विनोदाचा बादशहा ‘मेहमूद’
विनोदाचा बादशहा म्हणजे मेहमूद! तमाम विनोदवीरांच्या मालिकेतील सर्वाधिक यश मिळविणारा आणि सर्वात मोठी इनिंग खेळणारा कलावंत म्हणजे मेहमूद. थोडक्यात सांगायचं म्हणजे; ‘कॉमेडीचे दुसरे नाव म्हणजे ‘मेहमूद’! इतका या प्रांतात त्याचा दबदबा होता. १९६० नंतरच्या दशकात त्याने तुफानी हंगामा केला. इतका की नायकापेक्षा जास्त त्यांना मागणी असायची आणि नायकापेक्षा मानधन देखील अधिक. त्यांच्या नावावर सिनेमे चालायचे. त्याचं नाव असलं तरच वितरक पुढे यायचे इतका एकछत्री अंमल त्याचा होता. मेहमूद पडद्यावर असले की थिएटरमध्ये हास्याचे धबधबे कोसळत रहायाचे. त्यांच्या विनोदी अभिनयाला अनेक छटा होत्या. त्यांची कॉमेडी ही हुकमी फलंदाजासरखी होती. ते जसा मैदानात आले की चौकार, षटकारांची बरसात करीत.
त्याचं खास ‘मेहमूदी’ बोलणं, त्यांचं नाचणं, त्यांच्या एकेक आचरट हरकती यावर प्रेक्षक खूप खूश असायचे. ‘हम काले है तो क्या हुआ, दिलवाले हैं’, ‘ओ मामा ओ मामा’, ‘जोडी हमारी जमेगी कैसे जानी’ ही त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी अफाट गाजली. मेहमूदजी सारा पडदा व्यापून टाकत असे. ते पडद्यावर असे पर्यंत प्रेक्षक हास्यसागरात बुडालेले असायचे.
बॉम्बे टॉकीजचे सुप्रसिद्ध कलावंत व नर्तक मुमताज अली हे महमूदचे वडील.(जन्म :२९ सप्टेंबर १९३२) जोपर्यंत बापाची चलती होती तोपर्यंत घरी गर्भश्रीमंती होती. मेहमूद लहानपणापासूनच अत्यंत व्रात्य आणि खोडकर. शिक्षणात गती नव्हतीच. संगतही काही बरी नव्हती. त्यामुळे त्याची गणना आवारा म्हणून घरात व्हायला लागली. बॉम्बे टॉकीज बंद पडलं. घरात आर्थिक प्रश्न उभे राहू लागले. त्या वेळी मेहमूद यांनी पडेल ते काम करायला सुरूवात केली. राजा मेहंदी अली खान, पी.एल संतोषी, ग्यान मुखर्जीच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणूनही त्यांनी काम केले.
मेहमूद हे मीना कुमारीला टेबल टेनीस शिकवायला जात असे. तिथेच त्यांची भेट मीनाकुमारीची बहिण मधू सोबत झाली. तिच्या प्रेमात पडून त्यांनी १९५३ साली तिच्याशी विवाह केला. चार की पाच मुलांना तिने जन्म दिला पण दोघांचे वैवाहीक जीवन फार काही रंगले नाही. पुढे ते मुमताजच्या प्रेमात पडले. पण गाडी काही लग्नापर्यंत पोहचली नाही. नंतर त्यांनी ट्रेसी या अमेरीकन मुलीसोबत लग्न केले. तरी त्यांच्या प्रेमलीला चालूच होत्या. पुढे ते अरूणा इराणीच्या प्रेमात पडले. त्यांच्या ‘बॉम्बे टू गोवा’ व ‘गरम मसाला’ची नायिका तीच होती. पण या प्रेमातही अपयशच आलं. यामुळे ते पुरते ढासळले. व्यसनी बनले. ड्रगच्या आहारी गेले.
मुंबई सोडून मेहमूद बंगळुरुला रहायला गेले. आठ-दहा वर्षे ते मायानगरीतून गायबच होते. याच काळात त्यांची पत्नी ट्रेसी त्यांना मदर टेरेसा यांच्याकडे घेऊन गेली. मदरच्या भेटीनंतर मात्र त्यांनी सर्व व्यसने सोडली. १९८६ साली मेहमूद पुन्हा मुंबईत आले. आता त्यांचे वय झाले होते. नवे विनोदवीर आले होते. काही सिनेमातून ते पुन्हा दिसू लागले पण त्यांच्या अभिनयात तो जोश नव्हता. त्यांचा खरा सुवर्णकाळ होता साठच्या दशकातला.
प्रसाद प्रॉडक्शनच्या ‘छोटी बहन’पासून त्यांना खरी आयडेंटीटी मिळाली. ‘दिल तेरा दिवाना’त शम्मी कपूर सोबत ‘आरजू’, ‘ससुराल’मध्ये राजेंद्रकुमारसोबत, ‘लव्ह इन टोकियो’त जॉय मुखर्जीसोबत, ‘पत्थर के सनम’, ‘गुमनाम’मध्ये मनोजकुमारसोबत मेहमूद यांनी प्रचंड हंगामा केला. इतका की सिनेमातील नायक त्याच्यापुढे फिके पडले. त्यांच्या या करिष्म्याने सदाबहार त्रिकूट ‘राज-दिलिप-देव’ने त्यांच्यापासून चार हात दूर रहाणं पसंद केलं. (त्यांनी साईड किक म्हणून राजेंद्र नाथ, मुक्री यांचा वापर केला).
‘छोटी बहन’पासून त्याचं साऊथ कनेक्शन छान प्रस्थापित झालं. ‘हमराही’, ‘ससुराल’, ‘जिंदगी’ हे सिनेमे सुपर हिट ठरले. यात मेहमूद यांचा सिंहाचा वाटा होता. शुभा खोटेसोबत त्यांची जोडी जमून आली. ‘गृहस्थी’, ‘जिद्दी’, ‘भरोसा’, ‘लव्ह इन टोकियो’त ही जोडी जमली. त्यांच्या पडद्यावरच्या कॅरेक्टरचे नाव कायम महेश असायचे. प्रमोद चक्रवर्तींच्या बर्याच सिनेमात ते होते. छोटे नवाब (१९६१) हा त्यांचा निर्मिती असलेला पहिला सिनेमा. १९६५ साली त्याने ‘भूत बंगला’ चे दिग्दर्शन केले. ‘पडोसन’ हा त्यांचा सिनेमा भारतातील सर्वोत्कृष्ट विनोदी सिनेमा ठरला. यामध्ये त्यांनी रंगवलेला मद्रासी अफलातून होता. त्यातील ‘एक चतुर नार करके सिंगार’ या गाण्याच्या वेळचा त्यांचा अभिनय पाहण्यासारखा होता. ‘ये चतुर घोडा, चतुर घोडा क्या लगाया, एकपे रहना चतुर बोल नही तो घोडा बोल’ हे त्याचे मद्रासी शैलीतील बोल ऐकून थिएटरमध्ये हास्याचा विस्फोट होत असे. श्रीधरच्या ‘प्यार किये जा’मधील त्याचा ओमप्रकाशला स्टोरी सांगण्याचा प्रसंग आजही हसवून जातो. किशोर कुमारसोबत त्यांची ‘साधू और शैतान’मध्ये देखील जोडी जमली होती.
आय.एस. जोहरसोबत त्यांनी ‘जोहर महमूद इन..’ या सिरीजचे अनेक सिनेमे केले. हसवता-हसवता रडवण्याचे कसब त्यांच्या अंगी होते. ‘मैं सुंदर हूँ’ या सिनेमात त्यांनी अप्रतिम अभिनय केला होता. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना मुंबईत स्थिरावण्यात मेहमूद यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्याच सांगण्यावरून अमिताभ यांना पहिला सिनेमा ‘सात हिंदुस्थानी’ मिळाला होता. पुढे त्यांचे करिअर सावरण्यासाठी ‘बॉम्बे टू गोवा’मध्ये अमिताभ यांना नायकाची भूमिका दिली. १९७४ साली त्यांनी ‘कुंआरा बाप’ हा सिनेमा बनवला. या सिनेमामध्ये पोलिओ ग्रस्त मुलाला संधी दिली. राजेश रोशनला या सिनेमामध्ये संगीताची पहिल्यांदा संधी दिली. यातील ‘दूर दूर यहाँसे दूर’ या गाण्याने डोळे पाणावले. ‘हमजोली’ चित्रटपटामध्ये त्यांनी कपूर घराण्याच्या तीन पिढ्यांची अफलातून नक्कल केली होती.
हे ही वाचा : सुपरहिट सिनेमांचा जादुगार – महेश कोठारे
‘ससुराल’, ‘दिल तेरा दिवाना’, ‘गोदान’, ‘हमराही’, ‘चित्रलेखा, ‘शबनम’, ‘काजल’, ‘वारीस’, ‘काला आदमी’, ‘रोड न.३०३’, ‘दिल एक मंदिर’, ‘बेटी बेटे’, ‘सांज और सवेरा’, ‘आकाश दीप’ अशा कितीतरी हिट सिनेमाची त्यांनी रांग लावली होती. मन्नाडेचा आवाज त्यांना सूट होत होता. त्यांच्यावर चित्रित कितीतरी गाणी रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. ‘अपनी उल्फत पे जमनेका न पहरा होता’ (ससुराल ), ‘वो दिन याद करो’ (हमराही), ‘प्यार की आग मैं तन बदन जल गया’ (जिद्दी), ‘हम काले है तो क्या हुआ’ (गुमनाम), ‘ओ मेरी मैना तू मानले मेरा कहना’(पत्थर के सनम), ‘तुझको रख्खे राम तुझको अल्ला रख्खे’ (आंखे), ‘चंदा ओ चंदा’ (लाखों मैं एक), ‘मुत्तकुडी कव्वाडी हडा’ (दो फूल).
’आय अॅम हायली अनएज्युकेटेड मॅन’ असं मेहमूद ताजमध्ये बसून पत्रकारांना म्हणाले होता. शाब्दिक अर्थाने जरी हे खरं असलं तरी त्यांचा विनोदबुध्दी जबरदस्त होती. हे मान्यच करावे लागेल. उत्तरार्धात मात्र त्यांचं ओंगळवाणं दर्शन त्यांच्या चाहत्यांनाही दुखावून जात होतं. काळ कुणासाठी थांबत नाही. मेहमूद हे हळू हळू विसरत होते. किशोरच्या निधनानंतर ते आतून कोसळले. हृद्याच्या दुखण्याने ते त्रस्त झाले. त्यांनी शेवटचा श्वास घेतला तो देखील अमेरिकेत वयाच्या ७१व्या वर्षी २३ जुलै २००४ ला!