‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
चंदू….मी आलोय…
अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, पीव्हीआर प्रदर्शित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित ‘एबी आणि सीडी’ चित्रपट 1 मे, या महाराष्ट्रदिनी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होत आहे. मात्र त्याआधीच चित्रपटाच्या प्रोमोनी उत्सुकता वाढवली आहे. मार्चमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. वास्तविक चंदू मी आलोय…. या वाक्यानं चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
एबीसीडी मध्ये अमिताभ बच्चन आहेत. मराठी चित्रपटात बिग बी च्या भूमिकेची मोठी उत्सुकता आहे. बिग बी बरोबर विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्याही देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हिंदी चित्रपट सृष्टीत जस अमिताभ बच्चन यांचं नाव मानानं घेतलं जातं तसंच मराठी अभिनेत्यांमध्ये विक्रम गोखले यांच्या नावाचा दबदबा आहे. हे दोन दिग्गज ‘एबी आणि सीडी’ या चित्रपाटत एकत्र येत आहेत. अग्निपथ या चित्रपाटात 1990 मध्ये एकत्र आले होते. त्यानंतर ही दिग्गज अभिनेत्यांची जोडी या मराठी चित्रपटात एकत्र पहाता येणार आहे…
या चित्रपटाची कथा सहज सोप्पी आहे. आपल्या आसपास घडणारी आहे. तुमच्या आमच्या परिचयाची आहे. आणि म्हणूनच ती आपल्याला खेचून घेते. एबी म्हणजे अमिताभ बच्चन आणि सीडी म्हणजे चंद्रकांत देशपांडे.
चंद्रकांत देशपांडे चित्रकार पुण्यात राहणारे देशपांडे कुटुंब हे जरा शिस्तप्रिय. या कुटुंबात आजोबा, त्यांचीदोन मुलं, सुना आणि दोन नातवंडं अशी मंडळी आहेत. आता एकत्र कुटूंब असलं तरी प्रत्येकाची मतं वेगवेगळी. त्यात 75 वर्षाचे चंद्रकांत देशपांडे एकाकी पडल्यासारखे झाले होते. तरीही इथे आजोबा आणि नातवाचं अनोखं नातं फुललेलं आहे. जसजसं म्हातारपण येतं तसतसं कुटुंबात या वृद्ध व्यक्ती या अडचणवाटू लागतात किंवा त्यांच्याकडे फार लक्ष द्यावसं नाही वाटत आणि याचवेळी त्यांचा आधार म्हणून नातवंड काम करतात. या चित्रपटात नातवाची भूमिका केली आहे, विनोदाचे अचूक टायमिंग साधणारा अक्षय टंकसाळे याने. चित्रपटात तो आपल्याला विक्की देशपांडे म्हणून भेटतो. विक्रम गोखलेंचा नातू आजोबा आणि विक्की यांचं नातं मित्रत्वाचं फॉर्मल नातं नाही दोघं आपल्या अडीअडचणी एकमेकांबरोबर शेअर करीत होते. दोन पिढ्यांच्या या मैत्रीतील गम्मत पडद्यावर बघण्यासारखी आहे. हा विक्की त्याची मैत्रिण गार्गी हे आजोबांना कशी मदत करतात याची ही कथा आहे.
चित्रकार असलेल्या आजोबांची चित्र त्यांच्याच घरात जुनी होऊ लागतात, तेव्हा त्यांना आपले कुटुंबातील स्थान समजते. ही खंत त्यांच्या मनाला जाणवत असतांनाच एक पत्र त्यांना येते. त्यांच्या मित्राच कोणी साधासुधा मित्र नाही, तर तो आहे अमिताभ बच्चन मग काय, अमिताभ आणि देशपांडे यांची मैत्री आहे, ही गोष्ट सर्वत्र होते. हे एक साधेसे पत्र त्यांना घरात पुन्हा फॅमिली हेडच्या भुमिकेत आणते. बाहेर त्यांचे महत्त्व वाढते. जिथे गेले तिथे त्यांना अमिताभ बरोबरचे किस्से विचारले जाऊ लागले…
मग एका कार्यक्रमाला अमिताभला बोलवण्यात येते. अमिताभकडूनही या कार्यक्रमाचे आमंत्रण स्विकारल्याचे पत्र येते या कार्यक्रमाची तयारी सुरु होते.मोठ्या हॉलमध्ये चंद्रकांत देशपांडेंच्या नावाने अमिताभ बच्चन यांना भेटायला आलेल्यांची गर्दी झालेली असते असे असूनही अमिताभ बच्चन यांचा काही पत्ता नसतो.मग स्वतः चंद्रकांत देशपांडेच जाहीर करतात अमिताभ बच्चन येणार नाहीत या त्यांच्या वाक्यावर अनेक जण नाराज होतात कुजबूज वाढते तितक्यात आवाज येतो. चंदू…. मी आलोय रे… हा नक्की कोणाचा आवाज की खराखुरा अमिताभ बच्चन…. हे मात्र प्रत्यक्षात चित्रपटात बघण्यासारखे आहे.
मंडळी आता या लॉकडाऊनच्या काळात एबीसीडी सर्वांसाठी मोठं गिफ्ट ठरणार आहे. अगदी नवा कोरा चित्रपट. तोही दोन बड्या कलावंतांचा आपल्याला आपल्या घरात बसून बघता येणार आहे. या संधीचा फायदा घ्या. छान चित्रपटगृहात बसल्याचे फिल करा आणि आपल्याच घरी, आपल्या कुटुंबासह अमितजी आणि विक्रम गोखले या दोन दिग्गजांच्या जुगलबंदीची मजा घ्या.
सई बने