‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
स्टारचे बंगले पाहण्याच्या क्रेझची(ही) पन्नाशी!
ह्यॅ…. अमिताभचा असो अथवा शाहरूखचा असो, यांचा बंगला बघण्याची कसले हो वेड? त्यापेक्षा त्यांचे काम बघा. आणि हे स्टारपण ग्रेटच आहेत, तेही आपल्या बंगल्यातून आपल्या फॅन्सना दर्शन घडवतात आणि पब्लिक वेडापिसा होतो…. छे, छे ही कसली सिनेमा संस्कृती अशी टवाळी/टिप्पणी/टीका अशा ‘ट’च्या बाराखडीत काही जण कोकलत असले तरी याच स्टार्सच्या साध्या बंगल्याचे दर्शन घेतले तरी ‘टवटवीत’ होणारे फिल्म दीवाने आहेत आणि विशेष म्हणजे ‘स्टारच्या बंगल्याचे दर्शन घेण्याच्या अगदी वेगळ्या कल्चरचीही चक्क पन्नाशी ‘ झाली आहे…..
आमच्या गिरगावातील ठाकूरव्दार नाक्यावरील सरस्वती भुवनमध्ये राहणारा राजेश खन्ना शक्ती सामंता दिग्दर्शित ‘आराधना ‘ (रिलीज ७ नोव्हेंबर १९६९) मुंबईतील मेन थिएटर राॅक्सीमध्ये ( तेही गिरगावातील) हाऊस फुल्ल गर्दीत चालू लागला आणि राजेश खन्नाने आपला मुक्काम वांद्र्याच्या समुद्रलगतच्या कार्टर रोडवरील बंगल्यात हलवताना त्याचे नाव आपल्या आईच्या सांगण्यावरून ‘आशीर्वाद ‘ असे केले, राजेंद्रकुमारकडून हा बंगला राजेश खन्नाने विकत घेतला तेव्हा त्याचे नाव ‘डिंपल’ असे होते. काही काळाने डिंपल कपाडिया याच बंगल्यात सून म्हणून आली तर राजेन्द्रकुमारने तेथून जवळच पाली हिलवर नवीन बंगला बांधून त्याचे नाव ‘डिंपल’ असे ठेवताना त्यात प्रशस्त मिनी थिएटरही बांधले. कालांतराने तेथे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या प्रिव्ह्यूना जाण्याचा योग आला….
राजेश खन्नाची अशी काही जबरा क्रेझ होती की त्याला पडद्यावर पुन्हा पुन्हा पाहण्यास त्याचे फॅन्स आतूर असतच, पण मग प्रत्यक्षातही तो ‘नुसता’ दिसला तरी ‘भाग्य लाभले’ असे होते. मग काय एक तर एकाद्या स्टुडिओबाहेर उभे रहा अथवा बंगल्याबाहेर. त्यात आशीर्वाद बंगला अतिशय हवेशीर परिसरात. समोर खळखळणारा समुद्र. आणि अगदी खारदांड्यापर्यंत गेलेला रस्ता. त्यामुळे आशीर्वादबाहेर उभे राहण्यात कंटाळा असा नाही. त्या काळात काॅलेज स्टुडन्स मोठ्या प्रमाणावर येथे तासन तास उभे राहत. राजेश खन्नाची गाडी बाहेर पडतेय अथवा येतेय याची वाट पाहण्यात एक वेगळाच आनंद मिळे. आणि यातूनही काही किस्से, गोष्टी जन्माला येणे स्वाभाविक होतेच. राजेश खन्नाची गाडी गेल्यावर उडणारी धूळ आपल्या कपाळी लावण्यात अनेक युवती आनंद मानत वगैरे बरेच काही. मी स्वतः माझ्या काॅलेज जीवनात माझ्या मित्रांसोबत आशीर्वाद बंगल्याबाहेर अनेकदा उभा राहिलोय. ते वयच तसे होते आणि राजेश खन्नाची क्रेझही तशी होती. ती काही वर्षांनी ओसरली तशी या बंगल्याबाहेरचे चाहतेही कमी कमी होत गेले. अरेरे…
मुंबईत अनेक फिल्म स्टार्सचे बंगले आहेत. (पूर्वी जास्त होते, जाॅनी वाॅकर, संगीतकार नौशाद इत्यादींचेही होते) पाली हिलवरच दिलीपकुमारचा तर जवळच सुनील दत्तचा अजंठा बंगला होता. तेथील मिनी थिएटरमध्ये अनेक हिंदी चित्रपटांची गाणी अथवा ट्रायल पाह्यचा योग आला. काही वर्षांपूर्वीच हा बंगला पाडला आणि संजय दत्तने मोठी वास्तू उभारली. ‘स्टारचे बंगले ‘ हा वेगळा रंजक आणि माहितीपूर्ण विषय आहे. तर अशाच काही फिल्म स्टार्सच्या बंगल्याबाहेर फॅन्सचा दांडगा उत्साह प्रत्यक्षात अनुभवावा असाच.
जुहूच्या दहाव्या रस्त्यावरील अमिताभचा ‘ प्रतिक्षा बंगला ‘ असाच वेगळा. बराच काळ तेथून जाणारे ‘हा अमिताभचा बंगला ‘ अशा भावनेने पहात. पण १९८२ साली बंगलोर येथे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या ‘कुली ‘च्या एका मारधाड दृश्यात पुनीत इस्सारचा ठोसा चुकवायच्या प्रयत्नात अमिताभच्या पोटात टेबलाचा कोपरा लागला आणि तो प्रचंड विव्हळला. तेथून त्याला मुंबईत आणले आणि मग तो ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत असताना देशभरात त्याला बरे वाटावे म्हणून सर्वच धर्मांत प्रार्थना झाल्या. तेव्हा बरे झाल्यावर त्याने प्रत्येक रविवारी प्रतिक्षा बंगल्याच्या एका खिडकीतून एक तास आपल्या चाहत्यांना दर्शन घडवणे सुरु केले आणि मग रविवारी संध्याकाळी येथे ट्रॅफिक जाम होऊ लागला. अमिताभ ‘जलसा ‘वर राह्यला आला आणि आता त्याने रविवारी संध्याकाळी दर्शन घडवणे हा जणू इव्हेन्टस होऊ लागला. देशविदेशातून मुंबईत येत असलेल्या असंख्य चित्रपट शौकिनांना ही जणू पर्वणीच ठरली. बीग बीदेखिल शुभेच्छा, भेटींचा स्वीकार करु लागला. ज्यांना शक्य त्यांना सेल्फी मिळू लागला. बीग बी हे सगळे एन्जाॅय करु लागला हे जास्त महत्वाचे आहे. अर्थात, सतत गर्दीदेखिल वाढतच राहिली. लाॅकडाऊनच्या काळात आपण असे दर्शन घडवू शकत नाही असे त्यानेच ट्वीट केले. याचीही ब्रेकिंग न्यूज झाली यावरुन ही ‘दर्शनाची प्रथा ‘ किती महत्वाची गोष्ट आहे हे लक्षात येते. आता हा मोठा इंटरव्हल होत चाललाय. काही काळाने हाच जोश आणि उत्साहात बीग बी पुन्हा आपल्या दर्शनाने चाहत्यांची “प्रतिक्षा” पूर्ण करणार.
‘मुंबई दर्शन ‘ची बस वांद्रे बॅण्ड स्टॅण्डकडे वळली की फिल्म दीवाने खुश होतात. सलमान खानचे घर आले रे आले की गाडी स्लो होते, गाईड काही बोलणार तोच गाडीत हंगामा होतो. ईद आणि वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान गॅलरीत येऊन उभा राहिला तरी गर्दी वाढत जाते. त्याची मुंबई आणि जयपूर कोर्टात केस असली की याच त्याच्या घराबाहेर तमाम चॅनलच्या गाड्या उभ्या राहणारच. जवळच शाहरूख खानचा ‘मन्नत ‘ बंगला. मुंबई दर्शनची बस तेथे पोहचण्यापूर्वीच लगबग सुरु होते. आणि मग चित्कार, आनंद वगैरे वगैरे बरेच. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तर दूरदूरवरून फॅन आणि मिडिया येतात आणि जणू जत्राच भरते. मीदेखिल तीनदा या त्याच्या वाढदिवसाचा अनुभव घेतला. स्वतःवर प्रचंड प्रेम असलेल्या शाहरूखला अशी गर्दी अथवा क्रेझ फार आवडते हे लपत नाही. याच क्षणातून ‘फॅन ‘ या चित्रपटाची निर्मिती झाली. ही काॅन्सेप्ट वेगळी होती. पण पटकथेत फसली.
…. गर्दीचा उत्साह टिपेला गेला की शाहरूख आपल्या बंगल्याच्या वरच्या बाजूला येऊन दर्शन देतोय तोच प्रचंड उत्साहाचे भरते येतेच. समोरच्या समुद्र किनारास हे सुसंगत असेच आहे. या बंगल्यात पूर्वी सिनेमाचे शूटिंग व्हायचे. दिग्दर्शक मेहुलकुमारने ‘ तिरंगा ‘साठी राजकुमार आणि नाना पाटेकर यांच्यावर येथेच ‘पी ले पी ले ‘ या गाण्याचे शूटिंग केले तेव्हा कव्हरेजसाठी आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून आमंत्रित केले होते. त्यामुळे या बंगल्यात जाणे झाले. तर करण जोहर दिग्दर्शित ‘माय नेम इज खान ‘च्या निमित्ताने येथेच आम्हा काही सिनेपत्रकाराना शाहरूखच्या मुलाखतीचे आयोजन केले तेव्हा थेट त्याच्या लायब्ररीत जायचा योग आला. हा अनुभव सुखद होता. पण मन्नतवर कधीही पहावे तर त्याचे आठ दहा चाहते बंगल्यासोबत सेल्फी काढताना दिसतात. क्रेझ क्रेझ क्रेझ म्हणतात ती हीच. ती फक्त ‘पडद्याभर आपल्या आवडत्या स्टारला पाहण्यापुरती ‘ राहत नाही, त्यांना त्या स्टारचा बंगला दिसला तरी प्रचंड आनंद होतो. आपल्याकडची सिनेमा वेडाची संस्कृती ही अशी इस्टमनकलर आहे. खुद्द शाहरूख दिसला नाही पण बंगला पाहूनही सुखावलेले पर्यटक ढिगाने सापडतील. आपल्या शहरात/गावात गेल्यावर यावरुन अनेक गोष्टी ते रंगवून खुलवून नक्कीच सांगत असतील. स्टारच्या बंगल्याचे साधे बाहेरुन दर्शन त्यांच्या ह्रदयावर कायमचे कोरले जाते. आपल्या सिनेमावेड्या देशात किती दूरवर आणि कशी स्टारची क्रेझ क्रेझ क्रेझ आहे बघा. राजेश खन्नाच्या बंगल्याबाहेर आपण उभे राहिल्याचे अनेकांना आयुष्यभर इतरांना सांगावंसं वाटलं यात बरेच काही येते. राजेश खन्नाच्या निधनानंतर हा बंगला पाडला असला तरी आजही ती वास्तू डोळ्यासमोर येते. त्या काळात वर्षातून फक्त एकदा राजेश खन्ना आपल्या बंगल्यावर मिडियाला झक्कास पार्टी देताना दिलदारपणे ‘स्काॅच ‘ पाजायचा.
मुंबईत धर्मेंद्र, शत्रूघ्न सिन्हा (दोघांचेही जुहू परिसरात), रेखा (वांद्र्याच्या या बंगल्याच्या सिक्युरिटी गार्डला कोरोना झाला आणि रेखाने तपासणीला नकार दिला ही गोष्ट ताजीच आहे) इत्यादी इत्यादी स्टारचे बंगले होते अथवा आहेत. राजकुमारचा वरळी सी फेसला बंगला होता आणि तेथून तो उघड्या जीपमधून स्टुडिओत येई. पण सिग्नलला त्याची गाडी थांबली असता कोणीही पुढे जात नसे, याचे कारण म्हणजे त्याची सनकी इमेज! उगाच काहीतरी फटकून बोलला तर, याची भीती. आणि त्याचा बंगलाही लांबूनच पाह्यला अथवा दाखवला जाई. ‘स्टारच्या बंगल्याचे बघे’ या गोष्टीत हा एक ट्वीस्ट. राज कपूर चेंबुरच्या आर. के. काॅटेजमध्ये राह्यचा, ते मुख्य रस्त्यापासून बरेच आत आ. दुर्दैवाने त्याच्या निधनाच्या वेळी तेथे कोण कोण अंतिम दर्शनासाठी आले याच्या रिपोर्टीगसाठी गेलो होतो. पूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत भजड ‘बंगला’ म्हणजे स्टेट सिम्बल असे. प्रतिष्ठा असे. आज अमिताभचे मुंबईत प्रतिक्षा, जलसा, जनक आणि वत्सा असे चार बंगले आहेत. तेवढी त्याची रुपेरी घोडदौड सुरू आहे. पण नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात त्याची भूमिका असलेले ‘सूर्यवंशम’, ‘कोहराम’, ‘लाल बादशाह’ हे चित्रपट दणकून फ्लाॅप होताच अमिताभही गोंधळला (हे चित्रपट हिट झाले असते तर जाणकार प्रेक्षकांवर चकीत व्हायची वेळ आली असती) आणि आपल्या बंगल्यातून निघून जवळच्याच यश चोप्रा यांच्या बंगल्यावर गेला आणि ‘पुन्हा एकदा आपण एकत्र काम करुया’ असे म्हणाला (या जोडीच्या चित्रपटाची नावे पुन्हा वेगळी सांगायला नकोत) आणि तेव्हा त्याला आदित्य चोप्रा दिग्दर्शित यशराज फिल्मच्या ‘मोहब्बते’ (२००१) या चित्रपटात भूमिका मिळाल्याचा किस्सा खूप गाजला…
यंदाच्या पावसात प्रतिक्षा बंगल्यातील एक ४३ वर्षे जुने झाड ( १९७६ पासून अमिताभ या बंगल्यात राहतोय) पडल्यावर अमिताभने अतिशय भावूक होत ब्लॉग लिहिला. अगदी छोटेसे हे झाड तेव्हा लावले आणि आम्हा बच्चन कुटुंबातील एक सदस्य असल्याप्रमाणे त्याची वाढ अनुभवली, त्यामुळे त्याचे पडणे खूप दुःखदायक आहे वगैरे वगैरे बरेच काही म्हणतच बीग बीनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या स्टार्सचे फॅन्स/भक्त/क्रेझी वगैरे वगैरे त्यांचे बंगले बाहेरून पाहण्यासाठी प्रचंड आतूर असतात, त्यांचे ते वेड आहे, पण खुद्द हे स्टार आपल्या ‘घराबाबत ‘ खूप भावूक असतात. आपल्या घरात ते हाडामासाचा आणि भावभावनांचा माणूस म्हणूनच तर जगत असतात…. अशा स्टारच्या बंगल्याच्या गोष्टी खूप जुन्या आणि अनेक. पण ते बंगले फॅन्सनी पहावेत या कल्चरचा रंग काही वेगळाच.