलनायकीसदृश्य भूमिका आपण करू इच्छित नाही असे म्हटले. मुमताजला याच भूमिकेसाठी विचारले असता तिने आपण लवकरच लग्न करुन चित्रपटसृष्टीतून संन्यास घेणार आहोत असे म्हटले. तरी सातपैकी एक नायिका आपण साकारु असे म्हणत तिने पूर्ण सहकार्य केले. इच्छाधारी नागिणच्या भूमिकेसाठी रिना रॉयने होकार दिला आणि तिच्यासाठी हा चित्रपट सर्वाधिक सुपरहिट ठरला. कोणती भूमिका कशी कोणाला फलदायी ठरेल हे सांगता येत नाही हीच तर सिनेमाच्या यशाची गंमतीदार गोष्ट आहे. तिचा नायक जितेंद्र. तो नागाच्या रुपात असतो तेव्हा त्याला गोळ्या घातल्या जातात आणि त्याची भूमिका संपते. (Bollywood Movies on Snakes)

या जोडीवरचे ‘तेरे संग प्यार मै नहीं तोडना’ हे गाणे या चित्रपटाची जणू थीम. ते असे काही सुपरहिट झाले की अनेक वर्षांनीं ते सापाची गोष्ट असलेल्या भय मालिकेचे थीम गीत झाले. वर्मा मलिक यांनी लिहिलेल्या या गीताला लक्ष्मीकांत प्यारेलाल याचं संगीत आहे. लता मंगेशकर आणि महेन्द्र कपूर यांनी गायलेल्या ह्या गाण्याने त्या काळात लाऊड स्पीकरवर भरपूर धिंगाणा घातला. हे हा चित्रपट लोकप्रिय होण्यासाठी उपयुक्त ठरले. चित्रपटातील गाणी लोकप्रिय झाली की पिक्चर आपोआप जनसामान्यांना माहीत होत जातो.
================================
================================
चित्रपटात सुनील दत्त, फिरोज खान, संजय खान, विनोद मेहरा, अनिल धवन, कबीर बेदी हे नायक आणि रेखा, मुमताज, योगिता बाली, प्रेमा नारायण, नीलम मेहरा इत्यादी नायिका.( शेवटच्या दोघी सध्या कुठे असतात हो? असे अनेक लहान मोठे कलाकार सध्या काय करतात काय माहित?) याशिवाय हीना कौसर, रणजित, सुलोचना, अरुणा इराणी, रुपेशकुमार, टुनटुन आणि साधुच्या भूमिकेत प्रेमनाथ. आपल्या कारकिर्दीच्या दुसऱ्या डावात भारी ओरडत ओरडत काम करणारा अभिनेता. या चित्रपटातील त्याचा साधु असाच. पूजा अर्चा करून सापापासून दूर ठेवणारा. त्याचा एक डायलॉग भारी गाजला, इन्सान बदला लेना भूल सकता है, नागिण नहीं… या चित्रपटाची कथा आणि संवाद इंदर राज आनंद यांचे तर पटकथा जग्गी रामपाल यांची. ती केवढी तरी नाट्यमय. पब्लिकला खुर्चीला खिळवून ठेवणारी.
आपण श्रावणातील एक सण म्हणून नागपंचमी साजरी करतो. आपल्यासाठी तो देव आहे. फिल्मवाल्यानी त्यावर पौराणिक चित्रपट, भयपट, सूडपट अशी अनेक रुपे दिली. फिल्मवाल्याना सुपरहिट फॉर्म्युला हवा असतो तो मिळाला रे मिळाला ‘नागिना’चा पुढचा भाग ‘निगाहे’ पडद्यावर आलाच. चित्रपटाची नायिका नागिण साकारण्यासाठी डोळ्यात कलरफुल लेन्स लावते, नागिण पोषाख परिधान करून पडदाभर नाचते आणि पिक्चर सुपरहिट होतो हे अनेकदा घडलंय, तर मग आणखी हवं काय ? चित्रपटाच्या जगात यशासारखे सुंदर आणि आकर्षक असे काहीही नाही. मग गोष्ट साप म्हणा अथवा नाग, त्यावर पटकथा रचता यायला हवी….या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक राजकुमार कोहली कायम मल्टी स्टारकास्ट चित्रपट पडद्यावर आणू लागले… असतं एकेकाचे वैशिष्ट्य. (Entertainment News)