Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

सिनेमा सुपर फ्लॉप झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात Dev Anand ने केले होते पुढच्या तीन सिनेमांचे प्लॅनिंग!
‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया और फिक्र को धुवें मे उडाता चला गया…’ साहीर लुधियानवी यांनी लिहिलेल्या या गाण्याच्या ओळी ज्यांच्यावर चित्रित झाल्या होत्या त्या देव आनंद यांनी हे तत्व आयुष्यभर पाळले. त्यांनी कधीच विजयाचा उन्माद केला नाही किंवा पराभवाने कधीच ते खचून देखील गेले नाहीत. १९७८ साली आलेल्या ‘देस परदेस’ या चित्रपटानंतर जवळपास पुढची पंचवीस वर्ष त्यांच्या एकाही चित्रपटाला अजिबात यश मिळालं नाही पण सातत्याने ते चित्रपटाची निर्मिती करतच होते. नवनवीन विषय पडद्यावर आणण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. त्यांचा पब्लिकच्या टेस्टचा कनेक्ट तुटला असला तरी त्यांची सिनेमा निर्मिती ची हौस दांडगी होती. हा माणूस थकला कधीच नाही. कंटाळा तर कधीच नाही. सतत नव्या उत्साहात नव्या उमेदीत तो आपली वाटचाल पुढे चालू ठेवत होता. देव आनंदच्या ‘रोमान्सिग विथ लाईफ’ या आत्मचरित्रामध्ये आपल्याला याबाबतचे अनेक किस्से वाचायला मिळतात!

१९७४ साली नवकेतन या देवच्या बॅनरने ‘इश्क इश्क इश्क’ हा एक चित्रपट बनवला होता.याचे दिग्दर्शन देव आनंद ने केले होते. हा सिनेमा देवने अतिशय तब्येतीने बनवला होता.म्युझिक,लोकेशन्स आणि रोमान्स हा देव आनंद च्या सिनेमाचा युएसपी होता. आर डी बर्मन यांचा अतिशय मेलडीयस संगीत या चित्रपटाला होते. या चित्रपटात देव आनंद सोबत शबाना आजमी, झीनत अमान, जरीना वहाब, कबीर बेदी, प्रेमनाथ,जीवन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
================================
हे देखील वाचा : Dev Anand : ….तसं झालं असतं तर देव आनंद ‘तिसरी मंझिल’चा नायक राहिला असता!
=================================
हा संपूर्ण चित्रपट लडाख, नेपाळ, प.बंगाल आणि काश्मीरच्या नयनरम्य परिसरात चित्रित करण्यात आला होता. यात जी शाळा दाखवली आहे ती Dr.Graham’s Homes school यांची सुप्रसिद्ध शाळा आहे. चित्रपटात Kalimpong Public School असे म्हटले आहे. चित्रपटाचे छायाचित्रकार होते जाल मिस्त्री. त्यांच्या कॅमेरातून हा चित्रपट पाहणं म्हणजे खरोखरच एक सुखद अनुभव होता. डोळ्यांना सुखावणाऱ्या अतिशय सुंदर निसर्ग रम्य लोकेशनवर या सिनेमाचे चित्रीकरण देव आनंद यांनी केले होते. देव ने या सिनेमासाठी अफाट पैसा खर्च केला होता. पण दुर्दैवाने या चित्रपटाला व्यावसायिक यश अजिबात मिळालं नाही. नवकेतन चा हा सर्वात डिझास्टर असा हा सिनेमा समजला जातो. याबाबतचा एक किस्सा मध्यंतरी देव आनंद यांचे भाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी फिल्मफेअर च्या यु ट्यूब बोलताना सांगितला होता.

शेखर कपूर यांनी देखील या ‘इष्क इष्क इष्क’ या चित्रपटात भूमिका केली होती. चित्रपट बनला रिलीज साठी तयार झाला. ८ नोव्हेंबर १९७४ या दिवशी हा सिनेमा रिलीज झाला. नवकेतनच्या परंपरेप्रमाणे याचा प्रीमियर मोठा थाटामाटात झाला. देव आनंद अतिशय खूष होते. त्यांच्या मित्रांनी देखील चित्रपटाची तारीफ केली पण दुसऱ्या दिवशीपासून मात्र चित्रपट गर्दी कमी झाली. त्या काळात देव आनंद चा मुक्काम मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये होता. जेव्हा दुसऱ्या दिवशी देव ला कळाले की लोक चित्रपट एन्जॉय करत नाहीत मधूनच लोक उठून चाललेले आहेत. तिकीट विक्री अजिबातच होत नाहीये.
ब्लॅकचा तर प्रश्नच नव्हता. रेग्युलर तिकीट विक्री देखील होत नव्हती. थिएटर रिकामे पडत चालले होते. संध्याकाळपर्यंत देव आनंदला खात्री पडली की आपला सिनेमा सुपर फ्लॉप झाला आहे. आपली सर्व पुंजी वाया गेली आहे. शेखर कपूर या इंटरव्ह्यू मध्ये सांगतात,” जेव्हा देव आनंदला सगळ्या बाजूने बातम्या येऊ लागल्या तेव्हा सुरुवातीला त्यांचा चेहरा पडला. त्यांनी प्रचंड मेहनत, भरपूर खर्च या सिनेमासाठी केला होता. महागडे शूटिंग केलं होतं. भरपूर मोठी स्टार कास्ट होती. पण शेवटी पब्लिकला हा सिनेमा आवडला नव्हता. देव अंकल यांचा चेहरा खूप निराश वाटत होता. पण त्यांनी लगेच स्वतःला सावरले आणि ते बाथरूम मध्ये गेले. अर्ध्या तासाने जेव्हा बाथरूम मधून बाहेर आला तेव्हा देव आनंदचा चेहरा पूर्वीसारखाच टवटवीत होता. आम्हाला म्हणाले,” फिल्मी दुनिया में ऐसा ही होता है. चलो ये भूल जाते है और नया पिक्चर का प्लॅनिंग करते है!

पंधरा मिनिटांपूर्वी देव आनंद ज्या निराशेच्या गर्तेने वेढलेले दिसत होते आता पूर्णपणे सावरले होते. पंधरा मिनिटात जणू त्याचा मेक ओव्हर झाला होता.” लगेच त्यांनी आपल्या सर्व टीम मेंबर्स बोलून पुढचे प्लॅन सांगायला सुरुवात केली. “इश्क इश्क इश्क’ हा विषय आता माझ्यासाठी संपला आहे. आता पुढचे वर्ष १९७५ साल हे नवकेतन बॅनर चे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आपण या निमित्ताने तीन सिनेमे लॉन्च करत आहोत. पहिला सिनेमा ‘जानेमन’ माझे मोठे बंधू चेतन आनंद दिग्दर्शित करतील. दुसरा सिनेमा ‘बुलेट’ माझा धाकटा भाऊ विजय आनंद दिग्दर्शित करेल आणि तिसरा सिनेमा ‘देस परदेस’ मी स्वतः दिग्दर्शित करेन. या तिन्ही सिनेमाचे संगीतकार वेगवेगळे असतील,नायिका स्वतंत्र असतील पण नायक मात्र मी स्वतः असेन. सो लेट अ स्टार्ट अवर न्यू मिशन.” अर्ध्या तासात देव आनंदने स्वतःला सावरले आणि पुढचं प्लॅनिंग सुरू केलं आणि दुसऱ्या दिवशीपासून त्याने या तिन्ही सिनेमांवर काम सुरू केले. काही दिवसातच देव आनंद प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या नवीन सिनेमांची घोषणा करून टाकली आणि स्क्रीन साप्ताहिकल तिन्ही चित्रपटांची जाहिरात प्रसिद्ध केली.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
अपयशाला आपल्या मनात फारसं स्थान कधी द्यायचं नाही असं त्याला मनाशी ठरवलं त्यामुळे तो सतत उत्साही असायचा. उगाच देव आनंदला कोणी मोठे म्हणत नाही. कारण ‘इश्क इश्क इश्क’ या सिनेमाने नवकेतन चे संपूर्ण आर्थिक गणित संपूर्णपणे बिघडवून टाकले होते पण देवने ‘हर फिक्र को धुवे मे उडता चला गया….’ या न्यायाने पुन्हा तो राखेतून उभा राहिला आणि जानेमन, बुलेट आणि देस परदेस हे तिन्ही सिनेमे सुपरहिट करून दाखवले!