
Dheeraj Kumar : संघर्षातून यशाकडे
साधारण साठ वर्षांपूर्वीची गोष्ट. फिल्म फेअर आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील काही नामांकित निर्माते व दिग्दर्शक यांच्या संयुक्त विद्यमाने युनायटेड प्रोड्युसर या नावाची संस्था स्थापन करुन ‘नवीन चेहरे पाहिजेत’ (टॅलेंट हंट) अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात जी.पी.सिप्पी, चेतन आनंद, शक्ती सामंता, बी.आर.चोप्रा, नासिर हुसेन, जे.ओम प्रकाश, रामानंद सागर, राज खोसला अशा बड्या निर्मात्यांचा समावेश होता. मुंबईत टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीत या निर्मात्यांनी अनेक नवीन चेहर्यांची स्क्रीन टेस्ट घेतली. त्यात राजेश खन्नाने पहिला क्रमांक पटकावला.
तर सुभाष घई व धीरजकुमार यांची निवड दुसर्या व तिसऱ्या क्रमांकासाठी झाली. राजेश खन्नाला लगोलग जी. पी. सिप्पी यांनी राज, चेतन आनंद यांनी आखरी खत, नासिर हुसेन यांनी बहारों के सपने या चित्रपटांसाठी करारबद्ध केले. सुभाष घई व धीरजकुमार आपापल्या पध्दतीनुसार एकेका संधीसाठी संघर्ष करीत राहिले….धीरजकुमारच्या निधनाचे वृत्त समजताच ही गोष्ट मला पटकन आठवली. वयाच्या ७९ व्या अंधेरीतील कोकिलाबेन इस्पितळात धीरज कुमारचे निधन झाले.( जन्म १ ऑक्टोबर १९४४) आणि संघर्षातून यशाकडे आणि मग उल्लेखनीय वाटचाल करणारा सिनेमावाला काळाच्या पडद्याआड गेला.

एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी ती अशी की, धीरज कुमारचे मूळ नाव धीरज कोचर. पूर्वी चित्रपट अभिनेत्यांच्या नाव आडनावात कुमार असे, म्हणून त्यानेही धीरज कुमार केले. धीरज कुमारने संधीसाठी कारकिर्दीच्या सुरुवातीस अनेक निर्माता व दिग्दर्शकांच्या भेटीगाठी घेणे सुरु केले. त्यात त्याला जाहिरातपट मिळणे सुरु झाले. वाटचाल तर सुरु झाली. मग पहिला चित्रपट राजेश नहाटा दिग्दर्शित ‘रातों का राजा’ १९७० साली प्रदर्शित झाला. मुंबईत त्याचे मुख्य चित्रपटगृह सुपर हे होते. त्याच सुमारास नवीन निश्चल व रेखा यांची भूमिका असलेला पहिला चित्रपट मोहन सैगल निर्मित व दिग्दर्शित ‘सावन भादो’ (१९७०) सुपरहिट ठरल्याचा आपल्या या पहिल्याच चित्रपटाला फटका बसला असे धीरजकुमारच्या मनात कायमचेच बसले. पहिलाच चित्रपट अपयशी म्हणजे फारच मोठी अडथळ्यांची स्पर्धा. मात्र ‘रातों का राजा हू मै’ हे गाणे नायक ठरले. मजरुह यांच्या या गाण्याला राहुल देव बर्मनचे संगीत होते. गाण्यामुळे धीरजकुमार चर्चेत राहिला. तसेच त्या काळात गल्ली चित्रपटात हमखास ‘रातों का राजा’चा ट्रेलर दाखवत. तेवढाच धीरजकुमार प्रेक्षकांपर्यंत पोहचत होता.
================================
हे देखील वाचा : आणीबाणी उठली आणि Dada Kondke यांनी आपल्या पिक्चरचे नाव ठेवले ‘रामराम गंगाराम’
=================================
धीरजकुमारचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तोपर्यंत राजेश खन्नाची जबरदस्त क्रेझ निर्माण होत होती. त्याच सुमारास चित्रपटसृष्टीत नवीन निश्चल, अमिताभ बच्चन, समित भांजा, स्वरुप दत्त, किरणकुमार, राकेश रोशन, महेंद्र संधु, विजय अरोरा, विक्रम, अनिल धवन, सतीश कौल, कबीर बेदी, गुलशन अरोरा, राकेश पांडे, विशाल आनंद असे अनेक नवीन अभिनेते आले. (या प्रत्येकाचे प्रगती पुस्तक कमी अधिक गुणांचे. कमी गुणवालेच जास्त) धीरज कुमारसाठी वाट अवघड होती. अशातच खलनायक म्हणून कारागिरी करीत असलेले विनोद खन्ना व शत्रुघ्न सिन्हा नायकाच्या भूमिकेकडे वळले. धीरज कुमारला देव आनंद दिग्दर्शित ‘हीरा पन्ना’, मनोज कुमार दिग्दर्शित ‘रोटी कपडा और मकान’, बासू चटर्जी दिग्दर्शित ‘स्वामी’ अशा काही चित्रपटात त्याला सहनायक वा दुय्यम भूमिका मिळाली. ‘स्वामी’ चित्रपटातील ‘कां करु सजनी आये ना बालम’ हे गाणे पडद्यावर त्यानेच साकारले.
‘रोटी, कपडा और मकान’, ‘स्वामी’ हे चित्रपट सुपर हिट होऊनही धीरज कुमारला फायदा झाला नाही. धीरज कुमार ‘सरगम’, ‘मांग भरो सजना’, ‘शराफत छोड दी मैने’, मनोज कुमार दिग्दर्शित ‘क्रांती’ वगैरे चित्रपटात सहनायक वा छोट्या भूमिकेत दिसू लागला. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता म्हणून त्याचे भवितव्य अवघड होते. पण पंजाबी चित्रपटात त्याला चांगली संधी मिळाली. तब्बल एकवीस पंजाबी चित्रपटातून त्याने भूमिका केल्या. त्यात किस्सा ‘पंजाब’, ‘रॉकी मेंटल’, ‘रब्बा दा रेडिओ’ वगैरे चित्रपटांचा समावेश होतो. मूळात तो पंजाबचाच. त्यामुळे पंजाबी भाषेवर प्रभुत्व. आणि हिंदीतही अतिशय उत्तम.

अभिनेता म्हणून धीरज कुमार फार काही चमकदार कामगिरी करु न शकल्याने तो थांबला नाही.त्याने १९८६ साली क्रियेटीव्ह आय स्टुडिओज ही निर्मिती संस्था स्थापन करुन मालिकांच्या निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आणि अतिशय उत्तम प्रमाणात यश प्राप्त केले. ‘ओम नम:’ शिवाय ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. धार्मिक गोष्टींवरच्या मालिकेची निर्मिती हे त्याचे वैशिष्ट्य ठरले. आघाडीचा मालिका निर्माता ही त्याची ओळख निर्माण झाली. अंधेरी पश्चिमेकडील यशराज फिल्म स्टुडिओच्या अगदी समोर त्याने आपले क्रियेटीव्ह आय व नम: शिवाय एन्टरप्रायझेस या निर्मिती संस्थेचे प्रशस्त कार्यालय सुरु केले. त्याच कार्यालयात धीरजकुमारच्या मुलाखतीचा एकदा योग आला होता.
================================
हे देखील वाचा: Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण
=================================
आपल्या मनातील भाव अजिबात चेहर्यावर दिसणार नाहीत हे त्याचे वैशिष्ट्य असल्याचे त्या भेटीत मला जाणवले. २००४ साली त्याने बाल प्रेक्षकांसाठी ‘आबरा का डाबरा’ या हॅरी पॉटर शैलीतील हिंदी चित्रपट निर्माण केला. गोरेगावच्या ज्योती स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त मला आजही आठवतोय. आपण आणखीन एक पुढचे पाऊल टाकतोय म्हणून धार्मिक सुखावला होता. चित्रपटसृष्टीतील अनेक लहान मोठ्या कार्यक्रमाना धीरजकुमार आवर्जून हजर राहत असे. तो गुण विशेष उल्लेखनीय. आजच्या पिढीला कदाचित धीरज कुमारच्या वाटचालीबद्दल फारशी माहिती वा उत्सुकता नसेल. पण धीरजकुमारची आपली एक ओळख निर्माण झाली होती. मालिकांचा निर्माता म्हणुन तर निश्चितच.श्रध्दांजली.