हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

जेव्हा कॉमेडीयन मुक्री अभिनेत्री Nadiraच्या बेडरूममध्ये शिरला होता!
दिलीप कुमार यांनी आपल्या The Substance and shadow या आत्मचरित्रामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे यात त्यांच्या चित्रपट कारकीर्दी सोबतच चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान घडलेल्या काही गमतीदार घटनांचा देखील उल्लेख केला आहे. त्यातीलच ही एक घटना. विनोदी अभिनेता मुक्री हा दिलीप कुमार यांचा अत्यंत जवळचा मित्र होता. दिलीप कुमार सोबत त्याने तब्बल 20 सिनेमात काम केले होते. दिलीप सोबत त्यांचे संबंध इतके जिव्हाळ्याचे आणि जवळचे होते की इंडस्ट्री मध्ये दिलीप कुमार ला ‘युसुफ’ या नावाने बोलवणारा जे काही बोटावर मोजण्या इतके लोक होते त्यापैकी एक मुक्री होता.
चाळीस च्या दशकातील बॉम्बे टॉकीज पासून त्यांची मैत्री होती दिलीप कुमार त्याच्या जवळपास प्रत्येक सिनेमात मुक्री यांना एक विशेष भूमिका देण्याची विनंती निर्मात्याला करत असे. त्यामुळे विनोदाने असं म्हटलं जायचं ‘Where there is Dilipkumar there will be always Mukri’ . हे दोघे मुंबई च्या अंजूमन ए इस्लाम चे विद्यार्थी! दिलीपकुमार वर अधिकार वाणी ने रागावणारा एकाच व्यक्ती बॉलीवूड मध्ये होता तो म्हणजे मुक्री! याच मुक्री बाबतचा एक किस्सा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिला आहे.

1951 साली ‘आन‘ या चित्रपटाचे शूटिंग नाशिक जवळच्या इगतपुरी येथे चालू होते. ते थंडीचे दिवस होते. दिलीप कुमार यांना स्वतंत्र रूम दिली होती तर मुक्री बाहेरच्या हॉलमध्ये झोपत होते. एकदा रात्री कडाक्याची थंडी पडली असताना मुक्री यांच्याकडे उबदार पांघरुण नव्हते. तेंव्हा त्यानी आपल्या मित्राच्या खोलीत जायचे ठरवले. मुक्री एका रूममध्ये शिरला. रात्री आपल्या बेड मध्ये कोणीतरी शिरलं आहे हे पाहून दिलीप कुमार जागा झाला पाहिलं तर तिथे मुक्री ! त्याने मुक्री ला विचारले ,” तू इथे काय करतो आहेस?” तेव्हा मुक्री ने घाबरत घाबरत सांगितले,”काय करू मित्रा बाहेर खूप थंडी होती म्हणून मी ब्लँकेट साठी तुझ्या रूम मध्ये येणार होतो पण चुकून तुझ्या आधी मी दुसऱ्याच रूम मध्ये शिरलो तिथे आपल्या सिनेमाची हीरोइन नादिरा होती ती माझ्या भयंकर चिडली आणि तिने मला हाकलून दिले!” दिलीप कुमार म्हणाला,” ठीक आहे. झोप आता. आपण सकाळी बघू. “
सकाळी नादिरा ने रुद्रावतार धारण केला होता. ती म्हणाली ,” मुक्री माझ्या रूममध्ये शिरलाच कसा? त्याला शिक्षा झाली पाहिजे!” तेव्हा दिलीप कुमारने मुक्री ची बाजू घेत सांगितले की ,”मुक्री हा खूप प्रामाणिक आणि चांगला माणूस आहे तो असला फालतूपणा करणार नाही. त्याला थंडी वाजत होती म्हणून तो माझ्या रूम येणार होता पण रात्री अंधारात चुकून तो भलत्याच रूम मध्ये शिरला!” पण या चित्रपटाचे दिग्दर्शक महबूब यांची पत्नी हिला वेगळाच संशय आला. तिला कायम असं वाटत होतं की आपला नवरा मेहबूब आणि नायिका नादिरा यांच्यात अफेअर चालू आहे आणि नादिराने मुद्दामच रात्री आपल्या रूमचा दरवाजा फक्त लोटून घेतला आहे जेणेकरून मेहबूब यांना येतं यावे!
================================
हे देखील वाचा : Manoj kumar करीता किशोर कुमारने एकही गीत गायले नाही!
================================
नादिरा आणि मेहबूब यांची पत्नी या दोघींची समजूत काढता काढता दिलीप कुमार यांच्या नाकी नऊ आले पण शेवटी मुक्री ने सर्व खुलासा केला आणि प्रकरणावर पडदा पडला. दिलीप कुमार आणि मुक्री यांनी ‘प्रतिमा’, ‘अनोखा प्यार’, ‘आन’, ‘अमर’, ‘कोहिनूर’, ‘राम और श्याम’, ‘गोपी’, ‘विधाता’, ‘कर्मा’,’इज्जतदार’ या सिनेमात एकत्र भूमिका केल्या. मुक्री यांनी पांच दशके सिनेमाच्या दुनियेत काढली त्यांनी सहाशे हून अधिक सिनेमात काम केले. आजच्या पिढीला मुक्री माहीत असणे शक्य नाही पण अमिताभ बच्चन यांच्या ‘शराबी’(1984) चित्रपटातील अमिताभ चा ‘मुछे हो तो नथ्थूलाल जैसी ..’ हा डायलॉग आठवत असेल यातील मुछेवाला नथ्थूलाल म्हणजे मुक्री!