आपल्याला श्रद्धांजली वाहता येते का?
लता मंगेशकर गेल्यानंतर त्यांनी मानवी मनावर घडवलेल्या संस्कारांचा साक्षात्कार मला कसा झाला हे मी गेल्या लेखात लिहिलं होतं. पण आता आणखी एक नवा साक्षात्कार मला याक्षणी झालेला आहे, तो असा की, लता दिदींसारख्या प्रतिभावंतांनी मरण्यापूर्वी सामाजिक मृत्यूपत्र करायला हवं. कारण, अलिकडच्या सोशल मीडियाच्या जमान्यात आणि राजकारणाने बरबटलेल्या मानसिकतेत आपला समाज माणसांना शांतपणे ना मरू देत आणि ती व्यक्ती गेल्यानंतर ना त्या दु:खात आपल्याला काही तास राहू दिलं जातं. खरंतर, हे वाचताना मी तिरकस टोमणे मारतोय की काय, असं वाटेल एखाद्याला. पण काय करणार, वास्तव तर असंच आहे.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर खरंतर प्रदीर्घ विमनस्क शांतता यायला हवी होती. राज्य सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला होताच. पण तो दुखवटा उरला का? नाहीच!
दिदींच्या जाण्यानंतर सतत काही ना काहीतरी नवं येऊन मनावर आणि बुद्धीवर आदळत होतं. लता दिदी गेल्या आणि गेल्यानंतर लगेच नवं काय येऊन आदळलं? यात तीन महत्वाच्या गोष्टी होत्या.
पहिली गोष्ट, लता दिदी गेल्या गेल्या व्हायरल झाल्या त्या त्यांच्या रुग्णालयातल्या काही क्लिप्स.
दुसरी गोष्ट, लता दिदींच्या अंत्यसंस्करावेळी दर्शन घेण्यासाठी शाहरूख खान आणि त्याची सहाय्यक पूजा दादलानी पुढे आली आणि चर्चेला नवं उधाण आलं. शिवाय त्याचवेळी सुप्रिया सुळे कशा शरद पवारांना चपला घालतायत त्याच्याही बातम्या झाल्या.
तिसरी गोष्ट, दिदी जाऊन दोन दिवसही उलटत नाहीत तोवर त्यांच्या शिवतीर्थावरच्या स्मारकाची मागणी पुढे आली.
आपल्या एकूणच बौद्धिक दिवाळखोरीने किती अचाट पातळी गाठली आहे याची एकूण कल्पना सज्जनांना येऊ शकते. मला याची पूर्ण खात्री आहे की, हा सगळा प्रकार केवळ सोशल मीडियावर घडलेला आहे. खरंतर प्रत्येक सामान्यजन दिदी जाण्याच्या दु:खात बुडालेला असताना सोशल मीडियावरून ही गरळ जनसामान्यांच्या माथी मारली गेली. त्यातून हे वातावरण अधिक गढूळ झालं आहे.
लता मंगेशकरांचे अलिकडचे रुग्णालयातले व्हिडिओ व्हायरल होणं, ही तर त्या रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांची विकृती आहेच. पण त्याही पलिकडे, ब्रीच कॅंडीसारख्या रूग्णालयालाही त्याची जबाबदारी घ्यावी वाटत नाही. लता दिदी गेल्यानंतर त्यांच्या दिमतीला असलेल्या १० -१२ जणांच्या स्टाफचे फोटो पेपरमध्ये छापून आले. त्यांनी केलेल्या सुश्रुतेबद्दल शंका नाहीच. पण, मग या व्हिडिओबद्दल अक्षम्य दिरंगाई झालीच कशी त्याची चौकशीही व्हायला हवी. भारतरत्न मिळालेल्या अशा अद्वितीय व्यक्तीचे असे व्हिडिओ व्हायरल होणं, हा त्या रत्नाचा अवमान नव्हे काय? असो आपल्याला काय पडलंय.
दुसरी बाब, शाहरूख खान लता दिदींच्या पार्थिवावर थूंकला, अशा आशयाच्या पोस्ट्स सोशल मीडियावर आल्या. शाहरूख असं करणार नाहीच, असं म्हणणाऱ्यातही दोन प्रवाह होते. एक, असा की शाहरूख असं करणार नाही. आणि दुसरा असा की, शाहरूख इतक्या मीडियासमोर जाऊन असं कसं वागेल? यात दुसऱ्या तर्कात मीडिया नसता, तर कदाचित शाहरूख असं वागला असता, अशा शक्यतेची अदृश्य पुडीही सोडून देण्यात धन्यता मानण्यात आली.
गंमत अशी की, हे सगळं सोशल मीडियावरच चालू आहे. अहो, तो शाहरूख खान आहे. तो फार मोठा स्टार आहे. त्याच्यावर लोकांनी अपार प्रेम केलं आहे. तो असा कसा करेल? हां, त्याचवेळी त्यानं तिथे काय केलं, हा प्रश्न पडूच शकतो. तो प्रश्न विचारला जावा. त्याचं उत्तरही अनेक अनुभवी मंडळींनी सोशल मिडियावर दिलं. पण ती उत्तरं वा ते समजून घेण्याइतकी वेळ आपल्याकडे कुठे आहे?
एखादी आपल्याला सनसनाटी वाटेल अशी बातमी आपल्यापर्यंत पोचली की, एखाद्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या पत्रकारापेक्षाही घाई आपल्याला असते. पुढचं पुढं असं म्हणत आपण ते शेअर करून मोकळे होतो.
तिकडे अंत्यसंस्कारांवेळी शरद पवार बसले असताना सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पायात चप्पल सरकवली. भारतीय संस्कृतीत यात नाविन्य नाहीच. कोणत्याही वृद्ध पालकांना चप्पल सहज घालता येत नसेल, तर तिथे त्यांचा पाल्य पटकन पुढे येतोच. एक नक्की की, सुप्रिया सुळे या खासदार आहेत. त्यांनी संकोच न बाळगता पुढे होणं नोटिसेबल आहे. पण ती बातमी होत नाही. अर्थात, आपल्याला सध्या फक्त प्रचार करायचा असेल तर त्याला कुणाचा काय इलाज असणार? अर्थात, यावर आता आपला ताबा उरलेला नाही.
====
हे देखील वाचा: आनंदघन – लता मंगेशकर यांची अविस्मरणीय आठवण
====
तिसरी महत्वाची गोष्ट स्मारकाची. लता दिदींचं स्मारक करायला हवं हे खरंच. पण त्याची मागणी करताना त्याचा पूर्ण विचार बोलून दाखवायला हवा. स्मारक हवं. कुठं तर शिवतीर्थावर. मुळात शिवाजी पार्क हे मोठं मैदान आहे. तिथं स्मारक होऊ शकेल का? किंवा करायचंच असेल तर ते कसं असायला हवं? की फक्त पुतळे उभारण्यात आपण धन्यता मानणार आहोत?
यासंदर्भात कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी फार महत्वाचा विचार मांडला आहे. लता दिदींचं स्मारक कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत होऊ शकेल. दिदींचा कोल्हापूरशी स्नेह होताच. जयप्रभाला तशी मोठी व्हॅल्यूही आहेच. पण तिथेही काय स्मारक कसं करायला हवं, त्याचा विचार व्हायला हवा. त्या व्यक्तिमत्वाच्या उत्तुंग उंचीप्रमाणे स्मारकाचा व्यास हवा, हे आपल्या लक्षात कधी येणार आहे? पण बोलणारा बोलून गेला आणि त्यावरून नवं राजकारण तापलं.
सर्वात महत्वाचं असं की लता दिदींची क्लिप असो, शाहरूखचा वाद असो किंवा स्मारकाचं नवं राजकारण असो हा सगळा गलिच्छ खेळ आहे आणि यातून हशील काहीच होणारं नाही हे सुजाण नागरिक जाणून आहे. पण समाज माध्यमं, प्रसार माध्यमं यांकरवी त्याचा अपार मारा होतो आहे. हा मारा थांबवला पाहिजे. आता तर कुणी हवशे-नवशे लता दिदींना काहीबाही बोलू लागले आहेत. सोशल मिडियावरचा हा प्रकार इतका व्हायरल झाला की प्रकाश आंबेडकरांना पुढे यावं लागलं.
असं काही घडलं की, मला देव आनंद यांचा फार हेवा वाटतो. सहज म्हणून, देव आनंद यांची शेवटची छबी नजरेसमोर आणा. कोणती येते? कोणतीही येवो, पण त्याचाा हसतमुख चेहरा समोर येणार आहे. कारण, देव साहेबांचे सगळे अंत्यसंस्कार परदेशात झाले. त्याचा एकही फोटो व्हायरल झाला नाही. त्याच्या फारशा बातम्याही आल्या नाहीत. कारण, त्यांची इच्छा तीच होती. लोकांनी मला कसं लक्षात ठेवायला हवं याची तजवीज त्यांनी करून ठेवली होती. आता तोच कित्ता यापुढे गिरवण्याची गरज आहे.
खरंतर, आता इतक्या मोठ्या उंचीची माणसं आपल्या देशात फार कमी उरली आहेत आणि इतकी मोठी उंची गाठणारी माणसं पुढच्या काही वर्षात तयार होतील असंही फार आश्वासक चित्र देशात दिसत नाहीये. त्यामुळे जी काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रतिभावंत आहेत, त्यांनी हे सोशल मृत्यूपत्र तयार करणं गरजेचं आहे.
====
हे देखील वाचा: आयुष्याच्या शाळेत अशा घडल्या लता मंगेशकर
====
आपल्या कोणत्या क्लिप्स व्हायरल करायच्या, कोणते फोटो व्हायरल करायचे.. अंत्यसंस्कार कसे करायचे.. आपल्या नंतर आपली स्मारकं बांधायची कि नाही बांधायची.. ती कशी बांधायची.. हे सगळं लिहून ठेवावं. म्हणजे, भांडणं नकोत ना राजकीय चिखलफेक.
कारण, या सर्व प्रतिभावंतांनी एक लक्षात घ्यावं की, ते ज्या समाजात राहतायत तो समाज दिवसेंदिवस खुजा होत चालला आहे. गेलेल्या माणसाबद्दल आपल्याला धड श्रद्धांजलीही वाहता येत नाही. असो.
बाय द वे, तुम्ही पाकिस्तानी सर्जनने लता दिदींना वाहिलेली श्रद्धांजली ऐकलीय का?