ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
छय्या छय्याची पंचवीशी…
दिग्दर्शक मणी रत्नमच्या ‘दिलसे’ (रिलीज २१ ऑगस्ट १९९८) च्या पहिल्या गाण्याचे नरीमन पॅाईंटच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रकाशन असं आमंत्रण हाती येताच मणी रत्नम दिग्दर्शित ‘रोजा’ (१९९२), ‘बाॅम्बे’ (१९९५) या चित्रपटातील गीत संगीत व नृत्य पटकन डोळ्यासमोर आले. (हे मूळ तमिळ चित्रपट हिंदीत डब करण्यात आले होते, ते छान जमले होते.) खरं तर कमल हसनची बेहतरीन अदाकारी असलेल्या तमिळ भाषेतील ‘नायकन’ (१९८८) च्या व्हिडिओ कॅसेटला मुंबई पुण्यात व्हिडिओ लायब्ररीत मागणी वाढली तेव्हा मराठी व हिंदी चित्रपट रसिकांना दिग्दर्शक मणी रत्नमचा सिनेमा म्हणजे काही तरी ‘हटके आणि धाडसी’ पाहायला मिळणार अशी ओळख झाली. (चित्रपटाचे डब, रिमेक, सब टायटल्स या गोष्टी अशा फलदायी ठरतात.) मध्य मुंबईतील गॅंगस्टर म्हणून ओळखल्या गेलेल्या वरदराजन यांच्या बहुचर्चित आयुष्यावर आधारित ‘नायकन’ हा तेव्हाच्या रसिकांना वेगळाच अनुभव होता. ‘रोजा’मध्ये कश्मिर अतिरेकी, ‘बाॅम्बे’त १९९२\९३ ची मुंबईतील जातीय दंगल आणि बाॅम्बस्फोट असे खळबळजनक विषय हाताळणारे मणी रत्नम ‘दिलसे’त काय घेऊन येत आहेत, याची विशेष उत्सुकता होती. त्यात चित्रपटाचे निर्माते मणिरत्नम, रामगोपाल वर्मा आणि शेखर कपूर. (Song)
‘दिलसे’च्या पूर्वप्रसिध्दीची सुरुवात कशाने? छय्या छय्या गाण्याने. तीनदा दाखवले हो. पॅसेंजर ट्रेनच्या टपावर शाहरुख खान आणि मलय्यका अरोरा बेभान बेफाम नाचत आहेत. सोबतीला डान्सर आहेतच. (यालाच टोळी नृत्य म्हणत). वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या टपावर गीत संगीत व नृत्य म्हणजे भारीच काम. आता या सगळ्यांचे पाय ट्रेनच्या खिडक्यांना बांधले होते असंही म्हणता येणार नाही. यात दृश्य सौंदर्य नक्कीच होते. तेच तर महत्वाचे. या नृत्यातील मलय्यका अरोरा तेव्हा म्हणजे पंचवीस वर्षांपूर्वी होती अगदी तशीच सडपातळ आजही आहे आणि गाण्याची लोकप्रियताही अगदी तशीच आहे. (तत्पूर्वी शक्ती सामंता दिग्दर्शित १९७४ च्या ‘अजनबी’ मध्ये धावत्या मालवाहतूक ट्रेनमध्ये हम दोनो दो प्रेमी गायले, नाचले होते.) (Song)
या गाण्याच्या लोकप्रियतेचा साईट इफेक्ट काय झाला माहितीये ? चित्रपटात हे गाणे महत्वाचे आहे असा समज निर्माण झाला, तसे चित्र आकाराला आले. चित्रपटात तसं काही असेल असं वाटलं. प्रत्यक्षात ही दहशतवादाच्या तावडीत सापडलेली खतरनाक प्रेमकथा होती. एका आर्मी ऑफिसरचा मुलगा (शाहरुख खान) आणि सुसाईड बाॅम्बर (मनिषा कोईराला) यांची प्रेमकथा. त्याचं तिच्यावर मनोमन प्रेम आहे. पण ते एकतर्फी आहे. ती अतिरेकी संघटनांसाठी काम करतेय. या चित्रपटाचे सुरुवातीला नाव ‘लडाख एक प्रेम कहानी’असे होते. समिक्षकांची मिश्र प्रतिक्रिया होती. रसिकांना मात्र हे प्रेम रुचले नाही, पिक्चर फ्लाॅप झाला. मणिरत्नमचा हा तसा पहिला स्वतंत्र हिंदी चित्रपट. तो तमिळ व तेलगूत डब करण्यात आला. (Song)
======
हे देखील वाचा : ‘शोले’ च्या प्रसिद्धीचा हा मोठा फंडा
======
चित्रपटात इतरही कलाकार आहेत. प्रिती झिंटाचा हा पहिला चित्रपट. ही भूमिका रानी मुखर्जीला ऑफर झाली होती. मलय्यका अरोराच्या जागी शिल्पा शिरोडकर होती. पण काहीना काही कारणास्तव असे बदल होतच असतात. मणिरत्नमने चित्रपटात नवी दिल्लीतील भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनातील काही दृश्ये चित्रपटात वापरली. ‘दिलसे’ची सगळीच गाणी आजही लोकप्रिय आहेत. ऐ अजनबी (पार्श्वगायक उदीत नारायण), दिलसे रे (ए. आर. रेहमान), जिया जले (लता मंगेशकर), सतरंगी रे (कविता कृष्णमूर्ती). गीतकार गुलजार आणि संगीतकार ए. आर. रेहमानची जोडी छान जमली. गाणी (Song) सिच्युएशननुसार असतील तर ‘सूर ‘ नक्कीच सापडतो. ‘सत्या’च्या यशाने बदलून टाकलेल्या वातावरणाचा ‘दिलसे’ला फायदा होईल असं वाटलं. पण तसं झालं नाही हे खरेच. एक विशेष, ‘इनसाईड मॅन’ या हाॅलिवूडपटात ‘छय्या छय्या’चा वापर करण्यात आला आहे हे मात्र छान यशच.