….. आणि आठवली सिनेमाच्या तिकीट विक्रीची लांबलचक रांग
‘शकुंतला’, ‘गुलाबो सिताबो’ असे नवीन चित्रपट ऑनलाईन अर्थात तिसरा पडदा पध्दतीने रिलीज होणार या गोष्टीने माझे मन सत्तरच्या दशकात गेले आणि तेव्हा ‘जोशीला’, ‘शोले’, ‘प्रेम कहानी’, ‘मेहबूबा’, ‘अमर अकबर अॅन्थनी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ अशा अनेक बहुचर्चित चित्रपटाच्या आगमनाच्या वेळचे वातावरण आठवले.
आज ऑनलाईन सिनेमा पहायचा तर सबक्रिप्शन घ्या असे म्हटले जाते. पूर्वी काय असायचे?
सिनेमाचे व्यसनी, सिनेमाचे चाहते यांचे ‘पहिले लक्ष्य’ असे की अशा प्रचंड उत्सुकता वाढवलेल्या चित्रपटाचे मेन थिएटर कोणते आहे आणि त्यामागोमाग प्रश्न असे की रिलीजची तारीख काय? आजच्या पिढीच्या मनात एव्हाना प्रश्न पडला असेल, हे मेन थिएटर म्हणजे काय? अगदी थोडक्यात उत्तर द्यायचे तर प्रत्येक मोठ्या शहरात अनेक आठवडे (कधी पंचवीस तर कधी पन्नास, तर कधी त्याहीपेक्षा जास्त) मुक्काम करणारे थिएटर म्हणजे मेन थिएटर. आपल्याकडे दक्षिण मुंबईतील थिएटर त्यासाठी ओळखली जात. अशा मेन थिएटरवर आगामी चित्रपटाची पोस्टर अथवा शो कार्ड अगोदर लागत आणि त्याची पक्की खबर सिनेमावेड्यांना लागली की मग ‘एकच लक्ष’ पहिला शुक्रवार कोणता?
आजही प्रत्येक शुक्रवारी नवीन चित्रपट प्रदर्शित होतात (एखादा मोठा सण बुधवार, गुरुवारी आला तर भाग वेगळा). पूर्वी त्या शुक्रवारच्या अगोदरच्या सोमवारी त्या चित्रपटाची आगाऊ तिकीट विक्रीची खिडकी उघडे….. ५ ऑगस्ट १९६० रोजी मराठा मंदिर चित्रपटगृहात के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’ प्रदर्शित होताना तत्पूर्वी सोमवारी आगाऊ तिकीट विक्रीला पहाटेपासूनच प्रचंड मोठी रांग लागली. नऊ वाजता खिडकी उघडेपर्यंत अप्पर स्टाॅल आणि बाल्कनी या दोन्हीच्या रांगा केवढ्या तरी वाढतानाच लठ्ठालठ्ठी, पोलिसांचा लाठीमार वगैरे झालेच, पण एका प्रेक्षकावर चाकूहल्ला झाल्याचेही पूर्वीची पिढी आवर्जून सांगे.
या अॅडव्हास बुकिंग संस्कृतीत सातत्य आले ते राजेश खन्नाच्या क्रेझमध्ये. मिनर्व्हात ‘दाग’ ला, अप्सरात ‘अजनबी’ ला, शालिमारला ‘रोटी’ साठी ही अशीच तौबा गर्दी. अमिताभच्या वाटेला हे सुख ‘दीवार’ (२३ जानेवारी १९७५) पासून आले. मिनर्व्हा थिएटरमध्ये अशीच जबरदस्त रांग लागली. तत्पूर्वी, इंपिरियलमध्ये ‘जंजीर’ ने (१९७३) तब्बल पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला, पण तो रिलीज झाल्यावर अमिताभची क्रेझ निर्माण झाली. त्याचा स्वतःचा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आणि मग ते ‘दीवार’ ला फळले. तात्पर्य, अशी अॅडव्हास बुकिंगला गर्दी मोठ्या स्टारच्या सिनेमाना होई. शुक्रवारी फस्ट डे फर्स्ट शोचा पब्लिक रिपोर्ट नरम आला तर हीच गर्दी मग पहिल्याच आठवड्यानंतर ओसरे. ‘प्रेम कहानी’ ची ड्रीमलॅन्डची, ‘मेहबूबा’ ची नाॅव्हेल्टीची गर्दी अशीच वेगाने ओसरली आणि आठ दहा दिवसांनी करंट बुकिंगची खिडकी उघडली. त्या काळात अॅडव्हास बुकिंगसाठी दोन (अप्पर स्टाॅल आणि बाल्कनी) आणि तशाच करंट बुकिंगसाठी दोन खिडक्या असत. तर पडद्यासमोरच्या मोजून पहिल्या तीन चार रांगा या स्टाॅलच्या असत आणि त्याची खिडकी याच थिएटरमध्ये वेगळी असे. मेट्रो आणि नाॅव्हेल्टीत ही खिडकी मागे होती. ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये दोन बाल्कनी, त्यातील वरची बाल्कनी म्हणजे स्टाॅल. आणि सर्वच थिएटरमध्ये स्टाॅलचे तिकीट ऐन वेळी मिळे. महत्वाचे म्हणजे खिडकी उडताच दहा मिनिटात ही स्टाॅलची तिकीटे संपतही. एव्हाना तुम्हा वाचकांतील वयाच्या साठीजवळ आलेल्याना आणि मूळ दक्षिण मुंबईकरांना हे सगळे डोळ्यासमोर आले असेलच. मूळचे अगणित गिरगावकर आज डोंबिवली, विरार, पनवेल येथे स्थायिक झालेत.
‘शोले’ च्या अॅडव्हास बुकिंगची अख्खी स्टोरीच वेगळी. मिनर्व्हातच तो सत्तर एमएम आणि स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीममध्ये असल्याने वातावरण एकदमच तापले होते. १५ ऑगस्ट १९७५ रोजी सिनेमा रिलीज होण्यापूर्वी ११ ऑगस्टला मिनर्व्हावर ‘रेकाॅर्ड ब्रेक’ लाईन होती. आणि तेव्हा वाढीव तिकीट दर होते. ते असे, अप्पर स्टाॅल चार रुपये चाळीस पैसे आणि बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे. आज हा चिल्लरचा भाव वाटतो. पण त्या काळात मध्यमवर्गीय कुटुंबात मासिक पाचशे रुपये पगार प्रचंड आनंद आणि अभिमान देणारा होता.
‘शोले’ ची पहिल्या आठवड्याची तिकीटे कधी ‘हाऊसफुल्ल’ झाली हे कोणालाच समजले नाही (प्रत्येक चित्रपटासाठी ब्लॅक मार्केटवाले आपली अनेक पोरे अशा रांगेत उभी करून बरीच तिकीटे काढतात अशी उघड ‘हवा’ होती). ‘शोले’ चा सुरुवातीचा पब्लिक रिपोर्ट नरम आला. तात्कालिक समिक्षकांनीही झोडपले. काही दिवस तर ‘पडला पडला’ अशीच हवा होती. पण हिंदी चित्रपटातच एक डायलॉग असतो ना, मारनेवालेसे बचानेवाला बडा होता है….. साधारण बारा चौदा दिवसांनी ‘शोले’ असा काही उठला की थिएटरवर कधीही जावे तर अॅडव्हास बुकिंगला प्रचंड मोठी रांग. मी स्वतः अशा रांगेतच उभा राहूनच ‘शोले’ चे तिकीट मिळवले आणि जपूनही ठेवले. मिनर्व्हात ‘शोले’ ३० सप्टेंबर १९७८ पर्यंत नियमित तीन खेळ होता आणि मग मॅटीनी शोला शिफ्ट करुन तो आणखीन दोन वर्षे, असा एकूण पाच वर्षे चालला. सर्वाधिक काळ त्याची तिकीटे अॅडव्हास बुकिंगलाच संपली.
‘हम किसीसे कम नही’ चे नाझ थिएटरमध्ये पस्तीसाव्या आठवड्यापर्यंत हेच झाले. तुफान हिट चित्रपट ठरला तो. ह्या उलट निर्माता आणि दिग्दर्शक नासिर हुसेन व ऋषि कपूर या जोडीच्या ‘जमाने को दीखाना है’ या चित्रपटाच्या अॅडव्हास बुकिंगला प्रचंड मोठी रांग लागली. पण पिक्चरमे दम नही असा रिपोर्ट फुटला आणि काही दिवसांनीच करंट बुकिंगच्या खिडकीवरही सामसूम झाली. आपल्या पब्लिकला सिनेमा आवडला रे आवडला की ते डोक्यावर घेतात डोक्यात ठेवतात. पण आवडला नाही तर पहिल्या चार पाच दिवसानंतर ते फिरकत पण नाहीत.
अमिताभ बच्चनच्या ‘डाॅन’ च्या अॅडव्हास बुकिंगला गंगा आणि न्यू एक्सलसियर अशा दोन्ही ठिकाणी चाहत्यांची खचाखच रांग लागली. पण ‘दो और दो पाच’, ‘इमान धरम’ यांच्याकडे पाठ फिरवायाला ह्याच चाहत्यांना वेळ लागला नाही. दोन्हीचे मेन थिएटर नाॅव्हेल्टी होते.
एक महत्त्वाचे म्हणजे मी गिरगावातील खोताची वाडीत लहानाचा मोठा होताना ही सगळी माझ्या अवतीभवतीची थिएटर्स, म्हणून मला हे सगळे ज्ञात आहे. या माझ्या आठवणी आहेत. मी स्वतः ‘त्रिशूल’ च्या तिकीटासाठी अॅडव्हास बुकिंगला अप्सरा थिएटरवर मोठ्या रांगेत उभा राहिलोय. बरं, पर्यायही नव्हता.
त्या काळात उपनगरातील थिएटरवर अशा प्रचंड वगैरे रांगा लागत नसत, पण पिक्चर काही दिवस हाऊस फुल्ल गर्दीत चाले, चार पाच आठवड्यात उतरेही आणि ज्याला सिनेमा व्यवसायात लॉंग रन म्हणतात तो मेन थिएटरला असे.
आता तुमचा प्रश्न असेल की या रांगा गेल्या कुठे आणि कशा?
अगदी नेमके नेमके सांगायचे तर १९८२ साली देशात रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ आला, लगेचच व्हिडिओ थिएटर्स आली आणि या रांगेतील कनिष्ठ मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात कट ऑफ झाला. नंतरच्या काळात एखाद्या ‘राम तेरी गंगा मैली’ (मिनर्व्हा) ‘तेजाब’ (ड्रीमलॅन्ड), ‘राम लखन’ (मेट्रो) यांच्यासाठी अशीच रांग लागली इतकेच. १९९२ साली उपग्रह वाहिनीच्या आगमनाने अॅडव्हास बुकिंग संस्कृती एकदमच आटली.
पुढे मल्टीप्लेक्स युगात सिनेमा पाहणं ही नवश्रीमंत आणि उच्चभ्रू नवश्रीमंत वर्गाची चैन झाली. ते सिनेमाच्या तिकीटासाठी रांगेत उभे राहतील? मोबाईलवर बुकिंग सहज शक्य होऊ लागले. आणि आता तर ऑनलाईनवर चित्रपट पहा.
एकेकाळी चित्रपटाच्या अॅडव्हास बुकिंगसाठी लागणारी भली मोठी रांग इतिहासजमा झाली, पण त्याच रांगेत उभे राहून तिकीट काढलेल्या श्रमिक, कष्टकरी, स्वपाळु, आशावादी वर्गाने या देशात चित्रपट जगवला/वाढवला/जिवंत ठेवलाय…..
दिलीप ठाकूर