१० वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या या अभिनेत्याबद्दल माहिती आहे का तुम्हाला?
हॅरी पॉटर या चित्रपटामधून पुढे आलेल्या डॅनियल रॅडक्लिपचा 23 जुलै रोजी वाढदिवस. वयाच्या अकराव्या वर्षी हॉलिवूडमध्ये आलेला डॅनियल आता 31 वर्षाचा होतोय. बालकलाकार म्हणून आलेला डॅनियल आता सर्वाधिक मानधन घेणारा स्टार म्हणून ओळख मिळवून आहे…
राजकुमार…..
हॅरी पॉटर हे नाव जरी ऐकले तरी समोर एक चेहरा येतो… तो म्हणजे डॅनियल रॅडक्लिफ याचा…. अवघ्या अकरा वर्षाचा असतांना डॅनियल, हॅरी पॉटर म्हणून पडद्यावर झळकला. त्यानंतर पुढची दहा वर्ष डॅनियल हॅरी पॉटरच्या भूमिकेत होता. या भूमिकेनं डॅनियलला प्रसिद्धी, पैसा आणि नाव दिलं. आज वयाची तीशी ओलंडणा-या डॅनियलने त्याच्या वयाऐवढेच चित्रपट केले आहेत. फोर्ब्स मासिकमध्ये सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत झळकलेला हा डॅनियल वाढत्या वयाबरोबर अधिक परिपक्व होत आहे. त्याच्या अगदी काही महिन्यापूर्वी झळकलेल्या एस्केप फ्रॉम प्रिटोरीयामध्ये त्याचा नवा लूक आणि अभिनय, दोन्हीही कौतुकाचा विषय झाले.
डॅनियल हा लंडनचा… वयाच्या पाचव्या वर्षापासून त्याला रंगमंचाची गोडी लागली. शाळेत अभ्यासात फार हुशार नसला तरी नाटकांमध्ये तो भाग घ्यायचा. वयाच्या दहाव्या वर्षी बीबीसी डेव्हिड कॉपरफिल्ड या चित्रपटामधून तो पडद्यावर झळकला. त्यानंतर द टेलर ऑफ पनामा हा चित्रपट केला. याचवेळी जे. के. रोलींग हिच्या हॅरी पॉटर या जादुई पुस्तकावरील चित्रपटाची तयारी होत होती. त्यासाठी 10 ते 15 या वयोगटातील मुलांच्या ऑडीशन सुरु होत्या. डॅनियल या ऑडीशनला गेला आणि लगेच निवडलाही गेला. त्याचा गोल चेहरा आणि त्यावरचा चष्मा थेट पुस्तकात वर्णन केलेल्या हॅरीसारखाच होता. पण त्याच्या आईनं प्रथम या चित्रपटाला नकार दिला. कारण हॅरी पॉटरचे दोन भाग येणार असं त्यांना सांगण्यात आलं होतं. दोन चित्रपटात काम करणं डॅनियलला जमणार नाही, असा हिशोब करुन त्याच्या आईनं चक्क नकार दिला. पण नंतर त्यांची समजूत काढण्यात आली. आणि डॅनियलनं रेकॉर्ड केला. त्याच्या रुपानं एक परिपक्व बालकलाकार हॉलिवूडला मिळाला.
पुढच्या दहा वर्षात हॅरी पॉर्टरचे आठ भाग आले. एमा वॉटसन, रूपर्ट ग्रिंट, बॉनी राइट, रिचर्ड हॅरिस, मॅगी स्मिथ या कलाकारांसह डॅनियलनं या चित्रपटांना अक्षरशः जिवंत केलं. आपल्या आसपासच या घटना घडत आहेत इतका सजग चित्रपट… अर्थात यात रोलींगबाईंचं योगदान मोठं होतं. पण बोलक्या डोळ्याच्या डॅनियलनं जो हॅरी केला त्याला तोड नाही. या चित्रपटाला ऑस्कर नॉमिनेशन मिळालं. दहा वर्षाचा डॅनियल रेड कार्पेटवर आला तेव्हा फोटोग्राफरच्या प्लॅशचा लखलखाट थांबत नव्हता. तो आणि त्याचे चित्रपटातले छोटे सवंगडी ज्या आत्मविश्वासाने पत्रकारांना सामोरं गेले… त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्यावरुनही अनेक बातम्या झाल्या. डॅनियल पुढच्या दहा वर्षात सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता ठरला. फोर्ब्स मासिकानंही त्याची दखल घेतली.
अनेकवेळा बालकलाकार म्हणून चित्रपटात आलेले कलाकार नंतर काळाच्या ओघात मागे पडतात. पण डॅनियल त्याबाबतीत सुदैवी ठरलाय. याला मुख्य कारण म्हणजे डॅनियलचा अभिनय. अकराव्या वर्षी हॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून आलेला डॅनियल हॅरी पोर्टरच्या शेवटच्या चित्रपटात एकवीस वर्षाचा झाला…. त्यावेळी तो अधिक परिपक्व अभिनेता म्हणून समोर आला. त्याच्या फॅनफॉलोवरमध्ये आता तरुणांची… विशेषतः तरुणींची जास्त भर पडली होती. बालकलाकार ते चॉकलेट हिरो अशी त्याची इमेज झाली.
हॅरी पॉटर चित्रपटाच्या मालिकांमुळे आणि त्यानंतर आलेल्या प्रसिद्धीमुळे डॅनियला शाळा सोडावी लागली. पण त्यानं शाळाबाह्य शिक्षणाचा लाभ घेतला. पुढे मान्यवर विद्यापीठातून पदवी संपादन केली. हॅरी पॉटरच्या यशानंतर त्याच्याकडे हॉलिवूडपटांची रांग लागली. त्यात भयपटांची आणि सायन्स फ्रिक्शन चित्रपटांची संख्या अधिक होती. डॅनियलने वकील आर्थर किप्प्सची भूमिका असलेला दि वूमन इन ब्लॅक हा भयपट केला. किल योर डार्लिंग्ज, स्विस आर्मी मॅन, नाऊ थ्री, नाऊ यू सी मी 2, थ्रिलर इम्पीरियम, व्हिक्टर फ्रँकेंस्टीन, अॅनिमेटेड, गन्स अकिंबो, एस्केप फ्रॉम प्रिटोरिया अशा चित्रपटात आपल्याला डॅनियल पहायला मिळाला. हे सर्व चित्रपट सायन्स फिक्शन हॉरर, अॅक्शन कॉमेडी स्वरुपाचे होते.
आता वयाच्या एकतीसाव्या वर्षी डॅनियलच्या खात्यात एम्पायर अवॉर्ड, गोल्डन ॲपल अवॉर्ड, एमटीव्ही अवॉर्ड, युके नॅशनल फिल्म अवॉर्ड, युएसए पिपल चॉईस अवॉर्ड असे अनेक पुरस्कार जमा आहेत. आणि त्याची संपत्ती किती… याबाबत तर विचारुच नये… इंग्लडचा सर्वात श्रीमंत तरुण म्हणून त्याचा उल्लेख होतो. फोर्ब्सच्या मोस्ट व्हॅल्यूएबल यंग स्टार या यादीमध्ये डॅनियल प्रथम क्रमांकावर होता. हॉलीवूडच्या सर्वाधिक कमाई करणा-या कलाकारांच्या यादीमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे.
हॅरी पॉटर ही डॅनियलची ओळख आहे. हॅरीच्या भूमिकेतून आपण स्वतःला कधीही वेगळं करु शकणार नाही ही गोष्ट तो नेहमी कबूल करतो. डॅनियलकडे हॉलिवूडच्या मान्यवर दिग्दर्शकांचे प्रोजेक्ट आहेत. त्यातील बहुतांशी हे भयपट आणि ॲक्शनपट आहेत. परीराज्यातला राजकुमार अशी ओळख असणारा डॅनियलला आता एका प्रेमकथेमध्ये काम करायचे आहे. तशा गोडगोड स्टोरीची तो वाट पहातोय… त्याच्या वाढदिवसानिमित्त ही त्याची इच्छा लवकर पूर्ण होवो हिच सदिच्छा…