ग्लॅमरच्या मागे कधीही धावले नाही… धनश्री अंतरकर
धनश्री अंतरकर
धनश्रीचा अभिनय प्रवास शाळेपासून सुरु झाला. बालमोहन शाळेची ती विद्यार्थिंनी. विद्याताई पटवर्धन या सुट्टीमध्ये अभिनयाची शिबीरं घ्यायच्या. त्यात ती नेहमी भाग घ्यायची. संस्कार या सह्याद्री वाहिनीवरील मालिकेत बालमोहन शाळेचे अनेक विद्यार्थी होते. त्यात धनश्रीही होती. छोट्या पडद्याचा आणि तिचा पहिला परिचय झाला. पुढे बालनाट्याची तिला ओढ लागली. त्यातून ती अविष्कार ग्रुपच्या संपर्कात आली. येथे अनेक कलाकार तालमीसाठी यायचे. इथेच तिला पहिलं नाटक मिळालं, ‘गोष्ट लग्नाची…पण’. या नाटकात धनश्रीला स्टेनोची भूमिका मिळाली होती. ही स्टेनो बॉसच्या स्वप्नात जाते…असा तो रोल होता. नाटकात काम करतांना होणारी कसरत धनश्री या पहिल्याच नाटकात शिकली. कारण स्टेनोची भूमिका करतांना अगदी काही मिनीटात तिला साडी नेसून स्टेजवर यायला लागायचे. नाटकात टायमिंग महत्त्वाचा असतो. शिवाय बॅकस्टेजचा अनुभवही तिला मिळाला. यानंतर धनश्रीकडे अनेक चांगली नाटकं आणि मराठी-हिंदी मालिका आल्या. धनश्री यासाठी कुठेही स्पेशल ऑडीशन द्यायला गेली नाही, हे विशेष. बंदिनी, दामिनी या मालिंकामध्ये तिची भूमिका विशेष होती. प्रतिमा कुलकर्णींचे‘याच वेळी याच दिवशी’हे नाटक तिला मिळाले, पण तालमीसाठी अत्यंत कमी वेळ होता. अशावेळी धनश्री रात्रं-दिवस या तालमीसाठी हजर असायची. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात तिला भूमिका मिळाली. या भूमिकेचं तिला खूप अप्रुप वाटतं. कारण स्वतः प्रभाकर पणशीकर यांनी तिच्याकडून पाठांतर करुन घेतले. ऐतिहासिक नाटकांत संवाद कसे बोलायचे याचे धडे पणशीकरांनी धनश्रीला दिले.
या सर्व अनुभवातून अभिनयाचा पाया पक्का होत गेल्याचे धनश्री सांगते. मालिका मिळत गेल्या. झी मराठीवरील ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका तिला मिळाली. त्यातूनच पुढे तिला ‘जगावेगळी’ ही मालिका मिळाली. यात तिला राजन भिसे, सुहास जोशी, संजय मोने अशा सहकलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. या दोन्हीही मालिकांमधून मान्यवर कलाकारांबरोबर तिने काम केलं. याच दरम्यान धनश्रीनं म्युझिकलं ड्रामा केला. श्रेयस तळपदेसाबोत ‘अमानत’, ‘जूस्तजू’, ‘रेत का दर्या’ सारख्या हिंदी मालिका केल्या. साम मराठी या नव्यानं सुरु झालेल्या चॅनेलवर ती अॅंकरच्या रुपात दिसली. ‘मन माझे’ या महिलांसाठी असलेल्या कार्यक्रमात ती महिलांना बोलतं करायची. या लाईव्ह कार्यक्रमातून खूप शिकायला मिळाल्याचं धनश्री सांगते. एकतर लाईव्ह कार्यक्रम करण्याचा अनुभव आला. या लाईव्ह शो मध्ये महिलांच्या अनेक प्रश्नावर मान्यवर वक्त्या उत्तरं द्याचयच्या. या महिलांचे अनुभव…आणि मान्यवरांची बोलायची पद्धत….यातून समाजाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलल्याचं ती सांगते. ‘जय मल्हार’ या गाजलेल्या मालिकेमध्येही धनश्री दिसली. खरतर दोन दिवसांसाठींचा रोल आहे म्हणून तिला या मालिकेत घेण्यात आलं होतं. मालिकेत इंद्राची पत्नी शची हिची भूमिका धनश्रीनं केली आहे. पण नंतर हिच भूमिका दोन वर्ष चालली. त्यानंतर धनश्री दिसली ती स्टार प्रवाहवरील ‘ललित 205’ या मालिकेत. पद्मिनी या साध्या स्वभावाच्या महिलेची भूमिका तिने साकारली. या मालिकेनंतर ती सोनी मराठीवरील ‘मी तुझीच रे’ या मालिकेत आईच्या भूमिकेत होती. ही भूमिका पद्मिनीच्या नेमकी उलट होती. या दोन्हीही भूमिकांना चाहत्यांची चांगली पसंती मिळाली.
एक मालिका संपली की धनश्रीला दुसरी मालिका मिळत आली आहे. धनश्री यासाठी कुठेही ऑडीशन द्यायला जात नाही. मग या मालिका तिला मिळतात कशा, याबाबत ती सांगते, मी प्रत्येक सेटवर वेळेचं बंधन पाळते. डेली सोपमध्ये वेळेला खूप महत्त्व असतं. जर नऊ वाजता सीन असेल तर तुम्हाला साडेआठवाजता तयार होऊन सेटवर हजर रहावं लागतं. तसेच प्रत्येकवेळी मेअकपमन किंवा हेअरड्रेसर उपलब्ध असतीलच असं नव्हे. त्यासाठी धनश्री स्वतः तयार होणे अधिक पसंत करते. साडी नेसून सीन नुसार मेकअप आणि हेअर स्टाईल ती स्वतः करते. त्यामुळे वेळ वाचतो आणि आपला सीन काय आहे, हे अधिक चांगल्यापद्धतीने समजून घेता येते. या सर्वाला डेलीसोपच्या विश्वात महत्त्व आहे. आपल्या या वागण्याची कोणतरी नोंद घेत असतं. त्यामुळेच अशा चांगल्या भूमिका मिळत असल्याचे धनश्री सांगते.
धनश्री कधी विशिष्ट भूमिकांच्या बंधनातात अडकली नाही. तसंच ग्लॅमरच्या वलयाला भूलली नाही. की ग्लॅमरच्या मागे कधी धावली नाही. नेहमी उगवत्या सूर्याला सर्व नमस्कार करतात, हा साधा, सरळ, सोप्पा नियम धनश्रीचे घोषवाक्य आहे. त्यामुळे एक काम संपलं की ती स्वतःला गृहिणीच्या भूमिकेत व्यस्त करुन घेते. घर, नवरा, मुलगी अनन्या यांच्यासाठी तत्पर असते. या कामात व्यस्त असतांना एखादा रोल आला तर नाहीही म्हणते. कुटुंब आणि अभिनय या दोन वाटा धनश्रीने व्यावस्थि सांभाळल्या आहेत. त्या तिच्या स्वभावामुळेच. धनश्रीला तिच्या या अभिनयाच्या वाटचालीसाठी कलाकृती मिडीयाच्या शुभेच्छा…
सई बने