मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
क्लासिक डाकूपट : मुझे जीने दो
डाकूपट म्हणजे धुमशान घोडेस्वारी, त्यात उडणारा धुरळा, जळजळीत डायलॉगबाजी, खून का बदला सिर्फ खून अशी शपथ, बेसुमार बंदूकबाजी, गोळीबार, ग्रामीण नायिका, अधेमधे गीत संगीत व नृत्य अशी मसालेदार केमिस्ट्री एकदम फिट्ट असतानाच तो “क्लासिक चित्रपट” कसा काय ठरेल असा एव्हाना अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल. हिंदी चित्रपट संस्कृतीची हीच तर गंमत आहे. कुछ हटके करो.
सुनील दत्त मला निर्माता व दिग्दर्शक म्हणून जास्त प्रभावशाली व समंजस वाटला. (Classic Heist)
अभिनेता म्हणून त्याने साठच्या दशकात उत्तम वाटचाल केली, मग त्यालाही दुर्दैवाने ‘पडत्या काळा’शी सामना करावा लागला. राजेश खन्नाच्या जबरा सुपर स्टार क्रेझचा…( क्रेझ कसली ? तो जणू हिस्टेरिया होता. शब्दात न सांगता येणारा) राजेंद्रकुमार, शम्मी कपूर व सुनील दत्त, विश्वजीत यांना चांगलाच फटका बसला. सुल्तान अहमद दिग्दर्शित ‘हीरा’ (१९७३) या डाकूपटाने सुनील दत्तला पुन्हा ट्रॅकवर आणले. ते अखेरपर्यंत.
मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ (१९५८) च्या यशाने अभिनेता म्हणून स्थिरावत असतानाच सुनील दत्तने अजंठा आर्ट्स ही आपली चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आणि पहिलाच चित्रपट मोनी भट्टाचार्य दिग्दर्शित “मुझे जीने दो” (१९६३). एक वेगळाच डाकूपट.
मुंबईत रिलीज २३ जानेवारी १९६३. म्हणजेच एकसष्ट वर्ष पूर्ण झालीत. त्या काळात मराठी असो वा हिंदी चित्रपट, टप्प्याटप्प्याने प्रदर्शित होत. ‘मुझे जीने दो’ १९६३ च्या पहिल्याच शुक्रवारी दिल्ली, पूर्व बंगाल आणि उत्तर प्रदेश येथे प्रदर्शित झाला. त्याच्या पुढच्या शुक्रवारी मध्य भारतातील अनेक ठिकणी आणि निझाम वितरण क्षेत्रात (हैदराबाद वगैरे) प्रदर्शित झाल्यावर मुंबईत आला तेव्हा जाहिरातीत हे सगळे तपशील होते (पूर्वी चित्रपटाच्या जाहिरातीही बरीच माहिती देत. आजच्यासारखे ‘जवळच्याच चित्रपटगृहात’ असा कायम स्वरुपी ठोकळा नसे. आवर्जून जुन्या काळातील चित्रपट जाहिराती बघा की) (Classic Heist)
डाकूपट म्हणजे बदले की आग. एक प्रकारचे टोळीयुध्द. दोन डाकू एकमेकांच्या टोळीतील एकेकाचा ‘गेम’ करतात, गाव लुटतात, कधी नायक डाकूची प्रेमकथा वगैरे. अशाही पिक्चर्सना हुकमी प्रेक्षकवर्ग. हीच तर आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षकांची खासियत. त्यांना पडद्यावरील गोष्टीत रंगून, हरवून जायला पूर्वीही आवडे आणि आजही आवडतेय.
‘मुझे जीने दो’ मध्ये शस्त्र खाली ठेवणारा अथवा शरण येऊन सर्वसाधारण आयुष्य जगू इच्छिणारा डाकू ही मध्यवर्ती कल्पना. डाकू जर्नैलसिंग (सुनील दत्त) एकदम खतरनाक डाकू. तो चाल करुन येणार म्हणताच अख्खं गाव चळाचळा कापे. त्याच्या आयुष्यात नर्तकी चमेली (वहिदा रेहमान) येते. तो व त्याच्या खौपनाक साथीदारांचे आपले एक शासन असते. आपली हुकुमत. ते पोलीस अथवा सरकारचे काहीच नियम मानत नाहीत. एका ह्रदयदावक अनुभवातून त्याचे ह्रदय परिवर्तन होते. तो जणू माणसाळतो आणि आपल्या साथीदारांनाही सर्वसाधारण आयुष्य जगण्यास भाग पाडते. गोष्टीत नवीन वळण. (Classic Heist)
दिग्दर्शक मोनी भट्टाचार्य ‘दो बिघा जमीन’, ‘मधुमती’ या चित्रपटांच्या वेळेस बिमल राॅयकडे सहाय्यक दिग्दर्शक होते. बिमल राॅय यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही. ‘उसने कहा था’ हा त्यांनी दिग्दर्शिलेला पहिला चित्रपट. त्यात सुनील दत्त होता. तेव्हा दोघांची मैत्री झाली आणि त्यातून ‘मुझे जीने दो’ची तयारी सुरु झाली. सुनील दत्तने मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’मध्ये डाकू बिरजू साकारताना आपला फिटनेस, उत्तम शरीरबांधा, दणकट उंची, खुनशी नजर, आवाजातील जरब यांचा प्रत्यय दिला होता. तरी डाकूच्या विविध गेटअपमध्ये आपण कसे दिसतोय हे तो सतत आरशात पाही. त्यातून त्याचा आत्मविश्वास आणखीन वाढला. चित्रपटासाठी हवा असलेला सफेद घोडा सुनील दत्तने चक्क विकत घेतला ( भाड्याचा घोडा आणायचा तर तोच नेहमी मिळेल असे नाही. म्हणजेच कंटीन्यूटीची समस्या. हाच आपल्या मालकीचा घोडा सुनील दत्तने त्यानंतर आपल्या अनेक डाकूपटात वापरला. ‘अंहिसा’च्या शूटिंगच्या वेळेस तो आजारी पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.) (Classic Heist)
‘चमेली’ च्या भूमिकेसाठी वहिदा रेहमानची निवड म्हणजे एक प्रकारचे नाट्यच. गुरुदत्तनी वहिदा रेहमानना अभिनय क्षेत्रात आणताना ती ‘गुरुदत्त फिल्म ‘च्याच चित्रपटात पाच वर्ष भूमिका साकारणार असा लेखी करार केला होता. तो वहिदा रेहमान यांनी सांभाळला तरी कधी तरी या करारातून बाहेर पडावे असे वहिदा रेहमानसारख्या अफाट गुणवत्ता असलेल्या संवेदनशील कलाकाराला वाटणारच. आणि नेमकी तीच संधी ‘मुझे जीने दो’ने दिली. आणि कराराची मुदत संपताच वहिदा रेहमानने अजंठा आर्ट्सशी करार करीत नवीन वाटचाल सुरु केली.
थीमनुसार प्रत्यक्षात मध्य प्रदेशातील चंबळच्या खोर्यात शूटिंग करायचं हा सुनील दत्त व मोनी भट्टाचार्य यांचा निर्धार. शासनाचे सहकार्य होतेच. (चित्रपट राजस्थानात घडतो. पण शूटिंग मध्य प्रदेशात असे होतच असते) चंबळ, भिण्ड, उरैना यात पोलीस संरक्षणात चित्रीकरण सत्र आयोजित करण्यात आले. अशातच खऱ्याखुऱ्या डाकूंच्या धमक्याही येत. त्यामुळे वहिदा रेहमान घाबरत. त्यांना धीर देण्यासाठीच नर्गिस दत्त तेव्हा अगदीच लहान असलेल्या संजूबाबाला घेऊन आल्या. नर्गिस दत्त नेहमीच अजंठा आर्ट्स युनिटमधील प्रत्येकाची काळजी घेत.
मुझे जीने दोचे इनडोअर शूटिंग अंधेरीतील मोहन स्टुडिओत सेट लावून पार पडले. चित्रपटाचे लेखन आगा जानी काश्मिरी यांचे. गीते साहिरची आणि संगीत जयदेव यांचे. अतिशय श्रवणीय आणि शास्त्रीय संगीताच्या वळणाचे. नदी नारे जाव श्याम ( पार्श्वगायिका आशा भोसले), रात भी है कुछ भीगी भीगी ( लता मंगेशकर), मांग मे भरले रंग सखी रे ( आशा भोसले), मोहे ना यू घूर घूर के ( लता मंगेशकर), तेरे बचपन को जवानी की हवा ( लता मंगेशकर), अब कोई गुलशन ना उजडे (मोहम्मद रफी) ही सगळीच गाणी क्लासिक. चित्रपटातील हिंसेच्या नेमक्या विरुद्ध बाजूची. चित्रपटाचा समतोल साधणारी. आजही कधीही शांतपणे ऐकावीत अशी. या चित्रपटातील गोष्टीसारखं प्रत्यक्षातही घडलयं. माधवसिंह आणि मोहनसिंग हे खरेखुरे डेंजरस डाकू सरकारला शरण आले. ते सामान्य नागरिक झाले आणि त्यांनी ‘चंबल का डाकू’ ( १९८२) या चित्रपटात भूमिका साकारली. (Classic Heist)
सुनील दत्त आणि रुपेरी पडद्यावरचा डाकू हे हिट समीकरण. पूर्वी तर ‘एकाच भूमिकेच्या नावासह आवृत्त्या काढण्यात येत ‘. पब्लिकला हेच आवडेल असा भारी समज. ‘मदर इंडिया’त सुनील दत्तच्या व्यक्तीरेखेचे बिरजू नाव त्यानंतर डाकू और जवान, अहिंसा, काला आदमी यात होते. म्हणून काही ‘मदर इंडिया’ची कोणतीच सर आली नाही नि येणारही नव्हती. पण त्याचा विचार करतोय कोण? हीरा ( हीरा शीर्षक भूमिकेत), प्राण जाए पर वचन न जाऐ ( राजा ठाकूर), बदले की आग ( लखन), राज तिलक ( जयसिंह) यातही तो डाकूच. त्यात तो भारी शोभायचा.
त्याच्या अजंठा आर्ट्स बॅनरखाली ‘मन का मीत ‘ ( १९६८. सोम दत्त, लीना चंदावरकर, विनोद खन्ना या तिघांचाही पहिला चित्रपट. दिग्दर्शक ए. सुब्बाराम), या चित्रपटानंतर सुनील दत्तने दिग्दर्शनात पाऊल टाकले. रेश्मा और शेरा ( १९७१. हा चित्रपट त्या वर्षी ऑस्करसाठीची भारताची प्रवेशिका होती.), डाकू और जवान ( १९७८) पासून सुनील दत्तने वेगळेपण सोडले. (Classic Heist)
===========
हे देखील वाचा : यश चोप्रा त्यांच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना का कचरले ?
===========
‘दर्द का रिश्ता’ ( १९८२), ‘यह आग कब बुझेगी’ ( १९९१) हे अजंठा आर्ट्सचे चित्रपट. यातील यह आग कब…चा मुहूर्त मला आठवतोय. वांद्र्यातील पाली हिलवरील अजंठा मिनी थिएटरच्या गच्चीवर रंगला.खुद्द सुनील दत्तच्या अजंठा बंगल्यातच हे पोटमाळ्यात थिएटर. आणि वरचा भाग बाहेर. ती छान गच्ची. सुनील दत्तने आम्हा सिनेपत्रकारांचे अगदी छान हसतमुख स्वागत केले. मुहूर्ताच्या वेळी डिंपल कापडिया नायिका होती. तारखांच्या समस्येमुळे तिच्या जागी रेखा आली. ( सुनील दत्त व डिंपल जोडी खरंच शोभली असती काय?) सुनील दत्त व रेखा नागिन, अहिंसा इत्यादी चित्रपटातून एकत्र आले होतेच. सुनील दत्तनी १९६८ साली राजकुमार, स्वतः, तसेच मुमताज व लीना चंदावरकर अशा स्टार कास्टच्या ‘मसिहा ‘ या चित्रपटाच्या निर्मितीत पाऊल टाकले. पण हा चित्रपट घोषणेवरच थांबला.(Classic Heist)
‘मुझे जीने दो’मधील डाकूंचे आत्मसमर्पण ही वस्तुस्थिती होती. तसं प्रत्यक्षात घडले म्हणून चित्रपटात आले. सुनील दत्तचे वेगळेपण यातच आहे. दर्द का रिश्ता ( कर्करोग), यह आग कब बुझेगी ( हुंडा बळी) असे विषय सुनील दत्तनी हाताळले. निर्माता व दिग्दर्शक म्हणून सुनील दत्त जास्त प्रभावी का वाटतो याचे उत्तर या चित्रपटात आहे.