मी पिक्चर एन्जाॅय केलेल्या चार थिएटर्सची शंभरी…
आपण ज्या सिनेमा थिएटरमध्ये लहानपणापासून ‘पिक्चर’ (तेव्हाचा शब्द) पाहत आलो त्या चित्रपटगृहानी चक्क शंभरी गाठावी हे कोणत्याही ‘सिनेमा ‘प्रेमीसाठी रोमांचित करणारे आहे. यात मी पाहिलेल्या अनेक ‘चित्रपटां’च्या अगणित आठवणी आहेत.
आपल्या देशात दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र ‘ (३ मे १९१३) या पहिल्या चित्रपटाला १०७ वर्षे पूर्ण झाली, याचाच अर्थ त्या काळापासूनची काही थिएटर आजही सुरु आहेत (आणि अगणित थिएटर ‘काळाच्या पडद्याआड’ गेली हेही ओघाने आलेच. काहींच्या तर आज कोणत्याही खाणाखुणा सापडणे अशक्यच).
‘आजही शो सुरु असलेली ‘ थिएटर अशी….,
दक्षिण मुंबई ही जुनी मुंबई, त्यामुळे तेथे ही ‘थिएटर शंभरीत ‘ संस्कृती असणं स्वाभाविक.
ग्रॅंट रोडच्या प्ले हाऊस विभागातील थिएटर संस्कृती एक वेगळा विषय आहे, तेथील राॅयल हे मुंबईतील सर्वात जुने थिएटर आजही कार्यरत आहे. त्याचा रजिस्टर नंबरच एक आहे. यावरुन वेगळे काही सांगायला नकोच. मी गिरगावात राहिल्याने मेन थिएटरचे अनेक चित्रपट तेथून या प्ले हाऊस (त्याला पिला हाऊसही म्हणतात) विभागातील गुलशन, निशात, ताज वगैरे वगैरे थिएटरमध्ये शिफ्ट होत आणि अगदी स्वस्तातल्या तिकीट दरात पाहता येत. सत्तरच्या दशकात येथे स्टाॅल तिकीट पासष्ट पैसे, अप्पर स्टाॅल एक रुपया पाच पैसे, तर बाल्कनी एक रुपया पासष्ट पैसे अथवा कुठे दोन रुपये वीस पैसे असे तिकीट दर होते. थिएटरवर कधीही जावे तर ‘अभ्भी शुरु हुआ’ असे डोअर किपर ओरडत असे. बुकिंग क्लर्कही हेच सांगे. तिकीट काढून आत गेल्यावर समजायचे की मध्यंतरनंतरचा सिनेमा सुरु झाला आहे. त्यामुळे अजिबात विचलित होऊन जाता येत नसे. पुढच्या शोच्या मध्यंतरपर्यंत ते तिकीट चाले. सस्पेन्स फिल्मच्या वेळी ते अगोदरच्या शोच्या शेवटी माहित पडून मग पहिल्यापासून त्या सस्पेन्सनुसार (त्या काळात एकादा नोकर अथवा पुजारी क्लायमॅक्सला खुनी निघे. अथवा पहिल्या दोन तीन दृश्यांनंतर गायब झालेला कोणी तरी एकदम शेवटी दिसे आणि तोच गुन्हेगार असे).
अशी ही ‘सेकंड हाफ पहिला बघा’ संस्कृती कालांतराने गेली. या पिला हाऊसच्या थिएटरमध्ये जुने चित्रपटही अक्षरशः मोठ्या प्रमाणावर रिलीज होत. या रिपिट रनच्या फिल्मनी माझा बराच बॅकलाॅग भरुन काढला.
असेच एक रिपीट रनचे मुंबईतील अतिशय जुने थिएटर म्हणजे गिरगाव धोबीतलावचे एडवर्ड! १९२० सालापासून तेथे आजतागायत चित्रपट रिलीज होत असून त्या एडवर्डचे हे शंभरावे वर्ष सुरु आहे. अर्थात, सध्याच्या कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून सगळीच थिएटर बंद आहेत.
मुंबईत सध्या डाॅ. भडकमकर मार्गावरचे ( लॅमिन्टन रोड) इंपिरियल थिएटर असेच शंभरपेक्षा जास्त वर्षे जुने आहे , ते १९१५ साली सुरु झाले.
साधारण जवळचे ऑपेरा हाऊस थिएटरलाही शंभर वर्षे पूर्ण झाली असली तरी तेथे सुरुवातीला मराठी, हिंदी नाटकांचे, विशेषतः संगीत नाटकाचे वाद्यवृंद यांचे शनिवार रविवारी प्रयोग होत. १९३५ सालापासून ते सिनेमा रिलीज होत गेला आणि मधल्या काळात ते १९९४ ते २०१७ या काळात बंद होते, आता पुन्हा सुरु झाल्यावर तेथे नाट्य प्रयोग आणि मामी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. एडवर्ड थिएटर आणि ऑपेरा हाऊसची गोष्टच वेगळी. दोन्हीत दोन बाल्कनी. मधली बाल्कनी म्हणजे नियमित बाल्कनी. नवश्रीमंत उच्चभ्रू वर्गाला त्याचे तिकीट परवडते असे पूर्वी मानले जाई. तर अगदी वरची बाल्कनी म्हणजे स्टाॅल! तेथून खाली पाहत सिनेमा पाह्यचा म्हणजे दिव्य असे हो. पिटातला पब्लिक म्हणतात तो हाच होता. मला आजही आठवतेय, ऑपेरा हाऊसला १९७० साली ‘दो रास्ते’ साठी आम्ही गल्लीतील पोरं गेलो असता या वरच्या बाल्कनीचे तिकीट एक रुपया होते. प्रत्येकाकडे पाच, दहा अथवा चार आण्याची नाणी होती आणि त्याची बेरीज शंभर पैसे म्हणजे एक रुपया होई. दोघांकडे मात्र प्रत्येकी पाच पैसे कमी होते. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिकीट विंडोच्या बाजूला ते उभे राहिले आणि दोन प्रेक्षकांनी त्यांचे पाच पैसे भरले. पन्नास वर्षांपूर्वी पाच पैशाची किंमत कमी नव्हती. इंपिरियल थिएटरमध्ये तेव्हा पाच पैसे ग्लास पाणी मिळे. घरात/ नात्यात जुन्या पिढीतील कोणी असेल तर विचारा तेव्हा मध्यमवर्गीय मराठी माणसाला महिना सव्वाशे दीडशे रुपये पगार खूप आनंदाची गोष्ट वाटे.
…ते म्हणजे, सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धात राजेश खन्नाची जबरा क्रेझ होती, मग अमिताभ बच्चन आमच्या मनातील आग पडद्यावर ओकत होता. यांच्या काही नवीन चित्रपटानी ऑपेरा हाऊस आणि इंपिरियल थिएटरमध्ये रौप्यमहोत्सवी यश संपादले. अमिताभच्या ‘जंजीर ‘ने इंपिरियलला पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला. त्याचे बेनाम, हेरा फेरी, अंधा कानून, गिरफ्तार येथेच हिट झाले. तर राॅयल आणि एडवर्डला दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, शम्मी कपूर, सुनील दत्त, राजकुमार यांचे जुने चित्रपट वारंवार रिलीज होतात असे लक्षात आले आणि बॅकलाॅग भरुन काढण्याचा सपाटाच लावला.
मी लहानपणी शालेत वयात पाहू न शकलेलो आणि माझ्या जन्मापूर्वीचे अनेक चित्रपट पाह्यची ‘सोनेरी/रुपेरी/चंदेरी ‘ संधी म्हणजे राॅयल व एडवर्ड थिएटर हे मनावर बिंबले. कधी आजूबाजूच्या वडिलांधारांकडून जुन्या चित्रपटाची माहिती मिळे (तोही एक शेजारधर्म, चाळीत राह्यचे असे अगणित फायदे), तर कधी ‘रसरंग ‘, ‘चित्रानंद ‘ साप्ताहिकात, मग झूम, मयूरपंख अशा मासिकात फ्लॅशबॅक, गुजरा हुआ जमाना, वो दिन याद करो, कहा गये वो लोग अशा सदरातून जुन्या हिंदी चित्रपटांची माहिती मिळे.
गिरगावात राहिल्याने ही चारही थिएटर चालत चालत जाऊन गाठता येत. थिएटरला कार पार्किंग असते हे मध्यमवर्गीय कशाला विचारात घेईल? ऑपेरा हाऊसला मात्र पूर्वापार आहे. ऑपेरा हाऊस आणि इंपिरियलचे थिएटर डेकोरेशन अतिशय मोठे आणि तेही पहावेसे वाटे. इंपिरियलच्या तिकीट खिडकीच्या बाजूच्या दोन्ही भिंतीवर राजकुमारचे डायलॉग रंगले की समजायचो येथील ‘कमिंग सून ‘ चित्रपट त्याचाच असणार.
ऑपेरा हाऊसचे पोस्टर डेकोरेशन जास्तच लांबलचक असे. त्यावरुन अर्धा सिनेमा समजले की काय असे वाटे. पण त्या रचनेत सिनेमाचे आकर्षण वाटावे अशी कल्पकता असे. येथे सिनेमा रिलीज म्हणजे जणू सिल्व्हर ज्युबिली नक्कीच. मनोजकुमारचे उपकार, शोर, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान यांनी येथेच ज्युबिली हिट झाले.
इंपिरियल आणि ऑपेरा हाऊसचे सुपर हिटचे तसेच काही फ्लाॅपचे संदर्भ बरेच देता येतील. ऐशीच्या दशकात मी मिडियात आल्यावर ज्या फिल्मचे वेगळे प्रेस शो होत नसत त्यांची मेन थिएटरची तिकीटे आम्हा समिक्षकांना द्यायच्या पध्दतीने या थिएटर्सशी आता माझे नाते बदलले. ‘आखिर क्यू’ तसाच पाह्यला. तर शंभर वर्षांत ऑपेरा हाऊसला एकमेव मराठी चित्रपट रिलीज झाला, तो म्हणजे नवरी मिळे नवर्याला!
ऑपेरा हाऊसचे दोन्ही बाजूला असलेले बाॅक्स हे त्या काळातील वैशिष्ट्य. प्रत्येक बाॅक्समध्ये चार अथवा सहा सीटस, अर्थात फॅमिलीसाठी! एडवर्डमध्ये सतराम रोहरा निर्मित बहुचर्चित ‘जय संतोषी माॅ ‘ ( १९७५) या पौराणिक चित्रपटाने येथे खणखणीत पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला. समोरच पिकेट रोडचा मारुती हेही विशेष! एडवर्डला लाकडी खुर्च्या हे आणि एक वैशिष्ट्य. आणि पाॅलिसीनुसार अगदी वरच्या बाल्कनीची तिकीटे महिला प्रेक्षकांना दिली जात नसत. याचे कारण म्हणजे साडी अथवा दुप्पट्टा यामुळे महिला प्रेक्षकांना त्रास होऊ नये याची काळजी! ते दिवसच वेगळे होते हो.
अर्थात इंग्रजांच्या काळात मुंबईत सुरु झालेल्या थिएटरपैकी ही आहेत आणि त्या सगळ्याची वास्तूरचनाही तशीच त्या काळाची. एडवर्डचा मूळ मालक फाळणीनंतर पाकिस्तानात गेल्याने बिजन भरुचा आणि त्यांची जर्मन पत्नी गभरुचा यांनी या थिएटरची व्यवस्था पाहिली, त्यांच्यानंतर पूनावाला नावाची व्यक्ती होती, मग आणखीन कोणी. हे होतच असते. ऑपेरा हाऊस थिएटर जुन्या काळातील वास्तूशिल्प रचनेचा उत्तम दाखला. आजही ती इमारत मजबूत आहे. इंपिरियलचे तीन चार बाजूंना असणारे दोन हत्ती हे विशेषच. जुन्या पिढीतील अनेक जण या थिएटरला दोन हत्ती म्हणूनच ओळखत!
दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या विभागात ही चारही थिएटर चालत चालत आज शंभरीपार झालीत. ती आणखीन अधिकाधिक काळ चालत रहावीत अशीच शुभेच्छा! माझ्या तर या प्रत्येकाशी जुन्या आठवणीसह भावनिक नाते आहे. मल्टीप्लेक्सच्या युगात अनेक जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद होत चाललीत, काही टिकून आहेत. सिनेमाच्या इतिहासासोबत या थिएटर्सची वाटचाल सुरु आहे. आपण ज्या सिनेमा थिएटरमध्ये लहानपणापासून पिक्चर एन्जाॅय केला ती दीर्घायुषी ठरल्याचा आनंद आहेच…!