मराठा मंदिर थिएटर्सच्या बाल आठवणी
आज मराठा मंदिर थिएटर्सच्या आसपास गेलो तरी माझे बालपण आठवते. कोणत्याही वयात आणि कोणत्याही वाहनातून प्रवास करताना खिडकीबाहेर पाहणे हा खरं तर अगदीच लहानपणापासूनचा सगळ्यांचाच गुण. मला आठवतय, अगदी साठच्या दशकात मुंबई सेंट्रल ( बाॅम्बे सेंट्रल हे पूर्वीच्या पिढीच्या तोंडी बसलेले ) एस. टी. स्थानकातून मामाच्या गावाला जाण्यासाठी सकाळी सहा आणि संध्याकाळी सहा वाजता अशी दोनदाच मुंबई ते रेवदंडा अशी एस. टी. गाडी असे आणि ती सुटताच लगेचच दिसत असलेल्या मराठा मंदिर थिएटरवर हमखास नजर पडे. अतिशय आखीव रेखीव अशी वास्तू लक्षवेधक ठरे. हे अतिशय आलिशान, वैभवशाली वातानुकूलित असे चित्रपटगृह आहे, हे त्याकडे बघताच लक्षात येई आणि अशातच विजय आनंद दिग्दर्शित ‘जाॅनी मेरा नाम’ ( १९७०) हा बहुचर्चित चित्रपट सहकुटुंबपणे पाहण्यासाठी या मराठा मंदिरला सर्वप्रथम गेलो. अर्थात, तेव्हाचे माझे वय पाहता चित्रपट आणि चित्रपटगृह यांची ओळख होणे शक्यच नव्हते. ( चित्रपटाची ओळख होणे, वाढत जाणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. हा रिॲलिटी शो ‘दिसत’ नाही. पण ते वास्तव आहे. ) महिन्यातून एकदा पिक्चरला जाणे ही तेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबात घडणारी हुकमी गोष्ट.(Maratha Mandir Theaters)
अर्थात, काॅलेजमध्ये गेल्यावर मित्रांसोबत पिक्चर एन्जाॅय करण्याची सवय आपोआप लागतेच. हळूहळू मराठा मंदिर थिएटरला(Maratha Mandir Theaters) एकेक चित्रपट पाहू लागलो, त्याचे अंतर्बाह्य वैभव जाणवू लागले. ही एक प्रतिष्ठित वास्तू आहे हे लक्षात येताच माझ्याही वागण्यात बदल होत गेला. ज्या सहजतेने सेन्ट्रल थिएटरमध्ये आम्ही मित्र मस्करी करत असू तसे मराठा मंदिरला वावरणे योग्य नाही हे लक्षात आले. प्रत्येक सिंगल स्क्रीन थिएटर्सची आपली स्वतंत्र ओळख आणि व्यक्तिमत्त्व असते असे मी कायमच म्हणतोय ते हे असे. मिडियात आल्यावर समजले, बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘साधना’ ( १९५८) या चित्रपटाने मराठा मंदिर थिएटरचे १६ ऑक्टोबर १९५८ रोजी उदघाटन झाले. या चित्रपटात सुनील दत्त, वैजयंतीमाला, लीला चिटणीस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याचा प्रीमियर गाजला, त्या काळातील चित्रपट विश्लेषकांनी त्याच्या आठवणी सतत पुढील पिढीला सांगितल्या. म्हणजेच मराठा मंदिर चित्रपटगृहाला ६४ वर्षे पूर्ण होत आहेत. हळूहळू मराठा मंदिर थिएटर माझ्या सवयीचे झाले. मुंबई सेंट्रल, आग्रीपाडा, सात रस्ता, ग्रॅन्ट रोड या परिसरातील रसिकाना जवळचे. आम्हा गिरगावकरांना ६१ आणि ६६ क्रमांकाच्या बेस्ट बसमधून नायर रुग्णालय स्टाॅपवर आम्ही उतरुन जायचो. कंडक्टरला पैसे देत ‘एक मराठा मंदिर ‘ इतकेच बोललो तरी पुरेसे असे.
मराठा मंदिरची वैशिष्ट्ये अनेक. ती मी माझ्या आवडीचा भाग म्हणून जाणून घेतली. के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’ (रिलीज ५ ऑगस्ट १९६०) येथे प्रदर्शित होताना आगाऊ तिकीट विक्रीच्या खिडकीबाहेर पहाटेपासूनच अबब म्हणावी अशी लांबलचक रांग, त्यात प्रचंड धक्काबुक्की, एका दोघांना भोसकल्याचीही बातमी गाजली. थिएटरवरचे डेकोरेशन अतिशय भव्य आणि नेत्रदीपक. आजही सोशल मिडियात त्याचे छायाचित्र लक्षवेधक ठरते. पिक्चरच्या प्रिमियरच्या वेळची अक्षरश: प्रचंड गर्दी, चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सचे, फिल्मवाल्यांचे आगमन… एक प्रकारचा जणू सणच. आजच्या भाषेत इव्हेंट! मराठा मंदिरच्या या यशोगाथेत असे वैशिष्ट्यपूर्ण क्षण खूपच. विजय आनंद दिग्दर्शित.’गाईड ‘ ( १९६७) आणि ‘जाॅनी मेरा नाम’ ( १९७०), कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकिजा ‘ ( १९७२) यांचे प्रीमियर गाजले. ऐसपैस डेकोरेशन या खासियतेमुळे येथील अनेक पिक्चर्सची होर्डींग्स डिझाईन पाहण्यातही विशेष रुची असे. मेन थिएटरची ती खासियतच. तेवढ्यासाठीच मराठा मंदिर परिसरात चक्कर मारणारे माझ्यासारखे फिल्म दीवाने भरपूर. या थिएटरचे हेदेखील एक यशच.(Maratha Mandir Theaters)
तेरे मेरे सपने, फरार, खेल खेल में, कहानी किस्मत की, अमीर गरीब, बारुद, द बर्निंग ट्रेन, अब्दुल्ला, ड्रीम गर्ल, अग्रीमेंट, रझिया सुलतान, गांधी, अंदर बाहर, धरम कांटा, कर्मा, मिस्टर इंडिया, जादुगर, अग्निपथ,.खुदा गवाह, वास्तव…… नावे वाढत जातील. गंमत म्हणजे, अनेक पिक्चर्सचे डेकोरेशनच फक्त पाहण्यासारखे होते. तेवढे पाहण्यातही रोमांचकता असे. थिएटरला बाहेरच्या बाजूलाच शो कार्ड्स असल्याने तो एक प्रकारचा बोनसच. तोही हवाहवासा. टीनू आनंद दिग्दर्शित ‘शहेनशाह ‘ ( १९८८) चे येथील रिलीज बहुचर्चित. पिक्चरच्या रिलीजला प्रचंड विरोध वाढला होता. कारण बीग बीचा बोफोर्स प्रकरणात सहभाग. अर्थात तो विषयच वेगळा. सिनेमाला संरक्षण म्हणून मराठा मंदिर थिएटरबाहेर (Maratha Mandir Theaters)पोलीस व्हॅन उभी. ‘शहेनशाह ‘ रिलीज झाला आणि वाद निवळत निवळत गेला. तीन आठवड्यांनी ही सुरक्षा बाजूला केली. बीग बी आणि मराठा मंदिर थिएटरच्या इतिहासातील ही एक वेगळीच गोष्ट.
मराठा मंदिरची मॅटीनी शोची परंपरा अशीच वेगळी. यश चोप्रा दिग्दर्शित ‘ इत्तेफाक ‘ ( राजेश खन्ना व नंदा) या रहस्यरंजक चित्रपटाने येथेच मॅटीनी शोला ज्युबिली हिट यश संपादले. मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘गमन ‘ टॅक्स फ्री असल्याने एक रुपया सात पैसे असे त्याचे तिकीट होते आणि माझ्या खिशात मोजून तेवढीच नाणी असल्याने कधी एकदा हाती तिकीट येतेय असे मला झाले होते. उगाच पाच पैसे हातून पडलेच तर… पिक्चर न पाहता मला घरी यावे लागले असते. भारती राजा दिग्दर्शित श्रीदेवीचा पहिला चित्रपट ‘सोलवा सावन’ ( १९८०) येथेच मॅटीनी शोला होता. अमोल पालेकर या चित्रपटाचे नायक होते. आणि यशराज फिल्म्सचा आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ ( १९९५) ने येथेच मॅटीनी शोला इतिहास घडवला आणि मराठा मंदिर थिएटर जगभरात पोहचले. पहिले पन्नास आठवडे न्यू एक्सलसियर थिएटरमध्ये दिवसा तीन खेळ याप्रमाणे यशस्वी घौडदौड केल्यावर डीडीएलजे मराठा मंदिरला मॅटीनी शोला शिफ्ट केला आणि मग एकेक वर्ष करत करत पंचवीस वर्षानंतही त्याचा प्रवास सुरुच हे जगावेगळेच यश. कोरोना प्रतिबंधक काळात ते काही काळ थांबले होते इतकेच. अन्यथा एकदा पब्लिकला आवडलेला पिक्चर थिएटरमधून उतरला तरी पडद्यावर त्याचा प्रभाव असतो.
========
हे देखील वाचा : अमिताभचा हुकमी हिट पिक्चर…
========
अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स इतिहासजमा होत असतानाच मराठा मंदिर आपली वैभवशाली परंपरा कायम ठेवून आहे याचा आम्हा चित्रपट व्यसनीना खूपच आनंद होतोय. भविष्यात काय होणार माहित नाही.कदाचित आजच्या मल्टीप्लेक्स आणि ओटीटी पिढीला माहित नसेल, आपल्या देशातील अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या नावात ‘मंदिर ‘ असल्याचे दिसेल.(Maratha Mandir Theaters) यावरुन या वास्तूला पवित्र मानले जाते हेच अधोरेखित होतेय. हीदेखील एक चित्रपटगृृह परंपराच. अगदी आमच्या अलिबागमधील ब्रह्मा विष्णु महेश या थिएटरचे नाव महेश चित्र मंदिर असेच होते. अगदी माझ्या ‘मामाच्या गावाला ‘ म्हणजेच चौलला गेल्यावर रेवदंड्याच्या गणेश चित्र मंदिर या थिएटरमध्ये पिक्चर्स पाह्यला जायचो. चित्रपटगृहाच्या नावातील ‘मंदिर ‘ हा खूपच मोठा ठेवा आहे. मराठा मंदिर थिएटर (Maratha Mandir Theaters)तेच अधोरेखित करतेय….