‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
क्रेझ ट्रेलरची!
‘अशी असावी सासू’ (१९९७) या चित्रपटाच्या निमित्ताने जयश्री गडकर यांच्या भेटीचा योग आला असतानाची आठवण. जयश्री गडकर या चित्रपटाच्या नायिका होत्या आणि दिग्दर्शनही त्यांचेच होते. गप्पांच्या ओघात त्या म्हणाल्या, चित्रपटाचा ट्रेलर घेऊन बेळगावच्या एका थिएटरवर आम्ही गेलो (त्या व त्यांचे पती बाळ धुरी) आणि आम्ही थिएटर मालकाशी बोलणी करुन प्रोजेक्टर वाल्याकडून फक्त तीनच मिनिटे मागून घेतली. तेथे जितेंद्र आणि श्रीदेवीची भूमिका असलेला ‘तोहफा’ रिपीट रनला सुरु होता. गर्दीही चांगली होती. आणि काय सांगू? ट्रेलर सुरु होताच प्रेक्षकांचा मिळालेला अफाट प्रतिसाद थक्क करुन टाकणारा होता, जयश्री गडकर यांच्या बोलण्यात केवढा तरी आनंद होता. आपल्या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेला रिस्पॉन्स त्यांना भरपूर आनंद देणारा ठरला.
ही आठवण आताच सांगायचे कारण म्हणजे, प्रभू देवा दिग्दर्शित आणि सलमान खानचा (Salman Khan) जणू वन मॅन शो असलेल्या ‘राधे’ (Radhe) च्या ट्रेलरला सोशल मिडियात मिळालेला अफाट रिस्पॉन्स. सोशल मिडियात हा मसालेदार मनोरंजक असा ट्रेलर पोस्ट होताच, एका दिवसात त्याला जगभरातून बावीस मिलियन व्हीज्यू मिळाले (अबब म्हणावे इतक्या रसिकांनी तो पाह्यला) आणि १.२१ मिलियन लाईक्स मिळाले. त्यानंतरही हे आकडे वाढत राहिलेच. (हा ट्रेलर पाहूनच इतक्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाह्यचाच असे ठरवले आणि तसेच केले तरी पिक्चर हिट). यात काळासोबत झालेला बदलही दिसतोय. पूर्वी थिएटरमधील प्रेक्षकांना ट्रेलर म्हणजे पर्वणीच वाटे आता ओटीटी प्लॅटफॉर्मच्या युगात तोच ट्रेलर अतिशय वेगाने आपल्यापर्यंत येतोय. अगदी कुठेही बसल्या बसल्या पाहू शकतोय.
अस्सल चित्रपट रसिकांना आगामी चित्रपटाचा ट्रेलर का बघावासा वाटतो? तर नवीन चित्रपटात काय काय बरे पाह्यला मिळेल याची एक ‘झलक’ पाह्यची उत्सुकता असते. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटापासून ते कल्चर सुरु आहे. सिंगल स्क्रीन थिएटर्स, मग चॅनल, यू ट्यूब, ऑनलाईन असा त्याचा बदलता प्रवास असला आणि रसिकांची पिढी बदलत गेली असली तरी ‘कधी बरे ट्रेलर’ पाहतोय याची ओढ अजिबात कमी झालेली नाही हे आपल्या सिनेमावेड्या देशातील प्रेक्षक संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.
हा ट्रेलर (Movie Trailer) कसा असावा? उत्तर अगदी सोपं आहे. तो सिनेमा कधी बरे रिलीज होतोय नि आपण पाहतोय असं रसिकांना ट्रेलर पाहता पाहता व्हायला हवेच हवे. सगळेच ट्रेलर तसे का नसतात हा वेगळा विषय आहे. इतकेच नव्हे तर, ट्रेलरमधून सगळे कथानकही समजू नये. तेवढी दक्षता हवीच. साठ सत्तरच्या दशकात नवीन चित्रपटाचे ट्रेलर हे तो चित्रपट सेन्सॉर संमत झाल्यावर त्यावरुन केला जाई. तीच पध्दत होती. (आणि योग्यही होती). त्यात एकदा एस. रामनाथन दिग्दर्शित ‘सबसे बडा रुपय्या’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका संवादाला सेन्सॉरने हरकत घेतली. सिनेमा सेन्सॉर संमत होताना प्रसंगानुसार आलेला एक संवाद ट्रेलरमध्ये संदर्भहीन ठरला. त्या काळात मला आठवतयं, नवीन चित्रपट रिलीज व्हायच्या एक अथवा दोन आठवडे अगोदर ट्रेलर येई आणि तो ट्रेलर त्या चित्रपटाच्या प्रदर्शनास सज्ज असलेल्या थिएटरमध्येच दाखवला जाई. कधी कधी तर त्याच थिएटरमध्ये दाखवला जात असलेल्या अगोदरच्या चित्रपटाच्या वृत्तपत्रातील जाहिरातीत ‘अमूकतमूक नवीन चित्रपटाचा ट्रेलर पहा’ असे अगदी वर म्हटले जाई आणि फिल्म दीवाने त्या ट्रेलरसाठीही थिएटरमध्ये जात.
त्या काळात गल्ली चित्रपट हे एक धमाल कल्चर समाजात रुजले होते. त्यात हमखास एकाच वेळेस अनेक चित्रपटांचे ट्रेलर हमखास पाह्यला मिळत आणि आम्ही पोरं जोरदार टाळ्या शिट्ट्यानी दाद देत असू. गंमत म्हणजे, आराधना, जाॅनी मेरा नाम, रामपूर का लक्ष्मण अशा अनेक रंगीत चित्रपटांचे गल्ली चित्रपटात ट्रेलर मात्र ब्लॅक अॅण्ड व्हाईट असत तर त्यात एकाद्या मूळात ब्लॅक अॅण्ड व्हाईट मराठी चित्रपटाचा ट्रेलर पाह्यला मिळाला तर आणखीन उत्फूर्त दाद द्यायचो. इंग्रजी चित्रपट सव्वा दीड तासांचे असल्याने त्या काळात थिएटरमध्ये मध्यंतरापर्यंत अनेक इंग्रजी आणि हिंदी चित्रपटाचे ट्रेलर दाखवायची प्रथा असे आणि तो ट्रेण्ड माहित असल्याने ‘ट्रेलर चुकू नयेत म्हणून अनेक प्रेक्षक’ वेळेवर पोहचत.
कालांतराने, चॅनलच्या युगात ट्रेलर संस्कृतीत फरक पडत गेला. ते काळानुसार बदलणे होते. सुभाष घईने ‘खलनायक’ (Khal Nayak) (१९९३) च्या ट्रेलरमध्ये ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याचा मुखडा दर्शन (म्हणजे माधुरी दीक्षित नृत्य करतेय याचे अगदी जरासेच पण धक धक वाढवणारे नृत्य) करीत मग अंतरा कायम ठेवताना अन्य विविधरंगी दृश्ये दाखवली. तात्पर्य, सिनेमा रिलीज झाल्यावर पडदाभर चोली के पीछे क्या है पाह्यची उत्सुकता कायम राहावी. येथे दिग्दर्शकाची व्यावसायिकता दिसते म्हणायचं. ‘खलनायक’चा आणखीन एक मसालेदार मनोरंजक असाही ‘सुभाष घई टच’ ट्रेलर होताच. हे सगळे सुपर हिट ठरल्याने असाच ‘गाण्याच्या आड ट्रेलर’ असा ट्रेण्ड आला. सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ (१९९४) या ‘गीत संगीत व नृत्य या माध्यमातून’ पटकथा रचलेल्या चित्रपटाचे ट्रेलर असे होते. ट्रेलर हे साधे प्रकरण नाही हे अधोरेखित होतेय हो.
चॅनल युगात अशा काही ना काही नवीन गोष्टी येणे स्वाभाविकच. राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार है’ (Kaho Naa… Pyaar Hai) (२०००) ट्रेलरचा जणू धाकटा भाऊ टीझर आणला. त्यात फक्त आणि फक्त ह्रतिक रोशन आणि अमिषा पटेलची नृत्य स्टेप इतकेच दिसले आणि केवळ तेवढ्यानेही इम्प्रेस केले. अर्थात, आता टीझर आणि मग काही दिवसांनी ट्रेलर असे युग आले. मल्टीप्लेक्स कल्चरने एका चित्रपटाचे तीन चार ट्रेलर युग आणले. त्यातून ‘या चित्रपटात काय बरे आहे’ अधिकाधिक प्रमाणात दिसू लागले. अशातच म्युझिक चॅनेलवर या चित्रपटाची गाणी वारंवार पाह्यला मिळाल्याने अनेक नवीन चित्रपट थिएटरमध्ये पाह्यला गेल्यावर लक्षात येई की फक्त टायटल आणि क्लायमॅक्स तेवढा पाह्यचा राह्यला होता. कधी काळी ‘अवघ्या एका ट्रेलरने पडणारा इम्पॅक्ट’ आता तीन चार ट्रेलरनेही शक्य होईनासा झाला की काय? यू ट्यूबवर अनेक जुन्या चित्रपटांचे ट्रेलर अभ्यासायला हरकत नाही (चित्रपट अभ्यासात ट्रेलरचा धडा नक्कीच नसावा. खरं तर तो हवा, याचे कारण म्हणजे सिनेमा आणि प्रेक्षकांना जोडणारी ती मधली महत्वाची पायरी आहे).
आता नवीन चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीचा मुहूर्त मिडियाला ट्रेलर दाखवून जोडीने प्रश्नोत्तरे याने होऊ लागला. भरगच्च मिडियातून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत ट्रेलरमधील खासियत पोहचायला हवी याकडे दिग्दर्शकाचे लक्ष हवे. आजच्या ग्लोबल युगात आगामी चित्रपटाची पहिली ओळख या ट्रेलरने होते (फार पूर्वी रस्त्यावरच्या पोस्टरने होई) पण अनेकदा तरी काही चित्रपटांच्या ट्रेलरची अवस्था अतिपरिचयात अवज्ञासारखी होते. कोणताही नवा चित्रपट पाह्यला जावे तर तेच तेच ट्रेलर पुन्हा पुन्हा पाहावे लागत असल्याने काही वेळा प्रेक्षकांनी हुड आऊट केल्याची बातमी होते. फार पूर्वी, थिएटरवाले आवर्जून नवीन चित्रपटाचा ट्रेलर मागवून घेत आता हा ट्रेलर पब्लिसिटीचा एक भाग म्हणून निर्मात्याला तो दाखवण्याचे मोठी किंमत मोजावी लागते अशी कुजबुज आहे. इतकी सगळी वळणे घेत घेत रसिकांपर्यंत पोहचण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे, ऑनलाईन!
आजच्या युथचे आवडते माध्यम ऑनलाईन आहे, त्यानुसार तेथेच ट्रेलर लाॅन्च करणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य आहे. फरक इतकाच की पूर्वी थिएटरमध्ये ट्रेलरला टाळ्या शिट्ट्या वाजत, आता लाईक्स, काॅमेन्टस हमखासच मिळतात. कधी त्यात झोडपून काढलं जाते तेव्हा समजावे आपल्या चित्रपटाचे भवितव्य काय आहे. आता ट्रेलरसाठीही अनेक चित्रपटांना वेगळा दिग्दर्शक असतो. (मूळ दिग्दर्शकानेच ट्रेलर एडिट करुन घ्यावा. हीच परंपरा आहे.) त्याने रहस्यमय चित्रपटाचा सस्पेन्स ट्रेलरमध्ये उघड करु नये इतकीच अपेक्षा.
आज ट्रेलरची जागा टीझरचा मोठा भाऊ अशी आहे. नवीन चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीची सुरुवात आता टीझरने करुन चित्रपटसृष्टी, मिडिया आणि रसिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची सावध प्रवृत्ती वाढलीय. तेही बरोबरच आहे हो, प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचे पहिले पाऊल योग्य पडायला हवे. तेच आत्मविश्वास वाढवते. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’चा टीझर अगदी तस्साच आहे बघा. आता त्याच्या ट्रेलरमध्ये ‘चंद्रमुखी’ (कोण आणि) कशी दिसतेय याचे उत्तर मिळेल. अधूनमधून काही फिल्म दीवाने व्हाॅटसअपवर रमेश सिप्पी दिग्दर्शित सर्वकालीन सुपर हिट चित्रपट ‘शोले’ (१९७५) तसेच अन्य काही जुन्या चित्रपटाचे ट्रेलर शेअर करीत असतात, ही गोष्टही आपल्या चित्रपट रसिकांना सिनेमाइतकेच ट्रेलरला महत्व वाटतेय हे लक्षात येतेय.