दिल्लीची ती कडाक्याची थंडी… डिंपल खन्ना
प्रचंड मिडिया हाईपमुळे समिक्षक आणि प्रेक्षकांत जबरदस्त अपेक्षा वाढलेला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनपेक्षितपणे काही दिवस अगोदरच ट्रायललाच पहायला मिळणे अगदी शहारून टाकणारा अनुभव असतो अगदी तश्शीच ही आठवण….
जानेवारी महिना म्हणजे उत्तर भारतात प्रचंड कडाक्याची थंडी! अशातच दर वर्षाआड नवी दिल्ली येथे भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन (आता नोव्हेंबरमध्ये गोव्यातील पणजीत तो रंगतो). १९८६ साली मी सर्वप्रथम यानिमित्ताने भरणारी ‘देशविदेशातील चित्रपटाची जत्रा’ अनुभवली. (त्यातील बरेचसे चित्रपट अजूनही समजले नाहीत तो विषयच वेगळा).
सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये महोत्सवाच्या संध्याकाळच्या उदघाटन सोहळ्यास हिंदी चित्रपटसृष्टीतील बडे स्टार्स येणार याची खात्री होतीच. पण सकाळी आपल्या ड्राॅवरमध्ये आलेली काही माहिती पुस्तिका वगैरे गोळा करून मुख्य इमारतीबाहेर आलो आणि समोरच मुख्य गेटकडे लक्ष गेलो. आणि पटकन लक्षात आले ‘ही तर डिंपल कपाडिया’…. चक्क! क्षणभर खरंच वाटले नाही तरी ते खरेच होते. मेकअपशिवायही ती ग्लॅमरस होती, ती पुढे चालत येत असतानाच तेव्हाच्या माझ्या उत्साही स्वभावानुसार पुढे झालो आणि चक्क मराठीत बोलायला लागलो (डिंपल चांगले मराठी बोलते हे तोपर्यंत माहित झाले होते). चित्रपट महोत्सवाबाबत काही प्रश्न विचारायचेत…. मी पत्रकार असल्याचे गळ्यातील ओळखपत्र दाखवत म्हणालो. तिने नजरेनेच हो म्हटले, पण पटकन एक दोनच प्रश्न विचारा म्हणाली. ते दिवस प्रामुख्याने प्रिन्ट मिडियाचे होते, आणि फोटोग्राफरही व्यावसायिक शिस्त पाळत फ्लॅश उडवत आणि महत्वाचे म्हणजे हा फेस्टीवल माहोल असल्याने मिडिया आणि स्टार यांच्यात संवाद ही स्वाभाविक गोष्ट होती. डिंपलच्या बोलण्यात लक्षात आले की ती संध्याकाळच्या इव्हेन्टसची कबिर बेदीसोबत निवेदिका आहे, त्याच्या ट्रायलसाठी ती आता सकाळी आली आहे…..
आपण दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत आहोत याचा विसर पडावा अशी ही भेट झाली. शालेय वयात राज कपूरच्या ‘बॉबी’ ( १९७३)तील डिंपलचा उत्फूर्त आणि धाडसी अभिनय, त्यामुळेच तिच्या ग्लॅमरस रुपाचा पडदाभरचा प्रभाव, तिची अफाट लोकप्रियता, राजेश खन्नाने अगदी अनपेक्षितपणे तिच्याशी लग्न करुन उडवलेली खळबळ, त्यावरून तेव्हाच्या मिडियात भरपूर काही लिहून आलेल्या गोष्टी/दंतकथा वगैरे वगैरे बरेच काही याक्षणी डोळ्यासमोर आले….
ऐंशीच्या दशकात डिंपलची भूमिका असलेल्या ‘इन्साफ’, ‘जखमी औरत’, ‘इन्सानियत के दुश्मन’ अशा काही चित्रपटांच्या मुहूर्ताला ‘शूटिंग कव्हरेज’ साठी हजर राहिल्याचे अनुभव भरभरून मजकूर लिहिण्याची संधी ठरले आणि १९८८ सालच्या सुरुवातीला एका दिवशी हाती आमंत्रण आले, राजेश खन्ना निर्मित ‘जय शिव शंकर’ या चित्रपटाचा गोरेगावच्या फिल्म सिटीच्या देवळात मुहूर्त. विशेष म्हणजे प्रमुख भूमिकेत राजेश खन्ना आणि डिंपल ( त्यासह जितेंद्र, पूनम धिल्लाॅन, चंकी पांडे वगैरे). त्या काळात हे पती पत्नी एकमेकांपासून वेगळे राहत होते (त्यावर खमंग/तिखट/खारट केवढे गॉसिप्स!!) पण नायक नायिका म्हणून एकत्र भूमिका करु शकत होते (अस्सल व्यावसायिकता म्हणतात ती हीच, घरातले भांडण सेटवर आणायचे नाही).
हा मुहूर्त म्हणजे आम्हा मिडियाला चंगळ होती. खूपच दिवसांनी राजेश खन्ना आणि डिंपल पती पत्नी एकत्र म्हणून फोटोग्राफर फ्लॅश उडवायला कंटाळणे शक्यच नव्हते आणि मग दिवसभर शूटिंग असल्याने राजेश आणि डिंपलने जवळपास प्रत्येक पत्रकाराशी संवाद साधला. (तेव्हा मिडिया मोजकाच असे.) डिंपलला फार मोठी मुलाखत देण्याचा कंटाळा असे, पण हा घरचाच चित्रपट असल्याने थोडी सवय मोडली हे वेगळे सांगायला नकोच…. फरक इतकाच की, मुंबईत जानेवारीत दिल्लीइतकी थंडी नसते. पण सिनेपत्रकारीतेत बाराही महिने दिलखुलास मौसम असतो, तो अनुभवायची मानसिकता हवी.
दिलीप ठाकूर