
Bollywood Movie Trailer : गल्ली चित्रपट ते मल्टीप्लेक्स
अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर २’ सोबत आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ चा टीझर दाखवणार ही चक्क सोशल मीडियात बातमी झाली आहे. ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाच्या अक्राळविक्राळ क्रेझने त्याचा टीझरदेखिल पाहावासा वाटतोय हे सांगायला कोणत्याही फिल्मी ज्योतिषाची गरज नाही. आज मल्टीप्लेक्स असो, डिजिटल प्लॅटफॉर्म असो, नवीन मराठी व हिंदी चित्रपटांचे केवढे तरी टीझर आणि ट्रेलर पाहायला मिळत आहेत. एका चित्रपटाच्या दरात केवढे तरी टीझर आणि ट्रेलर फुकट असा हा मामला आहे.
मल्टीप्लेक्सला मात्र त्यात घसघशीत कमाई होते. हे टीझर, ट्रेलर चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीचा एक महत्त्वाचा भाग. कधी कधी इतका आणि असा अतिरेक होतो की, एकाच चित्रपटाचे चार पाच ट्रेलर असतात (चित्रपटसृष्टीच्या भाषेत कापले जातात) आणि त्यातून जवळपास सगळाच चित्रपट समजतो. बरं,त्याच चित्रपटातील गाणीदेखिल यू ट्यूबवर पाहायला मिळतात. इव्हेंटसमध्येही त्याच गाण्यांवर नाचकाम. एवढे सगळे दिसल्यावर फक्त आणि फक्त श्रेयनामावली आणि शेवट (क्लायमॅक्स) पाहायला ऑनलाईन तिकीट काढून मल्टीप्लेक्सला समोसा पॉपकॉर्न आणि शीतपेये यांचा आस्वाद घेण्यासाठी जायचे काय? चित्रपट चालत का नाहीत यावरच्या परिसंवादात हा गुद्दा आणि मुद्दा महत्वाचा.

ट्रेलर संस्कृती अगदी कृष्ण धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट चित्रपटाच्या काळापासून सुरू आहे, त्या काळात ते एकपडदा चित्रपटगृहांत अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये एक आठवडा अगोदर पाह्यला मिळत. ग्रामीण भागातील टूरिग टॉकिज,तंबू थिएटर्स यातही ही ट्रेलरची हौस मौज पूर्वापार चालत आलेली. चित्रपट रंगात आला आणि ट्रेलर वाढत गेले. कधी त्याची वृत्तपत्रांतून जाहिरात होई. मला आठवतंय ‘मै सुंदर हू’ या चित्रपटासह शालिमार चित्रपटगृहात नासिर हुसैन निर्मित व दिग्दर्शित ‘कारवा’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहा अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि असा ट्रेलर सुरू होताच थिएटरमध्ये हमखास शिट्टी वाजे.नवीन चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यातील विलक्षण उत्सुकता त्यात असे.चित्रपटाच्या तिकीटात ट्रेलर पाह्यला मिळतोय असा त्यात आनंद असे.
पूर्वी विदेशी चित्रपट दीड तासांचा असे,त्यांना मध्यांतर नसे.पण चित्रपटाच्या खेळाची वेळ दुपारी तीन वाजता, संध्याकाळी सहा वाजता आणि रात्री नऊ वाजता अशी असे. अशा वेळी मध्यंतरपर्यत दाखवायचे काय? तर अनेक जाहिरातपट आणि आगामी विदेशी चित्रपटांचे ट्रेलर दाखवले जात. आणि त्याचाही आपला एक प्रेक्षकवर्ग निर्माण झाला होता. आपल्या देशातील चित्रपट रसिक संस्कृतीतील हीदेखील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट.

साठ आणि सत्तरच्या दशकात गल्ली चित्रपट संस्कृती एकदम भन्नाट होती. श्रीगणेशोत्सव तसेच काही निमित्ताने गल्लीत,चाळीत,मैदानात,गच्चीत सोळा एम.एम.चा पडदा लावून चित्रपट दाखवला जाई आणि त्यात हुकमी फंडा ट्रेलरचा असे. नवीन निश्चल आणि रेखाचा पहिला चित्रपट ‘सावन भादो’, धीरजकुमारचा पहिला चित्रपट ‘रातों का राजा’, राजेश खन्ना आणि नंदा यांची भूमिका असलेला सुपरहिट म्युझिकल रहस्यरंजक ‘द ट्रेन’ या चित्रपटांचे गल्ली चित्रपटात हमखास ट्रेलर पाहायला मिळत. त्या काळात एका चित्रपटाचा एकमेव ट्रेलर पाहायला मिळतोय म्हणून तो एक्सलुझिव्ह ठरे. आणि तसेच हवे.
ट्रेलर चित्रपटाची उत्सुकता वाढवणारा असावा, चित्रपटात काय काय आहे हे सगळे सांगून “आता चित्रपटात पाहायला राहिलेय काय?” असं वाटणारा नसावा. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीतील अनेक निर्माता आणि दिग्दर्शकाने जुन्या चित्रपटाच्या ट्रेलरचा अभ्यास करायला हवा. विशेषतः राज खोसला, विजय आनंद, नासिर हुसैन, शक्ती सामंता, मऩोजकुमार, तसेच एन. चंद्रा, सुभाष घई, राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांचे ट्रेलर एकदम भारी. चित्रपटांचे ट्रेलर हा एका पुस्तकाचा अथवा एखाद्या मनोरंजन उपग्रह वाहिनी, डिजिटल चॅनेल शोचा माहिती आणि मनोरंजनाचा जबरदस्त खुराका आहे.
================================
================================
दीड दोन (काहींचा तीन साडेतीन)मिनिटांचा ट्रेलर पडद्यावर, यू ट्यूबवर पाहायाला मिळतोय असा व इतका हा क्षणभंगुर विषय नाही. चित्रपट माध्यम आणि व्यवसायातील तोही एक वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे.तसे पाह्यची दृष्टी तेवढी हवी. ‘बॉर्डर २’सोबत ‘धुरंधर २’चा टीझर यात व्यावसायिक रणनीती आहेच आहे. पण ही गोष्ट येथेच संपत नाही…. या ट्रेलर संस्कृतीचा फ्लॅशबॅक खूपच वेगळा आणि रंजक आहे.