
Devdasची धुंदी उतरविण्यासाठी प्रभातने बनवला होता ‘माणूस‘!
आज मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. चित्रपटांना राजाश्रयासोबतच लोकाश्रयही मिळताना दिसतो आहे.पण तरीही मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ कोणता असा जर प्रश्न कुणी विचारला तर ’प्रभात’चा काळ हेच उत्तर मिळते.१९३० ते १९५२ या उण्यापुर्या वीस बावीस वर्षाच्या कालखंडात प्रभातने उत्तमोत्तम चित्रपट दिले आणि मराठी सिनेमाला एक मानाचा दर्जा प्राप्त करवून दिला.आजच्या पीढीला कदाचित हे माहित नसेल पण पुण्याचा प्रभातचा स्टुडिओ (आताचे एफ टी आय) हा त्या काळातील आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट स्टुडिओ होता. भूमीगत वायरींग,अद्ययावत संकलन रूम, रेकॉर्डींगची सोय, वातानुकुलीत व्यवस्था या इतरत्र दुर्मिळ असणार्या गोष्टी या स्टुडिओत होत्या.
प्रभातनिर्मित चित्रपटातील दिग्दर्शनाचे बारकावे, भूमिकेसाठी केलेली नेमकी निवड, कलाकार तंत्रज्ञातील एकवाक्यता शब्दातीत होती. चित्रीकरणासाठी आणलेली फिल्म सुसंस्कारित चित्रपटात रुपांतरित होऊनच बाहेर पडत असे. त्यासाठी आवश्यक असलेली शिस्तबद्ध कार्यपद्धती व व्यवस्थापन हे प्रभात फिल्म कंपनीचे वैशिष्टय़ होते. प्रभात चित्रचे वितरण खाते, स्वतंत्र व सतत असे कार्यरत होते.

इंग्रजी साहित्यातील शोकात्मतेच्या कथा त्या काळी मोठ्या ग्लॅमरस वाटत होत्या.तरूणाईला प्रेमभंगातील अपयश,ते दु:ख कुरवाळणे, कणाकणाने संपून जाणे, विरहाच्या आगीत होरपळणे विलक्षण ’रोमॅंटीक’ वाटू लागले होते. न्यू थिएटरच्या (कुंदनलाल सहगल व पी सी बारूआ अनुक्रमे हिंदी आणि बंगाली अभिनित) ’देवदास’(१९३५) ने सार्या देशातील तरूणाईला भुरळ पाडली होती.’देवदास’च्या यशानंतर अशा प्रेमभंगाच्या सिनेमाची रांगच लागली. या सर्व कथानकाला एक निराशावादाची शेड असे आणि हिच बाब तरूणांना आवडू लागली होती.तरूणाई व्यसनाधीन आणि आत्मनाशाकडे जाण्याकडे प्रवृत्त होवू लागली होती.प्रभातला कायमच सामाजिक परिस्थितीची जाण होती.
================================
हे देखील वाचा : Aarti Movie : कभी तो मिलेगी कहीं तो मिलेगी बहारों की मंझील राही……
================================
देशातील युवावर्गाची अशी दुबळी अवस्था शांतारामबापूंना पटत नव्हती.आयुष्यात प्रेम म्हणजेच सर्वस्व नव्हे , आलेल्या संकटातून मार्ग काढणे यातच खरा पुरूषार्थ आहे हा संदेश त्यांना युवापिढीला द्यायचा होता.या साठी ते चांगल्या कथानकाच्या शोधात असताना त्यांना मुंबईच्या सागर मुव्हीटोनच्या संगीत विभागात असलेल्या भास्करराव अमेम्बल (ए.भास्करराव) यांची ’द पोलीस कॉंन्स्टेबल’ ही कथा वाचावयास मिळाली.वाचताक्षणी त्यांना बेहद आवडली. प्रेमभंगाने आयुष्याची होळी करावयास निघालेल्या तरूणाईच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी हि कथा त्यांनी अनंत काणेकर यांच्या हाती सोपवली. काणेकरांनी पटकथा,संवाद आणि गीते लिहिताना मूळ संदेशापासून कथानकाला भरकटू दिले नाही.चित्रपटाचे नामकरण झाले ’माणूस’! (हिंदीत ‘आदमी’)

सिनेमाची कथा तशी साधीच होती. हि प्रेमकहाणी होती एका पोलीस हवालदार आणि वेश्येची! चित्रपटात वेश्यावस्तीवर कॅमेरा असला तरी स्त्री देहाचे प्रदर्शन,अश्लील विनोद, शारीरीक जवळीक अजिबात दाखवले नाही.(हे प्रभातचे संस्कार).नायक नायिकांच्या भेटीतून उमललेलं प्रेम,नायकाच्या घरातील सत्विक वातावरण, घरातील या धार्मिक वातावरणाने नायिकेचं अस्वस्थ होवून निघून जाणं,प्रेमभंगाने व्यथित झालेल्या नायकाचं आत्मनाशाकडे जाणं,पण त्याच वेळी नायिकेच्या हातून तिच्या अधम मामाचा खून होणं, आणि नायकाच्याच हातून कैद होणं…कोर्ट नायिकेला जन्मठेपेची शिक्षा देते पण ’प्रेमापायी जग सोडू नको’ हा संदेश ती नायकाला देते! या संदेशातून तो सावरतो व नेटाने पुढे जातो. पुढे पुढेच जातो.या लघुकथेला कणेकरांनी मस्त रंगवले. अगदी साध्या साध्या प्रसंगाना देखील त्यातील बारकाव्यांसहीत रसिकांपुढे आणले.
चित्रपटच्या नायकाच्या भूमिकेत शाहू मोडक तर नायिकेच्या भूमिकेत शांता हुबळीकर होत्या. शाहू मोडक यांची नायकाच्या भूमिकेकरीता निवड झाली तेव्हा ते पीळदार शरीर यष्टीचे नव्हते. रोजचा व्यायाम आणि खुराक्याने त्यांची तब्येत मजबूत झाली तेव्हाच चित्रीकरणाला सुरूवात झाली.अन्य भूमिकेत चायवाला रामू रंगविला होता पुढे प्रख्यात संगीतकार, गायक व नट म्हणून नाव कमावलेल्या पं. राम मराठे यांनी.(त्या वेळी ते चौदा वर्षाचे होते!) नायकाच्या आईच्या भूमिकेत होत्या त्या काळच्या मान्यवर गायिका बाई सुंद्राबाई तर दुष्ट मामा बनले होते मा.छोटू! (अभिनेते यशवंत दत्त यांचे वडील). अन्य भूमिकात गौरी , बुवासाहेब होते. प्रभात मध्ये कलाकारांची मस्ती/नखरे (आजच्या भाषेत टॅंन्ट्रम्स) अजिबात चालत नसे.

भूमिका छोटी की मोठी यावर कधीच कलाकाराचे महत्व ठरत नसे.त्यामुळे प्रभातच्याच मागच्या सिनेमातील प्रमुख नट पुढच्या सिनेमात ’मॉब सीन’मध्ये ही उभा असे.सिनेमाची गाणी काणेकरांचीच होती तर संगीत मा. कृष्णराव यांचे होते. आज इतकी वर्ष लोटली तरी ’माणूस’ मधील शांता हुबळीकर यांनी गायलेले ’आता कशाला उद्याची बात ’हे गीत चटकन आठवते.विविध भाषतील हे कदाचित सिनेसृष्टीतील पहिले बहुभाषिक गीत असावे.या गीताच्या अंतर्यात भारतातील विविध भाषांचा वापर तर केलाच होता शिवाय त्या त्या भाषातील संगीतकारांचे मार्गदर्शन घेतले होते जसे बंगाली अंतर्याकरीता अनिल विश्वास यांचे सहकार्य लाभले होते. सुंद्राबाईच्या आवाजातील ’मन पापी भूला’व ’तोड तोड भोग जाल रे नरा’ हि भजने भक्तीरसाने न्हावून निघाली होती.सिनेमातील लहानग्या मुलीची चिचुंद्रीची भूमिका निभावली होती मंजूने.(जिने पुढे अभिनेते गायक करण दिवाण सोबत लग्न केले) तिने खास कोल्हापूरी ढंगात गायलेलं ’आम्ही वळखलं गं…’ हे गाणंही लोकप्रिय झालं होतं.चित्रपटात ’देवदास’आणि तत्सम सिनेमातील प्रेमाच्या संकल्पनांची मस्त विडंबना केली होती.
’प्रेमाची फुटली पेठ , लुटु या प्रेमाचा बाजार’ हे गाणं तत्कालीन फिल्मी प्रेमाची खिल्ली उडविणारे होते.राम मराठे यांनी गायलेलं ’ गुलजार नार न्यारी ’ (पडोसन सिनेमात किशोरकुमार गातो आणि सुनील दत्त फक्त ओठ हलवतो असला प्रकार ’माणूस’ मध्ये पहिल्यांदा या गीतात वापरला गेला होता!) आणि निरर्थक शब्दांची रचना असलेले पण सुरील्या धुन मधील ’तारर नॉव नॉव ’ जमून आलं होतं.नायिका मैना ’जा जा मुसाफीर तू रे’ गाते या गाण्याच्यावेळी ’मुरारी राधे गोविंद राधे’ हे भजनही ऐकू येते.वेगवेगळ्या पट्टीतली ही गाणी त्यांच एकत्रित मिक्सिंग हे ७५ वर्षापूर्वी नवलाईची बाब होती.शंकरराव दामलेंच्या रेकॉर्डींगचं ते कसब होतं.शांताराम बापूंच प्रभातच्या सिनेमाचे दिग्दर्शनातील कसब हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.माणूस मधील प्रत्येक फ्रेम त्यांच्या कौशल्याची साक्ष देते.नायक नायिकेची ही जगावेगळी प्रेमकहाणी चितारताना त्यांच्या प्रेमातील काव्यात्मकता अतिशय सुरेखपणे मांडली.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
================================
’माणूस’ अनेक अर्थाने मैलाचा दगड आहे. साहेबमामा फत्तेलाल यांनी उभा केलेला दुमजली वास्तववादी वेश्यावस्तीचा सेट त्या काळी मोठा कौतुकाचा विषय झाला होता. हा सेट लोकांना पहाता यावा या करीता दर बुधवारी प्रभात ने खास सोय केली होती. या सेट पहाण्यासाठी ख्यातनाम निर्माते व दिग्दर्शक मेहबूब खास मुंबई हून आले होते.चार्ली चॅप्लीन यांनी देखील हा सिनेमा पाहून प्रशंसा केली होती.’माणूस’ मुंबईच्या सेंट्रल थिएटर मध्ये ९ सप्टेंबर १९३९ रोजी प्रदर्शित झाला.’ फिल्म जर्नालिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडीया ’ ने १९३९ चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गौरविले होते.प्रभातचे सिनेमे दोन भाषेत निघत.माणूस पाठोपाठ त्याचा हिंदी अवतार ’आदमी’ देखील प्रदर्शित झाला.दोघांचे रसिकांनी/समीक्षकांनी मोठे स्वागत केले.शांताराम बापूंच्या दिग्दर्शनाचे सर्वत्र कौतुक झाले.जेष्ठ लेखक अरविंद गोखले यांनी ’माणूस व कळस ’ या पुस्तकातून तर बापू वाटवे यांनी ’एक होती प्रभातनगरी’ या पुस्तकातून या चित्रपटाबाबत अत्यंत तपशिलाने लिहिले आहे. नव्या पीढीला आपल्या दैदिप्यमान चित्रसंपदेचा परिचय व्हावा त्याकरीता हा लेख प्रपंच!