महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
दिल्लगीला २५ वर्ष पूर्ण
आश्चर्य पहिले
धर्मेंद्रच्या प्रगती पुस्तकात त्याच्या अफेअर्सपासून (मीनाकुमारी वगैरे) त्याने उंची दारु पिण्यापर्यंतचे किस्से बरेच. (अधूनमधून तो दारु सोडल्याच्या “ब्रेकिंग न्यूज” येत जात.) त्याने जुहू समुद्र किनाऱ्याजवळ सनी सुपर साऊंड असा रेकाॅर्डिंग स्टुडिओ / मिनी थिएटर उभारले यापासून तो आपल्या फार्महाऊसवर रमतो अशा गोष्टी अनेक. यासाठी त्याला जास्त गुण द्यावेत. पण तो कधीच दिग्दर्शक होण्याच्या भानगडीत पडला नाही. त्याच्या स्वभावात ते बसणारे, शोभणारे, झेपणारे नव्हते. ते व्हीजनच वेगळे. पडद्यावर ही मॅन असला तरी प्रत्यक्षात खूप संवेदनशील आहे. (ऐशीच्या दशकात त्याची भूमिका असलेल्या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग रिपोर्टिंगसाठी गेल्यावर तसा प्रत्यय येई..अनुभव येई.) (Dillagi)
तो निर्माता मात्र झाला. विजयता फिल्म हे त्याचेच बॅनर. सनी देओलने याच बॅनरखालील राहुल रवैल दिग्दर्शित “बेताब” (१९८३) पासून तर बाॅबी देओलने राजकुमार संतोषी दिग्दर्शित “बरसात“(१९९५) पासून चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकले. याच बॅनरखाली सनी देओलने चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले आणि “दिल्लगी” (Dillagi) रुपेरी पडद्यावर आणला. म्हटलं तर सनी देओलने धर्मेंद्रपेक्षा एक पाऊल पुढे टाकले. पण पुढे पडलेच नाही.
आश्चर्य दुसरे
सनी देओल “दिल्लगी” (Dillagi) च्या दिग्दर्शनात पूर्णपणे गुंतला. चित्रपट माध्यम व व्यवसायबाबत तो खूप गंभीर. उगाच चित्रपटाची संख्या वाढवण्यात, गाॅसिप्स मॅगझिनमधून चमकत राहण्यात त्याला रस नव्हताच. “दिल्लगी” पूर्ण होताच त्याने काही मान्यवरांसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीतील मिनी थिएटरमध्ये ट्रायलचे आयोजन केले. त्यात एक विशेष पाहुणे दिलीप कुमार व सायरा बानू.
धर्मेंद्र लहानपणापासूनच निस्सीम दिलीप कुमार भक्त आणि चित्रपटसृष्टीत आल्यावर तर त्या भक्तीचा प्रत्यय देण्याची संधीही त्याला मिळाली. दिलीप कुमारचा मोलाचा आशीर्वाद ही सनी देओलसाठी खूपच मोठी भावनिक गोष्ट होती, देणगी होती. चित्रपट संपला, एकेक पाहुणा सनी देओलचे कौतुक करत करत हळूहळू बाहेर पडला. (नवीन चित्रपटाची ट्रायल हा एक प्रकारचा कौतुक देण्याघेण्याचा सोहळा असतो)
दिलीप कुमार यांना बोलण्याची/ सांगण्याची/ ऐकण्याची कधीही घाई नसे. बोलण्यापूर्वी अगदी शांत शांत असणार. अशाने आपले कुतूहल विलक्षण वाढते आणि मग उर्दूमिश्रित हिंदीत छान कौतुक करणार. चांगल्या शब्दांची निवड करीत ते बोलत. सनी देओलला हा अनुभव कमालीचा रोमांचित करणारा. खुद्द दिलीप कुमारकडून आपण दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटाचे मनापासून कौतुक होतेय हे त्याला आयुष्यभर फारच सुखावणारे.
आश्चर्य तिसरे
“दिल्लगी” (Dillagi) मुंबईत १८ नोव्हेंबर १९९९ रोजी प्रदर्शित झाला. त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली देखील. (त्यानिमित्तच हा फोकस) मुंबईत मेन थिएटर मेट्रो. (येथे पहिल्यापासूनच गुरुवारी चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रथा). मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना मेट्रोतील फर्स्ट डे फर्स्ट शोची बाल्कनीची तिकीटे दिली. सनी देओलचे पहिलेच दिग्दर्शन म्हणून उत्सुकता होतीच आणि हा चित्रपट सेटवर असतानाच उर्मिला मातोंडकरच्या मुलाखतीचा योग आला असता तिने सनीच्या दिग्दर्शन शैलीचे कौतुक केल्याने माझी उत्सुकता वाढलेली. मी मिडियात असलो आणि समीक्षक असलो तरी आपण एक प्रेक्षक आहोत (फिल्म दीवाना म्हटलं तरी चालेल) याचे मला कायमच भान.
चित्रपट सुरु झाला. रणवीर सिंग उर्फ वीर ( सनी देओल) आणि राजवीर सिंग उर्फ राॅकी (बाॅबी देओल) हे एकमेकांवर बेहद्द प्रेम करणारे सख्खे भाऊ. (खरे भाऊ पडद्यावरही भाऊ, त्यामुळे गोष्ट पटकन लक्षात आली) राॅकीचं मन आपल्याच काॅलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या शालिनीवर (उर्मिला मातोंडकर) बसते. वीरलाही शालिनीच आवडत असते आणि तिचंही वीरवर प्रेम आहे. शालिनीने आपली भावना लक्षात घेतली नाही असे राॅकीचे दु:ख. तो मनातल्यामनात चरफडत राहतो, दु:खी होतो. आणि वीर व शालिनी लग्न करतात…
चित्रपट पाहत असतानाच यातील अनेक प्रसंग, गोष्टी अलिकडेच कोणत्या तरी चित्रपटात पाहिल्यात असे सतत वाटत होते. मध्यंतरला समोसा खात असताना लक्षात आले, हे सगळेच आपण सुभाष सैगल दिग्दर्शित “प्यार कोई खेल नही” या चित्रपटात पाहिलयं. (मेट्रो चित्रपटगृहातील समोसा म्हणूनच मला आवडतो. तो अशा आठवणी देतो) त्यातही सनी देओलच नायक. त्याच्या भावाच्या भूमिकेत अपूर्व अग्निहोत्री आणि दोघेही एकाच युवतीच्या प्रेमात पडतात. ती असते, महिमा चौधरी. गंमत म्हणजे प्यार कोई… ३० जुलै १९९९ रोजी प्रदर्शित झाला तो फर्स्ट शोपासूनच पब्लिकने नाकारला आणि अवघ्या साडेतीन महिन्यांतच तोच सनी देओल, तेच प्रेम, तसाच भाऊ आणि तशीच गोष्ट. मध्यंतरानंतर मात्र दोन्ही चित्रपटांचे रस्ते वेगळे. त्यात रंगतदार असे काहीही नाहीच.
आपण एकाच वेळेस एकाच गोष्टीवरील दोन चित्रपटात काम करतोय हे सनी देओलच्या लक्षात येवू नये की आपण दिग्दर्शित करत असलेला चित्रपट भारी मनोरंजक ठरेल असा त्याचा विश्वास? मला चांगलेच आठवतेय, पहिल्या खेळाचा पब्लिक बाहेर पडतानाच बोअर है, कुछ खास नही असे ओरडत होती. पैसे देऊन तिकीट काढलेल्या रसिकांस असे मोकळेपणाने व्यक्त होण्याचा हक्क आहेच. तोच खरा समिक्षक. उत्पन्नाच्या फुगवलेल्या आकड्यापेक्षा हीच खरी प्रतिक्रिया.
“दिल्लगी” (Dillagi) ला रसिकांनी नाकारल्याने तो फ्लाॅप.
सनी देओलला या अपयशाचे आश्चर्य वाटले. आपण अतिशय मनापासून, प्रेमाने चित्रपट दिग्दर्शित करुनही असे व्हावे हा त्याला मोठाच धक्का होता आणि अशातच एका मुलाखतीत तो म्हणाला, चित्रपटाची ट्रायल पाहून दिलीप कुमार बरेच प्रभावित झाले होते. तरीही चित्रपट अपयशी ठरावा?
==============
हे देखील वाचा : ‘आंधळा मारतो डोळा’ ५१ वर्ष पूर्ण
==============
सनी देओलला तोपर्यंत तरी चित्रपटसृष्टीतील अनेक अलिखित नियम माहित नसावेत, चित्रपट चांगला असो की वाईट, त्याची ट्रायल संपल्यानंतर “तारीफ पे तारीफ“च करायची असते…. ही प्रथा आता सर्वच सामाजिक सांस्कृतिक गोष्टीत आलीय.
धर्मेंद्रच्या अनेक गुणांना मी दाद देतो, त्यातील एक म्हणजे तो दिग्दर्शनात “पडला” नाही. खरं तर त्याच्याकडे मोहन सैगलपासून (देवर इत्यादी) ह्रषिकेश मुखर्जीपर्यंत (चुपके चुपके इत्यादी) आणि प्रमोद चक्रवर्तीपासून (नया जमाना, जुगनू इत्यादी) रमेश सिप्पीपर्यंत (शोले इत्यादी) अनेक दिग्दर्शकांकडचा अनुभव. म्हणून आपणही दिग्दर्शक बनूया असे त्याला कधीच वाटले नाही.
सनी देओलने आपल्या पित्याचा हा गुण घ्यायला हवा होता….त्याने आपल्या पित्याच्या चित्रपटाचे नाव घेतले. (बासू चटर्जी दिग्दर्शित “दिल्लगी” (Dillagi) मध्ये धर्मेंद्र व हेमा मालिनी होते. तो बासुदा शैलीतील खुमासदार शैलीतील चित्रपट होता) पण चांगला गुण दुर्लक्षित केला…