
Dhurandhar ने धुरळा केलाय; पण तरीही…
संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि रणवीर सिंग अशी तगडी स्टारकास्ट असलेला स्पाय थ्रिलर ‘धुरंधर’ (Dhurandhar Movie Review) अखेर थिएटर्समध्ये धडकला. गेल्या काही वर्षात कित्येक स्पाय थ्रिलर आलेत… पण हा स्पाय थ्रिलर सर्वांपेक्षाच वेगळा ठरलाय. सत्य घटनेवर चित्रपटाचं कथानक आधारित असून आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर आहे तरी कसा जाणून घेऊयात… (Dhurandhar Movie Review)

पहिली गोष्ट तर ‘धुरंधर’ हा A रेटेड चित्रपट आहे, त्यामुळे रिस्कवरच जा… आणि सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित असल्यामुळे यामध्ये काही रेफ्रन्स दिले आहेत… जसं, कंदाहर प्लेन हायजॅक, २००१ संसदभवन हल्ला, २६/११ वगैरे… पाकिस्तानचे हेच मनसुबे आणि त्यांच्या दहशतवादी लिंक्स हाणून पाडण्यासाठी भारताची सिक्रेट एजन्सी RAW एक ऑपरेशन राबवते ज्याचं नाव असतं ‘ऑपरेशन धुरंधर’! महत्त्वाचं म्हणजे हा साडे तीन तासांचा चित्रपट ७ चॅप्टर्समध्ये विभागलेला आहे. त्यातच आपल्याला पाकिस्तानी अंडरवर्ल्ड माफिया, गँगवॉर सुद्धा पाहायला मिळतो आणि ही माफियागिरी आणि दहशतवादी कारवाया थांबाव्यात म्हणून पुढे येतो एक भारतीय एजंट ज्याचं नाव आहे, जसकीरत सिंग रंगी… उर्फ हामजा अली मजारी… संपूर्ण चित्रपट पूर्णपणे हिंसक आहे.. म्हणजे सुसाईड बॉम्बिंगने चिंधड्या उडणं, चेहरा वजनाने ठेचून काढणं, शॉटगनने डोकं उडवणं, अपघातात मुंडकं उडून जाणं वगैरे अनेक सिन्स अक्षरशः अंगावर शहारे आणणारे आहेत. (Entertainment News)

२०२३ मध्ये आलेल्या रॉकी और राणी की प्रेमकहाणी या चित्रपटानंतर लीड हिरो म्हणून कमबॅक करणाऱ्या रणवीर सिंगचा जलवा तुम्हाला या चित्रटात पाहायला मिळेल. त्याने इतकी इंटेन्स भूमिका केली आहे की, चित्रपटात साकारलेलं पात्र त्याच्याकडून सुटतच नाही. विशेष म्हणजे ‘घायल हु इसलिये घातक हु’…हा डायलॉग त्याने चित्रपटात आपल्या भूमिकेने सार्थ करून दाखवलाय. हा चित्रपट जवळपास म्हणजे ९५% हा पाकिस्तानातलाच आहे. म्हणजेच तिथलेच रस्ते, गल्ल्या, मोहल्ले, आणि कराची… इथल्या ल्यारी टाऊनमध्ये रणवीर कसा येतो आणि कशाप्रकारे प्लॅनिंग-प्लॉटिंग करून सर्वांचे बारा वाजवतो, हे तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल. दुसरीकडे अक्षय खन्नाने रेहमान दकैत या पात्रातून मार्केट जाम करून टाकलं आहे. त्याचा लुक, ती अंडरवर्ल्ड डॉनवाली अॅक्टिंग सगळं अगदी परफेक्ट त्याने साकारलं आहे. (Ranveer Singh Movie)

अर्जुन रामपाल आयएसआयचा एक क्रूर माणूस मेजर इक्बाल म्हणून दिसला आहे. एका दहशतवाद्याचे विचार, त्याचं राहणीमान, त्याची दहशतवादी कारवायांमधली डीलिंग आणि त्याची क्रुरता किती असू शकते हे अर्जुन रामपालने दाखवलं आहे. तर, या चित्रपटात ज्याला सर्वात कमी स्क्रिनटाईम मिळाला आहे तो म्हणजे संजय दत्त… पण स्क्रिनटाईम कमी असूनही दमदार अभिनय साकारण्याचं कसब त्याच्यात दिसलं आहे. आपल्या मुंबई पोलीस खात्यात कसे अनेक शार्पशुटर होऊन गेलेत, तसे पाकिस्तानमध्येही होते. तसंच एक पात्र संजयने साकारलंय, ते म्हणजे एसपी असलम चौधरी. स्वतला अंडरवर्ल्ड डॉन म्हणवणाऱ्यांची धांदल उडालीच पाहिजे, असा संजय दत्तचा हा पोलीसवाला रोल आहे. ‘धुरंधर’मधलं आणखी एक पात्र म्हणजे आर. माधवनचं आयबी चीफ अजय संन्याल, जे पात्र अजित डोवाल यांच्यापासून प्रेरित आहे. ही भूमिकासुद्धा सुरेख रंगली आहे माधवनने ती जिवंत केली आहे. त्यातच राकेश बेदी यांनी एक कपटी राजकारणीसुद्धा युनिक पद्धतीने साकारला आहे. एकंदरीत सर्वांनी चित्रपटामध्ये आपले १००% दिले आहेत. (Sanjay Dutt)

या चित्रपटाचा सर्वात बेस्ट पार्ट आहे संगीत. प्रत्येक महत्त्वाच्या सीनला म्युझिकनेच उचलून धरलं आहे आणि त्यातच बॉलीवूडच्या जुन्या गाण्यांचा ठिकठिकाणी केलेला वापर खुपच भारी आहे. चित्रपटातील संवाद पण उत्तम आहे. प्रत्येक डायलॉगला शिट्टी जरी वाजवावी असे नसले तरीही प्रेक्षकांना खिळवून ठेवतील असे डायलॉग नक्कीच आहेत, जे तुम्हाला या साडे तीन तासांच्या चित्रपटात कुठेही बोअर करत नाहीत. निर्मात्यांनी अख्खा पाकिस्तान उभा केला आहे, सोबतच त्यांची वेशभूषा, संस्कृती, बलोच लोकांची संस्कृती हे सगळच यात दाखवलं आहे. रणवीर सिंग आणि सारा अर्जुन यांची केमिस्ट्री उत्तम आहे आणि लव्ह स्टोरी दाखवण्यामागचा उद्देशसुद्धा चित्रपटात कळून जातो. शिवाय, दिग्दर्शकांनी उत्कृष्ट व्हिजुअल ट्रीट प्रेक्षकांना देण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला आहे. काही ठिकाणी तर खरे फुटेज दाखवले आहेत.
चित्रपटाची पडती बाजू म्हणजे लेन्थ. साडे तीन तासात फर्स्ट हाफ हा दोन तासांचा आहे आणि दुसरा हा दीड तासांचा. त्यातच काही ठिकाणी अनावश्यक सिन्स आणि एक दोन सॉंग पार्टस टाकल्यामुळे स्टोरी बिल्डींग तुटते असं वाटतं. स्क्रीनप्ले खेळवून ठेवणारा आहे पण खूप ताणल्यासारखाही वाटतो. रणवीर सिंग स्पाय असतो हे तर समजतंच पण खरंतर तो पार्ट दमदार दाखवण्याची गरज होती. त्याचा अभाव जाणवतो. एकूणच काय तर चित्रपटात कुठलाच सस्पेन्स नव्हता. पुढे काय होईल याचा अंदाज सहजासहजी प्रेक्षकांना लावता येतो. त्यातच क्लायमॅक्स खटकतो. अक्षय खन्ना चित्रपटात कितीही क्रूर असला तरीही त्यांची अंगकाठी बघता त्याने गोळी लागलेली असतानाही संजय दत्तला आणि रणवीरलाही कुत्र्यासारखा मारणं, हे पचत आणि पटत नाही. त्यामुळे क्लायमॅक्स पूर्णपणे गंडला आहे. पण तरीही हा काही YRF च्या स्पाय हिरोज सारखा बिल्डींगवरून उड्या मारत नाही, किंवा विमानात फाईट करत नाही. तर ‘धुरंधर’ एकंदरीत स्पायचं काम कसं असतं, कशाप्रकारे वेषांतर करून ALERT रहावं लागतं, हेरगिरी नेमकी काय असते, हे दाखवतो.

आता जाणून घेऊया चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक आदित्य धरबद्दल. हा आदित्यचा दुसराच चित्रपट आहे. त्याचा पहिला चित्रपट होता ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’. त्यामध्येच त्याचं जबरदस्त दिग्दर्शन आपण पाहिलंच होतं. आता यामध्येही त्याने असे ऑपरेशन राबवणारे चित्रपट कसे प्रेजेंट करायचे हे दाखवून दिलं आहे. चित्रपटाला चॅप्टरनुसार दाखवणं, पाकिस्तानच्या अंडरवर्ल्डची ग्राउंड रीएलिटी, त्याचं दहशतवाद्यांशी असलेलं कनेक्शन, RAW कशी काम करते, याचं लिखाण आदित्यने उत्तमरित्या केलं आहे. त्याच्या दिग्दर्शनामध्ये कुठेही गोंधळ नव्हता. सरळलोट लिखाण असलं तरी त्याला एक दमदार बाजू होती, जी आदित्य धरने मांडली आहे. (Aaditya Dhar)
================================
हे देखील वाचा : R Madhvan : मराठी मातीशी कनेक्शन ते लष्करी प्रशिक्षण; असा आहे आर माधवनचा प्रवास….
================================
एकंदरीत काय तर एखाद्या चित्रपटाला खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक बनवण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या अॅक्शन, हिंसकता, इमोशन्स, देशभक्ती आणि डायलॉगबाजीची कुठेही कमी वाटत नाही. अजून एक महत्त्वाची बाजू जी अनेकांनी पाहिली नसेल, ती या चित्रपटात दाखवली आहे, ते म्हणजे २६/११ मधले दहशतवाद्यांचे संभाषण. एकंदरीत देशासाठी असे कितीतरी अज्ञात ‘धुरंधर’ स्पाय बनून इतर देशांमध्ये वावरले, पकडले गेले. त्यांना टॉर्चर केलं गेलं, शिक्षा झाली. अशाच वीरांना हा चित्रपट समर्पित आहे, हेच दिसून येतं. महत्वाचं म्हणजे २०२६ मध्ये ‘धुरंधर’चा दुसरा पार्ट रिलीज होणार याची झलकही यात शेवटी दिसतेच. त्यामुळे प्रेक्षक सीक्वेल पाहायलाही उत्सुक असतीलच… (Bollywood Movie Reviews)
कलाकृती मीडिया ‘धुरंधर’ला देत आहे पाच पैकी साडे तीन स्टार्स !
-सागर जाधव
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi