Kishore Kumar यांनी गायलेले गाणे काढून तिथे शब्बीर कुमारचे गाणे

आणीबाणी उठली आणि Dada Kondke यांनी आपल्या पिक्चरचे नाव ठेवले ‘रामराम गंगाराम’
आपल्या देशात आणीबाणी लागू झाली (२५ जून १९७५) याला पन्नास वर्ष पूर्ण झाली देखिल, याची विविध माध्यमांतून आपणास कल्पना आली आहेच. ती एकोणीस महिने होती. आणि त्यात रामदास फुटाणे निर्मित व डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’, जे. ओम प्रकाश निर्मित व गुलजार दिग्दर्शित ‘आंधी’, अमृत नाहटा दिग्दर्शित ‘किस्सा कुर्सी का’ अशा काही चित्रपटांवर बंदी आली. आणीबाणीत मनोरंजन क्षेत्राबाबत आणखीन काही गोष्टी घडल्या. आणखीन एक विशेष उल्लेखनीय गोष्ट घडली, त्यात एक चित्रपट होता ‘रामराम गंगाराम ‘.
हा दादा कोंडके स्टाईलचा द्वर्थी विनोद, हाफ ढगाळ पॅन्टमधील दादा कोंडके, ग्रामीण गोष्ट, गीत संगीत व नृत्याची धमाल असा हा पिक्चर असला तरी त्याची जन्मकथा’ अगदी वेगळी आहे. म्हणजे बी एक पेरले आणि पिक वेगळे काढावे लागले असं झालं. दादा कोंडकेंसोबत मुंबईतील आम्हा सिनेपत्रकारांचे गोवा, महाबळेश्वर, कोल्हापूर असे दौरे होत आणि आपण फक्त ऐकायचे कर्तव्य पार पाडावे लागे. भरपूर कच्चा माल, मसाला मिळे.

आजही तो पुन्हा पुन्हा शिजवून उपयोगी पडतोय आणि यापुढेही तो कधीही रंगवून खुलवून उपयोगी पडेल. दादा कोंडके हे सर्वकालीन चलनी नाणे आहे. दादांच्या चित्रपटांच्या सेटवर जाणे असो, त्यांच्या चित्रपटांतील गाण्याचे ध्वनिमुद्रण असो, त्यांच्या चित्रपटांचा प्रीमियर असो, त्याच चित्रपटाच्या यशाची पार्टी असो वा त्यांच्यासोबत फिरणे असो, आपण फक्त ऐकत राह्यचे हा माझा बाणा होता (पत्रकारीतेने असे बरेच काही मला दिले) त्याच गप्पांत दादांनीच सांगितलेला भन्नाट किस्सा.
================================
हे देखील वाचा: दादा कोंडके यांची हिंदीतील भन्नाट मुशाफिरी…
=================================
१९७५ सालातील ही गोष्ट आहे. भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लागू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून वीस सूत्री कार्यक्रम ठरवला होता. हा कार्यक्रम देशभरात लागू करायची सरकारची योजना होती. त्यानुसार पावले पडू लागली. राज्यातील ग्रामविकासमंत्री वसंतदादा पाटील यांनीहा २० कलमी कार्यक्रम राज्यात लागू करण्याचा धडाका लावला. अशातच वसंतदादांना आठवण आली दादा कोंडकेंची. त्यांनी दादा कोंडकेना सुचवले ह्या वीस कलमावर एक पिक्चर बनवा. दादा कोंडके स्टाईलमध्ये हा कार्यक्रम लोकांच्यात जास्त परिणामकारकरित्या पोहचेल, हा त्या मागचा हेतू. चित्रपट हे दूरवर पोहचलेले प्रभावी माध्यम आहे याचाही त्यामागे विचार असणारच.

दादा कोंडके अशा स्वरुपाचा चित्रपट निर्माण करण्यास तयार झाले. दादांचा ‘तुमचं आमचं जमलं'(१९७६) नुकताच रिलीज झाला होता आणि दादा नवीन चित्रपटाच्या तयारीत होतेच. एक चित्रपट सुपर हिट झाल्यावर मग पुढचा चित्रपट ही दादांची पध्दत होतीच. चित्रपट हा त्यांचा ध्यास होता. त्यात ही संधी मिळाली. राजेश मुजुमदार यांनी ‘सरकारी वीस कलमे ‘ गुंफणारी कथा- पटकथा- संवाद ‘ रचले. दादांनी अशोक सराफ, उषा चव्हाण, अशोक सराफ, धुमाळ, अंजना, रत्नमाला, मोहन कोठीवान, आशा पाटील, दीनानाथ टाकळकर, भगवान दादा, कुंदनकुमार अशी मराठीतील स्टारकास्ट घेऊन ‘गंगाराम वीस कलमे’ या नावाचा चित्रपट बनवला. त्याच्या गाण्याची तबकडीही मार्केटमध्ये आली. ही गाणी दादा कोंडके व राजेश मुजुमदार यांनी लिहिली होती आणि त्याला राम लक्ष्मण यांचे संगीत होते.
दादांच्या पिक्चरमधील गाणी हमखास हिट होत तशीच यातील आला महाराजा सोबत बेंडबाजा, माझ्या बकरीचा समद्यानी लागलाय लळा, गंगू तारुण्य तुझं बेफाम जसा इश्काचा ॲटमबाॅम्ब, मनात मन तुझ्या गुंतलय, गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला, नाकी डोळी छान रं ही गाणी पार गावागावात पोहचली देखिल, लाऊडस्पीकरवरुन सतत वाजू लागली आणि तोपर्यंत आणीबाणी उठली व लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला. आणि काॅन्ग्रेसचीही लोकप्रियता ओसरली. महाराष्ट्रात दुर्गाबाई भागवत, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधु दंडवते, मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार लढा उभा केला. याच फेऱ्यात दादा कोंडकेंचा ‘गंगाराम २० कलमे’ पिक्चर पुरता अडकला. पिक्चरचे नाव तसे भारी होते. पण आता सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थितीत फरक पडला होता.

आता लोक २० कलमी कार्यक्रमावर फारसं बोलत नव्हते. अशा बदलत्या वातावरणात चित्रपट प्रदर्शित झाला असता तर दुर्दैवाने दादांना अपयश आले असते. ते पचणारे नव्हते. परवडणारे नव्हते. दादांना काही सुचेना. आता ह्यातून नेमका काय मार्ग काढायचा असा विचार करत असताना त्यांना एक माणूस आठवला. तो माणूस म्हणजे पु. ल. देशपांडे. पु. ल.आणीबाणीविरोधी चळवळीत सक्रिय होते. शिवाय ते पूर्वी चित्रपट क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे त्यांना त्या क्षेत्राची जाण होती. दादा पिक्चरची स्क्रिप्ट घेऊन त्यांना भेटायला विलेपार्ले येथील घरी गेले. दादांनी त्यांना स्क्रिप्ट दिली आणि तुम्हीच मला मार्ग सुचवा सांगितले.
“हा पिक्चर रिलीज करण्यासाठी खूप बदल करावे लागतील. बरीच दृश्य नव्याने घ्यावी लागतील” पु. ल. म्हणाले.
दादांनी विचारलं “ह्यावर उपाय काय?”
पु. ल. स्पष्टपणे म्हणाले “पिक्चर टाकून द्यायचा. याचा काहीच उपयोग होणार नाही”.दादा निराश होऊन तिथून निघाले. पिक्चर डब्यात जाणार म्हणून ते हादरले. व्यावहारिक माणूस ना? निराश होणारच. सगळा पैसा, मेहनत पाण्यात जाणार होती. नवीन फिल्म बनवायचं धाडस पण शक्य नव्हतं. सतत गंगारामचा विषय डोक्यात फिरत होता. दादा तोपर्यंत चित्रपट निर्मितीत स्थिरावले होते. त्यांचा स्वतःचा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण झाला होता. मुंबई, पुण्यापासून पार अगदी खेड्यापाड्यातून दादा कोंडके यांच्या पिक्चर्सची उत्सुकता असे.

एक दिवस त्यांना एक भन्नाट आयडिया सुचली. कथानकाला त्यांनी एक वेगळं वळण द्यायचं ठरवलं. चित्रपटात बचत करा, दारूबंदी, नसबंदी असे चांगलेच विचार मांडले होते. तेच मुद्दे विरोधात वापरायचे असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी लागणारे छोटे-मोठे बदल त्यांनी केले. कोल्हापूरमध्ये जयप्रभा स्टुडिओत शूटिंगला सुरुवात केली. जोडीला राजेश मुजुमदार होतेच. आणि ऐनवेळी पंचेस घ्यायचा ‘विच्छा’पासूनचा अनुभव होताच. तसे ते स्मार्ट. कमालीचे हजरजबाबी. त्यांना ऑन दी स्पाॅट गोष्टी सुचत.
================================
हे देखील वाचा: दादा कोंडके यांचे दोन गुरु भालजी आणि बाळासाहेब!
=================================
दादांनी दाखवलं की गायीचं वासरू पैसे खातयं. काही शॉट नव्याने शूट केले. ह्या छोट्या छोट्या बदलांनी पिक्चरचा चेहरामोहराच बदलून गेला. ‘गंगाराम वीस कलमे पडद्याआड गेला’.आणि पिक्चरचे नाव ठेवले,’राम राम गंगाराम’. हा चित्रपट ११ मे १९७७ रोजी सेन्सॉर संमत झाला. त्यानंतर प्रथम पुणे शहरात, मग मुंबईत आणि मग त्या काळानुसार टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहचला आणि सुपरहिटही झाला. आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली असताना हीदेखील खास गोष्ट सांगायलाच हवी.