‘जेम्स बॉण्ड’ पुन्हा येतोय…
जगभरातल्या गुप्तहेरांचा बाप अशी ओळख असलेला ‘जेम्स बॉण्ड’ पुन्हा येतोय. जेम्स बॉण्ड सिरीजमधला 25 वा चित्रपट ‘नो टाइम टू’ डाय हा नोव्हेबंरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. डेनियल क्रेग यांनी जेम्सच्या रुपात जे ॲक्शन सीन दिले आहेत, ते बघून या संपूर्ण चित्रपटाची कल्पना येतेच. त्यामुळेच बॉण्डच्या चाहत्यांनी ‘नो टाइम टू डाय’च्या ट्रेलरवर लाखो लाईकचा पाऊस पाडला आहे.
एप्रिलमध्ये ‘नो टाइम टू डाय’ प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा फटका जेम्स बॉण्डलाही सहन करावा लागला. चित्रपट लांबल्यानं जेम्स बॉण्डच्या चाहत्यांची निराशा टाळण्यासाठी आता त्याचे ट्रेलर रिलीज करण्यात येत आहेत. आतापर्यंत दोन ट्रेलर रिलीज झाले असून त्यामधले ॲक्शन सिन बघून पन्नाशी ओलांडलेल्या डेनियल क्रेगचे कौतुक होत आहे. पाचवेळा क्रेग जेम्स बॉण्डच्या रुपात पडद्यावर आला आहे. पहिल्यांदा त्याच्या निवडीवर टिका झाली असली, तरी या अभिनेत्यानं जेम्स बॉण्डचा चेहरा म्हणून नाव मिळवलं आहे. ‘नो टाइम टू डाय’ची कथा बघितली की त्याची निवड योग्यच असल्याचे जाणवते.
या नव्या बॉण्डपटात बॉण्ड निवृत्त झाल्याचे दाखवण्यात आले आहे. जमैकामध्ये बॉण्ड निवृत्तीचे आयुष्य घालवत असतांना त्याचा जुना मित्र जेफरी राईट त्याच्याकडे मदत मागायला येतो. काही वैज्ञानिकाचे अपहरण झालेले आहे. त्यांची सुटका बॉण्डचं करु शकतो हा जेफरीचा विश्वास आहे. मग बॉण्ड या नव्या मिशनवर रुजू होतो. तिथे त्याची गाठ पडते ती एका मुखवटाधारी व्हिलनबरोबर आणि मग सुरू होतो जबरदस्त ॲक्शनचा पाऊस.
प्रदर्शनासाठी सहा महिने उशीर झालेल्या या चित्रपटात एना डे अरामास आणि लाश्ना लिंच सीआईए ऑफीसर म्हणून आपल्या समोर येतील. गेल्या 58 वर्षातील ‘नो टाइम टू डाय’ हा २५वा बॉण्डपट असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोजी फुकुनागा यांनी केले आहे. चित्रपटात लाया सेडॉक्स, बेन व्हिसॉ, नॉमी हॅरिस, जेफ्री राइट, क्रिस्टॉफ वॉल्ट्झ, रोरी किन्नेर आणि राल्फ फिनेस यांच्या भूमिका आहेत.या चित्रपटाचे चित्रिकरण इटली, जमैका, नॉर्वे आणि लंडन आणि फॅरो बेटांवर झाले आहे. चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान डॅनियल क्रेगला जमैकामध्ये पायाच्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे चित्रपटाचे शेड्यूल थोडं पुढे ढकलण्यात आलं. त्यातच या चित्रपटाचा सेट असलेल्या पाइनवुड स्टुडिओमध्ये एक स्फोट झाला. त्यात चित्रपटाच्या सेटचे खूप नुकसान झाले. त्याचाही फटका चित्रपटाच्या नियोजनावर झाला.
बॉण्डपटासाठी प्रथम डॅन रोमरला चित्रपटाच्या स्कोअरसाठी संगीतकार म्हणून घोषित केले होते. पण त्यांनी काही कारणांनी हा चित्रपट सोडल्यावर हंस झिमर यांची निवड करण्यात आली. जेम्स बॉण्ड चित्रपटाच्या सिरीजमध्ये प्रथमच पोस्ट-प्रॉडक्शन दरम्यान संगीतकार बदलण्यात आला.
‘नो टाइम टू डाय’च्या ट्रेलरवर लाईकचा वर्षाव होतोय. चित्रपटाचा पहिला ट्रेलर १० भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु दुसरा ट्रेलर मात्र केवळ इंग्रजीमध्येच प्रदर्शित झाला आहे. बॉण्ड सीरिजमधील हा डॅनियल क्रेगचा शेवटचा चित्रपट आहे. कॅसिनो रॉयल या चित्रपटापासून क्रेग जेम्स बॉण्ड म्हणून पडद्यावर आला. त्याआधी पियर्स ब्रॉस्नन जेम्स बाँडची भूमिका करीत असे.
जेम्स बॉण्ड झाल्यावर क्रेगकडे यश आणि पुरस्कार यांची गर्दी झाली. क्रेगने द गोल्डन कम्पास, डेफिअन्स, वेस्टर्न काउबॉय अँड एलियन्स, द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू, लोगन लकी, नाईफ्स आउट यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता शेवटच्या बॉण्डपटाच्या ट्रेलरमध्ये क्रेगच्या ॲक्शनमुळे चाहते चित्रपट पहाण्यासाठी उत्सुक आहेत. पण त्यासाठी प्रेक्षकांना नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे.