दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
दीपिका पादुकोन: गुलाबाचा काट्यांसह प्रवास…
डिप्पीच्या (दीपिका पादुकोन हो) कर्तृत्वाला यश निश्चित होते, प्रश्न इतकाच होता की, ग्लोबल फिल्म स्टार की बॅडमिंटन स्पोर्टस स्टार… दोन्ही खेळात दर्जा कायमच उंचावर ठेवावा लागतो (अभिनय हा देखील खेळाचाच एक भाग), स्पर्धकाच्या खेळीनुसार आपले डावपेच, सर्वीस (‘चाल’ या अर्थाने) बदलावी लागते आणि दोन्हीत जिंकणे हेच ध्येय असते (सिनेमाच्या बाबतीत मात्र ते पब्लिकच्या आवडीनिवडीवरच अवलंबून असते हे दीर्घकालीन सत्य आहे.)
दीपिका आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोन यांची मुलगी असल्याने ती जन्मतःच खेळाडू आहे, (प्रकाश पादुकोन दक्षिण आफ्रिकेत कोपनहेगन येथे स्पर्धेसाठी असतानाचा डिप्पीचा जन्म) ती बॅट तोंडात घेऊनच ती जन्माला आली असे कितीही कौतुकाने म्हटले तरी एकदा का मैदानात उतरले की, आपला खेळ आपल्यालाच खेळावा लागतो.
तेथे संस्कार आणि सराव उपयोगी पडतो तरी आपले कॉन्सन्ट्रेशन, फोकस, क्षमता आणि अप्रोच खूप महत्वाचा असतो. सिनेमाच्या जगातही तेच लागते हो, डिप्पीने तेच केले आणि ती स्टार झाली…
दीपिका पादुकोनची पहिली भेट…
तिच्यातील खेळाडूचा अनुभव मी सुदैवाने घेतलाय. मेघना गुलजार दिग्दर्शित “छपाक” (२०२०) च्या निमित्ताने आम्हा काही सिनेपत्रकारांशी दीपिकाने या चित्रपटाची एक ‘निर्माती’ आणि ‘नायिका’ अशा दुहेरी भूमिकेतून संवाद साधला असता ती आपल्या कारकिर्दीच्या चढउतारांकडे अधिकाधिक खिलाडूवृत्तीने पाहतेय असे तिच्या बोलण्यात आले आणि नेमका हाच मुद्दा घेऊन मी विचारले, तू मूळची बॅडमिंटनपटू असल्याने तुझा हा दृष्टीकोन असावा. (तिचे एक्प्रेशन नेमके तेच सांगत होते.)
दीपिकाने छान हसून दाद दिली आणि त्यातच काय ते उत्तर मिळाले. हा चित्रपट लक्ष्मी अगरवाल या स्त्रीवर झालेल्या ऍसिड अटॅकवर होता. दीपिकाने निर्माती म्हणून पाऊल टाकताना वेगळ्या पठणीतलया चित्रपटाला पसंती दिली यातून तिची संवेदनशील लक्षात येते आणि तेच तिच्यातील स्टारमधील वेगळेपण आहे. प्रेक्षकांनी मात्र हा चित्रपट नाकारला. आवर्जून पहावा असे त्यात होते तरी काय??? डिप्पीचा चित्रपट निर्मितीचा डाव फसला. तत्पूर्वी, दिल्लीतील जेएनयूच्या आंदोलनाला तिने सहभागी होत पाठिंबा दिल्याने ती अनपेक्षितपणे वादात सापडली.
सोशल मिडियात तिच्या विरोधात काॅमेन्टस वाढल्या. तिला ट्रोल केले गेले. या सगळ्यावर यावेळी ती काहीही बोलण्यास इच्छुक नव्हती. पण खूपच वेगाने तिच्या आणि “छपाक” विरोधात वातावरण निर्माण झाले. डिप्पीने दिल्लीला जाण्याचा निर्णय घेताना ‘आपला आतला आवाज’ ऐकला की तिच्या टीमचा तो सल्ला होता??? याचे ‘साईड इफेक्ट’ असे की तिच्या विरोधातील वातावरणामुळे तिच्या मॉडेलिंगच्या जाहिरातींचे प्रक्षेपणच थांबवले गेले.
दीपिका आणि ड्रग्स प्रकरण…
असाच भारी लोचा झाला तो, ती ड्रग्स घेते या कॉंट्रोव्हर्सीने. तिने कबुलीही दिली आणि चौकशीला सामोरीही गेली. आपण स्मार्ट खेळाडू असल्याचाच प्रत्यय दिला म्हणायचे. प्रत्येक वेळी खेळात आपल्या मनासारखेच होईल असे नसते. दीपीका सर्वप्रथम कधी लक्षात आली आठवतेय??? अशाच कुठल्या तरी उत्पादनाच्या जाहिरातीत छानशी मॉडेल म्हणून पाहिले. तिच्या कुटुंबियांचे मित्र प्रसाद बिदाया यांनी तिला हा छानसा मार्ग सुचवला आणि दीपिकाचा ग्लॅमर क्षेत्राचा प्रवास सुरू झाला.
तिचा लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभाग मग सुनीत वर्मा या फॅशन डिझायरने तिला ड्रेस सेन्सचे महत्व पटवले. ते फार महत्वाचे असते. या सपोर्ट सिस्टीमचे ऑक्सिजन मिळताच मॉडेलिंगच्या क्षेत्रात तिचा जम बसला. तसा लूक व छान पर्सनॅलिटी तिच्यात होतीच, फक्त अशा संधीची गरज होती. अशातच एके दिवशी दिग्दर्शिका फराह खानने “ओम शांती ओम” साठी चक्क दीपिका पदुकोनला साईन केले. ते देखील शाहरुखची नायिका म्हणजे ब्रेकिंग न्यूजच…!
दीपिकाचा पहिल्या चित्रपटाकडे वाटचाल…
“ओम शांती ओम” ची पार्टी आजही आठवतेय. सांताक्रूझच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ती झक्कास रंगली. पार्टीतील वाढत्या गर्दीत प्रकाश पदुकोन दिसला. त्याच्यासाठी हा फिल्मी माहौल पूर्णपणे केवढा तरी अपरिचित असावा, तो काहीसा हरवल्यासारखा व भांबावल्यासारखा वाटला. बहुतेक त्याची ती पहिली फिल्मी पार्टी असावी.
अपेक्षेप्रमाणे शाहरुखवर नजरा खिळल्या होत्या. त्या मग दीपिकावरही पडल्या. तिच्यात मला थोडासा का होईना, अगदी सुरुवातीच्या काळातील हेमा मालिनीचा भास झाला. थोडीशी लीना चंदावरकर मग थोडी दिव्या भारती देखील आठवली. चित्रपटाच्या जगात वावरताना असा थोडासा फ्लॅशबॅक आणि फ्लॅश फॉरवर्ड असावेच लागते… ओम शांती…. च्या पूर्वप्रसिद्धीचा भाग म्हणून दीपिकाच्या मुलाखतीचा योग आलाच. मिडियात असल्याने हे एक बरे असते.
आत्मविश्वासाच्या बळावर मंगलोरवरून ती मुंबईला रवाना…
दीपिकाशी गप्पा करताना काही गोष्टी समजल्या. मंगलोरवरून ती मॉडेलिंगसाठी एकटीच मुंबईत आली आणि आपल्या निर्णय क्षमतेवर तिने विश्वास ठेवला वगैरे वगैरे बरेच… त्यातून माझ्या लक्षात आले, तिचा स्वतःवर भरपूर विश्वास आहे. सतत बदलत्या परिस्थितीनुसार आपले दृष्टिकोन-मानसिकता बदलण्याची तिची तयारी आहे. टेनिस खेळात कधी कधी समोरचा खेळाडू अर्थात प्रतिस्पर्धी कशी बरे चाल करुन येईल हे सांगता येत नाही. त्यानुसारच आपला गेम हवा. अटॅक हवा. प्रतिहल्ला हवा.
मुंबईत मॉडेलिंगचे फोटो शूट व रॅम्पवर आपल्या व्यक्तिमत्वाचे अस्तित्व दाखवत असतानाच तिने इंद्रजीत लंकेश दिग्दर्शित “ऐश्वर्य” (२००६) या कन्नड चित्रपटातून भूमिका साकारुन अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले होते. उपेन्द्र त्यात हीरो. तिचा पुढचा प्रवास पाहता एव्हाना तो कन्नड चित्रपट तिच्यासाठी फक्त आठवणीपुरता राहिलाय. तिकडच्या प्रादेशिक भाषेतील चित्रपटातही तिचे करियर घडले असते म्हणा. टॅलेन्टला भाषेची मर्यादा नसते. दीपिका स्ट्रगलर कलाकाराप्रमाणे आपले काही फोटो घेवून फराह खानला भेटली (असे या चित्रपट व्यवसायात फोटोचे दळणवळण होतच असते. काहीना गोड, कधी कडू फळे येतात देखील).
फराहला फोटोतील दीपिका खूप बोलकी, देखणी, चार्मिग, प्रफुल्लित वगैरे दिसली. तरी तिने ऑडिशन दिली बरं का… त्यात दीपिका उत्तीर्ण झाली व ओम शांती…(२००७) चे चित्रीकरण सुरू झाले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एका स्टारचे पाऊल पडले, ते पुढे जाण्यासाठीच. पटतयं ना???
भन्साळीची मस्तानी आणि पद्मावत…
भन्सालीच्या “बाजीराव मस्तानी” ची ती सौंदर्यवती मस्तानी म्हणून परफेक्ट शोभली. अनेकांच्या मते, सही कास्टिंग मगर छा गयी काशिबाई प्रियांका चोप्रा. दिसण्यात/ बघण्यात/ हसण्यात/ अभिनयात महत्वाचे म्हणजे, पिंगा गाण्यात प्रियांका छा गयी आणि डिप्पी झाकली गेली, दुर्लक्षित झाली असे नाही. पिक्चरचा बाजीरावच तिला रियल लाईफमधला पार्टनर त्यामुळे रणवीर सिंगसोबतचे प्रणय प्रसंग विशेष खट्टे/मीट्टे नसते तरच आश्चर्य होते. डिप्पीच्या कारकिर्दीतील हायपॉईंट “पद्मावत”!
तो पडद्यावर आला तोच अनेक उलटसुलट वादळातून वाट काढत. करणी सेनेने धमकी दिली, म्हणे दीपिका पादुकोनचे नाक कापू. सिनेमा रिलीज झाला आणि दीपिकाचे नाक आजही वरच आहे. आहे की नाही??? अधूनमधून काही स्पीडब्रेकर येतात, तीच सोशल मिडियातून बाजूला होते, तरी पोझिशन कायम. कारकिर्दीत स्थिरावल्यावर तिने मोजकेच चित्रपट स्वीकारण्यास सुरुवात केली. आपला जिवलग प्रियकर रणवीर सिंगशी लग्न केले. तो तर प्रचंड मोठा मिडिया शो रंगला. (स्टारचे लग्न हे सर्वाधिक टीआरपी देते म्हणे. आपल्या सिनेमावेड्या देशात तेही शक्य आहे) तो सिंधी तर ती साऊथ इंडियन. पण प्रेमात आणि लग्नात असे काही आड येत नाही.
इटलीतील लोम्बार्डीत दोन दिवस हा अतिशय महागडा, बहुचर्चित आणि ग्लॅमरस लग्न सोहळा रंगला. हा जोडा शोभतो अगदी छान आणि दीपिका देवभक्त असल्याने आपल्या प्रत्येक नवीन चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी प्रभादेवीच्या आपल्या घराजवळच्या श्रीसिध्दीविनायक मंदिरात जाते तशीच ती लग्न होताच रणवीर सिंगला घेऊन आलीच. बायको बरोबर होती म्हणून त्याने आपली स्टाईल काही सोडली नाही. ‘यह हुई न बात’…!
सामाजिक स्तरावर दीपिका…
तुम्हाला कदाचित कल्पना नसेल तिने ‘एनडीटीव्हीच्या ग्रीनथॉन कॅम्पेन’ मधून ठाणे जिल्ह्यातील ‘आंबेगाव दत्तक’ घेतले आहे आणि तेथे ती वीज पुरवते. अशा गोष्टींची बातमी होत नसते, कारण त्यात कुरकुरीत असे काही नाहीच. स्टारमधील माणूस पाहणेही गरजेचे असते, पण त्याला न्यूज व्हॅल्यू नाही. प्रभादेवीत उंच इमारतीत राहायला आल्यावर तेथून आपल्या रुममधून श्रीसिद्धीविनायक मंदिर दिसते असे ती “आरक्षण” च्या वेळेस मुलाखत देताना गप्पांच्या ओघात सहज म्हणाली आणि क्षणभर त्या क्षणाच्या आठवणीत गेली.
आपला चित्रपट प्रदर्शित व्हायच्या वेळेस ती फूल नारळाचे ताट घेवून रांगेत उभे राहून याच सिद्धिविनायकाचे दर्शन घेते तेव्हा ती स्टार नसते, तर तुमच्या आमच्यासारखीच सर्व प्रकारच्या भावना असणारी व्यक्ती असते. एखाद्या सुट्टीच्या दिवशी स्वतःच ड्राईव्ह करीत ती परेलच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील कॉफी शॉपमध्ये येवून सॅन्डविच मागवते.
…पण हॉलिवूडमध्ये थोडं समीकरण बिघडलं…
विन डिसेल अभिनित “एक्स एक्स एक्स रिटर्न ऑफ xander cage17” या हॉलीवूडपटात भूमिका केली हे आठवतेय का??? अमेरिकन एन्टरटेन्मेंटसाठी लागणारा बोल्डनेस आणि सुंदरता डिप्पीकडे आहेच म्हणून तिनेही पाऊल टाकले, पण ते व्यवस्थित पडले नाही, नुसताच ‘शो’ झाला. एक तर हा तद्दन मसालेदार हिंदी चित्रपटासारखे फिल्मी मामला होता. डिप्पीला फारसे फूटेजही नव्हते. डिप्पी त्यात हास्यास्पद ठरली. पब्लिसिटीपुरती ती ग्लोबल स्टार ठरली. ग्लॅमर/गॉसिप्स/कॉंट्रोव्हर्सी/स्कूप्स याशिवाय स्टार असू शकतो का??? हेच तर त्याचे टॉनिक आहे.
दीपिका आणि तिचे अफेअर्स…
सिद्धार्थ मल्ल्या (विजय मल्ल्या सुपुत्र) डिप्पीचा पहिला जाहीर मित्र…! डिप्पी त्याला चोरी छुपे घेवून फिरली नाही. सगळे कसे खुल्लम खुल्ला करायचे, या पिढीची ती सही प्रतिनिधी. सिद्धार्थसोबत ती आयपीएलमध्ये रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरच्या सामन्याना भरगच्च स्टेडियमचे व तमाम कॅमेर्याना आपलेचे दर्शन घडेल अशा स्पॉटवर दिलखुलास हसे. नेमके तेच स्टाॅप कसे सापडत??? एकदा आपला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर असतानाच डिप्पी आणि युवराज सिंगमध्ये स्वादिष्ट खिचडी शिजतय असा वास हळूहळू पसरत होताच.
अशातच डिप्पीचा वाढदिवस त्या दोघांनी मेलबर्नला एका हॉटेलमध्ये डिनर घेवून साजरा केल्याचा छानसा फोटो इकडे वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर झळकला देखील. (अगदी मराठीतही) एकदम हॉट केक न्यूज. पण या स्टोरीचा डाव फसला. मैदानाबाहेरची गोष्ट अशी की, ही जोडी जमवण्यामागे कॉर्पोरेट माईंड होता. दोघांच्या लव्ह स्टोरीच्या हवेने या दोघाना काही जाहिरातपटांसाठी एकत्र आणायचे होते. हे गुलाबी प्रकरण खुलण्यापूर्वीच त्याचे काटे बोचू लागले. कभी कभी ऐसा भी होता है. आजच्या डिजिटल युगात जास्त ट्रोलिंग कोणाला झाले असते???युवराजला की डिप्पीला???
दीपिका आणि मीडिया…
रणबीर सिंगमध्ये डिप्पीला पुरुष मित्र सापडला. त्याच्या मर्दानी पर्सनॅलिटीचे हे वेगळेपण कोणत्याही आकर्षक स्त्रीला खुलवणारे व सुखावणारेही. बरं याच रणवीर, अर्जून कपूर, करण जोहरसोबतच्या एआयबी कार्यक्रमाचे वादळ आठवते ना??? अमेरिकेतील अॅडल्स कॉमेडीचे फॅड मुंबईत दरवळले आणि जणू सांस्कृतिक शॉक बसला. (एका उपग्रह वाहिनीवरील या विषयावरील चर्चेत दीपिकाचा बचाव करणे माझ्यासाठी कसोटीचे ठरले).
म्हणूनच म्हटलं डिप्पी कधी गोड तर कधी कडू. एकदा आठवतेय का??? एका इव्हेन्टमध्ये तिच्या फॅशनेबल ड्रेसमधून तिचे सौंदर्याचे अंतरंग नकळत डोकावत असता एका दैनिकाच्या पेज थ्री कल्चरने आपल्या शोध पत्रकारितेत ती अशाच पद्धतीने कोणत्या वस्त्रात कधी बसली व तेव्हा काही अशोभनीय घडले याचे फोटो पहिल्या पानावर प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. (सिनेमापेक्षा अन्य गोष्टीत मिडियाला रस हा असा)
डिप्पीसाठी हा कल्चरल शॉक. कॅमेराची नजर ही अशी कुठेही कशीही म्हणजे का पडू शकते??? अशी तिची भावना झाली. हे सगळेच त्या कलाकाराला डिस्टर्ब करणारे असते. ती रागावली व तिने आपली रोखठोक भूमिकेचे ट्वीट केले. तरी ती व तिला फॅशनेबल ड्रेसमधून तिचे दिसणारे शरीर सौंदर्य हा वाद पुन्हा उद्भवला. तिच्या हॉलीवूडपटाच्या प्रीमियरच्या वेळचा तिचा खूपच मोठा लो कट ड्रेस तसा भारीच.
अमेरिकेत असा गळ्याखाली खूप मोठा भाग उघडा ठेवण्याची स्टाईल आहे. तिकडचे हे कल्चर इकडे मॅच व्हायला हवे, शोभायलाही हवे. डिप्पी नखशिखांत सुंदर असूनही तिला हे शोभले नाही. काहीसे आंबटचिंबट. हिच डिप्पी शूटिंगसाठी गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा (अलिबाग) असा आठवडाभर स्पीड बोटने ये जा प्रवास केला हो. भलेही हे वीस मिनिटाचे अंतर असेल पण कामाशी असलेली बांधिलकी तिने जपली. याचे काही कौतुक कराल ना???
दीपिका बॉलिवूडमध्ये स्थिरावल्यानंतर…
कधी भरती तर कधी ओहोटी असे चढ-उतार अनुभवणारी ही युवती इंटेलिजन्ट, प्रोफेशनल टॅलेन्ट व माणुसकी या गुणांनी घडली. पब्लिसिटीची खेळी, फ्रेन्डसमुळे फोकसमध्ये राहण्याची खुबी, अनेकांना आपलेसे वाटावे असे मनमोहन व्यक्तीमत्व, दिग्दर्शकांचा विश्वास व चाहत्यांची क्रेझ असे बहुत कुछ स्टार हा घडवत असते. हा एक प्रकारचा खेळच आणि डिप्पी तर अष्टपैलू खेळाडू.
पडद्यावर ‘सीनची डिमांड’ म्हणून हार्ड ड्रिंक करणे, बाहेरच्या जगात ड्रग्ज घेते, ही नवश्रीमंत संस्कृती, ती केवढी गाजली. एक गुलाबी व म्हणूनच त्याच गुलाबाला असणार्या काट्यांसहचा हा प्रवास. सगळ्याच गोष्टी सहज कशा साध्य होतील??? काही गुगली अथवा बाऊन्सर असणारच.
सुडौलपणामुळे तिला ग्लोबल युगातील जगभरातील पुरस्कार प्राप्त झाले यात आश्चर्य ते काय हो??? (अभिनयाच्या पुरस्कारांचा दबदबा हरवला का?) फोर्ब्सने जगभरातील सर्वोत्तम 100 देखण्या पर्सनालीटीत तिची निवड उगाच केली का? ‘TIME’ ने तिची Most influential people in the world मध्ये निवड केली. INDIAN MAXIM या मॅगझिनने तिची HOT 100 अशी निवड.
हा तर आजच्या ग्लोबल युगातील अवॉर्डचा सही फंडा. याच कल्चरचे तिने आणखीनही पुरस्कार पटकावले. ही सगळी तिच्या पर्सनालीटीला दाद. डिप्पी एक कलरफुल ग्लॅमरस बहुरंगी (अधेमधे वादाची चटणीही असलेली) वाटचाल. फार गोडवा ही बरा नव्हे कडूपणाही असायला हवा…!
Today is the 35th birthday of actress Deepika Padukone.