दिल की दिल से बात
एका श्रीमंत बापाची मुलगी वडीलांच्या श्रीमंतीचा गर्व असलेली मग्रुर आणि तेवढीच सुंदरही दुसरा भंगार विक्रेत्याचा मुलगा त्यात बाप कमालीचा कंजूष त्याच्याकडून पैसे काढतांना मलगा काय काय क्लुप्त्या काढतो ते त्याचे त्यालाच माहीत. या दोघांचा कॉलेजमध्ये सामना होतो आणि मग काय होतं एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी दोघंही कायम तय्यार. या भांडणातूनच एक प्रेमकहाणी फुलते. श्रोत्यांना सुमधूर गाण्यांची मेजवानी मिळते. तीस वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट म्हणजे दिल… माधुरी दिक्षित आणि अमिर खान यांच्या अभिनयानं सजलेला हा चित्रपट त्यातील गाण्यांमुळे अद्यापही प्रेक्षकांच्या तेवढाच पसंतीला उतरतो.
1990 मध्ये इंद्रकुमार यांचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेमिकांना नव्या गाण्यांचा आधार मिळाला. आमिर खान आणि माधुरी दिक्षित….दोघंही सुपरस्टार. या मधु आणि राजा यांनी तेव्हा तरुणांच्या मनावर जणू जादूच केली. चित्रपटाची स्टोरी तशी नेहमीसारखीच. पण गीतकार समीर आणि संगीतकार आनंद-मिलींद यांच्या जादूई गाण्यानं ही स्टोरी श्रवणीय प्रेमकहाणी झाली. त्यात आपल्या माधुरीचे ते अप्रतिम लूक…वडीलांच्या श्रीमंतीचा गर्व…आपल्यासारखे आपणच हा तोरा…सोबत अमिर…त्याची ती कॉलर उडवण्याची स्टाईल…खंबे जैसी खडे है…दम दमा दम….या गाण्यांमध्ये या दोघांची जुगलबंदी…त्यानंतर दोघांच्या प्रेमाची कहाणी सुरु होते…मग यासोबत मुझे निंद ना आये, हम प्यार करने वाले, हमने घर छोडा है…सारख्या सुमधूर गाण्यांची साथ…
दिल चित्रपटाचे यश जेवढं आमिर, माधुरी, अमुपम खेर आणि सईद जाफरी यांच्या अभिनयात आहे, तेवढेच यश या चित्रपटातील गाण्यांमध्ये आहे. अनुराधा पौडवाल, उदित नारायण, साधना सरगम, सुरेश वाडकर यांच्या स्वरांनी सजलेली ही गाणी आजही तेवढ्याच आवडीनं ऐकली आणि पाहिली जातात. फिल्मफेअर पुरस्कारात तर या दिलचीच धूम होती. माधुरी दिक्षित, इंद्र कुमार, अमिर खान, समिर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, आनंद-मिलींद, अनुपम खेर या सर्वांना पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यात माधुरी दिक्षितला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
आज या चित्रपटाला तीस वर्ष झाली. पण त्यातील गाण्यांमुळे आजही चित्रपटाची गोडी कमी झालेली नाही.. खंबे जैसी खडी है. हे गाणं कुठे ऐकलं तरी तरी लाल ड्रेसमधली माधुरी आठवते…तर उटीच्या प्रत्येक प्रेक्षणीय स्थळात पर्यटक मुझे निंद ना आये…हे गाणं कुठे शुट झालं आहे, ती स्थळं शोधतात…या चित्रपटाची जादू अशीच कायम रहाणार आहे…दिल से…
सई बने…