देव कोहलीची लोकप्रिय गाणी पण नशीबाची साथ नाही…
हिंदी चित्रपटसृष्टीच्या अनेक अलिखित नियमांतील एक म्हणजे, सुपर हिट पिक्चरमधील अगदी छोट्याच छोट्या कलाकारालाही एखादी इमेज चिकटणे, नवीन चित्रपट मिळत राहणे आणि त्यातूनच आपली वाटचाल करणे. हाच रियॅलिटी शो चित्रपट पार्श्वगायक, गीतकार, संगीतकार यांच्याबाबत का बरे घडत नाही. तात्कालिक सिस्टीमशी त्यांना जुळवून घेता येत नाही की, प्रस्थापितांना ते धक्का देऊ शकत नाहीत? आपल्या मार्केटिंगमध्ये ते कमी पडतात की दुर्दैवाने त्यांना नशीबाची म्हणावी तशी साथ लाभत नाही? (Dev Kohli)
गीतकार देव कोहली (Dev Kohli) यांच्या निधनाचे वृत्त समजताच मला असेच अनेक प्रश्न पडले. एफ. सी. मेहरा निर्मित ‘लाल पत्थर ‘( १९७१) मधील किशोरकुमारने गायलेले शंकर जयकिशनने संगीतबद्ध केलेले आणि पडद्यावर विनोद मेहराने साकारलेले ( राजकुमार आपल्या खास शैलीत ते गाणे ऐकतोय आणि राखीसुध्दा थबकलीय ) गीत गाता हू मै गुनगुनाता हू मै हे देव कोहलीने गायलेले पहिले चित्रपट गीत. पिक्चर पडलं तरी पन्नास वर्षांनंतरही गाणे हिट आहे. तरी देव कोहलीच्या करियरला वेग मिळण्यास विलंब लागला. अधेमधे एकादे गाणे ते लिहीत. पण ओळख मिळत नव्हती. संघर्ष सुरु होता. कालांतराने त्यांची अनेक गाणी लोकप्रिय ठरली तरी देव कोहलीना स्वतःची अशी ओळख निर्माण करता आलेली नाही. कदाचित चित्रपट प्रसिध्दीत ते दुर्लक्षित राहिले असावेत अथवा असं काही पुढे पुढे करण्याची त्यांची प्रवृत्ती नसावी. आपण भलं नि आपलं काम भलं अशी अनेक संवेदनशील कलाकारांची प्रवृत्ती असते.
देव कोहलीने (Dev Kohli) हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले तेव्हा गीतकार म्हणून साहीर, कैफी आझमी, हसरत जैयपुरी, मजरुह सुल्तानपुरी, गुलजार, आनंद बक्षी, वर्मा मलिक, अंजान, नक्ष्य लायपुरी, असद भोपाली अशांचे प्राबल्य होते. म्हणजेच तगडी स्पर्धा होती. काळ पुढे सरकत असतानाच एम. जी. हशमत, गौहर कानपुरी, विठ्ठलभाई पटेल वगैरे गीतकार आले. दिग्दर्शक सावनकुमार, प्रकाश मेहरा हेदेखील अधूनमधून गीतलेखन करीत. देव कोहलीला रस्ता सापडणे अवघड होते. कदाचित आश्चर्य वाटेल, पण अनेक पटकथा लेखक, गीतकार हे घोस्ट लेखन करत अथवा करतात, त्यात ते आनंद मानतात. हे म्हणजे, स्वतःला श्रेय न मिळता, इतरांसाठी लिहिणे होय. याचं कारण म्हणजे, चित्रपट कसे मिळवावेत, निर्मात्यांना कसे पटवावे याची कला अवगत नसते. त्यात अनावश्यक दमछाक वाटते, त्यापेक्षा परिस्थिती स्वीकारत टिकून राहायचे.
देव कोहलींच्या (Dev Kohli) बाबतीत नेमके काय झाले हे त्यांनाच ठाऊक. पण कालांतराने आपल्या गुणवत्तेचे खणखणीत नाणे त्यांनी वाजवले. ‘मैने प्यार किया’मधील आजा श्याम होने आई, आते जाते हस्ते गाते, ‘हम आपके है कौन ‘मधील मायी नि मायी, दीदी तेरा देवर दिवाना, चाॅकलेटस लाईम ज्यूस, पहला पहला प्यार है, मुझसे जुदा होकर, हम आपके है कौन, ‘बाजीगर’मधील यह काली काली आंखे, ‘इश्क ‘मधील देखो देखो जानम हम, ‘जुडवा’मधील चलती है क्या ही सर्वकालीन सुपर हिट गाणी देव कोहली यांचीच. त्यासह त्यांनी शूट आऊट लोखंडवाला, टॅक्सी नंबर 911, रज्जो, दहक, बस इतना सा ख्वाब है इत्यादी चित्रपटांची काही गाणी लिहिली. यातील राजश्री प्राॅडक्सन्सच्या मैने प्यार किया, हम आपके कौन हैची गाणी साखरपुडा, लग्नापासून ते पिकनिकमधील भेंड्यांपर्यंत अगदी कायमच असतात. गाणे असे समाजात खोलवर मुरायला हवे. ते यश देव कोहलीला मिळाले. पण त्याचबरोबर तशाच गाण्यांची त्यांना संधी मिळायला हवी होती. अगोदर संगीत ट्रॅक आणि मग त्यावर गीत रचना अशा युगात ते असल्याने काही मर्यादा येतात अथवा आल्या असाव्यात. जातीवंत कवीला मोकळीक हवी असते. ती देव कोहलींना मिळायला हवी होती. त्यातही त्यांना राम लक्ष्मण, अन्नू मलिक, आनंद राज आनंद अशा नंतरच्या पिढीतील संगीतकारांनी संधी दिल्याचे स्पष्ट दिसतय. ते अगोदरच्या पिढीतील संगीतकारांनी करायला हवे होते.
========
हे देखील वाचा : पिक्चरच्या पीचवरचे क्रिकेट
========
देव कोहलींचा जन्म ( २ ऑक्टोबर १९४२) चा रावळपिंडीतील, ते आता पाकिस्तानात आहे. फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय भारतात डेहराडूनला आले. तेथेच देव कोहली यांनी उच्च शिक्षण घेऊन मग मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. १९६९ सालच्या ‘गुंडा’ या चित्रपटासाठी पहिले गाणे लिहिले. त्यांचे कार्यक्षेत्र हिंदी चित्रपटसृष्टी ठरले. त्यांच्या लोकप्रिय गाण्यातून ते कायमच आपल्या सोबत नक्कीच राहतील.