दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अभिनेता गोविंदाने कसा घेतला शाहरुख खानचा बदला?
समकालीन नायकांमध्ये (आणि नायिकांमध्येही!) कायम ‘कोल्ड वॉर’ चालू असते. हा लढा वर्चस्वाचा असतो. प्रत्येकालाच टॉपवर राहायचे असते. त्यासाठी अनेक उचापती करत राहतात. नव्वदच्या दशकामध्ये गोविंदा (Govinda) या अभिनेत्याची मोठी चलती होती. गोविंदा आणि करिष्मा कपूर या जोडीने धुमाकूळ घातला होता. त्यांच्या चित्रपटातील गाणी बऱ्याचदा द्विअर्थी आणि अश्लील गटात मोडणारी असायची पण याच गाण्यांनी गोविंदाला सुपरस्टार बनवले होते, हे नाकारता येत नाही.
अलीकडे ‘रिल्स’च्या काळात पुन्हा गोविंदाच्या गाण्यांना जबरदस्त डिमांड आला आहे. त्याची गाणी आणि त्याची डान्स शैली याची आजच्या युवा पिढीवर पण क्रेझ आहे. गोविंदाचे “मय से मीना से ना साकी से, ना पैमाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से….” हे ‘खुदगर्ज’ मधील गाणे आज कालच्या रिल्सच्या दुनियेत प्रचंड लोकप्रिय आहे.
या दशकात शाहरुख खान याने देखील मायानगरीत पाऊल टाकले होते. ‘बाजीगर’ पासून तो देखील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जाऊ लागला होता. त्याचे ‘कभी हां कभी ना’, ‘डर’, ‘राजू बन गया जंटलमन’, करण अर्जुन’ हे सिनेमे लोकप्रिय ठरत होते. गोविंदासमोर तगडं आव्हान घेवून तो उभा होता. मिडियातूनही दोघांच्या शीत युद्धावर चर्चा चालू असायची. पण याला जाहीर तोंड फुटले ते रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या टीव्ही वरील कार्यक्रमातून. (Govinda Vs Shahrukh)
एकदा रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या लोकप्रिय कार्यक्रमात शाहरुख खानला पाचारण करण्यात आले होते. तिथे शाहरुख खान एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला, “मी ‘सरकायलो खटिया जाडा लगे” सारख्या गाण्यांमधून ‘चीप पॉप्युलरिटी’ मिळविणार नाही. मला लोकप्रिय होण्याचा असला हलका प्रकार अजिबात आवडत नाही.”
शाहरुख खानचा रोख सरळ सरळ गोविंदावर होता. परंतु त्याने त्याचे नाव त्या कार्यक्रमात घ्यायचे टाळले होते. परंतु ‘समझने वाले को इशारा काफी होता है.” हा कार्यक्रम टेलिकास्ट झाल्यानंतर साहजिकच यावर चर्चा सुरू झाली. (Govinda Vs Shahrukh)
गोविंदापर्यंत हा विषय जेव्हा पोहोचला तेव्हा त्याने याला सडेतोड उत्तर द्यायचे ठरवले. शाहरुखला उत्तर देताना त्याने एक वेगळा मार्ग अवलंबिला. गोविंदा आणि करिष्मा कपूर यांचा ‘कुली नंबर वन’ हा चित्रपट त्यावेळेला प्रदर्शनाच्या वाटेवर होता. डेव्हिड धवन या सिनेमाचे दिग्दर्शक होते. यात एक गाणं होतं, “तुझको मिरची लगी तो मैं क्या करू?” या गाण्याच्या कॅसेट्स आणि सीडीज मार्केटमध्ये आल्या होत्या आणि त्या चांगलाच धुमाकूळ घालत होत्या.
गोविंदाने या गाण्यातच एक आणखी कडवं वाढवायचे ठरवले. त्या पद्धतीने त्याने गीतकार समीर याला बोलावून आपली भूमिका सांगितली. समीरने आता नवीन कडवे लिहिले. त्याचे शब्द असे होते –
‘मैने जो सरकाई खटीया तो आप को लगा बडा घटिया,
लेकीन मैने किसीको बेमौत मारा नही,
किसीके सीने में खंजर उतारा नही,
मै तो इस दुनिया के सर्कस का जोकर हूं,
नाचता, गाता सभी का दिल बहलाता हूं.
तुझको नाचना न आया तो मै क्या करू?’
गोविंदाचा हा शहारूखला जबरदस्त सडेतोड जवाब होता. गोविंदाने दिग्दर्शक डेव्हिड धवनला हा अंतरा सिनेमात घ्यायला सांगितला. त्यावर डेव्हिड धवन यांचे म्हणणे होते, “ऑलरेडी या गाण्याच्या कॅसेट विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता आपल्याला पुन्हा तेच गाणं मार्केटमध्ये आणता येणार नाही.” संगीतकार आनंद मिलिंद यांनी सांगितले, “हे नवे कडवे आधीच्या गीताच्या मीटर मध्ये बसत नाही.” असो पण गोविंदाच्या या भावना मिडियामधून बाहेर आल्या.
===========
हे देखील वाचा – एका गॉगलमुळे बिग बींचा चित्रपट आला होता आयटीच्या रडारवर; काय होता हा किस्सा?
===========
शाहरुख आणि गोविंदा समकालीन असून एकाही सिनेमात एकत्र आले नाहीत. पुढे काही वर्षांनी शाहरुखने गोविंदाची माफी मागितली आणि २००७ साली ‘ओम शांती ओम’ या सिनेमाच्या टायटल गीताच्या चित्रीकरणाच्या वेळी गोविंदाला बोलावून सन्मानाने त्याला त्यामध्ये सामील केले.