लाडाची मी लेक गं…
मुलीचा नेहमीच आईपेक्षा वडिलांवर जास्त जीव असतो अगदी त्याचप्रमाणे मुली वडिलांच्या लाडक्या असतात हे त्रिवार सत्य आहे आणि याला मालिकेतील मुलगी वडिलांची जोडी अपवाद नाही. मालिका विश्वात देखील लेक आणि बापाचं अगदी घट्ट प्रेमाचं नातं साकारतांना कलाकार दिसत आहेत. मालिकेतील संवाद आणि अनेक प्रसंगामधून या नात्याची जवळीक अधोरेखीत होत आहे. कोणकोणत्या मालिकात आहे ही बाप लेकीची सॉलिड टीम जरा नजर टाकूया.
‘झी मराठी’ वरील ‘माझा होशील ना‘ या मालिकेत शशिकांत उर्फ बब्या बिराजदार कितीही लफडेबाज असला तरीसुद्धा आपल्या लेकीच्या बाबतीत मात्र तो हळवा बाप आहे… तिच्या लग्न सोहळ्याच्या वेळी त्यांना अटक झालेली असताना देखील आदित्य या बाप लेकीची भेट घडवून आणतो. त्या वेळी आपल्या लेकीच्या आयुष्यात आलेल्या सुखाने सुखावलेला बाप अतिशय उत्तम प्रकारे लेखकाने कथानकातून रंगवला आहे.
‘स्टार प्रवाह’ वरील ‘आई कुठे काय करते’ मधील इशू तर अनिरुद्धचा जीव की प्राण आहे. अरुंधती पासून वेगळं होऊन तो संजनासोबत राहत असला तरीसुद्धा त्याला नेहमीच आपल्या लाडक्या लेकीची काळजी लागून राहिलेली असते. आता तर आई बाबा एकत्र राहत नाहीत या रागाने इशा जीव द्यायचा प्रयत्न करते… कारण तिला दोघांच प्रेम हवय.. आता आपल्या लेकीसाठी अनिरुद्ध परत घरी राहायला येणार का? या प्रश्नाच उत्तर मालिकेला रंजक वळणावर घेऊन जाईल.
‘झी मराठी’ वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील स्वीटू आणि दादांची जोडी अशीच एक हळवी जोडी म्हणावी लागेल. स्वीटूच्या लठ्ठपणावरून आई तिला बोल लावते तिच खाणंपिणं कमी करते. पण आपल्या लेकीचं हिरमुसलेलं मन दादा म्हणजे स्वीटू चे बाबा ओळखतात आणि तिला घराबाहेर शेजारी घेऊन समजावतात. आधार देतात. तिच्या लग्नाचा निर्णय तिने स्वतः घ्यावा असं ते तिला सांगतात… यातील संवादातून बापाचं हळवं मन, लेकीचं वडिलांवरच प्रेम चित्रित होताना दिसतंय.
‘कलर्स मराठी’ वरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतील शर्वरी आणि बाबा तर एकदम भारी आणि वेगळे आहेत.. कारण या बाप लेकी मध्ये मैत्रीचं नातं आहे. शरूला बाबा एकदम बेस्ट फ्रेंड वाटतो. एखाद्या मित्रा सारखी ती बाबाशी मोकळेपणाने वागते. बापाचा धाक वाटण्यापेक्षा तिला तो आपला शेअरिंग, गॉसीप पार्टनर वाटतो. शंतनूच्या बाबतीत शरूच्या आईची मतं विरूद्ध टोकाची असताना हा बेस्ट फ्रेंड बाबा तिच्या बाजूने कसा उभा राहून तिला मदत करेल हे जाणून घेण्यासाठी मात्र नक्कीच मालिका पाहायला हवी.
अशाप्रकारे मुलीसाठी बाबा हा खरा हिरो असतो आणि मुलगी त्याची लाडाची लेक असते हे रिअल लाईफ चित्र मालिकेतूनही प्रतिबिंबित होतंय आणि आता मालिका विश्वात बाप लेकीची जोडी हिट होतेय यात शंका नाही.
-सिध्दी सुभाष कदम