दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सलग आठ वर्ष ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ला फिल्मफेअर पुरस्काराने दिली हुलकावणी
हिंदी सिनेमाच्या दुनियेत ज्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाते त्या आमिर खान यांनी आजवर अनेक पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली आहे. पण गंमत म्हणजे ‘फिल्मफेअर पुरस्कार’ ज्याला आपण भारताचे ऑस्कर म्हणतो त्या फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने मात्र आमिर खान यांना एक-दोन नाही, तर सलग आठ वर्ष हुलकावणी दिली होती. तेव्हापासून त्यांचा पुरस्कार सोहळ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आणि ते या सोहळ्यांना गैरहजर राहू लागले. नवव्या वर्षी मात्र त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्या आधीची सलग आठ वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचे केवळ नामांकन मिळत होते. त्यामुळे आमिर खान (Aamir Khan) खूपच वैतागले होते.
याची सुरुवात १९८८ सालच्या ३४ फिल्मफेअर पुरस्काराच्या वेळी झाली. त्यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी तिघांना नामांकन मिळाले होते. यात ‘शहेनशहा’ या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना, ‘तेजाब’ या चित्रपटासाठी अनिल कपूर यांना आणि ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटासाठी आमिर खान यांना. पण पुरस्कार मात्र अनिल कपूरला ‘तेजाब’ करिता मिळाला. यावर्षी आमिर खान (Aamir Khan) यांना पदार्पणाचा पुरस्कार मात्र मिळाला होता.
१९८९ सालच्या फिल्मफेअर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी ‘राख’ चित्रपटासाठी आमिर खान, ‘ईश्वर’ चित्रपटासाठी अनिल कपूर, ‘परिंदा’ चित्रपटासाठी जॅकी श्रॉफ, ‘चांदनी’ चित्रपटासाठी ऋषी कपूर आणि ‘मैने प्यार किया’ चित्रपटासाठी सलमान खान यांना नामांकन मिळाले होते. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मात्र जॅकी श्रॉफ यांना त्यांच्या ‘परिंदा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला.
१९९० सालच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी नामांकन मिळालेले कलाकार होते, आमिर खान (Aamir Khan) (दिल), अमिताभ बच्चन (अग्निपथ), चिरंजीवी (प्रतिबंध), सनी देओल (घायल). या वर्षीही पुरस्काराने आमीर खान यांना हुलकावणी दिली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सनी देवल यांना त्यांच्या ‘घायल’ चित्रपटातील भूमिकेसाठी देण्यात आला.
१९९१ सालच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये अमिताभ बच्चन (हम), अनिल कपूर (लम्हे), दिलीप कुमार (सौदागर), संजय दत्त (साजन), तर आमिर खान (दिल है के मानता नही) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यावर्षीची फाईट खरोखरच खूप तगडी होती आणि ही फाईट जिंकली अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘हम’ या चित्रपटातील भूमिकेमुळे!
१९९२ सालच्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी, अमिताभ बच्चन (खुदा गवाह), अनिल कपूर (बेटा), आमिर खान (जो जीता वही सिकंदर) नामांकित झाले होते. पण पुरस्कार पुन्हा एकदा आमिर खान यांना खो देऊन अनिल कपूर यांच्या खात्यात गेला.
१९९३ सालच्या फिल्म पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचे नामांकन मिळालेले अभिनेते होते, आमिर खान (हम है राही प्यार के), गोविंदा (आंखे), जॅकी श्रॉफ (गर्दिश), शाहरुख खान (बाजीगर) आणि संजय दत्त (खलनायक). पण हा पुरस्कार पटकावला शाहरुख खान यांनी ‘बाजीगर’ या चित्रपटासाठी!
१९९४ साली ४० व्या फिल्मफेअर पुरस्कार प्रदान समारंभात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन मिळालेले अभिनेते होते. आमिर खान (अंदाज अपना अपना), अक्षय कुमार (ये दिल्लगी), अनिल कपूर (१९४२ ए लव स्टोरी), नाना पाटेकर (क्रांतिवीर) आणि शाहरुख खान (कभी हां कभी ना). पण पुरस्कार पटकावला नाना पाटेकर यांनी ‘क्रांतिवीर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी!
१९९५च्या ४१व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन मिळालेला अभिनेते होते, आमिर खान (रंगीला), अजय देवगन (नाजायज), गोविंदा (कुली नंबर १), सलमान खान (करण अर्जुन) आणि शाहरुख खान (दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे). या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान यांना ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटासाठी मिळाला. या वर्षी ‘रंगीला’ करीता आपल्याला नक्की पुरस्कार मिळेल, असे आमिर यांना वाटत होते. त्यांनी साकारलेली टप्पोरी मुन्नाची भूमिका त्याच्यासाठी खास होती. इथे देखील त्यांना पुरस्कारापासून वंचित राहावे लागले. याचे त्यांना खूप वाईट वाटले आणि त्यांचा एकूणच पुरस्कार सोहळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला. हे सर्व पुरस्कार म्हणजे ‘जुगाड’ असतात, असे त्याचे मत बनले.
=========
हे देखील वाचा – तब्बल दोन महिन्याच्या अथक परिश्रमातून बनले ‘हे’ अजरामर प्रार्थना गीत!
=========
सलग आठ वर्ष सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या आमिर खान यांना १९९६ साली झालेल्या ४२ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी नामांकन मिळालेले कलाकार होते, नाना पाटेकर (अग्निसाक्षी), सनी देओल (घातक) आणि आमिर खान (राजा हिंदुस्तानी). यावर्षी मात्र सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आमिर खान यांनी ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटासाठी मिळविला आणि सलग आठ वर्षे हुलकावणी देणाऱ्या या पुरस्काराला अखेर आमिर यांनी जिंकलेच!