Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग

Devendra Goel : अपरिचित पण महान दिग्दर्शक
काळाच्या ओघात काही कलाकारांची नावे त्यांच्या कलाकृती रसिकांच्या स्मृतीतून हळूहळू पुसट होवू लागतात. ज्या काळात या कलाकृतींचा गौरव झालेला असतो त्याचे त्या काळात व्यवस्थित Documentation झालेले नसते. कालौघात त्या रसिकांच्या मनातून नाहीशा होवू लागतात. कारण ज्या रसिकांनी त्यावर प्रेम केलेले असते ते सुध्दा कालपरत्वे दूर गेलेले असतात. अशा वेळी जेव्हा शताब्दी वगैरे निमित्ताने त्या कलाकारांची आठवण होते, तेव्हा उलटून गेलेल्या काळाची धूळ बाजूला करून पुन्हा एकदा तिकडे पाहावे लागते. (Devendra Goel)
यातीलच एक विस्मृतीत गेलेलं नाव म्हणजे निर्माता दिग्दर्शक देवेंद्र गोयल (Devendra Goel). ३ मार्च १९१९ ला जन्मलेल्या देवेंद्र गोयल यांचा आज जन्म दिवस. पन्नास आणि साठच्या दशकातील कितीतरी संगीतमय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक चित्रपटांचे ते निर्माते दिग्दर्शक होते हे आज किती जणांना ठावूक आहे? आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या सिनेमांचा आढावा घेवूयात. संगीतकार रवि आणि देवेन्द्र गोयल या दोघांची जोडी त्या काळात खूप प्रसिध्द होती.

देवेंद्र गोयल (Devendra Goel) यांचा पहिला चित्रपट १९५० साली प्रदर्शित झाला ‘आंखे’. भारत भूषण, शेखर आणि नलिनी जयवंत अभिनेते या सिनेमाला संगीत मदन मोहन यांचे होते. संगीतकार मदन मोहन यांचाही हा पहिलाच चित्रपट होता. ‘मोरी अटरिया पे कागा डोले’ हे मीना कपूरने गायलेलं गाणं खूप गाजले. या दोघांचा दुसरा चित्रपट होता १९५१ सालचा ‘अदा’ या चित्रपटापासून लता मदन मोहनकडे गायला लागल्या. याचाच अर्थ लता-मदनच्या सुरील्या कालखंडाची सुरुवात करण्याचे श्रेय देवेंद्र गोयल यांच्याकडे जाते. ‘सांवरी सुरत मन भाई रे पिया‘, ‘प्रीतम मेरी दुनिया में दो दिन तो रहे होते’ ही लताची गाणी यात होती.
१९५३ सालचा ‘आस’ फार काही चालला नाही. पण १९५५ साली प्रदर्शित झालेल्या ‘वचन’ आणि ‘अलबेली’ या दोन्ही सिनेमांनी चांगले यश मिळविले. या दोन्हीचे संगीत रवि यांनी दिले होते. रविला संधी गोयल (Devendra Goel) यांनीच दिली आणि त्यांचे पुढचे अनेक सिनेमे रविने स्वरबध्द केले. ’वचन’ हा राजेंद्र कुमारचा नायक म्हणून पहिला सिनेमा होता. नायिका गीता बाली होती. तिला या भूमिकेकरिता फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. ‘चंदा मामा दूर के’, ’जब लिया हाथ में हाथ निभाना साथ’ ‘एक पैसा दे दे बाबू‘ ही गाणी आणि चित्रपट खूप गाजला. १९५७ साली अशोक कुमार मधुबाला यांना घेवून देवेंद्र गोयल यांनी एक सिनेमा बनवला ज्यात लता तलतचे स्वतंत्र रित्या गायलेले अप्रतिम पियानो सॉंग होते. ‘सब कुछ लुटाके होश में आये तो क्या किया‘ संगीत रविचे होते. याच वर्षी त्यांनी ‘नरसी भगत’ हा पौराणिक सिनेमा (ज्यात शाहू मोडक,निरुपा रॉय यांच्या भूमिका होत्या) बनवला. ‘दर्शन दो घनश्याम नाथ मोरी आंखिया प्यासी हैं‘ हे नितांतसुंदर भक्ती गीत यात होते.

१४ ऑगस्ट १९५९ ला राजेंद्र कुमार मीना कुमारी यांचा ‘चिराग कहां रोशनी कहां‘ हा चित्रपट झळकला. यात मीनाची टिपिकल रडूबाई भूमिका होती. पण गोयल यांना यशस्वी कौटुंबिकपटाचा फॉर्म्युला सापडला. ‘टीम टीम करते तारे‘ हे गाणे लोकप्रिय ठरले. अभिनेत्री मीना कुमारी आणि कथा लेखक ध्रुव चटर्जी यांना फिल्मफेयरचे नामांकन मिळाले होते. यानंतरचा गोयल यांचा ‘रझिया सुलतान’ हा ऐतिहासिक चित्रपट १९६१ साली प्रदर्शित झाला. यात कामरान आणि निरुपा रॉय यांच्या भूमिका होत्या. ‘ढलती जाये रात सुनले दिल की बात‘ हे नितांत सुंदर गाणे यात होते. (Untold stories)
याच वर्षी राजेंद्र कुमार आणि मीना कुमारी या हिट पेयरला घेवून गोयल (Devendra Goel) यांनी ‘प्यार का सागर‘ हा चित्रपट बनविला. ‘मुझे प्यार कि जिंदगी देने वाले’, ’सदा खुश रहे तू जफा करनेवाले‘, ‘रात रात भर जाग जागकर इंतजार करते है’, ’वफा जिनसे की बेवफा हो गये वो वादे मुहोब्बत के‘ या गाण्यांनी चित्रपट खूप गाजला (सं.रवि). १९६४ साली जॉय मुखर्जी, सायराबानो आणि जॉनी वॉकर यांचा ‘दूर की आवाज‘ चित्रपट पुन्हा रविच्या संगीतात न्हाला होता. ‘हुस्न भी चांद से शरमाया है तेरी सूरत पे’. ’हम भी अगर बच्चे होते’, ’मुकद्दर आजमाना चाहता हूं’ ही रफीची गाणी भन्नाट होती. संगीत अर्थातच रवि.
१९६६ च्या ‘दस लाख‘ या सिनेमात संजय खानसोबत बबिता होती. यातील भिकाऱ्याचे गाणे ‘गरीबोकी सुनो वो तुम्हारी सुनेगा’ या गाण्याने लोकल, बस स्थानकावर गाणाऱ्या अनेक भिकाऱ्यांचा चरितार्थाचा प्रश्न सुटला. या गाण्याला आणि यातील ओम प्रकाश यांच्या विनोदी भूमिकेला फिल्मफेयर मिळाले. ‘आ लग जा गले दिलरुबा’ हे रफीचे गाणे ही लोकप्रिय ठरले.

१९६९ साली देवेंद्र गोयल (Devendra Goel) यांचा ऑल टाईम हिट ‘एक फूल दो माली’ हा संजय, साधना आणि बलराज सहानी यांचा चित्रपट आला. यातील काही गाणी रवि यांनी लिहिली होती. एका गीतात रविचा स्वर होता (किस्मत के खेल निराले मेरे भैय्या) चित्रपटाला संगीत रवि यांचे होते. यातली एकूण एक गाणी गाजली. सैया ले गये जिया तेरी पहली नजर (आशा) सजना सजना ओ सजना तेरे प्यार में मै (आशा) ये परदा हटा दो जरा मुखडा दिखा दो (रफी-आशा) तुझे सूरज कहू या चंदा (मन्ना डे) ओ नन्हे से फरिश्ते तुझसे ये कैसा नाता (रफी) औलाद वालो फुलो फलो (रफी-आशा) या गाण्यांनी कहर लोकप्रियता हासील केली. बलराज सहानीला सहायक अभिनेत्याचे फिल्मफेयर नामांकन मिळाले. हा सिनेमा १९६१ सालच्या हॉलीवूडच्या Fanny वर आधारीत होता.
===============
हे देखील वाचा : Madhubala : दिलीप कुमार – मधुबालाची अधुरी प्रेमकहाणी!
===============
१९७२ साली देवेंद्र गोयल (Devendra Goel) यांनी संजय खान, मुमताज ला घेवून ‘धडकन’ हा सिनेमा प्रेक्षकांपुढे आणला. स्टोरी लाईन चांगली होती. पण ढिसाळ संकलनाने चित्रपट चालला नाही. ‘मैं तो चला जिधर चले रस्ता मुझे क्या खबर हैं कहां मेरी मंजिल‘ या किशोरच्या गाण्याने चांगली लोकप्रियता मिळवली होती. १९ जुलै १९७५ (शोले प्रदर्शित व्हायच्या एक महिना आधी) देवेंद्र गोयल यांचा ‘एक महाल हो सपनों का’ हा धर्मेंद्र, शर्मिला आणि लीना चंदावरकर यांचा चित्रपट झळकला. पुन्हा एकदा चांगले कथानक, उत्तम कलाकार असूनही चित्रपटाला यश नाही मिळाले. या चित्रपटाची गाणी साहीरची होती. ‘दिल में किसी की याद का जलता हुआ दिया’, ’देखा है जिंदगी को कुछ इतना करीबसे’ या गाण्यांसोबत शीर्षक गीत ही मस्त जमून आले होते. १९७७ साली देवेंद्र गोयल यांचा ‘आदमी सडक का’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. यातील ‘आज मेरे यार की शादी है’ या गाण्याने एवढी प्रचंड लोकप्रियता हासील केली आजही आपल्या देशात क्वचितच एखादे लग्न या गाण्या शिवाय लागत असावे!

शत्रुघ्न सिन्हा, विक्रम, जाहीरा यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांचा सहभाग होता. (पद्मा चव्हाण , सुमती गुप्ते, रमेश देव, पल्लवी जोशी, गजानन जागीरदार) याच सिनेमाचा मराठी रीमेक ‘दोस्त असावा तर असा‘ हा सिनेमा १९७८ साली प्रदर्शित झाला जो देवेंद्र गोयल (Devendra Goel) यांनी दिग्दर्शित केलेला एकमेव मराठी चित्रपट होता. याची निर्मिती सीमा देव यांची होती. चित्रपटात रमेश देव, रविराज, रुही, श्रीकांत मोघे हे कलाकार होते. ‘होणार तुझे लगीन होणार’, ’जे जे सुंदर ते माझे घर मी तर आहे मस्त कलंदर‘ ही गदिमा आणि सुधीर फडके या युतीची अखेरच्या काळातील गाणी होती.
=============
हे देखील वाचा : bobby : सत्तरच्या दशकातील कोवळ्या प्रेमाची संगीतमय कहाणी!
=============
१९७८ साली देवेंद्र गोयल यांनी दिग्दर्शित केलेला ‘दो मुसाफिर’ हा सिनेमा झळकला. शशीकपूर, रेखा हि तगडी स्टार कास्ट असूनही सिनेमा चालला नाही. गंमत म्हणजे या सिनेमाला रविचे संगीत नव्हते याचे संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. रवि आणि बी आर चोप्रा ही जोडी सर्वांना माहित आहे पण रवि आणि देवेंद्र गोयल (Devendra Goel) ही देखील तितकीच लोकप्रिय जोडी होती. त्यांनी तब्बल ओळीने दहा हिट सिनेमे दिले. दोघांची जन्मतारीख ३ मार्च असल्याने कदाचित त्यांचे सूर जुळले असावेत! असो २६ फेब्रुवारी १९७९ ला देवेंद्र गोयल यांचे वयाच्या साठाव्या वर्षी निधन झाले. फारसे गाजावाजा न करता चिकाटीने काम करत उत्तम सिनेमे त्यांनी दिले.