दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
ब्लॉग: कधी इतिहास जाणून घ्यावा, कधी आठवावा (Bollywood Nostalgia)
शाळेत असताना इतिहास शिकता शिकता अनेक गोष्टींचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा जागी राहते. आपण राहतोय त्या विभागाच्या इतिहासाबाबत एकदम जागरुकता वाटू लागते. अगदी आपल्या आईबाबांचे लग्न कसे झाले, हे देखील जाणून घ्यावेसे वाटते आणि हरखून जायला होते. आवडत्या खेळ अथवा विषयात ‘पूर्वी काय बरे घडले होते’, याबाबत विशेष जिज्ञासा वाढत जाते. माहिती मिळवायची धडपड वाढते.
तेच मग पन्नाशी अथवा वयाची पंचावन्न वर्षे झाली की, आपल्याच आयुष्यातील जुन्या गोष्टी आठवू लागतात. ‘काय ते दिवस होते’, असे येता-जाताना बोलण्यात येतेच आणि मानसिक भावनिक आनंदही मिळतो. यामध्ये जुने दिवस आठवताना त्या काळातली गाणी आणि चित्रपट आवर्जून आठवतात (Bollywood Nostalgia).
देव आनंद ‘मी आयुष्यात कधी मागे वळून पाहत नाही’ असे अतिशय उत्फूर्तपणे म्हणायचा. मिडियात त्याचे यासाठीच कौतुक होई. याबाबत देव आनंदला फाॅलो करणारे बरेच आहेत आणि त्यांनी बदलत्या काळाबरोबर स्वतःमध्ये बदल केला, याचे विशेष कौतुक आहे. आशा भोसले यांची प्रवृत्ती अगदी अशीच आहे. त्याही सतत नवीन अनुभवांसाठी इच्छुक!
जनसामान्यांच्या बाबतीत काय दिसते? आपण चित्रपटाच्या संदर्भात ‘फोकस’ टाकूया (Bollywood Nostalgia). त्यात कितीतरी वेगळ्या रंगछटा दिसताहेत. साठच्या दशकात जन्माला आलेली पिढी अगदी लहानपणी आपल्या पालकांचा हात घट्ट पकडून सिनेमा पाहायला जात असे. काही मुलं तर पडद्यावरच्या सिनेमात रमण्याऐवजी चक्क रडायला लागत.
माझी आजी मला नेहमीच सांगे, “तू इतकासा होतास ना (हाताने दाखवे मी किती छोटा होतो ते) तेव्हा मॅजेस्टिक थिएटरमध्ये सिनेमा पाहताना मध्येच रडायचास, तेव्हा तुला मी रांगेच्या मधल्या जागेत खाली मांडीवर घेऊन बसायचे, नाही तर हाॅलबाहेर आणून शांत करायचे.” हे ऐकताना मी आजीला गंमतीत म्हणायचो, “अगं, त्या काळातील मराठी चित्रपटात अशी रडवणारी दृश्ये हमखास असत. म्हणून मी रडायचो! असो.
प्रत्येक काळातील लहान मुलांना ‘सिनेमाची ओळख ‘भिन्न पध्दतीने होत गेली, हा सुध्दा एक प्रकारचा ‘सिनेमाच्या अभ्यासाचा’ विषय आहे. सत्तरच्या दशकात जन्माला आलेली पिढी आपल्या घरातील अथवा शेजारी पाजारी अथवा चाळीत शनिवारी संध्याकाळी जुने मराठी, तर रविवारी संध्याकाळी घरबसल्या जुने हिंदी चित्रपट पाहता पाहता वाढली.
त्या काळात दूरचित्रवाणी संच कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट असायचा. त्यात जुने ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट पाहण्यात वेगळे थ्रील असे. तर, साठच्या दशकातील काही रंगीत चित्रपट दूरदर्शनवर अर्थात ब्लॅक अँड व्हाईट दिसत, तरी फारशी तक्रार नसे (Bollywood Nostalgia).
ऐशीच्या दशकात वाढलेली पिढी रंगीत दूरदर्शन व घरी अथवा सणासुदीला चाळीत आणल्या जात असलेल्या व्हीसीआरवर नवीन चित्रपट पाहत पाहत वयात आली. व्हिडिओ कॅसेटचे ते युग होते. यानंतरच्या प्रत्येक दशकात असेच होत राहिले. जस जशी नवीन माध्यमे आली तस तसे त्या काळात जन्माला आलेल्या पिढीला अनुभव आले. या दृश्यमाध्यमाची कमी अधिक प्रमाणात ओळख होत गेली.
या बाल अथवा शालेय वयात चित्रपट कसा पाहायचा याचे स्वतःचे आपले एक आकलन असते. ते शिकून येत नाही आणि जस जसे वय वाढत जाते तसतशी जुन्या चित्रपटाबाबत जाणून घेण्याची इच्छा जागी होत जाते. त्याबाबत पालकांसोबत गप्पा होत आणि वाचनालयातून साप्ताहिके, मासिके भरपूर माहिती आणि फोटो देत असत.
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला यु ट्यूबवर जुन्या चित्रपटाची माहिती/गोष्टी/गाॅसिप्स/गाणी असे सगळेच एकदम हवं तेवढं मिळतेय. डिजिटल युगात माहिती आणि मनोरंजनाचा जणू जबरदस्त स्फोट झाला आहे आणि त्यामुळे आजची काॅलेजची मुलं आपल्या आवडत्या विषयाची शक्य तितकी जुनी माहिती, तपशील, संदर्भ मिळवत आहेत. फक्त एकदा त्याची सवय लागायला हवी.
….. आणि एकदा का वयाची पंचावन्न वर्षे झाली आणि साठीचे वेध लागले. वाढते वय जाणवू लागले की, माणसाला जुन्या आठवणी येणे हा स्वभावधर्म आहे. आता ‘जुने ते सोने’ असे वाटू लागते. आताही कसा रंजक गोष्टींचा खजिना आहे बघा.
अगदी साठच्या दशकात अशा नोकरीच्या रिटायरमेंटकडे वळलेल्या पिढीला दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद यांचा अगदी सुरुवातीपासूनचा काळ आठवतो. दिलीपकुमारचा पहिला चित्रपट अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित ‘ज्वार भाटा’ आपल्या पालकांसोबत नेमक्या कोणत्या थिएटरमध्ये पहिला, त्या थिएटरची सद्यस्थिती कशी आहे, असे सगळे चित्र डोळ्यासमोर येते. खरंतर अशाच जुन्या आठवणी आता जगण्याचा मोठा आधार असतात (Bollywood Nostalgia).
सत्तरच्या दशकातील साठीच्या जवळचे जुन्या आठवणीत दिलीप/देव/राज यांच्या जुन्या चित्रपटाच्या आठवणीत हरखून जाताना राज कपूरचे ‘बरसात’, ‘आवारा’, ‘श्री ४२०’ हे पुन्हा पुन्हा कसे पाहिले, मा. भगवानदादांच्या अलबेलाच्या ‘भोली सुरत दिल के खोटे’, ‘श्याम ढले खिडकी तले’ या लोकप्रिय गाण्यांच्या वेळी इंपिरियल थिएटरमध्ये पडद्यावर कसे पैसे उडवले, अशा अनेक आठवणीत रमतात. आणि मग आणखीन कोणत्या चित्रपटाच्या गाण्याच्या वेळी पडद्यावर असे पैसे उडवले जात आणि कसा वेगळा अनुभव येई, अशा अनेक आठवणी हमखास येत आणि ‘हल्ली अशी गाणी कुठे बनतात’ असा शेरा हमखास मारत.
सत्तरच्या दशकातील साठीच्या जवळचे आठवणीत रमताना, आपण एकेकाळी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट बघता बघता मग रंगीत चित्रपट कसे पाहू लागलो यांच्या आठवणीत छान रमत. के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’ (१९६०) चे फस्ट रनला फक्त आणि फक्त काचमहालातील मधुबालाने साकारलेले ‘प्यार किया तो डरना क्या ‘ हे एकच गाणे कसे रंगीत होते आणि या गाण्यासाठी पुन्हा पुन्हा थिएटरला कसे वारंवार गेलो, रांगेत उभे राहून कसे तिकीट मिळवले, त्या तिकीटाचा दर किती होता यांच्या आठवणीत छान रमत (Bollywood Nostalgia).
आपण अशा पध्दतीने ‘काही भाग अथवा दोन गाणी रंगीत’ असे एकेकाळी कोणते चित्रपट पाहिले याच्याही त्यांना आठवणी येत. आर. के. फिल्मचा पहिला रंगीत चित्रपट ‘संगम’ (१९६४) हे सांगतानाच राज कपूरने आपल्या दिग्दर्शनात तो दोन मध्यंतरचा कसा केला, तरीही तो सुपर हिट ठरला आणि याच चित्रपटाने दक्षिण मध्य मुंबईतील अप्सरा थिएटरचे उदघाटन कसे झाले, ते पूर्वीचे लॅमिन्टन थिएटर आणि त्यामुळेच त्या रस्त्याला लॅमिन्टन रोड म्हणतात. त्याचेच नाव मग डाॅ. भडकमकर मार्ग असे झाले, अशा अनेक आठवणी त्यांना येतात (Bollywood Nostalgia).
हे वाढते वयच असे असते की, जुनी एक गोष्ट आठवली की, त्यासह त्याच्या आजूबाजूच्या अनेक गोष्टीही पटपट आठवतात आणि मन सुखावते. तो काळ जसाच्या तसा डोळ्यासमोर येतोच. अशा वेळी एक हुकमी वाक्य तोंडी येते, इतका काळ कधी मागे सरला हे समजलेच नाही. पण ते खरे सिनेमाचे दिवस होते. आता कसले हो चित्रपट बनतात? अशी तक्रार ठरलेलीच. प्रत्येक पिढीचा सिनेमाचा असा सुवर्ण काळ असतो आणि ते खूपच मोठे सत्य आहे.
ऐशीच्या दशकातील काहीशा उतारवयात जात असलेल्याना आपण काॅलेजमध्ये असताना ‘रिपिट रन आणि मॅटीनी शो’ला जुने चित्रपट कसे लेक्चर बंक करुन पाहिले आणि मग इराणी हाॅटेलमध्ये सगळे मित्र बसून ज्यूक बाॅक्समध्ये चार आण्याचे नाणे टाकून त्याच चित्रपटाची गाणी कशी पुन्हा पुन्हा ऐकली हे हमखासच आठवे. त्यात पुन्हा जुक्स बाॅक्समध्ये दहा पैशाचे नाणे टाकायचो आणि नंतर मग त्याचे चार आणे बहुदा, असं म्हणत असतानाच एखाद्याचा मुलगा म्हणतो, मी काॅलेजमध्ये असताना त्याचे आठ आणे झाले होते. आपण कधी काळी तरुण होतो आणि कसे चित्रपट पाहायचो, हे आता वाढत्या वयात पालक आपल्या पाल्यांना रंगवून खुलवून सांगतात (Bollywood Nostalgia).
सिनेमाच्या अशा गप्पा दोन पिढ्याना जोडण्याचे काम करते. ही महत्वाची सामाजिक सांस्कृतिक गोष्ट आहे. या पिढीतील रसिकांना मॅटीनी शोला देव आनंद आणि शम्मी कपूर यांचे अनेक जुने म्युझिकल हिट चित्रपट एन्जाॅय केल्याचे आठवते. ती गाणी आजही लोकप्रिय आहेत, याचा त्यांना विशेष आनंद होतो.
=====
हे देखील वाचा: बाळासाहेबांनी केलेलं कौतुक मला तमाम पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे! – मिलिंद गुणाजी
=====
मध्येच प्रश्न पडतो, ‘दिल का भंवर करे पुकार’ हे गाणे नक्की ‘तेरे घर के सामने ‘मधीलच आहे ना? आणि मग ते स्वतःच उत्तर देतात, होय! दिग्दर्शक विजय आनंदचे या गाण्याचे टेकिंग काय अप्रतिम आहे ना? गाण्याचा मुखडा आठवला तरी त्याचे पडद्यावरचे सादरीकरण डोळ्यासमोर येतच याला दिग्दर्शन म्हणतात असेही ते सर्टिफिकेटस देतात, तर त्यांची मुलं सांगतात, मी काॅलेजमध्ये असताना मॅटीनी शोला राजेश खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र यांचे अनेक जुने चित्रपट पाहिले. (मनात म्हणतो, त्यातील काही मैत्रिणीसोबत पाहिले).
काळ जस जसा पुढे जात राहतो तसतसे अजून एक पिढी वयाची पंचावन्न अथवा साठी/अगदी सत्तरी गाठते. त्यांना मग त्यांचे जुने दिवस आठवतात. राजेश खन्नाची काय जबरदस्त क्रेझ होती, असे आज पासष्टी सत्तरी ओलांडलेल्या अनेकांच्या तोंडी हमखास येतेच येते.
राजेश खन्नाच्या अनेक गोष्टी/किस्से/कथा/गाॅसिप्स/आठवणी यामध्ये ते रमतात (Bollywood Nostalgia). किती सांगू आणि काय काय सांगू, असे त्यांना होते. पण दुर्दैवाने आज त्यांचे ऐकायला कोणाहीकडे फारसा वेळ नाही. त्यातील ज्याना व्हाॅटसअप आणि फेसबुकवर व्यक्त होता येते, ते थोडे फार काही ना काही लिहितात.
सोशल मिडिया कसा वापरावा हे जुन्या पिढीला जेवढं समजेल उमजेल तशा अनेक जुन्या आठवणी/गोष्टी त्यात नक्कीच येतील. सोशल मिडिया युवकांचे माध्यम असले तरी जुन्या पिढीलाही त्यात आपले एकेकाळचे अनुभव सांगूदेत. अगदी काळाच्या पडद्याआड गेलेल्या अनेक जुन्या एकपडदा थिएटर अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सबाबत खूपच आठवणी त्यात येतील आणि सच्चा चित्रपट रसिकांच्या दुर्मिळ आठवणी म्हणजे पुस्तकाबाहेरचे आणि गुगलबाहेरचे खूपच मोठे जग असते.
पूर्वी मुद्रित माध्यमात अगदी जुन्या चित्रपट आणि कलाकार यांची भरपूर रोचक आणि रंजक माहिती देणारी अशी यादो की बारात, फ्लॅशबॅक, कहां गये वो लोग, वो दिन याद करो, घुंघट के पट खोल, गुजरा हुआ जमाना अशी सदरे येत आणि महत्वाचे म्हणजे जुनी, मधली आणि आजची अशा तीनही पिढीला या सदरांचे विशेष आकर्षण असे. अशा तीनही पिढ्या त्याचे आवर्जून वाचन करे. आजच्या पिढीला चित्रपटाचा इतिहास समजून येई तर कालची पिढी आठवणीत जाई. उपग्रह वाहिनींच्या जगात सह्याद्री वाहिनीने ते बरेचसे जपले आहे.
=====
हे देखील वाचा: हे राम..! आता अमोल कोल्हे आणि नथुराम
=====
एबीपी माझाच्या फ्लॅशबॅकला चांगला टीआरपी होता. अशा शोच्या तयारीसाठी बरीच मेहनत असते, माहिती मिळवावी लागते. पण असे असले तरी यामुळे तीन पिढ्याना जोडण्याचे आणि आनंद देण्याचे काम होते. ते जास्त महत्वाचे आहे.
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला यु ट्यूबवर सिनेमाची ओळख होत आहे. अगदीच वाटले तर ही पिढी मल्टीप्लेक्समध्ये जाते, तर आज साठीच्या आतबाहेरच्या पिढीला आपण ऐशीच्या दशकात अमिताभ बच्चनच्या ‘दीवार’, ‘डाॅन’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मिस्टर नटवरलाल’ अशा अनेक चित्रपटांच्या तिकीटासाठी ॲडव्हास बुकिंगसाठी कशा लांबलचक रांगेत उभे राहिलो, पोलिसांची लाठी खाल्ली हे आठवते