दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
चिरतारुण्य म्हणजे अनिल कपूर – बॉलिवूडचा एकदम “झक्कास” अभिनेता!
कपूर हे आडनाव कानावर पडताच डोळ्यासमोर उभं राहतं ते कपूर खानदान आणि त्यातले काही रथी महारथी म्हणजे पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, ऋषि कपूर पासून ते थेट करिश्मा कपूर आणि रणबीर कपूर पर्यंत! पण आणखीन एक कपूर फॅमिली आहे ज्यांनी सुद्धा या सिनेसृष्टीत मोलाचं योगदान दिल आहे!
सुप्रसिद्ध प्रोड्यूसर सुरिन्दर कपूर यांच्या कुटुंबाने सुद्धा या क्षेत्रात चांगलं योगदान दिलं आहे! त्यांना ३ मुलं, आणि त्या तिन्ही मुलांनी आज इंडस्ट्री मध्ये स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. एक नाव म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर, दुसरं नाव म्हणजे ॲक्टर संजय कपूर, आणि तिसरं नाव म्हणजे एव्हरग्रीन अनिल कपूर. आणि याच अभिनेत्याचा आज वाढदिवस.
अनिल कपूरच्या बाबतीत एक गोष्ट हमखास बोलली जाते आणि ती तंतोतंत खरी सुद्धा आहे ती म्हणजे “अनिल कपूरचं वय वाढत नाहीये, तर कमी होतंय!” आज त्यांना ६३ वर्ष पूर्ण होतील पण त्यांच्यातला उत्साह बघता आपल्याला तो ३६ वर्षांचा तरुणच वाटेल. इंडस्ट्री मध्ये अनिल कपूर यांनी ४० वर्षे पूर्ण केली असून आजही त्यांच्या नावाचा दबदबा इंडस्ट्री मध्ये आहे, हे त्यांच्या लवकरच येणाऱ्या नेटफ्लिक्स वरच्या AK vs AK या सिनेमाच्या ट्रेलर वरुन जाणवेल!
१९७९ च्या हमारे तुम्हारे सिनेमातून अनिल कपूरने त्यांच्या करियरची सुरुवात केली. शिवाय नंतर तेलगू कन्नड भाषेतल्या सिनेमातून सुद्धा पदार्पण केलं. १९८४ साली आलेल्या यश चोप्रा यांच्या मशाल या सिनेमात अनिल कपूरची प्रशंसा झाली. मुंबईच्या डोंगरभट्टी भागातला टपोरी राजा त्याने हुबेहूब वठवला. चेंबूर इथे लहानाचा मोठा झाला असल्याने अनिल कपूरला असे रोल्स जास्त चॅलेंजिंग नव्हते! या सिनेमासाठी अनिल कपूरला सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला.
अनिल कपूरला खरी ओळख मिळाली ती एन. चंद्रा यांच्या तेजाब सिनेमातून, या सिनेमातून अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही जोडी हीट ठरली, एक दो तीन हे माधुरी दीक्षित वर चित्रित झालेलं गाणं आजही रिमेक करून लोकं बक्कळ पैसा कमावत आहेत. या सिनेमासाठी अनिल कपूरला पहिला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला! त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. बेटा, विरासत, मेरी जंग, मिस्टर इंडिया, लम्हे, राम लखन असे कित्येक चित्रपट तो करत गेला.
हीरो मटेरियल काहीच नसलं तरी केवळ अभिनयाच्या जोरावर अनिल कपूर लोकांना आवडू लागला. त्याचा भाऊ संजय कपूर याने सुद्धा काही मोजके सिनेमे केले पण अनिल कपूरच्या चेहेऱ्यावरचं तेज, प्रसन्नता ही त्याच्या चेहऱ्यावर कधीच दिसली नाही! अनिल कपूरने ठेवलेली मिशी ही त्या काळातली सर्वात मोठी युएसपी होती. त्या काळात सिनेमातला हीरो हा मोस्टली क्लीन शेव्ड असायचा, पण त्या परंपरेला छेद देत मिशी कायम ठेवणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अनिल कपूर.
फिल्मी फॅमिलीमधून जरी आला असला तरी अनिल कपूरला आणि त्याच्यातल्या अभिनेत्याला स्वीकारायला प्रेक्षकांना बराच वेळ लागला हे देखील तितकंच सत्य आहे!
साधारण चाळीशीत आला की हीरोला साइड रोल करायला लागतात पण अनिल कपूर असा एकमेव ॲक्टर आहे ज्याने चाळीशीनंतरही ताल, पुकार, नो एंट्री सारख्या सिनेमातून माधुरी ऐश्वर्या, राणी, पासून बिपाशा बसू पर्यंत सगळ्यांबरोबर रोमान्स केला!
हे देखील वाचा: सिनेसृष्टीतला प्युअर एंटरटेनर -गोविंदा
लाडला, जुदाई, १९४२ अ लव्ह स्टोरी, नायक, माय वाइफ्स मर्डर सारख्या सिनेमातून अनिल कपूर हा कोणत्या लेवलचा ॲक्टर आहे याची प्रचिती येईल. अनिलला त्याच्या सेकंड इनिंग मध्ये वेगवेगळे प्रयोग करायची संधी मिळाली. टशन मधला व्हिलन असो, रेस मधला महत्वाचा रोल असो किंवा वेल्कम मधला मजनू भाई असो, अनिल कपूरची ही पात्र लोकांच्या मनात कायम राहतील!
२००८ चा ऑस्कर जिंकणारा स्लमडॉग मिलिअनेर तसेच टॉम क्रुज सारख्या हॉलीवूड सुपरस्टारचा मिशन इम्पॉसिबल अशा हॉलीवूडपटात सुद्धा अनिल कपूरने त्याच्या अभिनयाची छाप सोडली! अशा या चिरतारुण्याचं वरदान लाभलेल्या “झकास” अनिल कपूरला त्याच्याच स्टाइल मध्ये एकदम झकास शुभेच्छा! तुझे असेच नवनवे प्रयोग प्रेक्षकांना पाहता यावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना!