
Dada Kondke यांचे हिंदीतील पहिलेच पाऊल ज्युबिली हिट
चाळीस बेचाळीस वर्षांपूर्वीचा फिल्मी कट्ट्यावरचा एक संवाद…
दादा कोंडके हिंदी पिक्चर काढत आहेत म्हटलं…
हिंदी? मराठीत इतकं छान चाललय. “सोंगाड्या” पासून पाहतोय, त्यांचं (Dada Kondke) पिक्चर पहिल्याच खेळापासून हाऊसफुल्ल गर्दीत दणक्यात चालतं, ज्युबिली हिट होतेय, त्यांचा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण झालाय, त्यांच्या पिक्चरमध्ये दम नाही म्हणणारे पुन्हा पुन्हा थेटरात जात आहेत, मुंबई पुण्याचे काही चित्रपट समीक्षक (सगळे नाहीत. फक्त काही) दादांच्या पिक्चरमध्ये डबल मिनिंग असते अशी उठसूठ टीका करतात, तरी त्यांचे चित्रपट पब्लिक डोक्यावर घेत आहेत, ते सोडून ते हिंदीत जाऊन काय करणार? मराठीतील यशाची कमान हिंदीतही कायम ठेवणार.

एक मराठी माणूस, मराठी सिनेमावाला हिंदीतही आपला ठसा उमटवणार, हिंदीत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नावाचे खणखणीत चलनी नाणे आहे. हिंदीतील टाॅपच्या नायिका दादांसोबत काम करतील असे वाटते ? आणि हिंदी चित्रपटाची सिंगल स्क्रीन थिएटर्स दादांच्या चित्रपटांना मिळतील? ह्यॅ, सोडून द्या बाता. हिंदीत वितरकांची लाॅबी आहे, थिएटरवाल्यांची मक्तेदारी आहे. ते एका मराठी सिनेमावाल्याला हिंदीत खरंच घुसून देतील ? आणि हिंदी चित्रपट दिल्ली, पूर्व पंजाब, उत्तर प्रदेश, पूर्व बंगाल, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक असा सगळीकडेच प्रदर्शित करायचा असतो. दादांना तिकडे ओळखते कोण? त्यापेक्षा मराठी चित्रपट पडद्यावर आणत रहा आणि मुंबई, पुणे अशा शहरांपासून ते नातीपुती, सांगोला अशा तालुक्याच्या थिएटरपासून खेड्यापाड्यातील टूरिंग टाॅकीजपर्यंत पब्लिकला मनसोक्त मनमुराद हसवत रहा म्हणावं.
दादांच्या (Dada Kondke) चित्रपटांची वितरण व्यवस्था विजय कोंडके यशस्वीपणे सांभाळत आहेत. चित्रपट व्यावसायिकांची मक्का असलेल्या नाझ चित्रपटगृहाच्या इमारतीतील दादा व त्यांच्या कामाक्षी चित्र या वितरणचे प्रशस्त कार्यालयातील फोन सतत खणखणत असतो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सिंगल स्क्रीन थिएटर्सची आसन संख्या, तिकीट दर आणि आठवड्याचे कलेक्शन यांची माहिती त्यांच्या तोंडावर असते. ते दादांचा पहिला हिंदी चित्रपट देशातील अनेक चित्रपटगृहात नक्कीच पोहचवतील.

दादा कोंडके (Dada Kondke) म्हणजे “चर्चा तर होणारच !” आणि व्हायलाच हवी. अगदी सत्तरच्या दशकात मराठी वृत्तपत्रात शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक चित्रपट सदरापासून ते आजच्या डिजिटल मिडियापर्यंत दादा कोंडकेंबद्दल कायमच कुतूहल. याला स्टारडम म्हणतात. तो त्यांना मिळाला आणि त्यांच्या पश्चात तो टिकून आहे. (Entertainment mix masala)
एकिकडे अशी चर्चा होत असतानाच दादा कोंडके यांनी आपली मराठीतील हुकमी टीम घेऊन आपला पहिला हिंदी चित्रपट “तेरे मेरे बीच मे” या चित्रपटाचे शूटिंग सुरु केले. आपली हुकमी नायिका उषा चव्हाणलाच आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटाची नायिका केली. हिंदीतील मोठे नाव अमजद खान यालाही जोडीला घेतले. मूळ मराठीतील व काही हिंदीतील कलाकार घेतले. सगळ्यांचे लक्ष होते, मराठीत ज्या सहजतेने दादा (Dada Kondke) विनोदी पंच घेतात, आपल्या ग्रामीण शैलीत द्वर्थी संवादातून विनोद निर्मिती करतात आणि तशा दृश्याना सेन्सॉर कसे अडवते, त्यावर दादा कसे शाब्दिक खेळ करीत आपली दृश्ये सोडवून घेतात आणि या सगळ्यातून आपल्या चित्रपटासाठी कशी पूर्वप्रसिध्दी मिळवतात याकडे होते. सेन्सॉरने काही कटस सुचवणे दादांच्या चित्रपटासाठी नवीन नव्हतेच…त्याचे किस्से अनेक.

“तेरे मेरे बीच मे” ला मराठी प्रसार माध्यमातून भरघोस पूर्वप्रसिध्दी मिळत असतानाच देशाच्या विविध शहरांतून हिंदी व इंग्लिश मीडियातून भरपूर कव्हरेज मिळाले. एका प्रादेशिक भाषेतील चित्रपटातील सुपर स्टार आता अन्यभाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहचत होता. बरं दादा (Dada Kondke) म्हणजे रुपेरी पडद्यावरील भोळेपण. नाडी लोंबकळणारी हाफ पॅन्ट, ग्रामीण रुपडं आणि भाबडे बोल याचे मिश्रण. असा “हीरो” ही कल्पना मराठीत लोकप्रिय ठरली पण अन्य भागातील प्रेक्षकांसमोर ती आता जात होती. दादांच्या मनोरंजनाची जातकुळी अगदीच वेगळी. सामान्य माणसाला आपलीशी वाटणारी. ती अन्यभाषिक प्रेक्षकांना आपलीशी वाटू शकते.
==================
हे देखील वाचा : म्हणून Divya Bharti अस्खलित मराठी बोलायच्या…
==================
मुंबईत हा चित्रपट ६ एप्रिल १९८४ रोजी प्रदर्शित झाला. मेन थिएटर इंपिरियल. म्हणजेच चाळीस वर्ष झालीदेखील. देशातील विविध भागातही तेरे मेरे बीच मे प्रदर्शित होत होत गेला. त्याला कमीअधिक यशही मिळत राहिले. हैदराबाद शहरात अतिशय उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. तो असा व इतका होता की तेथे चक्क रौप्य महोत्सवी यश संपादले. एका महाराष्ट्रीय कलाकाराचे हे स्वबळावरचे उल्लेखनीय यश. दादांनी निर्णय घेतला, आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे यश हैदराबादला सेलिब्रेट करायचे आणि त्यासाठी मुंबईतील आपल्या सिनेपत्रकार मित्रांना न्यायचे.
मला आठवतंय दादांनी आम्हा सिनेपत्रकारांना आवर्जून हैदराबादला नेले. चाळीस वर्षांपूर्वी हैदराबाद काहीसं लांब होते. महत्वाचे म्हणजे तेलगूभाषिक हैदराबादमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील या “दादा माणसा” ने (Dada Kondke) अतिशय ऐटीत रौप्य महोत्सव साजरा केला. तोदेखील हैदराबादमधील सर्वोत्तम अशा बंजारा हाॅटेलमध्ये.

दादा कोंडके (Dada Kondke) यांनी त्यानंतर मराठीतील आपली यशस्वी घौडदौड कायम असतानाच हिंदीत आगे की सोच, अंधेरी रात मे दिया तेरे हाथ मे, खोल दे मेरी जुबान अशा आणखीन चित्रपटांची निर्मिती करीत सातत्य कायम ठेवले. सगळेच चित्रपट आपल्याच मराठी चित्रपटांची हिंदीत रिमेक. विशेष उल्लेखनीय गोष्ट, व्हिडिओ कॅसेट युगात (आणि त्यातही आजच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला चित्रपट आजच संध्याकाळी चोरट्या मार्गाने व्हिडिओ कॅसेटवर येत असतानाच) दादा कोंडके हिंदीत यशस्वी ठरले. त्याच सुमारास भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता आणि तेथे एका परगण्यावरुन दुसरीकडे बसने जायचा योग आल्यावर एकदा व्हिडिओ कोचमध्ये दादा कोंडके यांचा हिंदी चित्रपट दाखविण्यात येत असताना अख्खा संघ भरभरुन हसत होता असे सुनील गावस्कर यांनी आपल्या सदरात लिहिले होते हे मला चांगलेच आठवतेय. दादा कोंडके यांना हे एक प्रकारचे प्रमाणपत्रच.
दादा कोंडके (Dada Kondke) यांची हिंदीतील वाटचाल एक वेगळीच गोष्ट. त्यावरचा हा फोकस. अंधेरी रात मे… हा चित्रपट मात्र वाह्यात होता हे सांगायला काय हरकत आहे? मराठीतून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलेले अनेक दिग्दर्शक अवघ्या एक दोन चित्रपटांतूनच मराठीत परतले, त्या तुलनेत दादांनी चार हिंदी चित्रपट दिग्दर्शित केले हे एक प्रकारचे यशच.